অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रोग


प्रस्तुत नोंदीत ‘रोग’ या संकल्पनेचे व आनुषंगिक बाबींचे सर्वसाधारण विवरण दिलेले आहे. मानवाला होणाऱ्या शारीरिक रोगासंबंधी येथे प्रामुख्याने माहिती दिलेली असून मानसिक विकारांच्या विवेचनाकरिता ‘मानस चिकित्सा’ ही नोंद पहावी. वनस्पतींचे रोग व पशुरोग यांसंबंधीच्या माहितीकरिता ‘वनस्पतिरोगविज्ञान’ व ‘पशुवैद्यक’ या नोंदी पहाव्यात. रोगांचे मूलभूत स्वरूप व विशेषतः त्यांच्यामुळे शरीरात होणारे रचनात्मक व कार्यात्मक बदल यांचा अभ्यास करणाऱ्या वैद्यकाच्या शाखेची माहिती ‘विकृतिविज्ञान’ (रोगविज्ञान) या नोंदीत दिलेली आहे. तंत्रिका तंत्र (मज्‍जासंस्था), पचन तंत्र, जनन तंत्र इ. शरीरातील विविध तंत्रांविषयीचे रोग तसेच कान, नाक, फुप्फुस, यकृत, वृक्क (मूत्रपिंड) यांसारख्या अवयवांचे रोग यासंबंधी त्या त्या तंत्राच्या व अवयवाच्या नोंदीत माहिती दिलेली आहे. याखेरीज ‘दंतवैद्यक’ व ‘नेत्रवैद्यक’ या नोंदींत दात व डोळा यांचे रोग दिलेले आहेत. हृदयविकार, कर्करोग, क्षयरोग, कुष्ठरोग, धनुर्वात, प्लेग वगैरे महत्त्वाच्या रोगांवर स्वतंत्र नोंदी आहेत. बालरोगविज्ञान, स्त्रीरोगविज्ञान, गर्भारपणा, गुप्तरोग, त्रुटिजन्य रोग, संसर्गजन्य रोग, साथ व साथीचे रोग इ. नोंदींत संबंधित महत्त्वाच्या रोगांचे विवेचन केलेले आहे. विविध व्यवसायांतील विशिष्ट परिस्थितीमुळे उद्‌भवणाऱ्या रोगांची माहिती‘व्यवसायजन्य रोग’ या नोंदीत दिलेली आहे.

व्याख्या

रोग म्हणजे काय याची सर्वसाधारण प्रत्येकाला कल्पना असली व त्याचा प्रत्येकाला अनुभव असला, तरी त्याची नेमकी व्याख्या करणे कठीण आहे. रोग म्हणजे

(१) शरीराची किंवा मनाची रोगट अवस्था,

(२) प्राकृतिक (सर्वसाधारण) शरीरक्रियेपासून दूर गेलेली जिवंत शरीराची अवस्था,

(३) भोवतालच्या परिस्थितीशी योग्य प्रकारे जुळवून घेऊन (अनुकूलन) योग्य प्रतिक्रिया व्यक्त करण्याची शरीराची अक्षमता, (४) आरोग्यपूर्ण अवस्थेपासून दूर गेलेली शरीराची अवस्था,

(५) काही गोष्टींच्या अनिष्ट प्रभावामुळे शरीरांतर्गतक्रियांचे बिघडलेले संतुलन इ. विविध प्रकारे रोगाची व्याख्या केली जाते.

रोग म्हणजे काय हे समजावून घेण्यापूर्वी या संदर्भात वापरल्या जाणाऱ्या काही संज्ञांचे अर्थ समजावून घेणे आवश्यक आहे.

निरोगी अवस्था

ही मोजता येणाऱ्या काही निकषांच्या साहाय्याने ठरविता येते; उदा., शरीराचे प्राकृतिक तापमान, दर मिनिटाला पडणारे नाडीचे ठोके व होणारी श्वासोच्छ्‌वासाची आवर्तने, रक्तदाब, वजन, उंची इत्यादी. हे निकष आणि त्यांची परिमाणे अनेक व्यक्तींच्या निरीक्षणांवरून ठरविलेली सांख्यिकीय (संख्याशास्त्रीय) परिमाणे आहेत. या निकषांची परिमाणे वय, लिंग, जात, वंश इतकेच नव्हे; तर भौगोलिक प्रदेश, जलवायुमान (दीर्घकालीन सरासरी हवामान), व्यक्तीचा व्यवसाय इत्यादींप्रमाणे बदलत असल्याने हे आरोग्याचे निरपेक्ष निकष नाहीत.

शारीरिक क्षमता किंवा तंदुरूस्ती

स्‍नायूंची इष्टतम ताकद, अंतर्गत अवयवांचे सुसूत्र कार्य, तरतरीतपणा व उत्साह म्हणजे शारीरिक क्षमता किंवा तंदुरुस्ती होय. यामुळे रोग नाही म्हणून निरोगी असणे व शारीरिक दृष्ट्या कार्यक्षम असणे यांत फरक आहे, असे काहींचे मत आहे.

स्वास्थ्य किंवा आरोग्य

व्यक्तींचे शारीरिक, मानसिक व भावनिक असे संपूर्ण संतुलन म्हणजे स्वास्थ्य किंवा आरोग्य होय. यात फक्त रोगाचा अभाव अभिप्रेत नसून शारीरिक क्षमता, मानसिक व भावनिक स्थिरता, बाह्य परिस्थितीबरोबर सुसंगतपणे जुळवून घेऊन योग्य प्रतिक्रिया व्यक्त करण्याची क्षमता, जीवनातील नेहमीच्या व काही वेळा कसोटीच्या प्रसंगांना योग्य प्रकारे तोंड देण्याची क्षमता इ. अनेक गोष्टी समाविष्ट आहेत. यामुळे आरोग्य ही सर्वसमावेशक संकल्पना म्हणता येईल, तर रोग म्हणजे आरोग्यापासून दूर गेलेली शरीराची अवस्था अशी रोगाचीही सर्वसमावेशक व्याख्या करता येईल.

आजारीपणा

ही काही लक्षणांमुळे जाणवणारी रोगाची भावना आहे. अनेक वेळा रोग सुप्तावस्थेत असताना त्याची कोणतीच लक्षणे व चिन्हे न जाणवल्याने व्यक्तीला आजारीपणाची भावना होत नाही. यामुळे रुग्ण व्यक्ती आजारी असेलच असे नाही, उदा., मधुमेह, वाढलेला रक्तदाब, कर्करोगाची सुरुवातीची अवस्था यांमध्ये रोग बऱ्याच वेळा सुप्त असून रुग्ण आजारी नसतो. अप्रभावी जनुकांमुळे होणाऱ्या काही आनुवंशिक रोगांत [⟶ आनुवंशिकी] तर रोग जन्मभर सुप्तावस्थेत राहतो व पुढच्या पिढीतच त्याची लक्षणे दिसण्याची शक्यता आहे.

समस्थिती

आरोग्याच्या संकल्पनेमध्ये बाह्य परिस्थितीच्या प्रभावाबरोबरच शरीरांतर्गत परिस्थितीचाही विचार आवश्यक आहे, कारण आरोग्याच्या संकल्पनेतील संतुलन म्हणजे याच बाह्य व अंतर्गत परिस्थितींमधील संतुलन होय. शरीरांतर्गत परिस्थिती काटेकोरपणे आणि कडकपणे मर्यादित राखणे म्हणजेच समस्थिती होय. यामध्ये शरीरातील द्रव व विद्युत् विच्छेद्य (विशिष्ट पदार्थात विरघळविल्यावर विद्युत् प्रवाहाचे संवहन करू शकणारी रासायनिक संयुगे) यांच्या प्रमाणातील संतुलन, शरीरातील अम्‍ल व क्षारक ( अम्‍लाशी विक्रिया झाल्यास लवण देणारा पदार्थ) यांचे संतुलन, शरीराचे तापमान कडक मर्यादेत राखणे आणि हॉर्मोने आणि एंझाइमे यांच्या मदतीने चयापचयाचे (शरीरात सतत होणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींचे) संतुलन राखणे या गोष्टींचा समावेश होतो. या संदर्भात अनुकूलन म्हणजे आरोग्यपूर्ण अवस्था टिकवून धरतानाच, प्रतिकूल परिस्थितीनुसार बदललेली संतुलनाची अवस्था धारण करण्याची कोशिकांची (पेशींची) क्षमता होय. जेव्हा प्रतिकूल व पराकोटीचे अपायकारक बाह्य प्रभाव कोशिकेच्या या क्षमतेचा नाश करतात तेव्हा रोग होतो.

रोग प्रथमतः एखादा अवयव, ऊतक (समान रचना व कार्य असलेला कोशिकांचा समूह) किंवा तंत्र यांत सुरू होऊन मग इतर अवयवांत, ऊतकांत, तंत्रांत व शरीरभर पसरू शकतो किंवा एकदमच सर्व शरीरभर उद्‌भवू शकतो.

रोग उत्पन्न होण्यास एकाच वेळी अनेक प्रकारच्या गोष्टी कारणीभूत होतात व हातभार लावतात. यामुळे रोगाचा प्रतिकार, उपचार व प्रतिबंध करण्यास अनेक पातळ्यांवर प्रयत्‍न करावे लागतात.

कोणत्याही रोगाचे परिणाम हे शेवटी फक्त कोशिकेच्या नाशापुरते किंवा शरीरक्रियांच्या असंतुलनापुरते मर्यादित न राहता व्यक्ती, कुटुंब व संपूर्ण समाजाचेच आरोग्य धोक्यात आणू शकतात. एखाद्या व्यक्तीमध्येही हे परिणाम इतके खोल, दूरवर पसरलेले, दीर्घकालीन विविध रूपी असतात की, त्यांचा रोगाशी प्रत्यक्ष संबंध जोडणेही अवघड जाते. याखेरीज निरनिराळ्या व्यक्तींवर एकाच रोगाचे निरनिराळे परिणाम होऊ शकतात म्हणून रोग ही व्यक्तिनिरपेक्ष अशी वेगळी काढून दाखविता येण्यासारखी स्वयंभू गोष्ट नाही. यामुळेच उपचार करताना रोगावर उपचार करण्याऐवजी रुग्णावर उपचार करावे लागतात.

शरीराचा प्रतिकार

प्रतिकूल व अपायकारक बाह्य गोष्टींपासून शरीराचे व विशेषतः नाजूक व महत्त्वाच्या अवयवांचे संरक्षण व्हावे या दृष्टीने शरीराची रचना केलेली असते; उदा., डोळ्याचा समोरचा थोडा भाग वगळता बाकीचा सर्व भाग हाडांच्या खोबणीत बसविलेला असून समोरील भागावर उघडझाप करणाऱ्या पापण्या आणि पापण्यांचे केस असतात. अश्रूंच्या साहाय्याने डोळा वारंवार धुतला जातो वगैरे. ⇨प्रतिक्षेपी क्रिया शरीराला क्षणार्धात अपायकारक गोष्टींपासून दूर करतात; परंतु याशिवाय रोगांना (विशेषतः सूक्ष्मजंतू, व्हायरस, कवक-बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पती-इत्यादींपासून उद्‌भवणाऱ्या रोगांना) प्रतिकार करण्यासाठी शरीरात काही योजना केलेल्या आहेत.]

त्वचा व श्लेष्मकला यांचा सुसंधपणा

काही अपवाद वगळता रोग उत्पन्न करणारे सूक्ष्मजीव त्वचेतून व श्लेष्मकलेतून (आतडी, गर्भाशय, श्वासनाल इत्यादींसारख्या शरीरातील विविध नलिकाकार पोकळ्यांच्या अंतःपृष्ठावरील पातळ बुळबुळीत ऊतक स्तरातून शरीरात प्रवेश करू शकत नाहीत. त्यामुळे शरीरात रोगकारकाचा शिरकाव होण्यास हा प्राथमिक संरक्षक अडथळा आहे.

शरीरातील भक्षिकोशिका

या कोशिका शरीरात शिरलेल्या सूक्ष्मजीवांचे विशिष्ट पद्धतीने भक्षण करून त्यांना नष्ट करतात. यात दोन तऱ्हेच्या कोशिका मोडतात :

(१) रक्तातील श्वेत कोशिकांचे कण कोशिका व एककेंद्रक कोशिका [⟶ रक्त] हे दोन प्रकार. या कोशिका रक्तातून शरीरभर फिरत असताना जरूरीच्या ठिकाणी केशवाहिन्यांतून (अतिसूक्ष्म रक्तवाहिन्यांतून) बाहेर पडतात आणि तेथे भक्षणाचे कार्य करतात. यामुळे जरूर तेथे त्या इतर ठिकाणांपेक्षा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात, तसेच जरूरीच्या वेळी त्यांची रक्तातील संख्या खूप प्रमाणात वाढते.

(२) ऊतकांतील भक्षिकोशिका : या कोशिका त्या त्या ऊतकात स्थिर असून शरीरभर पसरलेल्या ⇨जालिकाअंतःस्तरीय तंत्राच्या भाग असतात. निरनिराळ्या ठिकाणांप्रमाणे व प्रकारांप्रमाणे या कोशिकांना महाभक्षिकोशिका, कुफर कोशिका (के. डब्ल्यू. फोन कुफर या जर्मन शरीरविज्ञांच्या नावावरून) इ. नावे आहेत.

शरीराची शोथ (दाहयुक्त सूज) प्रतिक्रिया

जेव्हा कोशिकांचे कोणत्याही कारणाने नुकसान होते किंवा त्या नष्ट होतात, तेव्हा त्या ठिकाणी रक्ताभिसरण व नवीन कोशिकांच्या संदर्भात आरोग्य संरक्षक घटनांची एक मालिकाच घडून येते. त्यामुळे बाह्य अपायकारक गोष्टींचा नाश करणे किंवा त्यांना एकूण शरीरापासून अलग ठेवणे शक्य होते आणि दुरुस्ती व कोशिकांच्या पुनर्जननाचा मार्ग मोकळा केला जातो. [⟶ शोथ].

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate