অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मधुमेह आणि स्थूलता

मधुमेह याचा अर्थ लघवीत साखर असणे. सर्वसाधारणपणे उपाशीपोटी 100 मि.ली. रक्तामध्ये साखरेचे प्रमाण 80-120 मि.ग्रॅ. इतके असते. सामान्यपणे रक्तातली साखर मूत्रपिंडातून लघवीत उतरत नाही. म्हणून निरोगी अवस्थेत (गर्भारपण सोडल्यास) लघवीत साखरेचा अंश नसतो. मधुमेह या आजारात रक्तातले साखरेचे प्रमाण इतके वाढलेले असते,की मूत्रपिंडातून काही प्रमाणात साखर लघवीत उतरते. मधुमेह हा भारतात मोठया प्रमाणावर आढळणारा आजार आहे. आपल्या देशात सर्वसाधारणपणे पुरुषांमध्ये मधुमेहाचे प्रमाण अधिक आढळते. सर्वसाधारणपणे 15वर्षावरील व्यक्तींमध्ये मधुमेहाचे प्रमाण 3-10 टक्क्याच्या जवळपास आढळते. यातील निम्म्या लोकांच्या बाबतीत मधुमेहाच्या इतर खाणाखुणा (लक्षणे) दिसतात. मधुमेह रुग्णांपैकी 90-95% मधुमेह रुग्ण प्रौढ मधुमेह प्रकारचे आहेत.

बिघाडाचे स्वरूप

मधुमेहात नेमके काय बिघडते हे आता जरा समजावून घेऊ या.

आपल्या शरीरात स्वादुपिंडातील विशिष्ट बीटा पेशींमध्ये इन्शुलिन संप्रेरक तयार होते. इन्शुलिन संप्रेरक हेच शरीरातील साखरेचा बहुतेक कारभार पाहते. साखर म्हणजे शरीराचे इंधन. साखरेचे ज्वलन करून पेशींना कार्यशक्ती(उष्मांक) मिळते. यासाठी रक्तात साखरेचे ठरावीक प्रमाण असावे लागते. साखरेचा वापर होण्यासाठी इन्शुलिन संप्रेरकाची (आणि इतर काही संप्रेरके ) मदत लागते.

रक्तात इन्शुलिन कमी असले, की साखरेचा वापर नीट होत नाही. त्यामुळे रक्तातले साखरेचे प्रमाण वाढलेले राहते. साखरेचा वापर नीट होत नसल्याने पेशींना पुरेशी कार्यशक्ती मिळत नाही. त्यामुळे थकवा, अशक्तपणा जाणवतो, लघवीतले साखरेचे प्रमाण वाढल्याने जादा साखर विरघळवण्यासाठी जादा पाणी लागते. म्हणून मधुमेहात लघवीचे प्रमाण वाढते. लघवीचे प्रमाण वाढल्याने तहानही जास्त लागते.

रक्तात वाढलेली साखर आणि इतर काही रासायनिक दोष निर्माण झाल्याने अनेक पेशीसमूहांमध्ये हळूहळू बिघाड (गंज) होत जातात. यामुळे शरीर हळूहळू जीर्ण होते. रक्तवाहिन्या कडक आणि ठिसूळ होतात. त्यामुळे रक्तदाब वाढणे, हृदयरोग हे दोष जास्त प्रमाणावर आढळतात. नेत्रपटलातल्या बिघाडांनी दृष्टी अधू होते. मूत्रपिंडाची क्षमता कमी होते. चेतासंस्थेवर परिणाम होऊन हातापायांना मुंग्या येतात व बधिरतेचे पुढचे परिणाम (जखमा, इ.) होतात. मेंदूमध्येही हळूहळू दोष निर्माण होतात. रक्तातले वाढलेले साखरेचे प्रमाण जंतूंना फार उपयोगाचे असते. त्यामुळे अशा व्यक्तींना जंतुदोष लवकर होतो. गळवे,जखमांमध्ये पू होणे, जखमा लवकर भरून न येता चिघळणे व इतर अनेक प्रकारचे जंतुदोषाचे आजार (उदा. क्षयरोग) लवकर वाढतात. या सर्व दोषांमुळे मधुमेही व्यक्तीचे आयुर्मान कमी असते. मात्र वेळीच उपचार सुरू करून काळजी घेतली तर हे दुष्परिणाम बरेचसे टाळता येतात आणि आयुर्मान चांगले राहू शकते.

रक्तातली साखर वाढणे, रक्तातले मेद वाढणे, रक्तातील इन्शुलिनची पातळी वाढणे,स्थूलता-वजनवाढ या सर्वांना मिळून एक्स लक्षणसमूह म्हणतात. यामुळे मधुमेह आणि अतिरक्तदाब हे घातक आजार निर्माण होतात. भारतात या एक्स लक्षणसमूहाचे प्रमाण वाढते आहे. (यामुळे हृदयविकार वाढतात.)

मधुमेह होण्याचा धोका

काही घटकांच्या बाबतीत प्रौढ मधुमेह होण्याची जास्त शक्यता असते.

  1. वजन जास्त असणे, लठ्ठपणा, पोट सुटणे, कमर-पोटाभोवती चरबी वाढलेली असणे. (कमर-नितंब गुणोत्तर किंवा वजन: उंची गुणोत्तर जास्त असणे.)
  2. मधुमेह वारसा : आई, वडील, आजोबा-आजी, भाऊ-बहीण, काका-मामा यांच्यापैकी कोणालाही मधुमेह असल्यामुळे मधुमेह असण्याची शक्यता वाढते. तरुण मधुमेह वा प्रौढ मधुमेह या दोन्ही प्रकारात हा वारसा महत्त्वाचा ठरतो.
  3. बैठी जीवनपध्दती : शारीरिक काम नसणे, सर्व काम बसून करणे हा एक मोठाच धोका आहे. आपल्या समाजातले हे चातुरर्वण्य, कष्टाबद्दल उच्च-नीच कल्पना आरोग्याला मारक आहे. काहीजण इकडची काडी तिकडे न करता जगतात. ही जीवनपध्दती मधुमेह,अतिरक्तदाब यांना आमंत्रण देणारी आहे. अशा व्यक्तींनी निदान नियमित व्यायाम तरी केलाच पाहिजे.
  4. साखरपेरणी : नेहमी आहारात साखरक्षम पदार्थांची भर असणे म्हणजे आपणहून आजाराला पायघडया घालण्यासारखे असते. वारंवार गोड चहा पिणे, मिठाई खाणे, हे तर वाईट आहेच पण ज्या अन्नपदार्थांची शरीरात लवकर साखर होते ते पदार्थही मधुमेहाला मदत करतात. भात, भाकरी, बटाटा, मिठाई हे सर्व पदार्थ शरीरात रक्तात साखर सोडतात. म्हणून हे पदार्थ साखर-पेरणी करणारे (साखरक्षम) पदार्थ कमी खावेत.

उपासमार जनित मधुमेह

लठ्ठपणाप्रमाणे उपासमारीमुळे होणा-या कुपोषणानेही मधुमेह होतो असे सिध्द झाले आहे. लहानपणी अतिकुपोषित असणा-या मुलांना तरुणपणातच मधुमेह होण्याची शक्यता असते. हा मधुमेह 10-20 वर्षे वयोगटात सुरु होतो. याची लक्षणे तीव्र असतात आणि इन्शुलिन दिल्याशिवाय या आजारात चालत नाही. भारतातल्या कुपोषणग्रस्त विभागात हा आजार आढळून येतो. यासाठी नियमित उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावू शकतात.

मधुमेहाचे दोन प्रकार

मधुमेहाचे मुख्य दोन प्रकार आहेत. एक म्हणजे लवकर येणारा (तरुण मधुमेह) आणि दुसरा उतारवयात येणारा मधुमेह (प्रौढमधुमेह). दुसरा प्रकार सहसा चाळिशीनंतर आढळतो. एकूण मधुमेहाच्या रुग्णांमध्ये याचेच प्रमाण जास्त आढळते. लवकर येणारा मधुमेह (तरुण मधुमेह) हा अगदी जन्मापासून ते तरुण वयापर्यंत कधीही सुरू होऊ शकतो. कारणे वेगवेगळी असल्याने दोन्हींचा उपचार थोडा वेगळा असतो.

इन्शुलिन कमतरता

तरुण मधुमेहाच्या प्रकारात इन्शुलिन कमतरता हाच मुख्य दोष असतो. प्रौढमधुमेहात इन्शुलिन निर्मिती ठीक असते, पण शरीरात पेशींच्या पातळीवर साखरेचा विनियोग व वापर नीट होत नाही हा प्रमुख दोष असतो. म्हणजे इन्शुलिनची तौलनिक कमतरता म्हणजे निरुपाय असते. प्रौढमधुमेहात उपचारांमध्ये इन्शुलिनची गरज सहसा पडत नाही. केवळ योग्य आहार, व्यायाम व काही मधुमेहाची औषधे यांवर भागते, याउलट तरुणमधुमेहात इन्शुलिन देणे अनिवार्य असते.

मात्र तरुण मधुमेह फक्त 5% असून 95% रुग्ण प्रौढ मधुमेहाचे असतात.

इन्शुलिन निरुपाय

सामान्यपणे शरीरात ग्लुकोजचा वापर नीट होण्यासाठी इन्शुलिन संप्रेरक मदत करते. प्रौढ मधुमेहात शरीरातल्या पेशी इन्शुलिन असून नीट वापरु शकत नाहीत. हा दोष असतो. याला 'इन्शुलिन निरुपाय' म्हणता येईल. असे होण्याचे कारण उतारवय, स्थूलता किंवा चरबीच्या पेशींची वाढीव संख्या असते. स्नायूपेशींमध्येही इन्शुलिन वापर कमी होतो. या आजारात पेशींमध्ये ग्लुकोज साखर कमी प्रमाणात शिरते म्हणून रक्तात जास्त साखर शिल्लक राहते. जास्त साखर रक्तात उरल्याने जादा इन्शुलिन रक्तात उतरवले जाते.

पोटात आणि कमरेभोवती जादा चरबी, वाढते वय, खाण्यात जास्त साखर-क्षम पदार्थ,काही प्रकारची खाद्यतेले या सर्वांमुळे 'इन्शुलिन निरुपाय' वाढत जातो.

प्रत्येक पेशीवर इन्शुलिनच्या Receptors असतात. प्रौढ मधुमेहात या संख्या 20-30% कमी झालेल्या असतात. याचमुळे पेशीपेशीत साखरेचा प्रवेश कमी होतो आणि ऊर्जाप्रक्रिया मंदावते.

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्यविद्या

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate