অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मुंगी

मुंगी

मुंग्या माश्यांप्रमाणे सर्वांना परिचित असून जगातील सर्व देशांत आढळतात. फार पुरातन कालापासून मानवाच्या सन्निध राहिलेल्या या कीटकाबद्दलचे उल्लेख वेदादी प्राचीन ग्रंथांतून आपणास आढळतात. मुंग्या बहुतकरून जमिनीतील वारुळात राहत असल्याने त्यांचा रोजचा जीवनक्रम समजण्यास फार कठीण जाते. तसेच त्या बहुतकरून जमावाने राहतात म्हणून शेकडो मुंग्यांत एकाच मुंगीवर नजर ठेवून तिच्या हालचालीवर लक्ष ठेवणेही अशक्य होते. ह्या दोन प्रमुख अडचणींमुळे यांच्या निरनिराळ्या सवयींचा तपशीलवार अभ्यास अद्याप व्हावयाचा आहे. त्यासंबंधी निरनिराळ्या शास्त्रज्ञांचे संशोधन चालू आहे. मुंगीच्या बाह्य व आंतररचनेसंबंधी बरीच माहिती प्रसिद्ध झाली आहे. मुंग्यांच्या अभ्यासाच्या शास्त्राला ‘पिपीलिकाविज्ञान’ (मर्मिकॉलॉजी) असे म्हणतात.

वर्गीकरण मुंगी हा कीटक हायमेनॉप्टेरा या गणाच्या फॉर्मिसिडी या कुलातील आहे. हायमेनॉप्टेरा या गणात मधमाश्या, गांधील माश्या, भुंगे इ. कीटकांचा समावेश होतो. मुंग्या इतरांपेक्षा जास्त उद्योगी, कष्टाळू, शिस्तप्रिय, कार्यतत्पर व हुशार समजल्या जातात. फॉर्मिसिडी या कुलातील मुंग्या फॉर्मिसिनी, डोरिलिनी, पोनेरिनी, मर्मिसिनी इ. सात उपकुलांत वर्गीकृत केल्या आहेत. जगातील मुग्यांच्या सु. १०,००० जातींची नोंद झाली असून भारतातच जवळजवळ १,००० जातींच्या मुंग्या आहेत. प्रत्येक जातीच्या मुंग्यांच्या सवयी आणि वर्तनक्रम यांत बराच फरक दिसून येतो. मुंगळा म्हणजे एक प्रकारची मोठ्या आकारमानाची मुंगीच असून त्याचे शास्त्रीय नाव कँपोनोटस काँप्रेसस(फॉर्मिसिडी कुल) असे आहे. नेहमी घरात आढळणाऱ्या मुंगळ्यांची रांग ही कामकरी प्रकारची असे.

तीन कोटी वर्षांपूर्वी मुंग्या वसाहती करून राहत असत व त्यांच्या वसाहतीत सामाजिक जीवनही अस्तित्वात होते. त्यावेळी मानवाचा पृथ्वीवर उदयही झाला नव्हता. मुंग्यांच्या सामाजिक जीवनात निरनिराळ्या जाती अस्तित्वात आहेत. प्रत्येक जात एक विशिष्ट काम करते. त्यांच्या सामाजिक जीवनात व्यक्तीस स्थान नसते. त्यांच्या समाजात एक प्रकारची शेती करणाऱ्या, प्राणिसंवर्धन करणाऱ्या, लढणाऱ्या, गुलामगिरी करणाऱ्या, चोरी करणाऱ्या व भीक मागणाऱ्या अशा सर्व प्रकारच्या मुंग्या असतात. मुंग्यांच्या वर्तनाचा खूप अभ्यास झाला असला, तरी अजूनही पुष्कळ संशोधनाची गरज आहे.

मुंग्या जमिनीत वारुळे करून वसाहती स्थापन करतात. एका वसाहतीत जास्तीत जास्त ५ लाख मुंग्या असतात. त्याच्यात श्रमविभाजन दिसून येते. तसेच एका वसाहतीत चार प्रकारच्या मुंग्या आढळतात : (१) कामकरी मुंग्या, (२) शिपाई मुंग्या, (३) मादी अगर राणी मुंग्या व (४) नर मुंग्या.

१) कामकरी मुंग्या

या आकारमानाने लहान व बिनपंखाच्या असतात. त्यांचे डोळे बारीक असतात. त्या सगळ्या माद्या असल्यातरी अंडी घालू शकत नाहीत. त्यांचे काम वारुळे स्वच्छ ठेवणे, वसाहतीमधले बांधकाम करणे, अन्न गोळा करणे व परिचारिकांप्रमाणे पिलांचे संगोपन करणे हे होय. एका वारुळात अनेक विविध आकारमानांच्या कामकरी मुंग्या असू शकतात.

२) शिपाई मुंग्या

हा कामकरी मुंग्याचाच एक प्रकार आहे. या आकारमानाने थोड्या मोठ्या असून त्यांचे डोके बरेच मोठे असते. जबडे मजबूत व तीक्ष्ण असतात. यांचे काम वसाहतीतील इतर मुंग्यांचे शत्रूपासून संरक्षण करणे हे होय.

३) मादी अगर राणी मुंग्या

या आकारमानाने बऱ्याच मोठ्या व पंखयुक्त असून यांचे काम फक्त अंडी घालणे व नवीन वसाहती स्थापन करणे हे होय.

४) नर मुंग्या

या मादी मुंगीपेक्षा आकारमानाने लहान व नाजूक पंख असलेल्या मुंग्या असून त्या फक्त मैथुनासाठी असतात. मुंग्यांच्या वसाहतीत पिल्लांची काळजी घेणे हे नराचे किंवा राणीचे काम नसून कामकरी मुंगी ते करते.

आ. १. मुंगीच्या शरीराची बाह्यरचना : (१) डोके, (२) वक्ष, (३) कंबर, (४) उदर, (५) नांगी, (६) पाय, (७) जबडा, (८) डोळे, (९) मिशा (संस्पर्शक).बाह्यरचना : मुंगीचा रंग तांबडा, तपकिरी, काळा व विटकरी असतो. तिच्या शरीराची लांबी १ मिमी. ते ४० मिमी. पर्यंत असू शकते. तिचे शरीर गुळगुळीत असून त्याचे डोके, वक्ष (छाती) व उदर असे तीन भाग पडतात. डोके गोल अगर लांबट असते. डोक्याच्या दोन्ही बाजूंना मिशा किंवा संस्पर्शक (सांधेयुक्त लांब स्पर्शेंद्रिये ) असतात व त्यांचा आकार मनुष्याच्या हातासारखा असतो. मनुष्याच्या हातास खांद्यापासून कोपरापर्यंतचा एक भाग व कोपरापासून पुढे दुसरा भाग असे दोन भाग असतात, तसेच मुंग्यांच्या मिशांचेही दोन भाग असतात. मनुष्याचा हात कोपराच्या सांध्यामुळे जसा वाकविता येतो, तसाच मुंगीलाही आपल्या मिशा मधे वाकविता येतात. मिशांचा शेवटचा भाग एकसंधी नसून मण्यासारख्या छोट्या भागांचा झालेला असतो. मिशांच्या एकूण भागांची संख्या बारकाईने पाहिल्यास ४ ते १३ असल्याचे आढळून येते. मिशांचा उपयोग स्पर्शज्ञानासाठी होतो. डोक्यावर तीन साधे व दोन संयुक्त पैलूदार डोळे असतात [ डोळा]. साधे डोळे डोक्याच्या वरच्या भागावर असतात, तर संयुक्त डोळे डोक्याच्या बाजूंना असतात. प्रत्येक संयुक्त डोळ्यास शेकडो पैलू (नेत्रिका) असतात. त्यांची संख्या नियमित नसते. मोठ्या आकारमानाच्या मुंग्यांना डोळ्यात जास्त पैलू असतात, तर लहान आकारमानाच्या मुंग्यांना कमी असतात.


स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate