অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शिक्षणाचे माध्यम :: मातृभाषा

शिक्षणाचे माध्यम :: मातृभाषा

शिक्षणाचे माध्यम :: मातृभाषा
१८३५ साली मेकाले या अत्यंत धूर्त व पाताळयंत्री माणसाने या देशातील शिक्षण व्यवस्थेचे इथल्या मातृभाषांशी असलेले नाते खंडीत करुन तौलनिकदृष्ट्या अत्यंत सुमार दर्जाच्या इंग्रजीशी जोडले ते आजतागायत अबाधित आहे. किंबहुना ते अधिक घट्ट होत आहे असे खेदाने म्हणावे लागते. आजकाल आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांत घालणे हे प्रतिष्ठेचे लक्षण झाले आहे. त्यातही अशी शाळा कॉनव्हेंट स्कूल असेल तर आम्ही कितीही लाचार व्हायला तयार असतो. " कॉनव्हेंट स्कूल " या इंग्रजी शब्दाचा डिक्सनरी मिनिंग आहे " धार्मिक शिक्षण देणारी शाळा ". अशा कॉनव्हेंट शाळांच्या परिसरात त्यांची प्रार्थनास्थळे, धर्मशिक्षण, धर्म प्रसारासाठी कार्य करणारे फादर्स, सिस्टर्स, नन्स, त्यांच्या देवतांच्या भव्य स्टॅचूज, फोटोज, वॉल पेंटींग्ज,  त्यांची निवासस्थाने इत्यादि ओघाने असतातच. या सार्‍यांचा परिणाम त्या ठिकाणी शिक्षण घेणार्‍या मराठी भाषिक विद्यार्थ्यांच्या बाल मनावर कळत नकळत होत असतो, केला जात असतो. अवाढव्य खर्च करुन अनेक खटपटी लटपटी करुन, प्रसंगी अपमान सहन करुन केवळ इंग्रजीच्या हव्यासापोठी आपण आपले पाल्य अशा शाळांतुन घालतो व त्यांचे या मातीशी असलेले नाते, सामाजिक बांधीलकी, कौटुंबिक जिव्हाळा , संस्कार या सार्‍यांपासून आपण स्व:ता हो‌ऊन त्यांची फारकत करतो आहोत हे आमच्या लक्षात कसे येत नाही. मराठी माध्यमांतून आदराने उच्चारला जाणारा " तुकाराम " तिकडे होतो " टूकाराम", शिवबाच्या लढावू " मावळे " चा अपभ्रंश होतो "मवालीज". इंग्रजी माध्यमातील त्यांच्या चालण्या, बोलण्यातील, वागण्यातील अशा अपभ्रंशांमुळे स्थानिक बाबी, परिस्थितीबाबत विद्यार्थ्यांचे आकलन परिपूर्ण होत नाही. मराठी माध्यमातील " येरे येरे पावसा " ही कविता तिथे " रेन गो अवे अवे " या स्वरुपात भेटते. दोन्ही कविता त्यांच्या त्यांच्या देश,  काल परिस्थिती आणि मातीशी निगडीत आहेत. सतत दलदलीच्या परिस्थितीत राहणार्‍या ब्रिटनवाशीयांसाठी  " रेन गो अवे अवे "  ही कविता उचित आहे तर लहरी पावसाळी महाराष्ट्र देशी " येरे येरे पावसा " ही विनवणी योग्य आहे. कदाचित आजकाल महाराष्ट्राच्या केवळ उच्चभ्रू महानगरांमधूनच नव्हे तर छोटया मोठया गांव शहर पातळीवरही इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधुन  " रेन गो अवे अवे "  हे स्वर मोठया प्रमाणावर कानी पडू लागल्यामुळेच मेघ राजांची आमच्यावर खप्पा मर्जी झाली नसेल कशावरुन ? महाराष्ट्र देशी या वर्षी आलेल्या महाभयानक दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर इंग्रजी शाळांमधुन येणारे  " रेन गो अवे अवे "  हे स्वर किती विसंवादी वाटतात.  कधी काळी आमच्या मराठी मातीतल्या मराठी शाळांमधुन  " येरे येरे पावसा, श्रावण मासी हर्ष मानसी , हिरवे हिरवे गार गालीचे "  या सारख्या निसर्ग कविता समुह स्वरात गायल्या जायच्या. त्या गाणार्‍यांचे आणि ऐकणार्‍यांचेही रोम रोम पुलकित व्हायचे. आज इंग्रजी ,कॉन्वेंट शाळांमधुन मराठी मुलांच्या तोंडून बाहेर पडणार्‍या  " जॅक ॲन्ड जील, वेन्ट अप दी हील..."  या विदेशी मातीतल्या विदेशी शब्दावलींमुळे कुणा कुणांचे काय काय पुलकित होत असेल ते रोमच जाणोत. संस्कारक्षम विद्यार्थी हा समर्थ राष्ट्राचा आधारस्तंभ असतो. संस्कार होत असतात घराघरातुन , समाजातुन , शाळा व ज्ञानमंदीरांतून . आज घर , गांव , समाज , विद्यालये या सार्‍या स्वदेशी संकल्पना मोडीत निघत आहेत. विकृत आणि भोगवादी पाश्च्यात्य चंगळवादी जीवन शैलीची मगर मिठी घट्ट आवळली जात आहे. आमच्या आत्मा आणि शरीरावर पाश्च्यात्य संस्कृतीचा परिणाम होत आहे. आमचा आत्मा हरवत असुन केवळ शरीर शिल्लक राहते आहे. साहित्य , संगीत , सिनेमा , दूरचित्रवाहिन्या यावरुन पाश्च्यात्य संस्कृतीचा सतत भडीमार होत आहे म्हणूनच लैंगिक अत्याचार , भ्रष्टाचार समाजजीवन पोखरत आहे. सुरुवातीला एकदा मातृभाषेतुन मुलभूत शिक्षण घेतल्यावर नंतर इंग्रजी अथवा इतर परकीय भाषा गरजे नुसार आत्मसात करणे, त्यांचा काळ परिस्थितीनुरुप वापर करणे यास कोणाचीही काही हरकत असण्याचे कारण नाही , परंतू मातृभाषा सोडून परकीय इंग्रजी भाषा मुलभूत शिक्षणाचे माध्यम म्हणून स्वीकारणे हे अत्यंत घातक आहे. संस्कारक्षम वयात इंग्रजी माध्यमातुन शिक्षण घेणारा विद्यार्थी केवळ इंग्रजीचेच शिक्षण घेतो असे नाही तर इंग्रजीच्या अंगी असणारे उपजत पाश्च्यात्य संस्कारही कळत नकळत त्याचा संपूर्ण ताबा घेतात. नंतर त्या संस्कारांचा त्याला अभिमान वाटायला लागतो.  त्याच्या मराठी कुटुंबात चालत आलेले रीती रिवाज ,परंपरा या सार्‍यांना तो मागासलेले समजुन तिरस्कार करु लागतो. क्वचित प्रसंगी धार्मिक श्रद्धा जपणार्‍या आपल्या मातेस यु इडियट मॉम असे म्हणायलाही तो कमी करत नाही. गुड मॉर्नींग सर, गुड ना‌ईट मॅडम इत्यादी कोरडे शिष्टाचार सांभाळणारा असा विद्यार्थी सांज वेळेला देव घरात तुळशीची माळ ओढणार्‍या आजी_आजोबांना गावंढळ समजतो व नमस्कार न करताच क्रिकेट खेळायला निघून जातो. मेकालेला हेच सारे हवे होते. त्यात तो पूर्ण यशस्वी झाला. इंग्रजांना हवे होते तसे स्थानिक इंग्रज त्यांनी तयार केले, गुलाम म्हणून वापरले व निघून गेले. हो, इंग्रज निघून गेले, आम्ही त्यांना हाकलले नाही. १९४७ साली इंग्रज देश सोडून गेले व त्यांच्या राजकीय गुलामगिरीतुन देशाची मुक्तता झाली. १९४७ च्याच मागे पुढे जगातील जवळपास ७२ देशही परकीय दास्यातुन मुक्त झाले. बहुतेक सर्वच नवस्वतंत्र देशांनी गुलामीची सारी प्रतिके फेकून देवून स्वाभीमानी, स्वदेशी राष्ट्रांची नव्याने उभारणी केली. गुलामगिरीची मानसिकता फेकून दिलेल्या व राष्ट्रप्रेमाने भारलेल्या या स्वाभीमानी राष्ट्रांनी अल्पावधीतच दैदिप्यमान प्रगतीची नवनवी शिखरे पादाक्रांत केली. जपान, चीन, इस्रा‌ईल, ब्राजील, मलेशिया, डेन्मार्क, स्वीडन, नॉर्वे हे त्यापैकीच कांही देश. अगदी अलिकडेच स्वतंत्र झालेले युक्रेन इत्यादी देशही स्वाभीमानाने ताठ उभे आहेत.या आणि जगातील बहुतेक सर्वच स्वाभीमानी राष्ट्रांत शिक्षणाचे व व्यवहाराचे माध्यम हे त्या त्या देशांच्या मातृभाषाच आहेत. कुठलाही देश परकीय भाषेच्या कुबडया वापरुन जगात स्वभीमानाने ताठ उभा राहुच शकत नाही. दुर्दैवाने भारतात आजही गुलामगिरीची निशाणी इंग्रजीचाच सर्रास वापर होतो आहे व त्याची आम्हाला जराही शरम वाटत नाही. आम्हाला राजकीय स्वातंत्र मिळाले, आम्ही सार्वभौम लोकशाही गणराज्य संस्थापित केले, परंतू  स्वातंत्र्याचा खरा अर्थ आम्हाला कळला नाही आणि स्वातंत्र्याचे वारे आम्हाला शिवले नाही. ब्रिटिश वसाहतवादाचा भाग म्हणून जी सदोष मेकाले शिक्षण प्रणाली येथे रुढ झाली होती ,ती बदलवून राष्ट्रीय वळणाचे सार्वत्रिक शिक्षण देणारी स्वदेशी प्रणाली आम्ही उभी करु शकलो नाही. आम्ही आजही मेकालेचे गुलामच आहोत. या शिक्षण पद्धतीतुन दर वर्षी सुसंस्कृत नागरीक निर्माण होत नाहीत तर तयार होतात ते कामकरी अभियंते, डाक्टर, वकील इत्यादी इत्यादी. शिक्षण प्रणालीतुन असे शिक्षण दिले गेले पाहिजे की जो शिक्षण घे‌ऊन बाहेर पडेल त्याला तो राहात असलेल्या प्रदेशातील पर्यावरणाची जाणीव असेल, राष्ट्रानिष्ठा, राष्ट्रप्रेम व राष्ट्रीय जबाबदारीचे त्याला भान असेल , देशाला भेडसावणार्‍या समस्या व आव्हाणे ओळखून त्याचा सामना करण्यास तो समर्थ असेल . कॉन्व्हेंट स्कूल्स व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधुन बाहेर पडणारा असा असेलच असे छातीठोकपणे सांगता येणार नाही. दोन हजार वर्षे मातृभूमीला पारख्या झालेल्या यहुदी लोकांनी त्यांची हिब्रू भाषा व त्यांची अग्नीपुजक संस्कृती  त्यांनी जीवापाड जपली. जाज्वल्य राष्ट्रप्रेमातुन स्वातंत्र खेचून आणले. सभोवताली परंपरागत शत्रूंचा विळखा असतांना, अत्यंत तोकडया पर्जन्यमानावर त्यांनी त्यांचा इस्रा‌ईल हा देश सुजलाम सुफलाम केला ते त्यांच्या मातृभाषा व मातृभूमीवरच्या निस्सीम भक्तीच्या जोरावरच. युक्रेनच्या संसदेत मातृभाषेतुन भाषणे करण्यासाठी हाणामार्‍या होतात. आमच्या संसदेचे सोडाच परंतू महाराष्ट्राच्या ग्रामीण खेडयापाडयातही तथाकथित शिक्षण सम्राट इंग्रजी शाळा सुरु करण्यासाठी अत्यंत उतावीळ असतात व अशा शाळांमध्ये आपल्या पाल्यांचा प्रवेश करण्यासाठी सर्वच स्तरातील पालक रात्रंदिवस रांगा ला‌ऊन बसतात. विशेष नवल असे की मराठी मातीत जन्मलेले, वाढलेले, मराठी माध्यमात शिकलेले पालकच आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमात घालण्यासाठी जास्त आतुर असल्याचे पहावयास मिळते. प्रगतीच्या सर्वोच्च शिखरावर असणार्‍या चीन, जपान, रशियासह कुठल्याच देशात त्यांच्या मातृभाषां ऐवजी इंग्रजी ही परकिय भाषा त्यांच्या व्यवहाराचे, शिक्षणाचे माध्यम नाही. तेथील शासनकर्ते देशात व देशाबाहेरही फक्त स्वत:च्याच भाषेत बोलतात. सोबत दुभाशी ठेवतात. इस्त्रा‌ईल, जपान, चीन, रशीया, जर्मनी, कोरिया, मलेशिया इत्यादी देश स्व:ताची सर्वांगीन प्रगती करुन आज भारताच्या कितीतरी पुढे निघून गेले आहेत. हे सर्व देश आज जगासमोर ताठ मान करुन स्वाभीमानाने उभे आहेत, त्याचे कारण या देशांची शिक्षणव्यवस्था, राज्यव्यवस्था, न्यायव्यवस्था, समाजव्यवस्था त्यांच्या त्यांच्या राष्ट्रभाषेतून, मातृभाषेतून संचलीत केल्या जातात. अनेक देशात एकापेक्षा अधिक राष्ट्रभाषा आहेत. त्यामुळे त्यांच्या विकासात कुठलीच आडकाठी आली नाही. कॅनडामध्ये दोन, स्वित्झरलॅन्डमध्ये चार, तर रशीयात डझनाहून अधिक राष्ट्रभाषा आहेत. त्या त्या प्रांतापुरती ती ती भाषा राष्ट्रभाषा मानली जाते. कुठल्यही प्रांतातील सर्व व्यवहार संबंधीत राष्ट्रभाषेतच चालतात. तिथे इतर भाषांना दुय्यम स्थान असते. इतरही कांही देशात अनेक राष्ट्रभाषा आहेत. भारतीय राज्य घटनेचाही तोच हेतू आहे. राज्य घटनेच्या आठव्या परिशिष्टात प्रथम पासून चौदा आणि आता बावीस भारतीय भाषांना विशेष दर्जा दिलेला आहे . त्यात इंग्रजीचा समावेश कुठेच नाही, हे विशेष. घटने प्रमाने इंग्रजीचे स्थान भारतीय भाषांच्या मानाने गौण आहे. इंग्रजीचे गोडवे गाणारे, पश्चिमेकडे तोंड करुन गळा काढणारे व इंग्रजी शिवाय आमचे कसे होणार म्हणून भोकाड पसरणार्‍या तथाकथित कपाळ करंटया विद्वानांना हे माहीत असेलच की सोळाव्या शतकापर्यंत इंग्रजी भाषा ही पवित्र बायबलचे भाषांतर करण्यास अपात्र व असंस्कृत मानली जात होती,आणि म्हणून तीमध्ये बायबल उपलब्ध करण्यास धर्मगुरुंची अनुमती नव्हती. आजही इंग्रजी भाषेविषयी भारतीयांच्या मनात अनेक भ्रामक समजुती आहेत. इंग्रजी ही  जागतिक भाषा आहे ही  त्यापैकीच एक. इंग्रजी ही जागतिक भाषा नसून ती पूर्वी इंग्रजांनी राज्य केलेल्या कांही देशात वापरली जाणारी भाषा आहे. जगाच्या लोकसंख्येत अंदाजे केवळ १० टक्के लोकच इंग्रजीचा वापर करतात. ही वस्तूस्थिती आहे. दुसरी भ्रामक कल्पना अशी की इंग्रजी ही आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाची भाषा आहे. वस्तूस्थिती अशी आहे की महाबलाढ्य चीन व प्रखर राष्ट्राभिमानी जपान यांनी सारी तांत्रीक वैज्ञानिक प्रगती त्यांच्या चित्रलिपी भाषा वापरुनच केली आहे. बहुतेक सर्व शोध रशियन, जर्मन, फ्रेंच आदि युरोपीयन देशात लागले आहेत. हे सर्व शोध साहित्य भारतीयांचा समोर इंग्रजी भाषेतुनच आल्यामुळे इंग्रजी हीच आधुनिक तंत्र शास्त्रांची भाषा आहे अशी आमची गैरसमजुत झाली आहे. आमच्या देशातील कुठलीही प्रादेशिक भाषा इंग्रजीपेक्षा सर्वार्थाने वरचढ व तिच्या थोबाडीत मारु शकेल इतकी सशक्त व समृद्ध  आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवणात माय, माती, मातृभाषा, आणि मातृभूमी यांचे अनन्य साधारण महत्व असते. माय जन्म देते, माती भरण पोषण करते, मातृभूमी आसरा सुरक्षा देते आणि मातृभाषा योग्य असे संस्कार करते. या संस्काराच्या शिदोरीवरच प्रत्येक व्यक्तीचे जीवन सुखी व संपन्न होते. म्हणुनच किमान प्राथमिक व माध्यमिक स्तरांवर तरी शिक्षणाचे माध्यम हे मातृभाषाच असले पाहिजे असे अनेक भाषातज्ञ, समाजशास्त्र्यज्ञ, माणसशास्त्रज्ञ तसेच सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्‍या राष्ट्रीय व जागतीक पातळीवरील संस्था ओरडून सांगत आहेत. युनेस्को ही युनोची शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी उपसंस्था आहे. युनेस्कोने केलेल्या संशोधनात मातृभाषेतुन शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची आकलन शक्ती व गुणवत्ता ही मातृभाषेतर माध्यमातुन शिक्षण घेतलेल्या विध्यार्थ्यांपेक्षा किती तरी चांगली व सरस असते असे आढळुन आले आहे. माध्यमिक व उच्चमाध्यमिक परिक्षांच्या मराठी व इंग्रजी या दोन्ही माध्यमांच्या उत्तरपत्रिका तपासणार्‍या अनेक परिक्षकांचा अनुभव असा आहे की इंग्रजी माध्यमांच्या उत्तरपत्रिका स्वछ व नीटनेटक्या असतात परंतू उत्तरे व्यवस्थित व परिपूर्ण नसतात. उलट मराठी माध्यमांच्या उत्तरपत्रिकांत व्यवस्थितपणा नसला तरी उत्तरे सविस्तर, व मुद्देसुद असतात. माध्यमिक परिक्षा मंडळ पुणे यानी माध्यमिक स्तरावर मराठी व इंग्रजी माध्यमातुन शिकलेल्या व पुढे विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा तौलनिक आढावा घेतला. यात मराठी माध्यमातुन आलेल्या विधार्थ्यांनी इंग्रजी माध्यमातुन आलेल्या विध्यार्थ्यांपेक्षा अधिक चांगली प्रगती केल्याचे आढळुन आले आहे. तशीच परिस्थिती वैध्यकीय व अभियांत्रीकी शिक्षण घेणार्‍या विध्यार्थ्यांची आहे. येथेही मराठी माध्यमातुन आलेल्या विध्यार्थ्यांचे सर्व विषयात नियमित उत्तीर्ण होण्याचे प्रमाण सुरुवतीपासुन इंग्रजीत शिकलेल्या विध्यार्थ्यांपेक्षा कितीतरी अधिक असते. प्राथमिक व माध्यमिक स्तरांवर मातृभाषे‌ऐवजी इंग्रजी लादल्याचा हा दुष्परीणाम आहे.
महात्मा गांधी म्हणतात:
" मातृभाषा शिक्षणाचे योग्य माध्यम आहे व अधिक योग्य माध्यम अनुभव आहे ".
जेष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर म्हणतात :
" मातृभाषाच मुलांच्या शिक्षणाचे स्वाभाविक माध्यम असुन त्याच भाषेतुन त्यांचा सर्वांगीन विकास हो‌ऊ शकतो  " .
श्री अरुण फिरोदीया म्हणतात :
" मातृभाषेतील शिक्षणामुळे विध्यार्थ्यांची आकलन शक्ती वाढते, विषयांची समज येते व शिकलेले पूर्ण आत्मसात होते. तसेच त्यांच्या चौकस बुद्धी व सृजनशीलतेला अधिक वाव मिळतो ".
कवीवर्य कुसुमाग्रज म्हणतात :
भाषा मरता देशही मरे, संस्कृतीचा दिवाही विझे ।
गुलाम आणिक हो‌ऊन, आपुल्या प्रगतीचे शीर कापू नका ॥
संत ज्ञानेश्वर मा‌ऊली मातृभाषेविषयी सार्थ अभिमान व्यक्त करताना आपल्या ओंकार स्वरुप सुंदर ओवीत म्हणतात :
माझा मराठाचि बोलु कौतुके।
परि अमृतातेही पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके ।
मेळवीन ॥
आपण आज इंग्रजी भाषेच्या जोखडातून स्व:ता मुक्त हो‌ऊन आपली शिक्षणव्यवस्था, राज्यव्यवस्था, न्यायव्यवस्था, समाजव्यवस्थाही मोकळी केली पाहिजे तरच आपण जगात एक स्वाभीमानी राष्ट्र म्हणून ताठ मानेने उभे राहू शकु.
सोमनाथ देविदास देशमाने,
अहमदनगर,
९७६३६२१८५६

अंतिम सुधारित : 8/31/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate