অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कावीळ

दूषित पाणी तसेच अन्नपदार्थामधून पसरणारी कावीळ वर्षभर असते. मात्र, पावसाळ्यात या संसर्गजन्य आजारात वाढ होते. परंतु स्वच्छतेच्या काही सवयी लावून घेतल्या तर काविळीपासून दूर रहाता येते.

काविळीचा संसर्ग कसा होतो ?

कावीळ हा विषाणूजन्य आजार आहे. या आजाराचा प्रसार दूषित पाणी, दूषित अन्न, वैयक्तिक अस्वच्छता अशा विविध कारणांमुळे होतो. डोळे, लघवी, नखे पिवळी दिसतात. कावीळ ही दूषित सुया कावीळ झालेल्या माणसाचे रक्त यातूनही कावीळ पसरू शकते. काविळीची लागण झाली की यकृतामध्ये बिघाड होतो. शरीरात पित्तनलिकेत काही अडथळा असला तर कावीळ होते.

लक्षणे

  • सुरुवातीला थोडा ताप येतो.
  • भूक कमी होते.
  • मळमळ व उलटया होतात.
  • लघवी गडद पिवळी होऊ लागते.
  • डोळे पिवळे दिसू लागतात.
  • बऱ्याच वेळा पोटाच्या वरच्या भागात दुखते. काही जणांच्या अंगाला खाज सुटते.

प्रतिबंधात्मक उपाय –

गरोदर स्त्रियांना हा आजार झाल्यास त्यांना गंभीर प्रकारांना सामोरे जावे लागते. हा आजार होऊ नये यासाठी गरोदर स्त्रिया तसेच इतरांनीही काही सूचनांचे काटेकोर पालन करावे.

  • पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचा वापर करावा. पाणी १५ मिनिटे उकळून प्यावे.
  • बाहेरच्या ठिकाणी पाणी पिताना काळजी घ्यावी .
  • घरी तयार केलेले ताजे पदार्थच खावेत. उघड्यावरील, माशा बसलेले पदार्थ टाळावेत.
  • रस्त्यावरील उघडे खाद्यपदार्थ- कापलेली फळे, शीतपेय, पाणीपुरी, भेळ हे सर्व बनवताना स्वच्छ पाण्याचा वापर केला नसल्यास तसेच वैयक्तिक स्वच्छता ठेवली नसल्यास या पदार्थांमधून काविळीचे विषाणू पसरू शकतात. विशेषतः गरोदर स्त्रियांना हे पदार्थ आवडत असल्यास ते खाण्याची तीव्र इच्छा होते. मात्र रस्त्यावर विक्रीसाठी ठेवलेले पदार्थ कटाक्षाने टाळावेत.
  • पावसाळ्याच्या दिवसात फळे तसेच सलाडसाठी कंदमुळे, गाजर, बीट व्यवस्थित धुवून घ्यावेत. वैयक्तिक स्वच्छता ठेवावी. तसेच परिसर ही स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी.
  • गरोदर स्त्रियांना ही लक्षणे पहिल्या तीन महिन्यानंतर दिसून आल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

कावीळ होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी-

  • परिसर स्वच्छ ठेवावा.
  • पिण्याचे पाणी शुद्ध व स्वच्छ असावे.
  • पिण्याच्या पाण्याजवळ धुणे-भांडी करणे, गुरांना धुणे, शौचाला बसणे तसेच सांडपाणी वाहू देणे अशा गोष्टी टाळाव्यात.
  • शौचाहून आल्यावर तसेच काहीही खाण्यापूर्वी हात साबणाने धुवावेत.
  • अन्नपदार्थ झाकून ठेवावेत.
  • फळे व भाज्या खाण्याआधी धुवून घ्याव्यात.
  • विनाकारण इंजेक्शन व सलाईन घेणे टाळावे.

 

स्त्रोत : सुरक्षित पिण्याचे पाणी, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट

अंतिम सुधारित : 7/1/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate