অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

व्यसन : गांजा

गांजा : व्यसन

गांजाचे झाड लावणे बेकायदेशीर असले तरी चोरून अनेकजण शेतात गांजा लावतात. पैशाचे आमिष असल्याने गांजा अनेक ठिकाणी होतो. गांजाचे झाड अंबाडी वर्गातले असून त्याच्यातून वाहणारा रस (डिंक) हा मादक आहे. गांजा हे मुळात एक औषधी झाड आहे. पूर्वीपासून निरनिराळया कामांसाठी त्याचा वापर होत आलेला आहे. यांच्या मादी जातीच्या झाडांपासून जो चीक निघतो त्यास गांजा असे म्हणतात. कोवळया फांद्यांवर राळेसारखा थर येतो त्यास चरस म्हणतात. पाने आणि टिकशा मिळून 'भांग' तयार होते. गांजा व भांग जुनी असल्यास निरुपयोगी असते. कारण त्यातले उडून जाणारे तेलद्रव्य असते, तेच मुख्य काम करते. हे तेल व राळ दारूत किंवा तुपात मिसळते पण पाण्यात नाही.

वैद्यकीय गुणधर्म

गांजाचा परिणाम मेंदू, चेतातंतू, पचनसंस्था, मूत्रजननसंस्था, स्त्री-पुरुष जननसंस्था, रक्त, श्वसनसंस्था वगैरे अनेक जागी होतो. गांजा तीन प्रकारे वापरला जातो - धूम्रपान, दुधात मिसळून पोटातून किंवा लेप इ. लेप हा स्थानिक वेदना कमी करण्यासाठी वापरला जातो. लेप देऊन दात काढण्यापुरती बधिरता येऊ शकते. रक्तात मिसळल्यानंतर गांजाचा परिणाम मात्रेप्रमाणे वाढत जातो. मेंदूवर त्याचा पहिल्यांदा उत्तेजक व त्यानंतर कैफ चढणे व झोप लागणे असा परिणाम होतो. संवेदना बोथट होतात. शरीर शिथिल व शक्तिहीन होते - विशेषतः पायांवर हा परिणाम जास्त होतो. नाडी वेगाने चालते व शरीरात गरमपणा जाणवतो. भूक जास्त लागते आणि अन्नपचनावर त्याचा परिणाम होतो व मलविसर्जनही सुधारते. गांजाने बाळंतपणात कळा वाढतात. पुरुष जननेंद्रियावर त्याचा लेप दिल्यास संवेदना बोथटते आणि त्यामुळे वीर्यपतन लवकर होत नाही.

  1. गांजाची मात्रा वाढल्यास प्रचंड झोप येणे, अगदी बेशुध्दीपर्यंत अवस्था येऊ शकते. निरनिराळे भास होणे, खूप आनंद वाटणे वगैरे परिणामांमुळे गांजा जास्त घेण्याकडे आणि नियमितपणे घेण्याकडे कल होतो. यामुळेच व्यसन वाढते.
  2. गांजाचे व्यसन खूप दिवस असल्यास भूक मंदावणे, अशक्तपणा, थरथर, गोंधळल्यासारखे वाटणे, लैंगिक इच्छा कमी होणे असे दुष्परिणाम होतात.
  3. गांजामुळे बाधा झालेल्या रुग्णास श्वसन थांबून मृत्यू येण्याचा संभव असतो. यासाठी ताबडतोब रुग्णालयात न्यावे. त्याआधी मीठपाणी देऊन उलटी करवल्यास गांजाचे शिल्लक द्रव्य पोटातून बाहेर पडायला मदत होते.
  4. व्यसन म्हणून गांजा-भांग इ. मोठया प्रमाणावर प्रचलित आहे. दारू समाजाने व धर्माने निषिध्द मानली आहे तसे भांगेच्या बाबतीत नाही. सहज मिळणारी वस्तू म्हणून खेडोपाडी त्याचा वापर बराच होतो. भांग दुधात मिसळून थंडाई केली जाते व ही खूप प्रचलित पध्दत आहे. गांजाची चिलीम करून ओढणे हे सर्वात जास्त प्रचलित आहे. यासाठी झाडाच्या टिकशांचा वापर होतो.

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्यविद्या

अंतिम सुधारित : 7/3/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate