অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

खोकला

(कास). श्वसन तंत्रात (श्वसन संस्थेत) दाबून धरलेली हवा एकदम जोराने आणि स्फोटक आवाज करून स्वरद्वारातून बाहेर टाकण्याच्या क्रियेला ‘खोकला’ अथवा ‘कास’ म्हणतात. ही क्रिया प्रतिक्षेपी (शरीराच्या एका भागामध्ये उत्पन्न झालेल्या आवेगामुळे इतरत्र झालेली प्रतिक्रिया) असून तिचे उद्दिष्ट श्वसन तंत्र आणि ग्रसनी (घसा) यांमधील क्षोभकारक द्रव्ये बाहेर फेकण्याचा प्रयत्न करणे हे असते.

या क्रियेमध्ये प्रथम लहान श्वास आत घेतला गेल्यानंतर स्वरद्वार बंद होते; नंतर उच्छवासाची म्हणजे श्वास बाहेर टाकण्याची जोराची क्रिया होते. परंतु स्वरद्वार बंद असल्यामुळे श्वसन तंत्रातील कोंडलेल्या हवेचा दाब पुष्कळ वाढतो; मग एकदम स्वरद्वार उघडते त्यामुळे ही दबलेली हवा जोराचा आवाज करून एकदम बाहेर पडते. हवा अशा तऱ्हेने बाहेर पडत असताना श्वसन तंत्रातील क्षोभजनक द्रव्य त्या हवेबरोबर वर सरकते. ते द्रव्य एकदम बाहेर न पडल्यास हीच खोकल्याची क्रिया पुनःपुन्हा होत राहून शेवटी क्षोभजनक पदार्थांचे उत्सर्जन होते.

नाकातील श्लेष्मकला (बुळबुळीत अस्तर त्वचा), ग्रसनी, कान, स्वरयंत्र, श्वासनाल (कंठापासून फुप्फुसापर्यंत जाणारी मोठी वायुनलिका), श्वासनलिका (फुप्फुसातील लहान वायुनलिका), फुप्फुसे आणि परिफुप्फुस (छातीची पोकळी व फुप्फुसांना वेष्टित करणारे पटल) या ठिकाणी क्षोभोत्पादन झाल्यास खोकला येतो, क्वचित जठरविकार आणि तंत्रिकाक्षोभामुळे (मज्जातंतूंच्या क्षोभामुळे) ही प्रतिक्षेपी क्रिया होऊ शकते. या सर्व ठिकाणांच्या तंत्रिकाग्राहकांमध्ये (मज्जांतंतूमधील संवेदनाक्षम केंद्रामध्ये) संवेदना उत्पन्न होते आणि ती मस्तिष्कापर्यंत (मेंदूपर्यंत) जाऊन तेथे प्रतिक्षेपी झाल्यामुळे खोकला येतो. या प्रतिक्षेपी क्रियेवर इच्छाशक्तीचे थोडेबहुत नियंत्रण असते.

खोकला ही एक संरक्षक क्रिया असून क्षोभजनक पदार्थ बाहेर टाकण्यासाठी तिचा उपयोग होतो. परंतु कित्येक वेळा ही क्रिया त्रासदायक आणि थकवा आणणारी होते. विशेषतः नाक, ग्रसनी आणि कान या ठिकाणांच्या तंत्रिकाग्राहकांच्या उद्दीपनामुळे (उत्तेजित होण्यामुळे) येणारा खोकला कोरडा आणि निष्फळ असा येत राहतो, कारण तेथे बाहेर टाकण्यासारखा क्षोभजनक पदार्थच नसतो; परंतु तंत्रिकाग्राहकांची उद्दीपनक्षमता वाढलेली असल्यामुळे असा खोकला येतो.

खोकल्याच्या आवाजावरून काही वेळा त्या खोकल्याचे कारण समजू शकते. उदा., रात्री येणारा कोरडा खोकला अथवा ‘ढास’ ही बहुधा ग्रसनी व स्वरयंत्राची उद्दीपनक्षमता वाढल्यामुळे येते. परिफुप्फुसाच्या शोथामुळे (दाहयुक्त सूजेमुळे) येणारा खोकला वरवर व दबल्यासारखा येतो. चिरकारी (दीर्घकालीन) श्वासनलिकाशोथात खोकला ओला आणि दर खोकल्याबरोबर कफ बाहेर आणणारा खबखबल्यासारखा येतो. डांग्या खोकल्यामध्ये खोकल्याची उबळ येऊन खोकल्याच्या शेवटी जोराने आत श्वास घेतला जात असताना एक विशिष्ट आवाज येतो. घाबरलेल्या किंवा अस्वस्थ मनःस्थितीमध्ये नुसता वरवर खाकरल्यासारखा खोकला येतो. श्वासनलिकेवर दाब पडला असल्यास येणारा खोकला विशिष्ट आवाजाचा येतो.

खोकला हे एक रोगलक्षणही असू शकते. याकरिता जर खोकला त्रासदायक व चिरकारी असेल तसेच कफ रक्तमिश्रित असेल वा त्याला घाण येत असेल, तर त्याबाबत वैद्यकीय सल्ला घेणेच इष्ट ठरते.

चिकित्सा

खोकल्याची चिकित्सा त्याच्या कारणांवर अवलंबून असते. खोकल्याकरिता देण्यात येणाऱ्या औषधांचे दोन प्रकार आहेत. एका प्रकारची औषधे कफ पातळ करून त्याचा चिकटपणा कमी करतात; त्यामुळे कफ सुटण्यास मदत होते. या औषधांना ‘कफोत्सारक’ औषधे असे नाव आहे. दुसऱ्या प्रकारची औषधे प्रतिक्षेपी क्रियेतील उद्दीपन कमी करतात आणि त्यामुळे खोकला येणेच कमी होते. त्या औषधांना ‘शामक’ कासनाशक औषधे असे म्हणतात.

ढमढेरे, वा. रा.

आयुर्वेदीय चिकित्सा

नेहमी आढळणारा आबालवृद्धांना होणारा असा खोकला हा विकार बहुतकरून कफामुळे झालेला असतो. त्याचे वातिक, पैत्तिक, श्लेष्मिक व सान्निपातिक असे चार प्रकार; क्षयामुळे होणारा व उरःक्षत झाल्यामुळे होणारा असे दोन उपद्रवात्मक होणारे आणि म्हातारपणामुळे होणारा ‘जरा कास’ असे प्रकार आहेत.

कफ कास

कफाच्या कारणांनी झालेल्या खोकल्याला प्रथम घसा खवखवतो, खोकला येत असता छाती-बरगड्या, आकुंचित होतात व दुखतात, डोळ्यांच्या शिरा ताठतात, डोके दुखते, नाक-डोळे ह्यांतून पाणी येते. बारा तास किंवा चोवीस तास ह्याप्रमाणे लक्षणे झाल्यावर खोकल्याची उबळ जोरदार सुरू होते व खोकल्याबरोबर कफ पडू लागतो. एकदोन दिवस हा जोर असतोच. थोडेसे उपचार केल्याने खोकल्याचा वेग कमी झाला, तरी खोकल्याबरोबर पडणाऱ्या कफाचे प्रमाण वाढते व पिवळट घट्ट असे बेडके पडू लागतात. अशा अवस्थेत रोग्याला आनंदभैरव दोन गुंजा मधातून दिवसातून तीन वेळा चाटवावा. ज्येष्ठमध घालून उकळलेले पाणी प्यावयास द्यावे. खोकल्याची उबळ जोरदार येऊन कफ सुटत नसेल, तर खदिरादी गुटी तोंडात खडीसाखरेबरोबर धरावी. याने कफ सुटा होऊन पडण्यास मदत होईल. कफ बराच पातळ व प्रमाणाबाहेर जास्त असा खोकल्याबरोबर पडत असेल, तर रससिंदूर मधातून अर्धा गुंज चाटवावा. तोंड आले असल्यास, कफ घट्ट झाला असल्यास देऊ नये. कफ पडून सारखे खोकून जर फारच थकवा आला असेल, तर हेमगर्भ मात्रा आल्याचा रस व मध यांतून सहाणेवर २ ते ४ वळसे उगाळून चाटवावी. याने थकवा दूर होईल.

वात कास

वातिक खोकल्यावर अनेक उपचार करावे लागतात. या खोकल्याला तिखट चवीचे कोणतेही औषध देऊ नये. काटेरिंगणीचा अवलेह १ ते २ तोळा या प्रमाणाने दिवसातून तीन वेळा चाटवावा. दूध, तूप, लोणी विरघळ ही द्रव्ये आहारातून बऱ्याच प्रमाणात द्यावी. दशमूलादि घृत २ तोळे दुधाबरोबर द्यावे. द्राक्षासव दिवसातून तीन वेळा समभाग पाण्यातून द्यावे. याप्रमाणेच बेहड्याचे आसव किंवा भृंगराजासव द्यावे. कस्तूरीवटी दोन वेळा विड्याच्या पानातून घ्यावी. बरेच दिवस वात कास राहिल्याने फारच फिक्कटपणा येतो. डोळे खोल जातात, गाल बसतात, उरोभाग पोकळ झाला आहे असे वाटते. अशा अवस्थेत प्रवाळ (चं.पु.) ४/४ गुंजा पातळ तुपातून दिवसातून दोन-तीन वेळा चाटावे.

पित्त कास

पित्त कासामध्ये खोकल्याचा वेग जोरदार नसला, तरी खोकला अत्यंत त्रासदायक असतो. जीभ, घसा ह्यांच्यावरील श्लेष्मल त्वचा फाटते, घशात फोड येतात, नाकात फोड येतात, कानात व घशात खाज सुटते, डोळे लाल होतात. गिळावयास त्रास होतो व रोगी खोकल्याच्या मानाने पुष्कळच घायाळ झालेला असतो. अशा वेळी त्याला दुधसाखरेतून सितोपलादि चूर्णातील पिंपळी वर्ज्य करून किंवा कामदुधा (मौ.) ६ गुंजा अडुळसा सरबतातून द्यावे. प्रवाळ (चं. पु.) ४ गुंजा भस्म अर्धा गुंज साखरेच्या पाकातून किंवा डाळिंबाच्या अवलेहातून चाटावे.

क्षय कास

क्षय कासामध्ये क्षयाची सर्व औषधे द्यावी. अभ्रक भस्म (सहस्त्रपुटी) १/४ गुंज, मृगश्रृंग दोन गुंजा मधातून तीन वेळा द्यावे. छातीला, सांध्यांना महानारायण तेल किंवा चंदनकलालाक्षादि तेल लावावे. कोरड्या हवेच्या ठिकाणी रहावे. हा विकार बरा झाला, तरी राजयक्ष्मा बरा होईपर्यंत खोकल्यावरील उपचार चालू ठेवावे.

जरा कास

ह्यावर सुवर्णमालिनीवसंत, वसंत कुसुमाकर किंवा चतुर्मुख ह्यांपैकी एक रसायन, रसायन पद्धतीने घ्यावे. म्हातारपण हेच कारण असल्यामुळे ते टाळण्यासाठी जरूर असणारा आहारविहार द्यावा. कोरड्या हवेत राहिल्याने व रसायन घेतल्यामुळे वार्धक्या सुसह्य करता येते. त्यांचाच उपयोग या कासावर होतो. उरःक्षयज कास जोशी, वेणीमाधवशास्त्री

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/27/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate