অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

विषरक्तता

विषरक्तता

रक्तामध्ये विद्राव्य (विरघळलेल्या) रूपात विषारी पदार्थ प्रविष्ट होऊन त्यांच्या अभिसरणामुळे शरीरातील विविध इंद्रियांमध्ये हानिकारक परिणाम घडून येण्याच्या स्थितीस विषरक्तता म्हणतात. विषांच्या निरनिराळ्या प्रकारांमुळे आणि उद्‌गम स्थानांमुळे विषरक्तताही बहुविध प्रकारांची असणे तात्विक दृष्ट्या शक्य आहे; परंतु सामान्यतः शरीराच्या आत निर्माण झालेल्या विषांमुळे संभवणाऱ्या विषाक्ततेचाच समावेश विषरक्तता या वैद्यकीय संज्ञेत केला जातो. यात दोन प्रमुख गटांचा विचार मोडतो :

  1. जंतुजन्य विषरक्तता
  2. गर्भिणी विषरक्तता.

जंतुजन्य प्रकार

कोणत्याही रोगकारक सूक्ष्मजीवांच्या संक्रामणामध्ये त्यांची वाढ शरीराच्या विविध ऊतकांमध्ये (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकांच्या-पेशींच्या-समूहांमध्ये) होऊ लागते आणि आपली विशिष्ट जंतुविषे हे सूक्ष्मजीव आसपासच्या ऊतकद्रवामध्ये सोडू लागतात. या जंतुविषांचे अंतर्विषे व बहिर्विषे असे दोन प्रकार आहेत.

अंतर्विषे

अंतर्विषांची निर्मिती सूक्ष्मजंतूंच्या कोशिकेत होते व अशा कोशिकांचे विभंजन (विघटन) किंवा लयन (नाश) झाल्यावर कोशिका घटकांबरोबरच ती आसपासच्या ऊतकांमध्ये आढळतात. उदा., पुंजगोलाणू, मालागोलाणू, फुप्फुसगोलाणू, परिमस्तिष्कगोलाणू इत्यादी. या जंतुविषांचे परिणाम संक्रामणग्रस्त ऊतकांमध्येच सर्वांत जास्त दिसून येतात व जंतुविषरक्तता जेव्हा सुरू होते, तेव्हा तिला समांतर अशी जंतुरक्तताही निर्माण होते. दूरच्या इंद्रियांवरील व सार्वदेहिक विषाक्तता त्यामानाने कमी असते. ती जास्त प्रमाणात दिसल्यास मूळ ऊतकातील संक्रामण गंभीर श्रेणीचे आहे, असा निष्कर्ष निघू शकतो; उदा., आंत्रज्वरातील विषाक्तता. अंतर्विषांचा संबंध जंतूंच्या प्रतिजनकारी घटकांशी निकटचा आढळतो. यांपैकी कायिक प्रतिजन-ओ याच्याशी निगडित अशा लिपिड-ए या घटकामुळे अंतर्विषजन्य अवसाद (आघात) हा लक्षणसमुच्चय निर्माण होतो, असे दिसून आले आहे. त्यात ज्वर, रक्तदाबात घट, श्वेतकोशिकान्यूनता, वाहिनी अंतःस्तरास इजा, रक्ताचे आंतरवाहिनी क्लथन असे गंभीर व दूरगामी परिणाम घडून येतात.

बहिर्विषे

बहिर्विषांची निर्मिती घटसर्प, धनुर्वात, बोट्युलिझम अन्नविषबाधा (कुपीजंतू विषबाधा), वायुयुक्त कोथ यांसारख्या रोगांच्या जंतूंकडून होते. ही विषे मोठ्या प्रमाणात जंतुकोशिकांबाहेर टाकली जातात व शरीरभर पसरू लागतात. त्यामुळे त्यांचे परिणाम दुरस्थ इंद्रियांवर (जंतुरक्तता नसतानाही) होतात. घटसर्पाचे बहिर्विष मुख्यतः हृदयाच्या स्‍नायूंची हानी करते. धनुर्वाताचे जंतुविष तंत्रिका तंतूंमधून (मज्‍जातंतूंमधून) मेंदू व मेरूरज्‍जूकडे पसरत जाते व आंतरकोशिकीय अनुबंधनांच्या कार्यात दोष निर्माण करून प्रेरक तंत्रिका कोशिकांची (मज्‍जापेशींची) उत्तेजनक्षमता वाढवते. त्यामुळे झटके य़ेऊ लागतात. याउलट बोट्युलिनम विषामुळे तंत्रिका कोशिकांच्या प्रेरक तंतूच्या टोकाशी होणारी रासायनिक प्रेषकाची निर्मिती कमी होऊन स्‍नायूंचे आकुंचन बल कमी होते. शरीराच्या दर किग्रॅ. वजनास सु. १०-९ मिग्रॅ. इतक्या सूक्ष्म मात्रेनेही परिणाम घडवून आणणारे हे विष सर्वांत प्रभावी विषारी पदार्थाचे उदाहरण म्हणून दाखवता येईल. त्याच्या तुलनेने इतर सर्व बहिर्विषे व अंतर्विषे कमी प्रभावकारी ठरतात.

पटकी, शिगेला, पुंजगोलाणू इ. काही जंतू अंतर्विषाबरोबर काही प्रमाणात बहिर्विषेही निर्माण करतात. जंतुविषासारखे परिणाम घडवणारे पदार्थ काही खाद्य वनस्पती (उदा., अळिंबे), प्राणी (उदा., गोगलगायी व तत्सम मृदुकाय वर्गातील प्राणी), कवचमत्स्य आणि कवके (उदा., भुईमुगाच्या शेंगेवर वाढणारी अल्फाटॉक्सिन निर्माती बुरशी) यांमध्येही आढळतात. त्यामुळे अशा पदार्थांच्या भक्षणातूनही विषरक्तता उद्‌भवू शकते.

विषरक्ततेस कारणीभूत असणारे वरील सर्व पदार्थ मुख्यत्वे उच्च रेणुभाराची प्रथिने आणि एंझाइमे असतात. त्यांचे रक्तांमधील अस्तित्व रक्तपरीक्षेने सिद्ध करणे नेहमीच शक्य नसते. काही समान लक्षणे सर्व प्रकारच्या विषरक्ततेमध्ये आढळतात. उदा., ऊतकनाशामुळे निर्माण होणारी अस्वस्थता व अशक्तपणा, ताप येणे, अंग दुखणे, घाम येणे, डोकेदुखी, उलट्या इ. लक्षणांनी ग्रस्त रुग्णाला त्याच्या दैनंदिन कार्यक्रमातून विश्रांती घेणे अपरिहार्य ठरते. यांशिवाय विशिष्ट ऊतकांवरील किंवा तंत्रावरील जंतुविषाच्या क्रियेमुळे उद्‌भवणारी लक्षणे निदानास मार्गदर्शक ठरू शकतात. उदा., धनुर्वातामधील स्‍नायूंचा ताठरपणा, घटसर्पामधील हृदयाची दुर्बलता, बोट्युलिनम अथवा टेट्राडो टॉक्सिनापासून संभवणारी स्‍नायूंची अशक्तता व हालचालीतील असंगतता.

उपचार

धनुर्वात किंवा इतर बहिर्विषजन्य रोगांमध्ये विशिष्ट उतारा म्हणून प्रतिपिंडाचा वापर लशीच्या स्वरूपात करता येतो [⟶ लस व अंतःक्रामण]. अंतर्विषांविरुद्ध प्रतिपिंड असलेल्या लशी तयार मिळत नाहीत; परंतु विशिष्ट परिस्थितीत उत्पादित करून घेता येतात. प्रतिजैविक (अँटिबायोटिक) औषधांच्या (उदा., पेनिसिलीन)वापराने जंतुसंक्रामण नियंत्रित करता येणे सहज शक्य झाल्याने अशा अंतर्विषविरोधी लशीची जरूरीही भासत नाही. संक्रामण स्थानापासून जंतुविषनिर्मिती पूर्ण थांबून विषरक्तता कमी होईपर्यंत प्रतिजैविकां बरोबरच लक्षणानुसारी इतर औषधे वापरून रोग्याला आराम मिळू शकतो. [⟶ जंतुविषरक्तता].

गर्भिणी विषरक्तता

सुमारे ३ ते ८ टक्के गर्भिणींमध्ये विषरक्ततेमुळे रक्तवाहिन्यांचे संकोचन होऊन रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. पहिल्या एकदोन महिन्यांमध्ये असलेल्या मूळ रक्तदाबामध्ये ३०/१५ (आकुंचक/प्रसरक) मिमी. पेक्षा जास्त वाढ झाल्यास विषरक्ततेची शंका यावी. विशेषतः शेवटच्या तीन महिन्यांत तीअवस्था निर्माण होण्याची शक्यता असते. सर्वांगावर सूज येऊन दर आठवड्याला अर्धा किग्रॅ. पेक्षा जास्त वजन वाढणे व लघवीमधून प्रथिनाचे उत्सर्जन होणे ही इतर प्रमुख लक्षणे होत.

रुग्णास पूर्ण विश्रांती (शय्याविश्राम) देऊन सौम्य शामक औषधे, प्रथिनयुक्त व मीठरहित आहार व इतर पोषक द्रव्ये यांच्या मदतीने गर्भ जीवनक्षम अवस्थेस पोहोचेपर्यंत गर्भिणी अवस्था टिकवणे आवश्यक असते. तशी काळजी न घेतल्यास तीव्र विषरक्ततेमध्ये परिणती होऊन उच्च रक्तदाब, अल्पमूत्रता, ताप, ऊतकांचे निर्जलीभवन, दृष्टीची अस्पष्टता, उलट्या होणे अशी लक्षणे निर्माण होतात. रक्तवाहिन्यांच्या संकोचनामुळे गर्भास धोका संभवतो. हीच अवस्था तीव्रतम झाल्यास आकडीसारखे झटके येऊन शारीरिक इजा होऊ शकते. जास्त प्रभावकारी शामक द्रव्ये शिरेतून देऊन, तसेच रक्तदाबनियंत्रक औषधे वापरून ही अवस्था काबूत आणणे अत्यावश्यक ठरते. त्यानंतर शक्य तितक्या लवकर व सर्वांत सुरक्षित अशा पद्धतीने प्रसूती घडवून आणणे इष्ट असते.

या अवस्थेचे निश्चित कारण विवाद्य आहे. अपरेमध्ये निर्माण होणारी वाहिनीसंकोचक द्रव्ये सर्वदूर आपला परिणाम घडवून हे संलक्षण (लक्षणसमुच्चय) निर्माण करतात एवढे निश्चित असले, तरी ही द्रव्ये का तयार होतात हे स्पष्टपणे माहीत झालेले नाही. काही प्रतिरक्ष वैज्ञानिक सिद्धांत अलीकडे या संदर्भात मांडले गेले आहेत. भ्रूणाच्या अस्तित्वामुळे मातेच्या रक्तात काही रोधक प्रतिपिंड तयार होत असतात. त्यांचे पोषजनक पेशीवरील प्रतिजनांशी बंधन झाल्यावर त्यातून प्रतिरक्षा (रोगप्रतिकारक्षम) यंत्रणेचे अवसादन घडवणारी प्रणाली कार्यान्वित होते व गर्भाचे रक्षण होते. या सर्व शृंखलेमधील आयजीजी रोधक प्रतिपिंड निर्मितीस काही कारणाने अडथळा आला, तर पोषजनक पेशींचा चयापचय बदलतो आणि त्यातूनच वाहिनीसंकोचक असे प्रोस्टॅनॉइड पदार्थ मोठ्या प्रमाणात विमोचित होतात, असा या सिद्धांताचा दावा आहे.

गर्भिणी विषरक्ततेचा धोका पहिलटकरणींमध्ये थोडा जास्त असतो. तसेच लठ्ठपणा, आधीच असलेला रक्तदाबाचा विकार, जुळेगर्भ, आधुनिक जीवनाचे ताणतणाव, आहार व हवामानविषयक घटक यांमुळे त्यात भर पडते. यामुळेच उच्च रक्तदाबाच्या पातळीवर उद्‌भवणारी आकडी कधीकधी तुलनेने कमी दाबाच्या अवस्थेतही प्रकटण्याची शक्यता असते.

 

संदर्भ : 1. Anderson, I, R. Muir’s Textbook of Pathology, London.1985.

2. Lawson, J. B,; Stewart, D. B. Obstetrics and Gynaecology in Tropics

and Developing Countries, London, 1983.

3. Llewelyn-Jones D. Fundamentals of Obstetrics and Gynaecology,

London, 1990.

4. Thomas, G. A. Medical Microbiology, London, 1988.

लेखक : दि. शं. श्रोत्री

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate