অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

प्रक्षेप

कर्करोगामध्ये जेव्हा मूळ रोगस्थानापासून रक्तवाहिनी, लसीकावाहिनी किंवा इतर नैसर्गिक वहनमार्गांतून (उदा., श्वासनलिका, आतडी वगैरे) कर्ककोशिका (कर्कपेशी) वाहून आल्यामुळे नव्या जागी त्याच प्रकारचे कर्काबुर्द (कोशिकांची अत्याधिक नवोत्पत्ती झाल्यामुळे निर्माण होणारी आणि शरीरक्रियेला हानीकारक असणारी गाठ) तयार होते तेव्हा या क्रियेस प्रक्षेप म्हणतात व नव्या अबुर्दास प्रक्षेपजन्य अबुर्द म्हणतात. उदरगुहा (उदरातील इंद्रिये जिच्यात असतात ती पोकळी) आणि परिफुप्फुसगुहा (फुप्फुसावरील स्त्रावोत्पादक पातळ पटलामय आवरणाच्या दोन थरांमधील पोकळी) या ठिकाणी मूळ रोगस्थानापासून सुट्या झालेल्या कर्ककोशिका कोणत्याही वहनमार्गाशिवाय या गुहातील इतर जागी पडून तेथे कर्काबुर्द तयार करू शकतात. या प्रक्षेपाला ‘आंतर-आंतरावकाशीय’ प्रक्षेप म्हणतात.

प्रक्षेप हे कर्करोगाचेच एक प्रमुख लक्षण व वैशिष्ट्य असून साध्या अबुर्दामध्ये त्याचे कर्करोगात रूपांतर होईपर्यंत प्रक्षेप कधीही आढळत नाही. अर्बुदांचे ‘साधे’ व ‘मारक’ असे करण्यात येणारे वर्गीकरण याच गुणधर्मावर आधारित आहे. प्रक्षेपनिर्मिती हा गुणधर्म मात्र सर्व प्रकारच्या कर्करोगांत सारख्या प्रमाणात आढळत नाही. काही कर्करोग मूळ स्थानी प्रथम आकारमानाने वाढतात व नंतर त्यांचे अन्यत्र प्रक्षेप निर्माण होतात. काही कर्करोगांत मूळस्थानी आकारमान लहान असतानाच शरीरात इतरत्र प्रक्षेपजन्य लहान मोठी अर्बुदे निर्माण होतात. त्वचेच्या कृष्णकर्कात (त्वचेतील ‘कृष्णरंजक’ नावाच्या रंगद्रव्याचे उत्पादन करणाऱ्या कोशिकांच्या कर्करोगांत) मेंदू, फुप्फुसे व यकृत यांसारख्या दूरवरच्या अंतस्त्यांत (इंद्रियांत) मूळ रोग अत्यल्प असतानाच प्रक्षेपनिर्मिती होते. याउलट मेंदूतील तंत्रिकाबंधाबुर्द (मेंदूच्या आधार ऊतकातील-समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहातील-कोशिकांपासून उद्‌भवणारे अर्बुद) मारक असूनही त्याचे बहुधा प्रक्षेप निर्माण न होता मूळस्थानीच वाढते. त्वचेतील आधार कोशिकांच्या कर्करोगातही स्थानिक वाढ होते; परंतु प्रक्षेपनिर्मिती होत नाही.

प्रक्षेपनिर्मिती

प्रक्षेपनिर्मितीसाठी पुढील गोष्टी आवश्यक असतात : (१) अन्यत्र जिवंत राहून वाढू शकतील अशा कर्ककोशिका, (२) मुक्त झालेल्या अशा कर्ककोशिकांच्या वहनासाठी मार्ग उपलब्ध असणे आणि (३) त्यांच्या बीजारोपणास व वाढीस अनुकूल परिस्थिती नवीन जागी उपलब्ध असणे.

मूळ रोगस्थानी वाहिनीसंवर्धन प्रथम होते म्हणजे तेथे नीलिका (सूक्ष्म नीला), केशवाहिन्या (सूक्ष्म रोहिण्या व नीलिका यांना जोडणाऱ्या सूक्ष्म वाहिन्या) व लसीकावाहिन्या यांमध्ये वाढ होते. वाहिन्यांत कर्ककोशिका शिरकाव करतात. प्रामुख्याने नीलिकांत प्रवेश केलेल्या अशा कर्ककोशिका त्या बाह्य पदार्थ असल्यामुळे रक्तातील बिंबाणू (रक्त साखळणाऱ्या क्रियेशी संबंधित असलेल्या वर्तुळाकार व दीर्घवर्तुळाकार तबकड्या),लसीका कोशिका व इतर विरोधी पदार्थांना तोंड द्यावे लागते व हा झगडा वहनमार्गातून चालू असतो. रक्ताभिसरणातून योग्य त्या जागी कर्ककोशिका पोहोचताच तेथील केशवाहिन्यांच्या भित्तींना चिकटून राहिल्यानंतर त्या भित्तीतून आजूबाजूच्या ऊतकांत शिरतात व तेथे वृद्धिंगत होण्यासारखी परिस्थिती मिळताच प्रक्षेपजन्य अर्बुद तयार होते.

प्रक्षेप प्रामुख्याने फुप्फुस, मेंदू, यकृत, अस्थी, त्वचा आणि लसीका ग्रंथी या अवयवांतून आढळतात. विशिष्ट कर्कार्बुदे विशिष्ट अवयवांत प्रक्षेपनिर्मिती करतात, असे किरणोत्सर्गी मार्गण मूलद्रव्याच्या [भेदक कण वा किरण बाहेर टाकणाऱ्या व या कणांचा वा किरणांचा विशिष्ट उपकरणांच्या द्वारे शोध घेऊन ज्याचा मार्ग ठरविता येतो अशा मूलद्रव्याचा; अणूउर्जेचे शांततामय उपयोग] समावेश केलेल्या कर्ककोशिकांच्या अलीकडील अभ्यासावरून आढळले आहे. काही विशिष्ट अवयवच प्रक्षेपनिर्मितीस मदत का करतात, तसेच जिवंत कर्ककोशिकांचा शिरकाव होऊनही काही अवयव प्रक्षेपवृद्धी का होऊ देत नाहीत, याविषयी अजून माहिती झालेली नाही.

कित्येक वेळा मूळस्थानी कर्करोग लहान असून त्यापासून कोणतेही लक्षण निर्माण होण्यापूर्वी प्रक्षेपच प्रथम लक्षणे निर्माण करुन रोगाकडे लक्ष वेधले जाते. यामुळे कधीकधी कर्करोग असल्याचे प्रक्षेपामुळे प्रथमच समजते. काही प्रसंगी खूप शारीरिक तपासण्या करण्याचा खटाटोप करूनही प्रक्षेपास कारणीभूत असलेला मूळ कर्करोग शेवटपर्यंत सापडत नाही.

स्तन, अष्टीला ग्रंथी, अधिवृक्क ग्रंथी, जठर, गर्भाशय, अंडकोश आणि फुप्फुस या अवयवांचा कर्करोग दूरवर त्वरित प्रक्षेपनिर्मिती करतो. म्हणून प्रक्षेपच प्रथम आढळल्यास साधारणतः वरील अवयवांची तपासणी करुन तेथे कर्करोग आहे किंवा नाही, याची शहानिशा करावी लागते.

प्रक्षेपनिर्मिती मुख्यतः लसीकावाहिनी व रक्तवाहिनी यांच्याद्वारे होणाऱ्या प्रसाराने होते. लसीकावाहिनीद्वारे होणारा प्रक्षेप वाहिनीच्या कडेकडेने कर्ककोशिका वाढत गेल्याने किंवा तिच्या प्रवाहातून कोशिकांचा अंतर्कील (कोशिकांचा पुंजका) दूरवर वाहून नेल्यामुळे होतो. असे प्रक्षेप प्रामुख्याने प्रादेशिक लसीका ग्रंथीत किंवा त्यांना संलग्न असलेल्या लसीका ग्रंथीत निर्माण होतात. उदा.,स्तनातील कर्करोगाचा प्रक्षेप काखेतील लसीका ग्रंथीत तयार होतो. प्रक्षेप प्रसाराचा हा मार्ग बहुतेक सर्व प्रकारच्या कर्करोगात आढळतो.

रक्तवाहिनीद्वारे निर्माण होणारा प्रक्षेप कर्ककोशिकांचा अंतर्कील दूरवर वाहून नेल्यामुळे उत्पन्न होतो. कर्ककोशिका रक्तवाहिनीत प्रामुख्याने नीलिकांत प्रत्यक्ष आक्रमणाद्वारे प्रवेश करतात. रोहिणिकांत (सूक्ष्म रोहिण्यांत) असे आक्रमण सहसा होत नाही. कारण त्यांच्या भित्ती प्रतिबंध करतात. नीलिकांत भित्ती पातळ असतात आणि त्यांतून जागोजागी लसीकावाहिन्या शिरलेल्या असतात. यामुळे नीलिकांत कर्ककोशिकांचा सहज शिरकाव होतो.

रक्तवाहिनीद्वारे तयार होणारे प्रक्षेप फुप्फुस, यकृत, मेंदू व अस्थी या अवयवांतून तयार होतात. कोणत्या अवयवात प्रक्षेपनिर्मिती होणार हे रक्तप्रवाहाच्या,विशेषेकरून नीलांतील रक्तप्रवाहाच्या दिशेवर अवलंबून असते. लहान व मोठ्या आतड्यांतील रक्तप्रवाह यकृताकडे जातो व म्हणून या जागी असलेल्या कर्करोगाचा प्रक्षेपही यकृतात तयार होतो. मूत्रपिंड, गर्भाशय, हात, पाय इत्यादींचे रक्त नीलांतून फुप्फुसात येत असल्यामुळे या भागांच्या कर्करोगाचे प्रक्षेप फुप्फुसात तयार होतात. काही शरीर भागांत (उदा., स्नायू व प्लीहा) प्रक्षेपनिर्मिती होत नाही. काही वेळा कर्ककोशिकांचा अंतर्कील नवीन जागी पोहोचल्यानंतर बराच काळपर्यंत सुप्तावस्थेत टिकून राहतो. प्रदीर्घ सुप्त कालावधीचे उदाहरण डोळ्यातील कृष्णकर्कात (जालपटलातील कृष्णरंजक उत्पादक कोशिकांच्या कर्करोगात) आढळते. मूळ कर्करोगावर शस्त्रक्रिया करुन तो पूर्णपणे काढून टाकल्यानंतर वीस वर्षांनी यकृतात प्रक्षेप निर्माण झाल्याचे आढळले आहे.

प्रक्षेपक्रिया चालू असताना पोषकातील (रोग झालेल्या व्यक्तीतील) नैसर्गिक संरक्षणात्मक प्रतिक्रिया (ज्यामध्ये प्रतिरोधक व अप्रतिरोधक अशा दोन्ही प्रकारांचा समावेश असतो) चालू असतात. रक्तातील काही कोशिका (ज्यांना ‘नैसर्गिक मारककोशिका’ अशी संज्ञा देण्यात आली आहे) वहनमार्गातील कर्ककोशिकांच्या नाशाचे कार्य सतत करीत असतात. याशिवाय सक्रियित (पूर्वानुभवाने क्रियाशील बनलेल्या) महाभक्षी कोशिका या नाश कार्यात भाग घेत असतात. या सर्व विरोधाला तोंड देऊन जिवंत राहणाऱ्या कर्ककोशिकाच प्रक्षेपनिर्मिती करू शकतात. अलीकडील संशोधनानुसार सर्व कर्ककोशिकांची प्रक्षेपनिर्मितीक्षमता सारखी नसल्याचे आढळले आहे. ज्या कर्ककोशिकांची अशी क्षमता अधिक असते त्याच प्रक्षेपनिर्मिती करू शकतात.

लक्षणे

प्रक्षेपामुळे होणारी लक्षणे मुख्यतः तो ज्या अवयवात निर्माण होतो त्यावर, तसेच मूळ कर्करोगाच्या स्वरूपावर व कार्यप्रवणतेवर अवलंबून असतात. फुप्फुसातील प्रक्षेपामुळे छातीत दुखणे, खोकला, रक्तमिश्रित थुंकी ही लक्षणे उद्‌भवतात. यकृतातील प्रक्षेपामुळे कावीळ, जलोदर, भूक मंदावणे ही लक्षणे उद्‌भवतात. त्वचा व लसीका ग्रंथीतील प्रक्षेपामुळे शरीरभर लसीका ग्रंथींची वृद्धी होऊन गाठी तयार होतात. अस्थीतील प्रक्षेप अस्थिभंग, रक्तक्षय, ज्वर इत्यादींस कारणीभूत होतो.

प्रक्षेप निर्माण झालेला कर्करोग साधारणपणे शस्त्रक्रियेचा उपयोग होण्यापलीकडे गेलेला असतो. अशा रोग्याच्या बाबतीत प्रारण चिकित्सा त्याचे आयुर्मान थोडेफार वाढविण्यास मदत करते.

निदान

फुप्फुस व अस्थी यांत निर्माण झालेले प्रक्षेप क्ष-किरण छायाचित्रात दिसू शकतात. लसीका ग्रंथीतील प्रक्षेपाच्या निदानाकरिता जीषोतक परिक्षा (शस्त्रक्रियेने अल्पसा तुकडा कापून घेऊन सूक्ष्मदर्शकाखाली विशिष्ट तपासणी करणे) उपयुक्त असते. मेंदू, यकृत यांसारख्या अंतस्थ अवयवांतील प्रक्षेपाकरिता कर्ककोशिकांत केंद्रित होणाऱ्या किरणोत्सर्गी समस्थानिकांचे (अणुक्रमांक तोच पण भिन्न अणुभार असलेल्या त्याच मूलद्रव्याच्या किरणोत्सर्गी प्रकारांचे) प्रथम नीलेतून अंतःक्षेपण (इंजेक्शन) करून नंतर विशिष्ट उपकरणांच्या मदतीने बाहेर पडणाऱ्या प्रारणांचे मापन व रेखाचित्रण करणे उपयुक्त असते. याला क्रमवीक्षण म्हणतात. त्याकरिता विशिष्ट अवयवासाठी विशिष्ट समस्थानिक वापरतात. उदा., अवटू ग्रंथीच्या क्रमवीक्षणाकरिता तसेच अन्यत्र प्रक्षेपांच्या निदानाकरिता आयोडीन (१३१) व टेक्नेशियम (९९) हे समस्थानिक वापरतात. कर्करोगाची अवस्था व प्रक्षेप आलेखनाकरिता इतर नवनवीन किरणोत्सर्गी द्रव्ये वापरण्यात येत आहेत. यामध्ये गॅलियम (६७), इटर्बियम (१६९), ब्लिओमायसीन यांसारख्या द्रव्यांचा समावेश होतो.

 

संदर्भ : 1. Boyd, W. A. Textbook of Pathology, Philadelphia, 1961.

2. Dey, N. C.; Dey, T. K. A Textbook of Pathology, Calcutta, 1974.

3. Illingworth, C.; Dick, B. M. A Textbook of Surgical Pathology, Edinburgh, 1975.

लेखक : श्यामकांत कुलकर्णी / य. त्र्यं. भालेराव

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate