অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

घातक खेळण्यांपासून सावधान

 

सांगली जिल्ह्यात घडलेली एक घटना.

 

विट्याजवळच्या धानवड गावात शुभम सुरेश राजमाने हा पाच वर्षाचा मुलगा चिनी बनावटीचा व्हिडिओ गेम खेळत होता. त्याच्या सोलापूरच्या मामानं दीड महिन्यापूर्वी त्याला हा व्हिडिओ गेम आणून दिला होता. बाहेर खूप ऊन पडलं होतं. त्यामुळे शुभमच्या आईनं त्याला बाहेर जाऊ नको म्हणून बजावलं होतं. शुभम व्हिडिओ गेम खेळत होता,तिथेच त्याची आजी भाजी निवडत बसली होती.

अचानक टायर बर्स्ट झाल्यासारखा आवाज आला. आजीनं चमकून बघितलं, तर शुभम रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला होता. त्याच्या हातातल्या खेळण्याचा स्फोट होऊन खेळण्याचे तुकडे तुकडे झाले होते. शुभमला तातडीनं दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली; पण ते शुभमला वाचवू शकले नाहीत. तुटून उडालेले खेळण्याचे धारदार तुकडे शुभमच्या फुफ्फुसात शिरले होते. त्यातल्या एका तुकड्यानं त्याच्या हृदयाची रक्तवाहिनी तुटली आणि हसत्याखेळत्या शुभमचं आयुष्यच संपलं.

शुभमच्या मृत्यूची कथा मोठी हृदयद्रावकच म्हणायला हवी. का झालं असेल हे असं? तो पाच वर्षाचा असून व्हिडिओ गेम खेळत होता म्हणून?त्याच्याकडे कोणाचं लक्ष नव्हतं म्हणून? त्याला दिलेलं खेळणं सुरक्षित राहिलं नव्हतं म्हणून? खेळणी सुरक्षितपणे वापरण्याच्या सूचना खेळण्यावर नव्हत्या म्हणून?खेळण्यांमधल्या बॅटर्‍या आणि खेळणं बनवण्यासाठी वापरलेलं साहित्य दज्रेदार नव्हतं म्हणून?
यापैकी एक किंवा अनेक कारणं एकत्र येऊन शुभमचा मृत्यू झाला.शुभमच्या मृत्यूसारख्या घटना तशा विरळच असतात.कोट्यवधी मुलं बॅटरीवर चालणारे व्हिडिओ गेम खेळत असतात, त्यातल्या किती मुलांच्या वाट्याला शुभमचं दुर्दैव येतं?
लगेच अगदी घाबरून जाऊ नये हे खरं, पण म्हणून आपल्या मुलांभोवती पसरलेल्या धोक्यांचा विचारही करू नये, हे काही शहाणपणाचं नाही. म्हणूनच तो विचार आज करूया! 

चीन-युरोप-अमेरिका यांनी खेळण्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं जागरूकता दाखवायला २00७ पासून सुरुवात केली आहे. भारत सरकार ते कधी करणार? सरकारनं काही हालचाल करायला काही काळ लागेल कदाचित, पण तोपर्यंत आपण आपल्या बाळांना सुरक्षित खेळणी देऊ आणि खेळणी सुरक्षितपणे कशी खेळायची हेही करून दाखवू.

खेळण्यांच्या पोटातली पेटती बॅटरी

 

आपण रिचार्जेबल बॅटरी सहजपणे वापरतो. सेलफोनमधली बॅटरी रिचार्जेबल असते. आपण सेलफोनवर आठ-दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ बोललो की, आपला सेलफोन गरम झालेला तुमच्या लक्षात आला आहे का? या बॅटरीमधून बराच काळ वीज काढून घेतली की बॅटरी गरम होते. शुभमही बराच वेळ व्हिडिओ गेम खेळत असणार. त्यामुळे बॅटरी गरम झाली असण्याची शक्यता आहे.

अशा कमी दर्जाच्या बॅटर्‍यांवर प्रयोग केले तेव्हा असं आढळलं की, बॅटरी वापरायला सुरुवात करताना त्यातून मोठय़ा प्रमाणात वीज खेचली जाते आणि त्यामुळे बॅटरीचं तपमान अक्षरश: २0 ते ४0 सेकंदांत उकळत्या पाण्याच्या तपमानाइतकं होतं. बॅटरीचं कवच कमी दर्जाचं असेल तर ते बॅटरीच्या आतल्या उकळत्या द्रव्याच्या वाफेचा दाब सहन करू शकत नाही. ते फुटतं आणि आतल्या उकळत्या अँसिडमुळे बॅटरीच्या बाहेरची खेळणी, सेलफोन अशा वस्तू स्फोटानं विदीर्ण पावतात. त्यांचे तुकडे तुकडे होतात. खेळण्याचे अन्य भाग ज्वलनशीलही असू शकतात. प्लॅस्टिक पेट घेतं. डोळे लुक लुक करणार्‍या खेळण्याच्या लुकलुकत्या डोळ्यात असणारा पारदर्शक पदार्थ केरोसिन (रॉकेल) असू शकतो.

मुलं चघळतात ते विषारी प्लॅस्टिक

 

खेळणी बनवण्यासाठी वापरलं गेलेलं प्लॅस्टिक कोणत्या पदार्थाचं बनलं आहे?
पॉलिविनाईल क्लोराईडपासून प्लॅस्टिक बनतं. त्याचे गुणधर्म वाढवण्यासाठी त्यात वेगवेगळ्या प्रकारची थॅलेट (phthalate) प्रकारातील रसायनं मिसळतात. थॅलेट प्रकारातल्या रसायनांचा अंश एक कोटी भागात शंभर इतका कमी असला तरी ते जीवाला घातक ठरतं. आपली लहान मुलं तर प्लॅस्टिकची खेळणी चघळतात, चावतात, तोंडात घालतात. त्यांच्या लाळेबरोबर अल्प मात्रेत थॅलेट त्यांच्या पोटात जाऊ शकतात. त्याचं प्रमाण खूपच जास्त असेल तर लगेच परिणाम होईल; पण प्रमाण कमी असेल तर या विषाचे अणू-रेणू आपल्या बाळाच्या शरीरात साठत साठत जातील. शरीराच्या काही भागांना ते पोखरूही लागतील.


खेळण्यातले छोटो छोटे भाग, लोहचुंबके


मुलं खेळण्यांशी खेळताना बरीच ओढाताण करतात. कारण त्यांना खेळण्याबद्दल अतिशय कुतुहल असतं. अशावेळी खेळणं छोट्या छोट्या भागांनी बनलं असेल तर? असे छोटे भाग खेळण्यापासून सैल होऊन निघून येऊ शकतात. खिळे, स्क्रू, तुकडे, टोकदार भाग, मणी, गोट्या असे भाग नाकात,घशात, कानात जाऊन अडकू शकतात. कदाचित श्‍वास गुदमरून मृत्यूही येऊ शकतो. आजकाल काही खेळण्यांमध्ये छोटे छोटे लोहचुंबक वापरलेले असतात. त्यातले काही खेळता खेळता बाळ तोंडात टाकू शकतं. लोहचुंबकामध्ये एकमेकांबरोबर जोरानं चिकटण्याची काही ठिकाणं असतात. असे दोन लोहचुंबक पोटातल्या वेगवेगळ्या भागांत गेले आणि एकमेकांकडे आकर्षित होऊन चिकटले की पोटातल्या भागांमध्ये चिमटे बसतात, पीळ पडतो, पचनव्यवस्था त्रासदायक होते.


बाहुल्यांच्या दागिन्यांची चमकी


·         रंगीबेरंगी चकचकीत दागदागिने खेळण्यात वापरण्यासाठी बाजारात विकत मिळतात. बाहुल्यांचे दागिने, कपडे यावर चमकी वापरलेली असते. ती फुफ्फुसात आत जाऊन अडकून बसते. त्यामुळे पुढे फुफ्फुसात बारीक फोड, पू वगैरे होण्याची शक्यता असते. अशाच प्रकारची चमकी साडीवर,कपड्यांवर, लग्नाच्या पत्रिकेवर चिकटवण्याची एक घातक प्रथा पडत चालली आहे, ती आपण थांबवली पाहिजे.


आकर्षक. पण जीवघेणे रंग


मुलांसाठीची खेळणी आकर्षक करण्यासाठी भडक रंग वापरले जातात. यापैकी कितीतरी रंगांची रसायनं-शिसं किंवा लीड या नावाच्या मूलद्रव्यापासून बनलेली असतात. शिशाची संयुगं आरोग्याला हानिकारक आहेत. लहान मुलांमध्ये त्यांचा परिणाम लवकर होतो. एक कोटी भागांपैकी दहा भाग इतक्या अत्यल्प प्रमाणात असलेल्या शिशाच्या संयुगांमुळे मेंदूवर आणि मज्जासंस्थेवर कायमचे विपरीत परिणाम होतात. मुलांची बौद्धिक आणि मानसिक वाढ खुंटू शकते.
आकर्षक रंग करण्यासाठी शिशाच्या संयुगाचा वापर करणं बंद केलं पाहिजे. लहान मुलांच्या खेळण्यात शिशाच्या रंगांचा वापर करण्यावर सरकार बंदी घालू शकतं तशी बंदी घातली पाहिजे.

धोके आणि दक्षता

 

  • खेळण्यांपासून मुलांना त्रास होऊ नये म्हणून खेळण्यांची यांत्रिक तपासणी केली पाहिजे.
  • त्याच्या ज्वलनशीलतेची तपासणी केली पाहिजे.
  • खेळण्याचा वापर करताना निर्माण होऊ शकणार्‍या विद्युत धोक्याची तपासणी केली पाहिजे.
  • खेळण्याच्या रासायनिक गुणवत्तेचीही तपासणी केली पाहिजे.
  • आरोग्याला घातक तसेच खेळताना धोकादायक ठरणार्‍या गोष्टींवर बंदी आणतात, त्याप्रमाणे अशी खेळणी बाजारात येता कामा नये.
  • कोणतं खेळणं कोणत्या वयाच्या बालकांना खेळण्यासाठी बनवलं आहे ते त्याच्या खोक्यावर स्पष्टपणे छापलेलं असलं पाहिजे.
  • खेळणं खेळताना कोणती काळजी घ्यावी याबद्दलही माहितीपत्रक सोबत सहज वाचता येईल इतक्या मोठय़ा टाइपात छापलेलं असलं पाहिजे.
  • आणि मुख्य म्हणजे, आपल्या मुलांच्या आनंदासाठी वाट्टेल ते करायला तयार असलेल्या पालकांनी या सूचना वाचून त्या काटेकोरपणे पाळल्या पाहिजेत.



लेखक : विनय र. र.

स्त्रोत : मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग

 

अंतिम सुधारित : 6/6/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate