অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मातृत्व आणि एचआयव्ही

मातृत्व आणि एचआयव्ही

  1. एचआयव्ही आणि एड्स म्हणजे काय?
  2. एचआयव्हीचा प्रसार कसा होतो?
  3. एचआयव्ही कशाने पसरत नाही?
  4. स्त्रियांना एचआयव्ही संसर्गाचा धोका जास्त असतो काय?
  5. मुलांना एचआयव्ही संसर्ग कसा होतो?
  6. मला एचआयव्ही संसर्ग आहे की नाही हे कसे समजेल ?
  7. माझ्या गर्भावस्थेवर एचआयव्ही कशा प्रकारे प्रभाव टाकू शकतो?
  8. माझ्या बाळापर्यंत एचआयव्ही संसर्गाचा प्रसार थांबविला जाऊ शकतो काय ?
  9. पालकाकडून शिशुकडे प्रसार प्रतिबंधन सेवा कुठे उपलब्ध आहेत?
  10. पालकाकडून शिशुकडे प्रसार प्रतिबंधक सेवा म्हणजे काय?
  11. मला ह्या सेवांबद्दल अधिक माहिती कोण देईल?
  12. बाळाच्या सुरक्षित आहारासाठी काय करावे?
  13. मला ह्या सेवांसाठी पैसे द्यावे लागतील काय?
  14. जर मला एचआयव्ही असल्याचे समजले तर ते मी कुणाला सांगावे?
  15. मी त्यांना एचआयव्ही असल्याचे कसे सांगू?

जागतिक एड्स जनजागृती सप्ताहानिमित्त विशेष लेख
आई होणे हा आपल्या आयुष्याचा एक विशेष क्षण आहे आणि आईने आपल्या बाळासाठी सुरक्षित आणि पूर्णपणे तयार असावे. आपण एच.आय.व्ही बद्दल ऐकले असेल की जो आपल्यावर आणि आपल्या बाळावर दूष्परिणाम करु शकतो. यासंदर्भात जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभाग, सामान्य रुग्णालय, जळगाव यांच्याकडून प्राप्त काही माहिती लेख स्वरूपात देत आहोत ज्याच्या सहाय्याने आपण स्वत:ला आणि आपल्या बाळाला ह्या रोगापासून वाचवू शकाल.

एचआयव्ही आणि एड्स म्हणजे काय?


एचआयव्ही संसर्ग ह्यूमन इम्यूनो डेफेशिएंशी व्हायरस (एचआयव्ही) नावाच्या एका विषाणूमुळे होतो. हा विषाणू शरीराच्या रोगप्रतिकार शक्तीवर आक्रमण करून तिची रोगांशी लढण्याशी शक्ती कमी करतो. त्यामुळे, बरीच वर्षे एचआयव्हीच्या प्रभावाखाली राहिल्यामुळे, शरीर अनेक प्रकारच्या आजारांना बळी पडतं ह्या अवस्थेला एड्स (अक्वायर्ड इम्यूनो डेफिशिएंसी सिण्ड्रोम) म्हणतात.
एचआयव्ही कसा पसरतो. कशाने पसरत नाही, स्वत:ची काळजी कशी घ्यावी आणि आपल्या बाळाचा संसर्गापासून बचाव कसा करावा ह्याबद्दल अधिक माहिती मिळवा.

एचआयव्हीचा प्रसार कसा होतो?


एचआयव्ही संसर्गित पुरुष आणि स्त्रियांकडून इतर आणि स्त्रियांकडे संसर्ग फक्त चार प्रकारे पसरतो.
1. असुरक्षित लैगिकसंबंधाद्वारे (संसर्गित जोडीदाराशी कंडोम न वापरता लैंगिकसंबंध, अनेक जोडीदारांशी लैंगिकसंबंध, देह विक्री, करणाऱ्यांशी, किंवा गुदामैथुन) तेव्हा कंडोम वापरा किंवा एकाच जोडीदाराशी एकनिष्ठ राहा.
2. एचआयव्ही संसर्गित रक्त पदार्थ वापरल्याने, रक्त मान्यताप्राप्त रक्तपेढीतूनच आले आहे आणि ते एचआयव्हीसाठी तपासले गेले आहे. ह्याची नेहमी खात्री करुन घ्या.
3. एचआयव्ही संसर्गित इंजेक्शन, सुया आणि उपकरणांच्या वापरामुळे हे सर्व जंतुरहित केले गेले आहेत. ह्याची खात्री करुन घ्या.
4. एच.आय.व्ही संसर्गीत-गरोदर मातेकडून तिच्या बाळाला संसर्ग होऊ शकतो.

एचआयव्ही कशाने पसरत नाही?


अन्य कुठल्याही मार्गाने जसे मच्छर चावल्याने, एकत्र जेवल्याने, एकच शैाचालय किंवा कपडे वापरल्याने एचआयव्ही संसर्गिताच्याजवळ बसल्याने, मिठी मारण्याने, गालावर चुंबन घेतल्याने, हात मिळविल्याने, एकत्र खेळल्याने, बस किंवा रेल्वेतील एकत्र प्रवासाने, पोहण्याने, टेलीफोनद्वारे, शिंक किंवा खाकरण्याद्वारे एचआयव्ही/एड्सचा प्रसार होत नाही.

स्त्रियांना एचआयव्ही संसर्गाचा धोका जास्त असतो काय?


होय कारण स्त्रियांची शारीरिक रचनाच अशी असते की त्यांना लैंगिक रोगाचा संसर्ग लवकर होतो. स्त्रियांच्या जन्मनलिकेतील श्लेष्माचे पातळ आवरण संभोगक्रिया दरम्यान एचआयव्हीच्या विषाणूंना शरीरात प्रवेश करू देते. स्त्रिया बहुधा नको असलेल्या संभोगाला नकार देण्याच्या परिस्थितीत पण नसतात.

मुलांना एचआयव्ही संसर्ग कसा होतो?

एचआयव्ही संसर्गित गर्भवती मातेकडून तिच्या मुलाकडे एचआयव्ही येऊ शकतो. विशेषकरून शेवटच्या तिमाहीमध्ये, प्रसूतिदरम्यान, किंवा स्तनपानातून, लहान मुलांमध्ये एचआयव्ही संसर्ग बहुतांशी पालकांकडूनच येतो.

मला एचआयव्ही संसर्ग आहे की नाही हे कसे समजेल ?


आपल्याला एचआयव्हीचा संसर्ग आहे की नाही हे रक्त तपासणी वरूनच समजू शकेल. प्रत्येकाने ही तपासणी करून आपली एचआयव्हीची स्थिती जाणून घेतली पाहिजे.

माझ्या गर्भावस्थेवर एचआयव्ही कशा प्रकारे प्रभाव टाकू शकतो?


एचआयव्हीचा संसर्ग आपल्या गर्भावस्थेवर पुढीलप्रमाणे बरेच विपरीत प्रभाव टाकू शकतो. गर्भपाताची शक्यता वाढते. जन्माताना मुलांचे वजन फार कमी असू शकते (2.5 किलो पेक्षा कमी) अशी मुले जन्मल्यानंतर अनेक रोगांना बळी पडू शकतात. बाळ मृत जन्माला येऊ शकते. वेळेच्या आधीच प्रसूति होऊ शकते.

माझ्या बाळापर्यंत एचआयव्ही संसर्गाचा प्रसार थांबविला जाऊ शकतो काय ?


चांगली बातमी अशी आहे की, जरी आपल्याला एचआयव्ही संसर्ग असला तरी आता नवीन एमडीएआर या उपचार पद्धतीने त्याचा प्रसार आपल्याकडून आपल्या बाळाकडे होणे थांबवले जाऊ शकते. याला पालकाकडून शिशुकडे प्रसार प्रतिबंधन (MDAR) उपाय असे नाव आहे. (प्रतिबंधासाठी प्रसूतिच्या वेळी आणि बाळाच्या जन्मानंतर लगेच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घ्यावे) आपण बाळासाठी सुरक्षित आहारयोजना देखील करावी.
आपली प्रसूतियोजना नीट आखा. प्रसूति-पूर्व योग्य काळजी घ्या. एचआयव्हीसाठी आपले रक्त तपासून घ्या. आणि जवळच्या केंद्रावर आपले नाव नोंदवा. जर आपण बाळंतपणाला माहेरी जाणार असाल तर सरकारी दवाखान्यातील ICTC केंद्राशी संपर्क साधा आणि तिथल्या समुपदेशकांशी चर्चा करा.

पालकाकडून शिशुकडे प्रसार प्रतिबंधन सेवा कुठे उपलब्ध आहेत?


सर्व सरकारी दवाखान्यांतील प्रसूति-पूर्व चिकित्सा विभागातील ICTC (इंटीग्रेटेड काउन्सेलिंग ॲण्ड टेस्टिंग सेंटर) मध्ये ही सेवा उपलब्ध आहे.

पालकाकडून शिशुकडे प्रसार प्रतिबंधक सेवा म्हणजे काय?


पालकाकडून शिशुकडे प्रसार प्रतिबंधन सेवा पुढील प्रमाणे आहेत-
1.प्रसूति पूर्व काळजी ज्या शारीरिक तपासणी, रक्त आणि मूत्र तपासणी धनुर्वाताचे इंजेक्शन, लोह आणि व्हिटॅमिनच्या गोळ्या आणि दवाखान्यात प्रसूति सेवाही सामील आहेत.
2.समूह शिक्षण/तपासणी पूर्व एचआयव्हीबद्दल माहिती आणि आपली स्थिती जाणून घेण्याच्या आवश्यकतेवर समूपदेशन.
3.गोपनियता राखून एचआयव्ही तपासणी.
4.तपासणीनंतरचे समुपदेशन आणि जोडीदाराची तपासणी.
5.दवाखान्यात प्रसूति.
6.नवीन एम.डी.ए.आर उपचार पद्धतीप्रमाणे मातेने आजीवन ए.आर.टी. घेणे.
7.बाळाला सहा आठवड्यापर्यत दररोज नेव्हीरॅपीनचा एक डोस देणे.
8.आईला बाळाच्या आहाराविषयी, परिवार नियोजन आणि गर्भनिरोधकांबद्दल माहिती देणे.
9.एचआयव्ही आजाराच्या स्थितीचा आढावा आणि औषधे व रोग व्यवस्थापनावर योग्य सल्ला उपलब्ध असलेल्या केंद्राकडे शिफारीस.
10.आपल्या बाळाची पुढची काळजी घेण्याबद्दल सल्ला.

मला ह्या सेवांबद्दल अधिक माहिती कोण देईल?


ICTC मध्ये आपल्याला समुपदेशक भेटतील जे आपल्याला ह्या सेवाबद्दल अधिक माहिती देतील. ह्यावेळी आपले पति सोबत असल्यास फार उत्तम, शेवटी, मुलाचे स्वास्थ्य चांगले ठेवण्याची जबाबदारी पित्याचीही असतेच नाही का? नंतर समुपदेशक आपली डॉक्टरांची आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञांची भेट घालून देतील.

बाळाच्या सुरक्षित आहारासाठी काय करावे?


बाळासाठी सुरक्षित आहार म्हणजे त्याला एचआयव्हीच्या संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी सुरक्षित पर्याय निवडणे आणि बाळाला संपूर्ण पोषण मिळून त्याची वाढ सुनिश्चित करणे, ह्याकरिता दोन पर्याय आहेत. पण लक्षात घ्या एक पर्याय निवडल्यावर तो पुढचे सहा महिने बदलू नका.
1. पहिले सहा महिने बाळाला स्तनपान करा (त्याशिवाय काही देऊ नका अगदी पाणी देखील) त्यापुढे लगेच स्तनपान सोडवण्यासाठी अन्न द्या आणि स्तनपान थांबवा.
2. आपल्याला परवडत असल्यास बाळाला आवश्यक असलेल्या संपूर्ण वेळी गाईचे किंवा म्हशीचे किंवा पावडरीचे दूध स्वच्छतेची काळजी राखून द्या. कुठल्याही परिस्थितीत स्तनपान आणि वरचे दूध एकत्र देऊ नका. स्तनपान बंद केल्यास पूर्ण बंद करा. आपल्या समुपदेशकांना आहारबद्दल विचारा, आपल्याला हे जाणून घेणे आणि त्याचे पालन करणे आवश्यक आहे. मिश्रीत आहार देऊ नका. आपल्या समुपदेशकांना आहारबद्दल विचारा, आपल्यासाठी हे समजून घेणे आणि त्याचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.

मला ह्या सेवांसाठी पैसे द्यावे लागतील काय?


ह्या सर्व सेवा सरकारी दवाखान्यामध्ये विनामूल्य उपलब्ध आहेत. आपण त्यांचा फायदा तर घ्याच पण आपल्या परिचितांनाही, विशेषकरून गरोदर स्त्रियांना त्याबद्दल सांगा.

जर मला एचआयव्ही असल्याचे समजले तर ते मी कुणाला सांगावे?


आपण आपल्या पति आणि परिवारजनांना सांगावे म्हणजे ते आपल्याला आधार देऊ शकतील.

मी त्यांना एचआयव्ही असल्याचे कसे सांगू?


आपल्या कुटूंबाला आपण एच.आय.व्ही संसर्गित असल्याचे नीट ठरवून सांगा, एकदम अचानक सांगू नका, अशी वेळ निवडा जेव्हा ह्यावर पूर्ण चर्चा होऊन आपल्याला आवश्यक तो आधार आपल्या कुटूंबाकडून मिळू शकतो.

अभिनंदन! आपण पहिले पाऊल टाकले! ICTC मध्ये या एचआयव्ही आणि एड्सबद्दल आणि ते टाळण्याबद्दल संपूर्ण माहिती मिळवा आणि आपली एचआयव्हीची स्थिती जाणून घेण्यासाठी रक्त तपासून घ्या. हाच आपल्या किंवा आपल्या बाळाला एचआयव्ही संसर्गापासून वाचवायचा उपाय आहे. जर आपल्याला किंवा आपल्या जोडीदाराला एचआयव्ही संसर्ग झाला असेल तर इथे आपला इलाज होईल. आपण घरी स्वत:ची काळजी कशी घ्यावी आणि कुठे प्रसूत व्हावे ह्याबद्दल समुपदेशक आपल्याला सल्ला देतील.

अधिक माहितीसाठी संपर्कः-
जिल्हा एडस प्रतिबंधक व नियंत्रण विभाग, सामान्य रुग्णालय, जळगाव
दूरध्वनी 0257-2233091

संकलन- जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव
स्रोत - महान्युज


 

अंतिम सुधारित : 6/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate