অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मुतखडा

मूत्रोत्सर्जक तंत्र

मूत्रोत्सर्जक तंत्रात (संस्थेत) तयार होणाऱ्या अश्मरीला मुतखडा म्हणतात. मुतखडा अनेक कारणांमुळे उद्‌भवत असला, तरी तो ज्या प्रमुख पदार्थाचा बनतो त्याचे मूत्रातील अती सांद्रण (अतिशय प्रमाण वाढणे) हे प्रमुख कारण असते. कौटुंबिक व आनुवंशिक पूर्वानुकूलता अनेक वर्षे ज्ञात आहे. मुतखडा ही एक जगभर आढळणारी विकृती आहे. काही शतकांपूर्वी ब्रिटनमध्ये मुतखड्यावरील उपचार हेच अनेक वैद्यांचे उपजीविकेचे साधन होते. आजही अमेरिकेत रुग्णालयात दाखल होणाऱ्या प्रत्येक हजार रुग्णांमध्ये एक रोगी मुतखड्याचा असतो. ब्रिटनमध्ये रुग्णालयांतून बाहेर पडणाऱ्या १०,००० रुग्णांमध्ये १·८ रुग्ण मुतखड्याचे आढळतात. सर्वसाधारण वैद्यकाच्या व्यावसायिकांना ४५ ते ६० वर्षे वयाच्या पुरुष रुग्णांमध्ये प्रत्येक १०,००० रुग्णांमध्ये २१ रूग्ण मुतखड्याचे आढळतात. पहिला खडा आपोआप किंवा शस्त्रक्रियेने काढल्यानंतर पुनःपुन्हा मुतखडा होण्याचे प्रमाण, दहा वर्षांच्या कालावधीत ७०% आढळले आहे. पुरुष व स्त्री यांचे गुणोत्तर ४ : ३ आढळते.

औद्योगिकीकरण, नागरीकरण आणि सर्वसाधारण राहणीमानाची उंचावलेली पातळी या गोष्टींचा जसा बालवयीन मूत्राशयातील मूतखड्यांच्या कमी होण्याशी संबंध आहे, तसाच तो प्रौढातील वृक्काश्मरीच्या (मूत्रपिंडातील मुतखड्याच्या) वाढत्या प्रमाणाशीही आहे. कॅल्शियम ऑक्झॅलेट किंवा मिश्र कॅल्शियम ऑक्झॅलेट व फॉस्फेट यांचे खडे यूरोप, उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलेशिया व दक्षिण आफ्रिका या भागांत वृक्काश्मरी प्रकारात अधिक आढळतात. विकसनशील देशांतून अती प्रदेशनिष्ठ असणाऱ्या बालवयीन मूत्राशय मुतखड्याच्या विकृतीतील खडे बहुजिनसी असतात. मध्यपूर्व, भारत आणि उत्तर आफ्रिका येथील अशा खड्यांचा प्रमुख घटक यूरेट (यूरिक अम्लाचे लवण) असतो. आग्नेय आशियात हा घटक प्रामुख्याने कॅल्शियम ऑक्झॅलेट असतो.

रोगपरिस्थितिविज्ञानदृष्ट्या केलेल्या अभ्यासातून असे दिसते की, मुतखडा ही विकृती श्रीमंती व गरिबी या दोहोंशी संबंधित आहे. श्रीमंती आहारातील अती प्रथिने व अती कार्बोहायड्रेटे आणि गरिबांच्या आहारातील प्रथिनन्यूनता मूत्र घटकावर परिणाम करीत असावीत. यूरोपात मोठ्या युद्धानंतर निर्माण झालेल्या आहारातील न्यूनतेमुळे मुतखड्यांच्या साथी उद्‌भवल्याचे नमूद करण्यात आले आहे.

मूत्रोत्सर्जनाचे प्रमाण

काहीशी वेगळी परिस्थिती थायलंड व आसपासच्या प्रदेशात आढळते. तेथे बालवयीन मूत्राशय मुतखड्याचे प्रमाण अधिक आहे. खडे अधिकांश कॅल्शियम ऑक्झॅलेटाचे असतात. या प्रदेशात स्तनपान लवकर बंद करून अर्भकांना विशिष्ट प्रक्रिया केलेला भात भरवितात. परिणामी मूत्रातील ऑक्झॅलेटाच्या उत्सर्जनाचे प्रमाण वाढते, अर्भकाचे एकूण द्रव सेवन घटते आणि मूत्रोत्सर्जनाचे प्रमाण कमी होऊन मूत्रातील फॉस्फेटाचे प्रमाणही घटते. याशिवाय तेथील खेडूत पालेभाज्यांचे सेवन अधिक करीत असल्यामुळे त्यातून त्यांना ज्यादा ऑक्झॅलेट मिळते. मूत्रातील फॉस्फेट घटण्यामुळे कॅल्शियम ऑक्झॅलेटच्या स्फटिकीभवनास मदत होते व सूक्ष्म खडे बनतात. तेथील मुलांच्या आहारात ऑर्थोफॉस्फेट दिल्यापासून मुतखड्याचे प्रमाण कमी झाल्याचे आढळले आहे.

मुतखड्याचे प्रमाण प्रौढांपेक्षा लहान मुलांत अधिक असून मुलींपेक्षा मुलग्यांत जास्त आढळते. उपजत चयापचयात्मक (शरीरात सतत होणाऱ्या भौतिक आणि रासायनिक घडामोडींतील) दोषामुळे विशिष्ट घटक असलेले खडे तयार होतात; उदा., सिस्टिनोसिस अथवा सिस्टीनमयता या विकृतीत सिस्टीन या ॲमिनो अम्लाचे स्फटिक सर्व शरीर ऊतकांतून (समान कार्य व रचना असलेल्या कोशिकांच्या-पेशींच्या-समूहांतून) संचयित होतात. या विकृतीतील मुतखड्याचा प्रमुख घटक सिस्टीन असतो.

एकूण मुतखड्यांपैकी ७५% ते ८५% खडे कॅल्शियम ऑक्झॅलेट किंवा ऑक्झॅलेट व फॉस्फेट मिश्रित असतात. १५% मॅग्नेशियम अमोनियम फॉस्फेटाचे, ६% यूरिक अम्लाचे (यूरेट) आणि १% ते ३% सिस्टिनाचे असतात.

निर्जलीभवनास कारणीभूत होणाऱ्या काही व्यवसायांशिवाय बेरिलियम व कॅडमियम ही धातवीय मूलद्रव्ये ज्या उद्योगात वापरतात (उदा., बेरिलियम क्ष-किरण नलिका उत्पादनात व कॅडमियम छायाचित्रण उद्योगात वापरतात) त्या उद्योगांतील कामगारांना मुतखड्याच्या विकृतीचा धोका असल्याचे सिद्ध झाले आहे.

मुतखड्याविषयी अधिक माहिती 'अश्मरी' या नोंदीत दिली आहे.

 

संदर्भ : 1. Behrman, R. E. Vaughan. V. C. Ed. Nelson Textbook of Pediatrics, Philadelphia, 1983.

2. Joshi. L. B. Etiology of Urinary Calculi, Pune.

3. Weatherall. D. J. and others, Ed., Oxford Textbook of Medicine, Oxord, 1984.

लेखक : य. त्र्यं. भालेराव

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/11/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate