অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

होऊ या सारे एक संघ, करुया एच.आय.व्ही. चा प्रतिबंध

एड्स सारख्या आजाराबद्दल आणि त्यांच्या संक्रमणाबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 1 डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन पाळला जातो. ऑगस्ट 1987 मध्ये जेम्स् डब्लू बन आणि थॉमस नेटर या दोघांनी वर्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जिनेव्हा (स्वित्झर्लंड) येथील जागतिक कार्यक्रमात यांची संकल्पना मांडली. त्यानंतर 1 डिसेंबर 1988 पासून हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो.

जगात आणि भारतात लाखो लोक एच.आय.व्ही.बाधित जीवन जगत आहेत. एड्समुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. सुरक्षित वर्तणूक आणि सवयीमुळे एच.आय.व्ही. च्‍या संसर्गास प्रतिबंध घालता येतो. एच.आय.व्ही./एड्स हा आजार विषाणू मुळे होतो.

या आजाराचा विषाणू एकदा शरीरात शिरला तर त्याला उपचार व लस देऊन काढू शकेल अशी कोणतेही प्रभावी औषध व उपाययोजना नाही. यासाठी या आजाराला रोखण्यासाठी देशात व विदेशात जनजागृती केली जाते. यात सरकारला मोठ्या प्रमाणात यशही आलेले आहे. यासाठी 'होऊ या सारे एक संघ : करुया एच.आय.व्ही.चा प्रतिबंध' असेच म्हणावे लागेल.

युवाशक्ती हीच राष्ट्रशक्ती



भारतात व महाराष्ट्रात या आजाराची प्रतिबंधात्मक व्यापक मोहिम राबवून शासनस्तरावर जनजागृती, रक्ताची सुरक्षितता, रोग सर्वेक्षण स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था, इ.मार्फत जनजागृती केली जाते. एच.आय.व्ही./ एड्स आजाराविषयी असलेले समज- गैरसमज, रोगाचा प्रसार कशामुळे याचे प्रबोधन, शिक्षण व समुपदेशन शासनस्तरावर राबविलेली मोहिम व जनजागृती आमची युवा शक्ती करु शकते.

एच.आय.व्ही./ एड्स हा आजार फक्त वैद्यकीय प्रश्न नसून तो एक सामाजिक प्रश्न बनला आहे. या रोगाचा प्रादुर्भाव मुख्यत्वे 15 ते 49 वयोगटात आहे. एखाद्या कौटुंबिक स्तरावर घरातील कमावती व्यक्ती बाधित झाल्यास संपूर्ण कुटूंबावर आणि पर्यायाने समाजावर त्याचे विपरीत परिणाम होतात. यात युवकांचे प्रमाण जास्त असल्याने युवाशक्तीने ठरविल्यास या आजाराला प्रतिबंध करता येऊ शकतो. त्यासाठी युवाशक्ती पुढे येऊन समाजात जनजागृती करु शकते. यात यशही आलेले आहे. म्हणून एच.आय.व्ही./ एड्स चे प्रमाण कमी झालेले आहे. ते प्रमाण शुन्यावर आणण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत.

एच.आय.व्ही., एड्स विषयी



प्रतिकार शक्तीच्या अभावाने प्राप्त झालेल्या अनेक रोग लक्षणांचा एकत्रित समुह म्हणजेच एड्स होय. एडस- ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम. ॲक्कायर्ड म्हणजे-प्राप्त, इम्यूनो-प्रतिकार शक्ती, डेफिशियन्सी-अभाव, सिंड्रोम-लक्षण समुह. एड्स हा एच.आय.व्ही. विषाणूमुळे होणारा आजार आहे. एचआयव्ही म्हणजे ह्युमन इम्यूनोडेफिशियन्शी व्हायरस. मानवाची प्रतिकारशक्ती कमी करणारा विषाणू. एड्सच्या विषाणूचा शोध 1983 साली डॉ.ब्ल्यूक मोण्टिग्रेयर (फ्रेंच) व डॉ. रॉबर्ट गॅलो (अमेरिकन) या शास्त्रज्ञांनी लावला. जगामध्ये –अमेरिकेत एड्सचा पहिला रुग्ण-1981 साली आढळला. भारतामध्ये 1986 साली मद्रास (चेन्नई) पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळला.

एच.आय.व्ही.,एड्सचा प्रसार



असुरक्षित लैंगिक संबंध, एच.आय.व्ही. बांधित रुग्णास इंजेक्शन देण्यासाठी वापरलेली सुई दुसऱ्यांना वापरल्याने, एच.आय.व्ही.बाधित व्यक्तीचे रक्त दुसऱ्या रुग्णाला दिल्याने, एच.आय.व्ही.ग्रस्त गरोदर महिलेपासून तिच्या होणाऱ्या बाळाला (नाळेमार्फत), स्तनपानाद्वारे आदी कारणांमुळे एचआयव्ही चा प्रसार होऊ शकतो.  एच.आय.व्ही. चा विषाणू सहजरित्या शरीराबाहेर हवेत जास्तकाळ जगू शकत नाही. एच.आय.व्ही. बाधित व्यक्तीशी हस्तांदोलन केल्याने, चुंबन घेतल्याने, एकत्र बसल्याने, जेवल्याने, राहिल्याने, डास चावल्याने याचा प्रसार होत नाही.

लक्षणे

1. तीन आठवडे किंवा त्याहून अधिक काळ खोकला, जुलाब (सतत). तोंडात पांढरे चट्टे व बुरशी शरीरावर फोड/पुरळ, चार आठवड्यापेक्षा जास्त ताप व वजनात घट इ.

एचआयव्ही एड्स चाचणी विषयी



केंद्र सरकार व राज्य सरकार यांचे स्त्रोत

राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था अंतर्गत महाराष्ट्रात शासकीय/ निमशासकीय धर्मादाय इ.मार्फत दवाखान्यात एच.आय.व्ही. चाचणी एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र, गुप्तरोग इ.मार्फत समुपदेशन करुन चाचणी केली जाते. मात्र या विषयी गुप्तता पाळण्यात येते. गरोदर/ बाळंतपणात एचआयव्ही बाधीत मातेने सावधानता बाळगल्यास अर्भकास संसर्ग होण्याचे प्रमाण 70% कमी असते. यासाठी मातेस अँटी रिट्रो व्हायरस थेरपी (ए.आर.टी उपचार) व बाळाला सहा आठवडे नेव्हीरॅपिन औषध दिले जाते. हा उपक्रम सर्वत्र उपलब्ध आहे. एच.आय.व्ही.चाचणी निदान रॅपिट इलायझा चाचणी केली जाते.

वेस्ट्न ब्लॉट (Western Blot) पी.सी.आर.टेस्ट

जगात सर्वात सुधारीत/ प्रगत चाचणी डी.एन.ए. ची करतात. प्रतिकारशक्तीच्या अभावी संधीसाधू आजार उदा. क्षयरोग जे मृत्यूचे सर्वात मुख्य कारण आहे. एड्सवर कोणतेही प्रतिबंधात्मक लस अद्याप उपलब्ध नाही. एड्सच्या बाबतीत प्रतिबंध हाच खरा उपचार ठरतो. अॅन्टी रिट्रो व्हायरल थेरपी (एआरटी) ए.आर.टी. म्हणजे एच.आय.व्ही. विषाणूचे प्रमाण कमी करणे. एखाद्या व्यक्तीस एच.आय.व्ही. बाधा झाल्यास जवळच्या सरकारी एआरटी केंद्रात जाऊन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच उपचार सुरु करण्यात येतात. या सर्व सुविधा (शासनात) मोफत आहे.

एच.आय.व्ही. बाधितांना शासनस्तरावर न्याय

एच.आय.व्ही. बाधितांना हक्काचे संरक्षण मिळणेसाठी शासनाने एच.आय.व्ही./ एड्स (प्रतिबंध व नियंत्रण) विधेयक 2014 मध्ये दुरुस्ती प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. या दुरुस्तीनुसार एच.आय.व्ही. ग्रस्तांना शिक्षण, रोजगार, वैद्यकीय उपचार, निवास यामध्ये भेदभावाची वागणूक देणाऱ्या व्यक्ती व संस्थाविरुद्ध कारवाईची तरतूद करण्यात आली आहे.

अशा प्रकारे एच.आय.व्ही. एड्स आजारा विषयी जगात, देशात, जनतेत विविध कार्यक्रम माध्यमातून, लोककला, प्रभातफेरी, इ.मार्फत जनजागृती केली जाते.

लाल फित हे आंतरराष्ट्रीय जनजागृतीचे प्रतिक आहे. एच.आय.व्ही. एड्स या आजाराने जे मृत्यूमुखी पडले आहेत. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, ज्यांची या आजाराने हानी झाली आहे त्यांना आधार दाखविण्यासाठी आणि त्यांना झळ पोहचलेली आहे त्यांच्याशी दृढ सामाजिक बांधिलकी म्हणून लाल फित लावली जाते.


लेखक - हेमकांत पी. सोनार
मो. 9823506166

स्त्रोत - महान्युज

 

अंतिम सुधारित : 8/11/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate