অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मैथुनक्रियेतील मानसिक समस्या

लवकर वीर्यपतन/शीघ्रपतन होणे

 

गैरसमजामुळे किंवा अवास्तव कल्पनांमुळे ब-याच पुरुषांना आपण 'कमजोर आहोत'अशी भावना होते. या भावनेमुळे मैथुनक्रियेसाठी आवश्यक ताठरपणा व ताठर-काळ मिळत नाही. ब-याच वेळा अशा जोडप्यांशी नीट सल्लामसलतीने हा प्रश्न सुटू शकतो. या समस्येवर खालीलप्रमाणे उपाय सुचवण्यात येतो, यासाठी स्त्री-पुरुष या दोघांचे सहकार्य हवे.

मास्टर पध्दत

 

(अ) स्त्रीने शिश्नाचे हस्तमैथुन करावे, मात्र वीर्यपतनापर्यंत वेळ येऊ न देता थांबावे.

(ब) ताबडतोब तीन बोटांनी शिश्नाचे पुढचे बोंड दाबून धरावे- यामुळे इंद्रिय सैल व लहान होते.

(क) वरील अ व ब क्रिया परत परत कराव्यात, मात्र प्रत्यक्ष मैथुन टाळावे. शेवटी वीर्यपतन होऊ द्यावे. यामुळे वीर्यपतनाचा काळ वाढू शकतो असा विश्वास निर्माण होतो.

(ड) काही दिवस असेच करून पुरेसा आत्मविश्वास आल्यावर 'पुरुष खाली स्त्री वरती' अशा स्थितीत मैथुन करावे. यातही मधून मधून सैलावून थांबावे व वाटल्यास शिश्नाचे टोक दाबून नंतर सोडावे व मैथुनक्रिया परत करावी.

(इ) याप्रमाणे 'वरती स्त्री'स्थितीत काही दिवस मैथुन करावे.

(फ) यानंतर दोघांनी कुशीवर राहून मैथुन करावे व काही दिवस या पध्दतीने सवय करावी.

(ग) नंतर स्त्री खाली, पुरुष वरती अशा अवस्थेत मैथुन करावे. याप्रमाणे शीघ्रपतनाची भीती नष्ट करता येते.

ताठरपणा नसणे

हीही एक मनाची समस्या आहे. पुरुषाच्या इंद्रिय-ताठरपणा प्रसंगी कमीजास्त होऊ शकतो. अतिकष्ट, थकवा, रात्रपाळी, जागरणे, व्यायामाचा अभाव, अशक्तपणा, आजारातून उठलेले असणे, इत्यादी कारणांनी ताठपणा कमी होतो. कारण दूर झाल्यावर समस्याही आपोआप सुटते. योग्य आहार, विश्रांती, करमणूक, व्यायाम, इत्यादी उपायांनी अशा बहुतेक सर्व समस्या आपोआप सुटतात त्यासाठी औषधोपचार करावा लागत नाही.

नैराश्य -नैराश्यग्रस्त अवस्थेत इंद्रिय ताठ होत नाही व मैथुनेच्छापण मंद असते.

स्त्री-मनाची कारणे

शरीरसंबंधाबद्दल भीती, लिंगसांसर्गिक आजार किंवा नको असताना गर्भ राहण्याची भीती, एकांतवासाचा अभाव, इत्यादी कारणांमुळे स्त्रियांना मैथुनाची भीती असू शकते. लहानपणी काही अत्याचार झाला असेल तर खोल मनात अशी भीती रुजून बसलेली असते. ब-याच घरांमध्ये लहान मुलींना नातेवाईकांकडूनच लैंगिक त्रास होतो हे पण एक महत्त्वाचे कारण आहे.

अशा समस्या सहानुभूतीने व बरेच दिवस उपाय केल्यावरच जातात. जोडीदारांचा परस्पर-विश्वास, प्रेम, सहानुभूती हेच यावरचे मुख्य उपाय आहेत.

नपुंसकता

हा शब्द काही वेळा आपण ऐकतो. ऐकणा-याला किंवा बोलणा-याला त्यातून अमुकजण 'पुरुष- नाही' असे अभिप्रेत असते. स्त्री संबंध करू न शकणे हाच याचा अर्थ. यामागे काही शारीरिक किंवा वर सांगितल्याप्रमाणे मानसिक कारणे असू शकतात. तज्ज्ञाकडून तपासणी करून घ्यावी.

लैंगिक विकृती

खालीलप्रमाणे काही लैंगिक विकृती आढळतात.

  • स्त्री जोडीदार असतानाही केवळ गुदामार्गे मैथुन करणे. पुरुष-समलिंगी संबंधाची लहानपणापासून सवय जडली तर लग्न झाल्यावरही स्त्रीच्या योनिमार्गाऐवजी गुदाशय प्रवेशाचीच इच्छा बाळगणे असा प्रकार काही वेळा आढळतो. यामुळे स्त्रीजोडीदारास लैंगिक समाधान मिळत नाही व गर्भधारणाही होत नाही.
  • लैंगिक संबंधावेळी/ऐवजी मारहाण करणे. बरेच पुरुष स्त्रियांना लैंगिक संबंधाचे वेळी मारणे, शिवीगाळ करणे, सिगरेट-बिडीचे चटके देणे आदि अत्याचार करतात. लैंगिक आत्मविश्वासाचा अभाव, दारूचे व्यसन, संशयीपणा, इत्यादी कारणे यामागे असतात.
  • वेश्यागमनाची सवय - काही पुरुषांना, पत्नी लैंगिकदृष्टया योग्य असूनही, वेश्यांकडे जाण्याची सवय असते. यातून आरोग्याचे तसेच कौटुंबिक प्रश्न उद्भवतात.

धातू जाण्याची भीती

स्वप्नात किंवा जागेपणी 'वीर्य गळण्याची' भीती मोठया प्रमाणावर आढळते. अनेक पुरुष यामुळे सतत त्रस्त असतात. स्वप्नात वीर्य जाण्याची क्रिया इंद्रिय ताठरल्यानंतरच होते. इंद्रिय ताठ होऊन नंतरच वीर्य बाहेर फेकण्याची क्रिया होते, त्याशिवाय वीर्य बाहेर येऊच शकत नाही. म्हणूनच आपोआप वीर्य गळण्याची, किंवा 'लघवीतून धातू जाणे'म्हणजे 'वीर्यपतन' असू शकत नाही. मग धातू जाणे म्हणजे काय? '

धातू जाणे

' म्हणजे शिश्नाच्या बोंडावरचे स्त्राव जाणे, किंवा जंतुदोषामुळे पू जाणे यापैकी काही तरी असू शकते. काही जणांच्या वीर्यकोशात जंतुदोष होऊन पू तयार होतो, व हा पू मलविसर्जनाच्या वेळी मूत्रनलिकेतून बाहेर पडतो. गुदाशय हे मूत्रनलिकेच्या व वीर्यकोशाच्या मागेच असते. हे सर्व समजावून सांगून आवश्यक वाटल्यास तपासणीसाठी पाठवावे.

लैंगिक समस्यांवरची टॉनिके

फार पूर्वीपासून लैंगिक इच्छा व शक्ती वाढवणारी औषधे निरनिराळया शास्त्रात सांगितली जातात. अनेक उपाय प्रचलितही आहेत. आजही अनेक पुरुष यासाठी लाखो रुपये खर्च करतात असे आढळते. यातली काही सोडता बरीच औषधे व्यर्थ जातात.'वियाग्रा' नावाचे एक औषध आहे, याचे दुष्परिणामही दिसून आले आहेत. एकूणच अशा उपायांपेक्षा योग्य मनोभूमिका, आहार-विहार-व्यायाम यातून योग्य लैंगिक समाधान मिळू शकते. यातूनही उपयोग न झाल्यास योग्य तज्ज्ञांकडे जावे.

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्यविद्या

अंतिम सुधारित : 8/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate