অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

परांत्रज्वर

परांत्रज्वर

(पॅराटायफॉइड). ‘आंत्रज्वर गट’ हे नाव असलेल्या संक्राम़णजन्य ज्वरांच्या गटामध्ये आंत्रज्वर किंवा टायफॉइड व परांत्रज्वराचे ए, बी आणि सी प्रकार यांचा समावेश होतो. या सर्वच ज्वरांची लक्षणे एवढी एकसारखी असतात की, ते एकमेकांपासून केवळ वैद्यकीय तपासणी करून ओळखणे जवळजवळ अशक्यच असते.

परांत्रज्वर हा रोग सार्वत्रिक स्वरूपाचा असून निरनिराळ्या प्रदेशांत कारणीभूत असणारे जंतु-प्रकार निरनिराळे असतात. साल्मोनेला पॅराटायफाय ए सूक्ष्मजंतू भारत व आशियाच्या इतर भागात कारणीभूत असतात. सा. पॅराटायफाय बी यूरोप आणि विशेषेकरुन ग्रेट ब्रिटनमध्ये आणि सा. पॅराटायफाय सी पूर्व आशियात कारणीभूत असतात. जंतूवरून रोगांना परांत्रज्वर-ए, परांत्रज्वर-बी आणि परांत्रज्वर-सी अशी नावे देतात.

रोगपरिस्थितिविज्ञान दृष्ट्या आंत्रज्वर आणि परांत्रज्वर यांत फारसा फरक नसतो. दूध आणि साय हे अन्नपदार्थ रोग फैलावण्यास अधिक कारणीभूत असावेत. विकृतिविज्ञान, लक्षणे व उपद्रव आंत्रज्वरासारखीच असतात. परिपाककाल (जंतू शरीरात शिरल्यापासून रोगलक्षणे दिसेपर्यंतचा काळ) ७ ते १४ दिवसांचा असतो. रोगाची सुरूवात अधिककरून उदरगुहीय (उदराच्या पोकळीतील) लक्षणांनी, अतिसार, पोटफुगी आणि उदर वेदना वगैरेंनी होते. आंत्रज्वरातील ज्वरापेक्षा या रोगाच्या ज्वरात अधिक चढउतार आढळतात आणि ज्वर चौदाव्या दिवशी कमी होतो व तेव्हापासून नेहमीचे तापमान आढळते. तंत्रिका तंत्रासंबंधीची (मज्जासंस्थेसंबंधीची) तसेच विषरक्तता (जंतूची विषे रक्तपरिवहनाबरोबर सर्व शरीरात पसरल्यामुळे निर्माण होणारी अवस्था) झाल्याची लक्षणे जवळजवळ आढळतच नाहीत. हृदयाच्या स्नायूंवर होणारे आंत्रज्वरातील दुष्परिणाम अती सौम्य प्रकारातच या रोगात दिसतात. लघ्वांत्रातील (लहान आतड्यातील) रक्तस्राव आणि आंत्रभेद यांसारखे मारक उपद्रव या रोगात सहसा आढळत नाहीत.

परांत्रज्वरांचे निदान प्रयोगशाळेतील रक्ततपासणीने निश्चित करता येते. पहिल्या आठवड्यात रक्त घेऊन त्याचे संवर्धन केल्यास कारणीभूत सूक्ष्मजंतू कोणते हे समजते. पहिल्या आठवड्यानंतर विडाल परीक्षेचा निष्कर्ष रोगदर्शक म्हणजे होकारात्मक मिळतो.

या रोगावरील प्रतिबंधात्मक इलाज तसेच शुश्रूषा, विशिष्ट औषधे, उपद्रवासंबंधी काळजी व इलाज हे सर्व आंत्रज्वराप्रमाणेच असतात. हा रोग क्वचितच मारक ठरतो.

 

संदर्भ : Vakil R. J., Ed. Textbook of Medicine, Bombay, 1969.

लेखक : वा. रा. ढमढेरे / य. त्र्यं. भालेराव

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/17/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate