অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

राज्यपाल

राज्यपाल

राज्यपाल : भारतातील घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख. गर्व्हनर या इंग्रजी संज्ञेचा राज्यपाल हा मराठी पर्याय आहे. सामान्यपणे देशांतील घटक राज्याचा प्रमुख म्हणून राज्यपालाचे पद अनेक देशांत आढळते. एके काळी ब्रिटिश, फ्रेंच, पोर्तुगीज, डच इ. साम्राज्यातील वसाहतींचा कारभार राज्यपालांकडे असे. ब्रिटिश काळात भारतातील प्रांतिक कारभार गव्हर्नरकडे असे आणि सर्व देशाचा घटनात्मक प्रमुख म्हणून गव्हर्नर जनरल असे. भारतीय संविधानानुसार राष्ट्रपतींचा प्रतिनिधी या नात्याने राज्यपाल काम करीत असतो.

संविधानातील १५३ ते १६७ या अनुच्छेदांतून राज्यपालांसंबंधी वैधानिक तरतुदी केलेल्या आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शिफारशीवरून घटक राज्याच्या राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपतींकडून केली जाते. राज्यपाल हा केंद्रशासन व घटक राज्य यांना जोडणारा दुवा असून त्यांद्वारे भारतीय संघराज्यामधील राजकीय एकात्मीकरण साधण्यात येते. घटक राज्याची सर्व प्रकारची शासकीय कारवाई राज्यपालांच्या नावे करण्यात येते.

घटक राज्याचा प्रमुख या नात्याने राज्यपालाचे अधिकार हे राज्यापुरतेच मर्यादित आसतात. राज्याचा घटनात्मक प्रमुख या नात्याने राज्याचे मुख्यमंत्री, इतर मंत्री, राज्याच्या लोकसेवा आयोगाचे सभासद इत्यादींची नियुक्ती करण्याचा अधिकार राज्यपालांना आहे. तसेच घटक राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखणे व ती परिस्थिती धोक्यात आली असता किंवा घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाल्यांनतर वा घटनात्मक राज्यशासन कोलमडून पडले असल्यास, घटनेच्या ३५६ व्या अनुच्छेदानुसार राज्यपाल राष्ट्रपतींकडे त्यांसबंधीचा अहवाल सादर करतात व त्याबाबत राष्ट्रपतींचे समाधान झाले, तर राष्ट्रपती त्या घटक राज्यात राष्ट्रपती राजवट आणू शकतात.

याव्यतिरिक्त, राज्यातील विधिमंडळाची बैठक निमंत्रित करणे अथवा तहकूब करणे, विधान सभेत अँग्लो-इंडियन जमातीचा प्रतिनिधी नसल्यास तो नियुक्त करणे, विधान परिषदेतील इतर एक-षष्ठांश सभासदांची नियुक्ती करणे, राज्य विधिमंडळाचे कामकाज चालू नसताना वटहुकूम काढणे, जिल्हा न्यायाधीश व इतर नयायालयीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे, इ. महत्वाचे अधिकार राज्यपालांना असतात. सर्वसामान्य परिस्थितीमध्ये हे सर्व अधिकार राज्य मंत्रिमंडळाच्या सल्यानुसारच राज्यपालांना वापरता येतात; पण नवनिर्वाचीत विधानसभेत कोणत्याच राजकीय पक्षास स्पष्ट बहुमत सिद्ध होत नसल्यास अशा अपवादभूत परिस्थितीत राज्यपालांच्या अधिकारांचे महत्त्व खूपच वाढते. स्वातंत्र्योत्तर काळात सुरुवातीस संस्थान प्रमुखास राज्यपाल- गव्हर्नर असे म्हणत.

वसाहतप्रमुखाची नियुक्ती इंग्लंडचा राजा वा राणी यांच्याकडून होते. त्यांना राज्यपाल वा गव्हर्नरच म्हणतात.

अमेरिकेतील संयुक्त संस्थानांतील राज्यांचा राज्यपाल लोकनिर्वाचित असतो. ब्राझील व मेक्सिको या देशांतील राज्यपालांची निवडही अमेरिकेप्रमाणेच लोकांमार्फत करण्यात येते.

 

लेखक - यशवंत सुमंत

स्त्रोत - मराठी विश्वकोश

 

 

अंतिम सुधारित : 7/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate