অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लोहितांग ज्वर

(स्कार्लेट फीव्हर). हा एक तीव्र सांसर्गिक रोग असून ज्वर, घशाचा शोथ (दाहयुक्त सूज) व विशिष्ट पुरळ ही त्याची प्रमुख लक्षणे आहेत. स्ट्रेप्टोकॉकस या प्रजातीतील सूक्ष्मजंतूंमुळे होणाऱ्या अनेक रोगांत या रोगाचा समावेश होतो. आर्. सी. लॅन्सफिल्ड या अमेरिकन सूक्ष्मजंतुवैज्ञानिकांच्या वर्गीकरणाप्रमाणे ‘ए’ (A) गटातील स्ट्रेप्टोकॉकसांमुळे (विशेषतः स्ट्रे. पायोजिनीसयाच्या विविध वाणांमुळे) हा रोग होतो. घशाचा शोथ, गिलायुशोथ (टॉन्सिलशोथ), ग्रसनीशोथ वगैरे श्वसन तंत्राचे (संस्थेचे) नेहमी आढळणारे रोगही याच सूक्ष्मजंतूंची क्षमता (या विषामुळे रक्तातील तांबड्या कोशिकांतील – पेशींतील-हिमोग्लोबिन कोशिकांपासून वेगळे केले जाते व हे विष निर्माण करणाऱ्या सूक्ष्मजंतूंना ‘रक्तविलयक स्ट्रेप्टेकॉकस’ असे म्हणतात) आणि रुग्णावर या विषाचा परिणाम होऊ शकणे यांवर लोहितांग ज्वराचा विशिष्ट पुरळ येणार किंवा नाही, हे अवलंबून असते. आधीच्या सौम्य प्रमाणावरील रोगामुळे बऱ्याच व्यक्तींत या विषाविरुद्ध प्रतिकारक्षमता निर्माण झाल्याने कदाचित बरेच रुग्ण या विषाला दाद देत नाहीत व त्यांच्या शरीरावर विशिष्ट पुरळ येत नाही.

लोहितांग ज्वर सामान्यतः दोन ते आठ वर्षांच्या दरम्यानच्या मुलांना होतो. मुर्लीपेक्षा मुलग्यांना तो होण्याचे प्रमाण जास्त असते. तो मुख्यत्वे शीतोष्ण प्रदेशात हिवाळ्यात व वसंत ऋतूत जास्त प्रमाणात आढळतो. तो उष्ण प्रदेशात क्विचितच आढळतो व अजून तरी तो भारतात आढळल्याचे ज्ञात नाही.

या रोगाचा प्रसार रुग्णाच्या तोंडातील तुषार उडून सरळ संसर्गाने किंवा दूषित अन्नाचे व दुधाचे सेवन आणि दूषित भांडी, रुग्णांचे कपडे, परिचारकाचे हात यांच्या संसर्गाने होतो म्हणजेच रोगप्रसार हवेतून न होता रुग्णाशी किंवा रोगवाहक व्यक्तीशी जवळचा संबंध आल्यावरच होतो. रोगाचा परिपाक काल (सूक्ष्मजंतूंचा शरीरात प्रवेश झाल्यापासून रोगाची लक्षणे दिसून येईपर्यंतचा काल) दोन ते सात दिवसांचा असतो.

लक्षणे व चिन्हे

डोकोदुखी, ज्वर, घशाचा शोथ व ओकाऱ्या ही सुरुवातीची लक्षणे असतात. दोन-तीन दिवसांनंतर अंगावर विशिष्ट पुरळ उठावयास लागतो. तो प्रथम मान व छाती यांवर दिसतो आणि काही तासांतच शरीरभर पसरतो. काखा, जांघा, कोपराची पुढची व गुडघ्याची मागची बाजू यांवर तो जास्त स्पष्ट असतो. चेहरा लाल दिसतो आणि तोंडाभोवती पांढुरके मंडल दिसून येते; परंतु चेहऱ्यावर, तळहातांवर व तळपायांवर पुरळ येत नाही. पुरळ लालभडक, ठिपकेवजा असून त्यावर दाब दिल्यास तो दिसेनासा होतो. घसा सुजतो व मृदू तालूवर लाल ठिपके दिसून येतात. गिलायूंवर लहान लहान विद्रधी (गळवे) होतात व जिभेवर साका धरतो. दोन दिवसांत साक्यामधून लाल पिंडिका (उंचवटे) दिसू लागतात (याला ‘सफेद स्ट्रॉबेरी जीभ’ म्हणतात). हळूहळू जिभेवरील साका झडतो व चवथ्या दिवशी जीभ लालमडक व सुजलेल्या जलसंचयी लाल पिंडिकांनी भरलेली दिसते (याला ‘लाल स्ट्रॉबेरी जीभ’ किंवा‘रासबेरी जीभ’ म्हणतात). शरीरातील निरनिराळ्या⇨लसीका ग्रंथींची वृद्धी होते. मानेतील वृद्धी पावलेल्या लसीका ग्रंथी वेदनायुक्त व स्पर्शासह्य (स्पर्शाला संवेदनाक्षम) असतात. काही वेळा त्यांत पू होण्याचा संभव असतो.

ताप हळूहळू एक आठवड्यात उतरतो. पुरळ सु. एक आठवडाभर राहतो. नंतर हळूहळू कोंडा पडावयास लागतो व दोन-तीन आठवडे तो पडत राहतो.

उपद्रव

रोग होऊन गेल्यावर चवथ्या किंवा पाचव्या आठवड्यात तो परत उलटण्याचा संभव असतो. कानात विद्रधी होऊन कान फुटण्याची व कर्णपश्चास्थिशोथ होण्याची शक्यता असते. महत्त्वाचे इतर उपद्रव म्हणजे वृक्कशोथ (मूत्रपिंडदाह; हा उपद्रव एकूण रोग्यांतील ०.५ ते १.०% रोग्यांत आढळतो), तसेच संधिशोध व संधिज्वर (एकूण रोग्यांतील ३% रोग्यांत हा उपद्रव होतो) हे होत. यात मुख्यत्वे बोटे, मनगट, घोटा, गुडघा व खांदे यांचे सांधे ग्रस्त होतात आणि पुढे हृदयाच्या झडपांनाही विकार होण्याची शक्यता असते.

निदान

रोगाची लक्षणे व बाह्य चिन्हे (विशेषतः विशिष्ट पुरळ) यांवरून निदान सहज करता येते. या रोगाच्या ९०% रुग्णांत पहिल्या तीन दिवसांत डिक कसोटी (जी. एफ्. डिक व जी. एच्. डिक या अमेरिकन वैद्य तांपत्याने शोधून काढलेली कसोटी) घन मिळत असल्याने (रुग्णाच्या संपर्कात आलेल्या आणि ज्वर व घशाला सूज आलेल्या व्यक्तींच्या बाबतीत) पुरळ येण्याच्या आधीच निदान करणे या कसोटीने शक्य होते. ही कसोटी पुढीलप्रमाणे आहे. त्वचेला लाली आणणारे विष त्वचेत टोचल्यावर काही वेळाने भोवतालच्या त्वचेवर रक्तिमा दिसण्याची प्रतिक्रिया व्यक्तीची प्रतिकारक्षमता कमी असल्याचे दर्शविते म्हणजेच ती व्यक्ती आजाराला बळी पडण्याची शक्यता जास्त असते. अशा व्यक्तींना पूर्वी सात दिवस अलग ठेवावे लागे. आता अशा व्यक्तींवर योग्य संरक्षक उपचार केल्यास रोग लगेच आटोक्यात येतो, रुग्णाला अलग ठेवण्याची गरज नसते व संधिज्वरादि उपद्रव होण्याचे टळते. ही कसोटी आता फारशी वापरात नाही.

या रोगाचे गोवराशी बरेच साम्य असते; पण या रोगातील पुरळ मोठ्या प्रमाणात पसरलेला असून त्याचा लाल रंग गोवराच्या पुरळापेक्षा जास्त गडद असतो.

घसा, गिलायू, लसीका ग्रंथी, त्वचा इ. ज्या अवयवांना सूज येते तेथे सूक्ष्मदर्शकाखाली तंत्रिका ऊतकस्नेही (मज्जा कोशिकासमूहांची आसक्ती असणारी) शोथ प्रतिक्रिया दिसते व नंतर बाह्य त्वचेमध्ये शृंगस्तराची अतिवृद्धी दिसून येते.

चिकित्सा प्रतिबंधक

ज्वर व घसाची सूज असलेल्या रुग्णांना विशेषतः ज्यांना संधिज्वर विकृती आहे अशा रुग्णांना, योग्य प्रमाणात व योग्य कालावधीपर्यंत पेनिसिलीन औषध दिल्यास रोग लगेच आटोक्यात येतो आणि संधिज्वरादि उपद्रव होण्याचे टळते. याशिवाय रोगाचा प्रसार दूषित अन्न व वस्तू यांमुळे होत असल्याने रुग्णाशी किंवा रोगवाहक व्यक्तीशी जवळचा संपर्क टाळणे हिताचे असते.

रोगनिवारक

रुग्णाला कमीत कमी दोन आठवडे पूर्ण विश्रांती, पातळ आहार व भरपूर प्रमाणात द्रव पदार्थ देतात. गरम लवण विद्रावाने (सलाइनाने) गुळण्या केल्यास घशाची सूज कमी होते. मात्र तोंडात सूक्ष्मजंतुनाशक औषधांच्या गोळ्या धरण्याचा उपयोग होत नाही. या रोगावर पेनिसिलीन हे औषध अत्यंत गुणकारी आहे. ते स्ट्रेप्टोकॉकसांसाठी विशिष्ट सौम्यकारक परिणाम असलेले औषध असून सूक्ष्मजंतुनाशक असल्याने स्ट्रेप्टोकॉकसांचा संपूर्ण नाश करते. त्यासाठी ते कमीत कमी दोन ते चार आठवडे द्यावे लागते. फक्त लक्षणे कमी झाल्यावर लवकर औषध बंद केल्यास सूक्ष्मजंतूंचा पूर्णपणे नाश होत नाही. त्यामुळे रोग उलटणे, रुग्ण रोगवाहक होणे किंवा वृक्कशोथ, संधिशोथ व संधिज्वरादि उपद्रव होणे यांचा धोका असतो. या रोगावर इतर नवीन प्रतिजैव (अँटिबायॉटिक) व सल्फा औषधेही उपयुक्त आहेत. सल्फा औषधे सूक्ष्मजंतुरोधक असल्याने कमी परिणामकारक आहेत. यांशिवाय रक्तरसापासून तयार केलेल्या व परार्जित रोग प्रतिकारक्षमता निर्माण करणाऱ्या गॅमा ग्लोब्युलीन औषधांचाही चांगला उपयोग होतो.

ऐतिहासिक

डॅनिएल सेनेर्ट या जर्मन वैद्यांनी १६१९ मध्ये या रोगाचे प्रथमच सुस्पष्ट वर्णन केले. १६७६ मध्ये इंग्लिश वैद्य टॉमस सिडनॅम यांनी या रोगावर संशोधन करून गोवर व या रोगातील फरकही स्पष्ट केला. जी. एफ्. डिक व जी. एच्. डिक या अमेरिकन दांपत्याने हा रोग होण्याची शक्यता वर्तविण्यासाठी व निदानासाठी १९२४ मध्ये एक कसोटी विकसित केली. या कसोटीचे वर्णन वर दिले आहेच.

विसाव्या शतकाच्या मध्यापासून लोहितांग ज्वराचे प्रमाण (विशेषतः ब्रिटन व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत) पुष्कळ कमी झाले असून त्याची तीव्रताही कमी झाली आहे व होत आहे. पेनिसिलीन, इतर प्रतिजैव औषधे व सल्फा औषधे यांच्या वापराशिवाय स्वतंत्रपणे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. याचे कारण बहुधा स्ट्रप्टोकॉकसांची ताकद कमी झालेली असणे किंवा/आणि मानवाची रोगप्रतिकारक्षमता वाढलेली असणे, हे असू शकेल.

 

संदर्भ : 1. Ma Carty, M. Ed.Streptococcal Infections. New York,1958.

2. Petersdorf, R. G. and others, Ed. Harrison’s Principles of Internal Medicine, New York, 1983.

लेखक : म. आ. रानडे / रा. प. प्रभुणे

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/4/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate