অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

श्वसनसंस्थेची रचना आणि कार्य


श्वसनसंस्था म्हणजे बाहेरून हवा घेऊन ती असंख्य सूक्ष्म फुग्यांमध्ये खेळवण्याची व्यवस्था आहे. या सूक्ष्म फुग्यांच्या आजूबाजूला असलेल्या केशवाहिन्यांच्या जाळयातून रक्तप्रवाह खेळता असतो. हवा आणि रक्तप्रवाह या दोन्हींमध्ये वायूरुपी पदार्थांची देवाणघेवाण यामुळे शक्य होते. या देवाणघेवाणीत रक्तातले काही वायुरूप पदार्थ (कार्बवायू,पाण्याची वाफ व इतर काही पदार्थ) बाहेर टाकले जातात. हवेतून रक्तामध्ये प्राणवायू घेतला जातो. प्राणवायू व कार्बवायूची देवाणघेवाण रक्तातल्या तांबडया पेशींमधील रक्तद्रव्यामुळे (हिमोग्लोबीन) होऊ शकते. शुध्द' केलेला रक्तप्रवाह हृदयाच्या डाव्या भागात येतो. तेथून तो रोहिण्यांमार्फत सर्व शरीरात पोहोचवला जातो. याचप्रमाणे 'अशुध्द' रक्त महानीलेमार्फत हृदयाच्या उजव्या भागात येते. तेथून हे रक्त फुप्फुसांमध्ये पोहोचवले जाते. असे हे चक्र सतत चालते. श्वसनसंस्थेला हवेचा पुरवठा करण्यासाठी नाकापासून सुरुवात होते. घशात स्वरयंत्रापासून श्वासनलिका सुरू होते. नाक, घसा व स्वरयंत्र यांना बाह्य श्वसनसंस्था असे नाव देता येईल. त्याखाली श्वासनलिकेपासून फुप्फुसापर्यंत आतली श्वसनसंस्था असते. या विभागणीचे खूप महत्त्व आहे. बाह्य श्वसन संस्थेचे आजार सहसा किरकोळ असतात. तर आतल्या श्वसनसंस्थेचे बहुतेक आजार गंभीर असतात.

फुप्फुसाचे भाग

छातीत श्वासनलिकेच्या दोन मुख्य शाखा तयार होतात उजवी आणि डावी. या मुख्य शाखेपासून प्रत्येकी तीन तीन फांद्या निघतात. या तीन उपशाखा - (वरची, मधली, खालची) - फुप्फुसाच्या वेगवेगळया भागांना हवा पुरवतात. प्रत्येक फुप्फुसाचे याप्रमाणे तीन भाग पडले आहेत (वरचा भाग, मधला भाग, खालचा भाग.) मात्र डाव्या बाजूच्या फुप्फुसाचा मधला भाग फार लहान असतो कारण ती जागा हृदयाने व्यापलेली असते. म्हणून डाव्या फुप्फुसाचे वरचा व खालचा असे दोन भाग सांगण्याची पध्दत आहे. ही माहिती घेण्याचे कारण असे, की सहसा फुप्फुसाच्या आजारांमध्ये यांपैकी एखादाच भाग आजारी होतो. विशेषतः न्यूमोनिया व क्षयरोग हे आजार बहुधा फुप्फुसाच्या एखाद्या भागातच बहुधा वरचा भाग होतात.

वायुकोश व श्वासनलिकांचे जाळे

फुप्फुसाची एकूण रचना ही एखाद्या झाडासारखी फांद्याफांद्यांची असते; फक्त पानांच्या ऐवजी फुग्यांची कल्पना करा. श्वासनलिकेतून हवा घेतल्यानंतर हे असंख्य सूक्ष्म फुगे (वायुकोश) थोडे फुगतात. हवा सोडून देताना तेलहान होतात. हे सतत लहानमोठे होणे हेच फुप्फुसाचे मुख्य कामकाज आहे. यासाठी श्वासनलिकांचे सर्व जाळे लवचीक असते. हा लवचीकपणा धूम्रपान, प्रदूषण, इत्यादी कारणांमुळे कमी होतो. धूम्रपानामुळे श्वासनलिकांच्या शाखा-उपशाखा आकुंचित व अरूंद होतात, आणि छातीवर दम्यासारखा परिणाम होतो.

स्राव (पाझर)

श्वासनलिकेच्या शाखा-उपशाखांमध्ये ओलेपणा राहण्यासाठी पाझर होत असतात. निरोगी अवस्थेत हे पाझर थोडे असल्याने जाणवत नाहीत. पण काही कारणांमुळे हे स्राव वाढले तर खाकरा-बेडका या स्वरूपात ते जाणवतात. काही आजारांमध्ये फुप्फुसात दाह निर्माण होऊन आत पाझर वाढतात. ते श्वासनलिकेत येऊन खाकरा-बेडका या स्वरूपात बाहेर पडतात.

दुपदरी आवरण

एकात एक अशा दोन प्लॅस्टिक बॅगची कल्पना करा. फुप्फुसाच्या भोवती असे पातळ दुपदरी आवरण असते. या दोन थरात पोकळी असते व त्यात थोडासा द्रव असतो. त्यात हवा येऊ शकत नाही. छातीच्या पिंज-याची भिंत आणि फुप्फुसे या दोन्हींच्या मध्ये हे दुपदरी आवरण असते. निरोगी अवस्थेत यात ओलेपणा असण्याइतकाच द्रव असतो. क्षयरोग व इतर 'पू' कारक जंतुदोषामुळे यात जादा द्रव जमतो. (छातीत पाणी होणे) त्याचा दाब फुप्फुसाच्या तेवढया भागावर येऊन श्वसनाला अडथळा येतो.

श्वसनाची हालचाल

श्वसनाची लयबध्द क्रिया ही मेंदू, चेतासंस्था व श्वसनाचे स्नायू यांच्यामुळे शक्य होते. श्वसनाचे मुख्य स्नायू म्हणजे श्वासपटल (म्हणजे छाती आणि पोट यांच्यामधला घुमटासारखा स्नायु पडदा) आणि बरगडयांचे स्नायू, हे स्नायू इच्छेनुसार हलवता येतात. पण हे स्नायू आपल्याला जाणीव नसते तेव्हा आपोआपही (इच्छेशिवाय) काम करीत असतात. या स्नायूंचे नियंत्रण मूळ मेंदूतील केंद्रे करतात. काही गंभीर आजारांमध्ये या केंद्राचे कामकाज बिघडून श्वसन बंद पडते. यामुळे मृत्यू येऊ शकतो. मेंदूचा रक्तपुरवठा बंद पडणे, सर्पदंश, विषबाधा, इ. यामुळे असे होऊ शकते.

सायनस व कानाघ नळी

श्वसनसंस्थेच्या या मुख्य रचनेशिवाय आणखी एक भाग म्हणजे सायनस. सायनस म्हणजे नाकाला जोडलेली हाडातली पोकळी. एखाद्या घरात जशा खोल्या असतात तसे नाकाला सायनस असतात. नाकाच्या दोन्ही बाजूंना चार-चार अशा एकूण आठ पोकळया असतात. यात हवा असते. मध्यकर्णातून निघणारी नळीही नाकात उघडते (कानाघ नळी). म्हणूनच सर्दीपडशात सायनसदुखी किंवा कानदुखी होऊ शकते.

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्याविद्या

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate