অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कर्करोगाचे आव्हान

कर्करोगाचे आव्हान

प्रास्ताविक

कर्करोग म्हणजेच कॅन्सर. कर्क म्हणजे खेकडा. कर्करोगाचे आजार खेकडयाप्रमाणे चिवट, धरले तर सहसा न सोडणारे असतात. तसेच खेकडयाला सर्व दिशांनी अवयव असतात त्याप्रमाणे कर्करोग आजूबाजूला अनेक दिशांनी पसरतो. म्हणूनच कर्करोग हे नाव अगदी समर्पक आहे. पण यापेक्षा जास्त समर्पक शब्द म्हणजे बांडगूळ. बांडगूळ जसे झाडाला खाऊन टाकते तसेच कर्करोगाचे आहे.

कर्करोग हा मध्यमवयानंतरचा आजार आहे. याला काही अपवाद आहेत. भारतात दर लाख लोकवस्तीत 100 कर्करोगग्रस्त व्यक्ती असे प्रमाण आहे. पन्नाशी, साठीनंतर कर्करोग होण्याची शक्यता वाढते. कर्करोग जवळजवळ कोणत्याही अवयवात निर्माण होऊ शकतो. त्वचा, स्नायू, अस्थी, सांधे, पचनसंस्था, श्वसनसंस्था, रक्ताभिसरणसंस्था, मज्जासंस्था, जननसंस्था, अंतःस्त्रावी ग्रंथी, रक्तपेशी, डोळा, कान,जीभ, स्तन, रससंस्था, इत्यादी कोणत्याही ठिकाणी कर्करोग निर्माण होऊ शकतो. हा आजार लगतच्या भागांत वाढत जातो किंवा रक्त वा रसावाटे पसरू शकतो. भारतामध्ये काही प्रकारचे कर्करोग विशेष प्रमाणात आढळतात. स्त्री-पुरुषांमध्ये कर्करोगाचे प्रमाण थोडे बदलते. भारतात कर्करोगाच्या एकूण रुग्णांपैकी 50 टक्के रुग्ण-तोंडाचा अंतर्भाग, घसा व गर्भाशयाचे तोंड या भागाशी संबंधित असतात

कर्करोग: महत्त्वाचे अवयव (तक्ता (Table) पहा)
ही वर्गवारी शहरी लोकसंख्येतून घेतलेली आहे. ग्रामीण भागात थोडयाफार फरकाने हेच चित्र असेल, फक्त क्रम थोडा वेगळा असेल. यातल्या काही अवयवांचे कर्करोग उघड दिसत असल्यामुळे हे रुग्ण जरा आधीच्या अवस्थेत तपासणीसाठी येतात उदा. जीभ व तोंडाच्या अंतर्भागाचे कर्करोग, घसा, स्तन, इ. पण काही कर्करोग अगदी अंतर्भागात असल्यामुळे उशिरा दिसून येतात व तोपर्यंत ते हाताबाहेर जातात. विशेषतः जठर, यकृत,अन्ननलिका, फुप्फुसे, गर्भाशय, मोठे आतडे, गुदाशय, प्रॉस्टेट, इत्यादी ठिकाणचे कर्करोग लवकर दिसून येत नाहीत. कर्करोगाच्या जागेनुसार आजारांमुळे थोडाफार त्रास किंवा बदल जाणवतो उदा.
  • स्वरयंत्राच्या कर्करोगाने आवाज बदलणे
  • गर्भाशय कर्करोगामुळे रक्तस्राव होणे
  • गुदाशय कर्करोगामुळे मलविसर्जनात बदल व त्रास होणे
  • अन्ननलिका कर्करोगामुळे गिळायला त्रास, इ.
असे बदल लवकर हेरून डॉक्टरकडे पाठवणे अगदी महत्त्वाचे आहे. योग्यवेळी उपचार झाले तर यांतील काही रुग्ण उपचाराने बरे होण्याची शक्यता असते.

वाढते प्रमाण

कर्करोगाचे लोकसंख्येशी व इतर आजारांशी असलेले प्रमाण सतत वाढत आहे हे स्पष्ट आहे. याची कारणे अनेक आहेत. याबरोबरच लोकशिक्षणामुळे रोगाची विशिष्ट लक्षणे आढळल्यास जागरूकपणे रुग्ण लगेच डॉक्टरांकडे जाण्याची शक्यता वाढलेली आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षा रुग्णांची नोंद होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे रोगनिदानाचे प्रमाण खूप वाढले आहे. सोनोग्राफी व रक्तचाचण्या यामुळे रोग लवकर ओळखता येतो. कर्करोगाच्या आकडेवारीत जी वाढ झालेली दिसते, ती वाढ थोडीशी खरी आहे. मुळात कर्करोगाच्या प्रमाणात वाढ होतेच आहे. याची मुख्य दोन कारणे म्हणजे आयुर्मान वाढणे,आणि कर्करोगाला कारणीभूत ठरणारी परिस्थिती वाढत जाणे (उदा. प्रदूषण, अनेक व्यवसायजन्य कर्करोग).

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्याविद्या

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate