অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

क्रॉनिक किडणी फेल्युअरवरील उपचार

क्रॉनिक किडणी फेल्युअरवरील उपचार

  1. औषधे व पथ्याने करण्याचे उपचार
    1. क्रॉनिक किडणी फेल्युअरच्या रुग्णांसाठी औषधे व पथ्याचे पालन करून करण्यात येणारे उपचार महत्वपूर्ण का आहेत?
    2. क्रॉनिक किडणी फेल्युअरचे कित्येक रुग्ण औषधे व पथ्याच्या उपचारांचा लाभ घेण्यात अयशस्वी का झाले?
    3. औषधे व पथ्यपालन करून उपचार करण्यामागे काय हेतू आहे?
  2. क्रॉनिक किडणी फेल्युअरवर औषधांनी करण्यात येणारे मुख्य उपचार खालीलप्रमाणे आहेत
    1. क्रॉनिक किडणी फेल्युअरच्या कारणावर उपचार
    2. किडनीची कार्यक्षमता टिकवण्यासाठीचे उपचार
    3. क्रॉनिक किडणी फेल्युअरमुळे उदभवनाऱ्या लक्षणावर उपचार
    4. किडनीला कोणत्याही प्रकाराने होणारया हानीपासून वाचवणे
    5. क्रॉनिक किडनी फेल्युअरवरील भविष्यातील उपचारांची तयारी
    6. खाण्यासाठी पथ्य
  3. क्रॉनिक किडनी फेल्युअरमध्ये औषधान्द्वारे उपचार करताना सर्वात महत्वाचा उपचार कोणता?
  4. रक्तदाब कमी करण्यासाठी कोणती औषधे जास्त उपयोगी असतात?
  5. क्रॉनिक किडणी फेल्युअरच्या रुग्णांमध्ये रक्तदाब किती असला पाहिजे?
  6. रक्तदाब नियंत्रणात आहे हे कसे समजेल? याकरिता कोणती पद्धत चांगली आहे?
  7. किडनी फेल्युअरमध्ये वापरण्यात येणारी डाययुरेटीक्स औषधे कशाप्रकारे काम करतात?
  8. किडनी फेल्युअरमधील रक्तातल्या फिकेपनावर काय उपचार आहेत?
  9. रक्तातल्या फिकेपानाव्र उपचार घेणे का आवश्यक आहे?
  10. नेफ्रॉंलॉजीस्टकडून रुग्णांची वेळोवेळी तपासणी व देखभाल

क्रॉनिक किडणी फेल्युअरवरील उपचारांचे तीन प्रकार आहेत.

१)  औषधे व पथ्य

२) डायलिसीस

३) किडणी प्रत्यारोपण

  • क्रॉनिक किडणी फेल्युअरमध्ये (क्रॉनिक किडणीडिसीज ( CKD) अगदी प्राथमिक अवस्थेत जेव्हा किडनीचे जास्त नुकसान झालेले नसते. तेव्हा औषधे व पथ्य पाळायला सांगून इलाज केला जातो.
  • दोन्ही किडन्या जास्त खराब झाल्यामुळे जेव्हा किडनीची कार्यक्षमता कमालीची कमी होते , तेव्हा डायलिसीस करण्याची आवश्यकता असते व त्यातले अनेक रुग्णांना किडनी प्रत्यारोपनासारख्या विशिष्ट उपचारांची गरज लागते.

औषधे व पथ्याने करण्याचे उपचार

क्रॉनिक किडणी फेल्युअरच्या रुग्णांसाठी औषधे व पथ्याचे पालन करून करण्यात येणारे उपचार महत्वपूर्ण का आहेत?

किडणी जास्त खराब झाल्यामुळे आवश्यक असणारे डायलिसीस व किडनी प्रत्यारोपण हे उपाय अतिशय खर्चिक आहेत आणि अशा प्रकारच्या सुविधा सगळीकडे उपलब्ध नाहीत ,शिवाय ह्यामुळे रुग्ण संपूर्ण निरोगी होण्याची शाश्वतीही नाही, तर मग आपल्याच परिसरात कमी खर्चात उपलब्ध असलेली औषधे आणि पथ्य अशा सोप्या उपचारांनी आपली किडणी अधिक बिघडू नये यासाठी प्रयत्न करायला काय हरकत आहे.

क्रॉनिक किडणी फेल्युअरचे कित्येक रुग्ण औषधे व पथ्याच्या उपचारांचा लाभ घेण्यात अयशस्वी का झाले?

क्रॉनिक किडणी फेल्युअरच्या अगदी प्राथमिक अवस्थेतच उपचार सुरु केल्यास किडनीचे संभाव्य नुकसान टाळू शकते.परंतु या रोगाची लक्षणे सुरुवातीला लक्षातही न येण्यासारखी असतात व रोगी आपली दैनंदिन कामे सहज करू शकत असतो. म्हणूनच वेळोवेळी उपचार केल्याचे फायदे याचे महत्व काही रोगी व त्याचे कुटुंबीय यांच्या लक्षातच येत नाही.

बऱ्याचशा रोग्यांमध्ये उपचाराविषयी अज्ञान किंवा बेपर्वाई असल्याचे दिसते. अनियमित ,अयोग्य व अर्धवट उपचारांमुळे किडनी लवकर खराब होऊ शकते व निदान झाल्यानंतर थोड्याच कालावधीत तब्बेत जास्त बिघडल्यामुळे डायलिसीस , किडनी प्रत्यारोपण यांसारख्या महागड्या उपचारांची आवश्यकता भासते. इलाजामध्ये बेपर्वाई व दुर्लक्ष केल्यामुळे अनेक रुग्णांना आपले प्राणही गमवायची वेळ येऊ शकते.

औषधे व पथ्यपालन करून उपचार करण्यामागे काय हेतू आहे?

क्रॉनिक किडणी फेल्युअरमध्ये औषधे व पथ्य पाळण्यास सांगून उपचार करण्यामागे खालील संदेश असतात.

१)रोगामुळे होणारया त्रासापासून रुग्णाला आराम देणे.

२) किडनीच्या राहिलेल्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ न देणे व किडनीला जास्त खराब होऊ न देणे तसेच खराब होण्याच्या प्रक्रियेचा वेग कमी करणे.

३)योग्य उपचारांनी तब्येत आनंदायी ठेवणे आणीब डायलिसीस किंवा किडनी प्रत्यारोपणाची अवस्था शक्यतोवर लांबवण्याचा प्रयत्न करणे.

क्रॉनिक किडणी फेल्युअरवर औषधे व पथ्य सांगून कसे उपचार केले जातात

क्रॉनिक किडणी फेल्युअरवर औषधांनी करण्यात येणारे मुख्य उपचार खालीलप्रमाणे आहेत

क्रॉनिक किडणी फेल्युअरच्या कारणावर उपचार

  • मधुमेह ,उच्च रक्दाबव्र योग्य इलाज.
  • लघवीत होणाऱ्या जंतुसंसर्गावर आवश्यक इलाज.
  • मूतखड्यावर आवश्यक ऑपरेशन किंवा दुर्बिणीद्वारे इलाज.

किडनीची कार्यक्षमता टिकवण्यासाठीचे उपचार

  • मधुमेह व उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवणे .
  • शरीरातील पाण्याचे योग्य प्रमाण सांभाळणे.
  • शरीरातील वाढलेल्या आम्लाच्या (असिडोसीस) प्रमाणावर इलाज म्हणून सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच सोडामिन्टचा वापर करणे, जो एक प्रकारचा क्षार आहे.

क्रॉनिक किडणी फेल्युअरमुळे उदभवनाऱ्या लक्षणावर उपचार

  • उच्च रक्तदाब नियंत्रण ठेवणे.
  • सूज कमी करण्यासाठी ,लघवीचे प्रमाण वाढवण्यासाठी औषधे (डाययुरेटिक्स) देणे.
  • उलट्या ,मळमळ, अॅसीडीटी यावर विशेष   औषधांनद्वारे इलाज करणे.
  • हाडांच्या बळकटीसाठी कॅल्शियम आणि वीटॅमीन ‘ डी ‘ (Alfa D3, Rocaltrol)  द्वारे इलाज करणे.
  • रक्तात येणाऱ्या फिकेपणा (अॅनिमिया) यावर लोह,वीटॅमिनची औषधे आणि विशेष प्रकारच्या एरीथ्रोप्रोएटीनचे इंजेक्शन देऊन इलाज करणे.

किडनीला कोणत्याही प्रकाराने होणारया हानीपासून वाचवणे

  • किडनीला हानिकारक ठरतील अशी औषधे घेऊ नयेत. उदा. अॅटीबयोटीक्स , वेदनाशामक गोळ्या,आयुर्वेदिक भस्म वगैरे.
  • किडनीला हानि पोहचवतील अशा रोगांवर त्वरित इलाज केला पाहिजे.( उदा. उलट्या,मलेरिया,सेप्टीसेमिया वगैरे)
  • किडनीला सरळ-सरळ नुकसान पोहोचवणाऱ्या रोगांवर (मुतखडा,मुत्रमार्गाचा संसर्ग) त्वरित उपाय योजणे.
  • धुम्रपान करू नये.गुटखा, दारू या व्यसनांपासून दूर राहावे.

क्रॉनिक किडनी फेल्युअरवरील भविष्यातील उपचारांची तयारी

  • रोगाचे निदान झाल्यावर , डाव्या हाताच्या शिरांचे नुकसान होऊ नये म्हणून तपासणीकरिता त्यातून रक्त घेऊ नये अथवा कोणतेही इन्जेक्तिओन किंवा ग्लुकोज देऊ नये.
  • किडनी जास्त खराब झाली असल्यास डाव्या हाताची धमनी व शिरा जोडून ए वी फिस्ब्युला (Arterio Venous Fistula) तयार करावी. ती हिमोडायलिसीससाठी दीर्घकाळ गरजेची असते.
  • हीपेटाइटीस ‘बी ‘ चे लसीकरण , इंजेक्शनचा कोर्स लवकरात लवकर केल्यास डायलिसीस किंवा किडणी प्रत्यारोपणाच्या वेळी हीपेटाइटीस ‘यी’होण्याचा धोका टाळू शकतो.

खाण्यासाठी पथ्य

  • मीठ :

उच्च रक्तदाबाला नियंत्रणात ठेवण्यासाठी व सूज कमी करण्यासाठी मीठ कमी खाल्ले पाहिजे.अशा प्रकारच्या रुग्णांनी जेवणात पूर्ण दिवसात ३ ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये. जास्त मीठ असलेले पदार्थ उदा. पापड ,लोणची,वेफर्स आदि पदार्थ आहारातून वर्ज्य करावे.

  • पाण्याचे प्रमाण :

लघवीचे प्रमाण कमी झाल्यामुळे शरीरावर सूज येते व श्वास घेण्यासाठी त्रास होऊ शकतो. जेव्हा शरीरावर सूज असेल तेव्हा पाणी व इतर द्रवपदार्थ कमी प्रमाणात घ्यावे. त्यामुळे सूज वाढत नाही. जास्त प्रमाणातील सूज कमी करण्यासाठी २४ तासात होणाऱ्या एकूण लघवीच्या प्रमाणापेक्षा पाणी व द्रवपदार्थ कमी घेण्याचा सल्ला दिला जातो.

  • पोटॅशियम:

किडणी फेल्युअरच्या रुग्णांनी फळे,सुका मेवा,शहाळ्याचे पाणी असे जास्त पोटॅशियम असलेले पदार्थ कमी किंवा आहारातूनच वर्ज्य करावेत. पोटॅशियमचे जास्त प्रमाणातील सेवन हदयासाठी हानिकारक व प्राणघातक ठरू शकते.

  • प्रोटीन :

किडनी फेल्युअरच्या रुग्णांना प्रोटीनचा समावेश असलेले खाद्यपदार्थ वर्ज्य करण्यास सांगतात. शाकाहारी रुग्णांना खाण्यापिण्यात जास्त बदल करण्याची आवश्यकता नसते. प्रोटिनयुक्त खाद्यपदार्थ (उदा. डाळी) आहारात कमी प्रमाणात घ्यायचा सल्ला दिला जातो.

  • कॅलरी :

शरीराच्या पोषणासाठी व प्रोटीनचा अनावश्यक व्यय रोखण्यासाठी शरीराला योग्य प्रमाणात कॅलरीज आवश्यक असतात.

  • फॉस्फरस:

किडणी फेल्युअरच्या रुग्णांनी  फॉस्फरसयुक्त पदार्थ कमी प्रमाणात घ्यायला पाहिजेत.

क्रॉनिक किडनी फेल्युअरमध्ये औषधान्द्वारे उपचार करताना सर्वात महत्वाचा उपचार कोणता?

ह्या रोगावर उपचार करताना उच्च रक्तदाब नियंत्रणात असणे हे अतिशय महत्वाचे आहे.

किडणी फेल्युअरच्या बहुतांश रुग्णांमध्ये रक्तदाब उच्च असल्याचे दिसून येते,ज्यामुळे रोगग्रस्त अशक्त किडनीवर भर येऊन किडनीला आणखी नुकसान पोहोचते.

रक्तदाब कमी करण्यासाठी कोणती औषधे जास्त उपयोगी असतात?

उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी किडनी रोग तज्ञ (नेफॉलॉजिस्ट )किंवा फिजिशियन योग्य उपचार व औषधे देतात. रक्तदाब कमी करण्यासाठी कॅल्शीयम चॅनेल ब्लॉकर्स , डाययुरेटिक्स,क्लोनिडीन आदींचा उपयोग केला जातो.किडणी फेल्युअरच्या प्राथमिक अवस्थेत मुख्यत्वेकरून एसीईआय किंवा ए आर बी प्रकारची औषधे (उदा.केप्टोप्रिल अॅनालेप्रील, लिसिनोप्रील ,रामिप्रील ,लोसारटन इ.)देण्यावर भर असतो. हि औषधे रक्तदाब तर कमी करतातच , शिवाय व्याधीग्रस्त किडणी खराब होण्याच्या प्रक्रियेचा वेग कमी करण्यात महत्वाचे व फायदेशीर काम करतात.

क्रॉनिक किडणी फेल्युअरच्या रुग्णांमध्ये रक्तदाब किती असला पाहिजे?

किडणीजास्त खराब होण्यापासून वाचवण्याकरिता रक्तदाब नेहमी १४०/९० पेक्षा कमी असणे आवश्यक असते.

रक्तदाब नियंत्रणात आहे हे कसे समजेल? याकरिता कोणती पद्धत चांगली आहे?

नियमितपणे ठराविक कालावधीनंतर डॉक्टरांकडे रक्तदाब तपासून रक्तदाब नियंत्रणात आहे किंवा नाही हे तपासून पाहता येते. किडनीच्या सुरक्षेसाठी रक्तदाब नियंत्रणात असणे अत्यंत आवश्यक आहे. ज्याप्रमाणे मधुमेहाचे रुग्ण ग्लुकोमिटरने स्वतःच रक्तातील साखरेचे प्रमाण मोजू शकतात,त्याप्रमाणे रुग्णाच्या कुटुंबीयांनी रक्तदाब मोजायला शिकले तर ते रुग्णाला अतिशय फायदेशीर ठरते. रोज डायरीत रक्तदाबाची नोंद करून डॉक्टरांना दाखवले तर डॉक्टरही औषधांनमध्ये बदल करू शकतात.

किडनी फेल्युअरमध्ये वापरण्यात येणारी डाययुरेटीक्स औषधे कशाप्रकारे काम करतात?

डाययुरेटिक्स नावाने ओळखली जाणारी औषधे (उदा. लॅसिक्स ,फ्रुसीनेक्स ,टाइड,डायटॉर इ.)लघवीचे प्रमाण वाढवून सूज कमी करण्यात व श्वास घेताना होणारा त्रास कमी करण्यात रुग्णाला मदत करतात.मात्र हे लक्षात ठेवले पाहिजे कि , हि औषधे लघवीचे प्रमाण वाढवण्याकिरता असतात.

किडनीची कार्क्षमता वाढविण्यात हि औषधे कोणत्याही प्रकारची मदत करीत नाहीत.

किडनी फेल्युअरमधील रक्तातल्या फिकेपनावर काय उपचार आहेत?

यासाठी आवश्यक लोह व व्हीटॅमिनयुक्त औषधे दिली जातात.जेव्हा किडणी जास्तच खराब होते तेव्हा हि औषधे घेऊनसुद्धा हिमोग्लोबिनचे प्रमाण घातल्याचे पाहायला मिळते. यासाठी खास प्रकारची एरीथ्रोपोएटीनची (इप्राक्स , वेपॉक्स, विन्टॉर इ.) इंजेक्शन देण्यात येतात . हि इंजेक्शने अत्यंत परिणामकारकरित्या हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवितात. आजारी हे इंजेक्शन सुरक्षित,प्रभावशाली आणि सोप्या पद्धतीने देता येत असेल ,तरी अतिशय महाग असल्यामुळे,सगळ्याच रुग्णांना हा खर्च परवडत नाही. अशा प्रकारच्या रुग्णांसाठी रक्तदान घेणे कमी खर्चात आहे. पण ते अशा प्रकारच्या उपचारामध्ये जोखीमचे असते.

रक्तातल्या फिकेपानाव्र उपचार घेणे का आवश्यक आहे?

फुफुसातून ऑक्सिजन घेऊन संपूर्ण शरीराला पोहोचवण्याचे महत्वाचे काम रक्तातील हिमोग्लोबिन करते. रक्तात फिकेपणा आहे म्हणजेच हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आहे. हे सिद्ध होते.त्यामुळे रुग्णाला अशक्तपण वाटतो व तो लवकर थकतो. थोडेसे काम केल्यावर दम लागतो,छातीत दुखते,शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि अनेक प्रकारचे त्रास सहन करावे लागतात. म्हणून किडणी फेल्युअरच्या रुग्णांना तंदुरुस्तीसाठी रक्तातील फिकेपनावर उपचार अत्यावश्यक आहे. रक्त कमी असल्यास त्याचा परिणाम ह्दयाच्या कार्यक्षमतेवरहि होतो आणि ह्दय कार्यक्षम राहण्यासाठी हिमोग्लोबिन वाढणे अत्यंत आवश्यक आहे.

नेफ्रॉंलॉजीस्टकडून रुग्णांची वेळोवेळी तपासणी व देखभाल

  • किडनीचे नुकसान टाळण्यासाठी वेळोवेळी नेफ्रॉंलॉजीस्टचा सल्ला घेणे . तपासणी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
  • नेफ्रॉंलॉजीस्ट रुग्णांचा त्रास व किडनीची कार्यक्षमता लक्षात घेऊन आवश्यक ते उपचार ठरवतो.

 

स्रोत - Kidney Education Foundation

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate