অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जेम्स ब्रायंट कोनंट

जेम्स ब्रायंट कोनंट

जन्म : २६ मार्च १८९३

अमेरिकन शिक्षणतज्ञ आणि रसायनशास्त्रज्ञ. यांचा जन्म डॉर्चेस्टर (मॅसॅचूसेट्‌स) येथे झाला. हार्व्हर्ड विद्यापीठाची पीएच्.डी.पदवी त्यांनी १९१६ मध्ये मिळविली. त्यांनी पहिल्या महायुध्दात अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या रासायनिक युद्धतंत्र खात्यात १९१७–१८ मध्ये संशोधन कार्य केले. नंतर हार्व्हर्ड विद्यापीठात रसायनशास्त्राचे अध्यापक म्हणून व १९२७ मध्ये कार्बनी रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. १९३३ मध्ये हार्व्हर्ड विद्यापीठाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. दुसऱ्या महायुध्दाच्या काळात अमेरिकेच्या युध्दखात्याच्या विज्ञान विभागाची रचना करण्यात त्यांनी महत्त्वाचे कार्य केले. दुसऱ्या महायुध्दानंतर ते नॅशनल सायन्स फाउंडेशन व अ‍ॅटॉमिक एनर्जी कमिशन यांचे जेष्ठ सल्लागार होते.१९५३ मध्ये प. जर्मनीत अमेरिकेच्या वकिलातीतील उच्च पदाधिकारी आणि १९५५ मध्ये राजदूत म्हणून त्यांनी काम केले. १९५७ मध्ये अमेरिकेस परत आल्यावर ते शैक्षणिक क्षेत्रात काम करू लागले. कार्नेगी कॉर्पोरेशनतर्फे त्यांनी अमेकिरेतील उच्च शालेय शिक्षणासंबंधी तसेच शिक्षकांच्या प्रशिक्षणासंबंधी सर्वेक्षण कार्य केले. फोर्ड फाउंडेशनचे प. जर्मनीमधील शैक्षणिक सल्लागार म्हणून त्यांनी १९६३–६५ मध्ये काम केले.

मुक्त मूलके (सामान्यतः इतर अणूंशी संयोग पावलेल्या अवस्थेत अस्तित्वात असणारे पण विशिष्ट परिस्थितीत स्वतंत्र अस्तित्व असणारे अणुगट), हरितद्रव्याची रासायनिक संरचना व कार्बनी विक्रियांचा परिमाणात्मक (वजनी प्रमाणाच्या दृष्टीने) अभ्यास ह्यांसंबंधी त्यांनी विशेष संशोधन केले.

प्रॅक्टीकल केमिस्ट्री  (१९२०) हे एन्.एच्. ब्लॅक यांच्या बरोबरकेमिस्ट्री ऑफ ऑर्‌गॅनिक कांपाउंडस (१९३३), सायन्स अँड कॉमनसेन्स (१९५१),मॉडर्न सायन्स अँड मॉडर्न मॅन (१९५२),एज्युकेशन अँड लिबर्टी  (१९५३), द अमेरिकन हायस्कूल टुडे (१९५९),सबर्बस अँड स्लम्स (१९६१), टू मोड्स ऑफ थॉट (१९६४) इ. पुस्तके तसेच शैक्षणिक अहवाल व शास्त्रीय शिक्षण न घेतलेल्यांसाठीऑन अंडरस्टँडिंग सायन्स या मालेत बरेच लेख त्यांनी लिहिले.

लेखक : भू.चिं.मिठारी

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 3/11/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate