অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सौर दिव्यांनी उजळली दरेवाडी....

सामूहिक प्रयत्नांतून सोडवला विजेचा प्रश्‍न

यंदाच्या दिवाळीत पहिल्यांदा दरेवाडीतील (ता. जुन्नर, जि. पुणे) प्रत्येकाच्या घरावरील आकाशकंदीलामध्ये दिवा लागला तोही सौर ऊर्जेचा... आणि खऱ्या अर्थाने लोकांच्या मनामनांत प्रगतीची ऊर्जा भरली गेली. सौर ऊर्जेने पेटलेल्या एका दिव्याने वाडीला तर एकत्र आणलेच, त्याचबरोबरीने सामूहिक प्रयत्नातून आपले प्रश्‍न आपणच सोडवू हा आत्मविश्‍वास निर्माण केला. यातूनच या वाडीने येत्या काळात शेती आणि पिण्यासाठी पाण्याचे नियोजन, मुलांसाठी अंगणवाडी, शेतकरी आणि महिला बचत गटातून सुधारित शेती आणि वाडीच्या विकासाचा आराखडा निश्‍चित केला आहे.
वीज पोचली नाही अशी अनेक गावे देशात आढळतात. सामूहिक पद्धतीने विकासाच्या वाटेवर चालण्याची आणि कष्ट घेण्याची तयारी असलेली गावे मिळणे मुश्‍कीलच. अशा गावांच्या शोधात अभियांत्रिकी पदवीधरांनी स्थापन केलेल्या "ग्रामऊर्जा' कंपनीचे तज्ज्ञ कायम भटकत असतात. त्यातच त्यांना जुन्नर तालुक्‍यात दरेवाडी गाव सापडले. या उपक्रमाची रूपरेषा सांगताना कंपनीतील तज्ज्ञ अंशुमन लाठ, समीर नायर आणि प्रसाद कुलकर्णी म्हणाले, की माणिकडोह धरणाच्या मागील नाणेघाटाच्या डोंगर रांगातील गावे आणि वाड्यांचे सर्वेक्षण करताना तेथील लोकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. त्यातून चार- पाच वाड्यांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यातून मुख्य रस्त्यापासून किमान अडीच-तीन किलोमीटर आत दवंड्या डोंगराच्या पायथ्याला वसलेल्या 40 उंबऱ्याच्या दरेवाडीत सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याची तयारी केली.
पहिल्या टप्प्यात दोन महिने गावकऱ्यांची मानसिकता, आर्थिक क्षमता, शेती व पूरक उद्योग, रोजगाराच्या संधी यांची माहिती घेतली. गावात वीज नसल्याने रॉकेलच्या दिवा हाच प्रकाशाचा स्रोत. ओढ्यातील पाणी उचलण्यासाठी डिझेल पंपाचा वापर, सायंकाळनंतर मुलांच्या अभ्यासाची गैरसोय, विहिरीवर पंप नसल्याने पाणी भरण्यासाठी लागणारा वेळ, पिठाची गिरणी वाडीपासून तीन किलोमीटर लांब. गाव परिसरातील अंधारामुळे रात्री जंगली प्राणी, सापांचा धोका अशा विविध अडचणी वाडीतील लोकांसमोर होत्या. त्यात विजेची उपलब्धता हाच केंद्रबिंदू होता. विजेच्या उपलब्धीतून पाणी, शेती आणि शिक्षणाच्या काही प्रमाणात समस्या सुटणार होत्या. भात शेती, त्यानंतर मोलमजुरी आणि एप्रिल -मेमध्ये हिरड्याची विक्री हेच वाडीतील लोकांचे उत्पन्नाचे साधन. आर्थिक उत्पन्न कमी आणि दुर्गम भाग यामुळे सरकारी वीज घेणे गावकऱ्यांना शक्‍य नव्हते. त्यामुळे प्रगतीच्या वाटा खोळंबल्या होत्या. अशावेळी सौर ऊर्जेचा पर्याय या गावकऱ्यांसमोर होता. कुलकर्णी म्हणाले, की वाडीत सौर ऊर्जा प्रकल्पाच्या उभारणी खर्चासाठी जर्मनीमधील बॉश सोलर एनर्जी कंपनीला प्रस्ताव दिला. त्यांच्या तज्ज्ञांनी गावाची परिस्थिती अभ्यासली. लोकांची प्रकल्प उभारण्याची आणि त्याचे योग्य व्यवस्थापन करण्याची मानसिकता लक्षात घेऊन प्रकल्पाला 30 लाख रुपयांचे अर्थसाहाय्य देण्याचे मान्य केले. "ग्रामऊर्जा'ने संबंधित प्रकल्प उभारण्याची आणि तांत्रिक सेवा देण्याची जबाबदारी घेतली.

उभा राहिला सौर ऊर्जा प्रकल्प...

दरेवाडी हे 40 उंबऱ्यांची वाडी, लोकसंख्या 250. शेती आणि मोलमजुरीवर पोट अवलंबून. पण वाडीच्या विकासासाठी कष्ट उपसण्याची आणि सामूहिक कामाची मानसिकता हे प्रकल्पाच्या उभारणीला बळ देणारे ठरले. प्रकल्पाच्या वाटचालीबाबत कुलकर्णी म्हणाले, की गावाचे सर्वेक्षण केल्यानंतर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य जागा निवडली. वाडीची सभा घेऊन प्रकल्प आखणी, खर्च, प्रकल्पामुळे मिळणारे फायदे आणि वाडीतील लोकांनी प्रकल्पाची घ्यावयाची जबाबदारी याची माहिती दिली. सौर ऊर्जेचा वापर केवळ दिव्यांसाठी न होता पाणी पंप, गिरणी अशा व्यावसायिक कारणांसाठीही व्हावा असा आमचा आग्रह होता. सभेमध्ये गावकऱ्यांनी प्रकल्पाच्या नियोजनासाठी एकमताने लहू बोऱ्हाडे यांच्या अध्यक्षतेखाली "वनदेव ग्रामोद्योग न्यास'ची स्थापना केली. त्यात वाडीतील चार पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. संबंधित जर्मन कंपनीने प्रकल्पाला आर्थिक साहाय्य दिले होतेच. त्याचबरोबरीने या वाडीनेदेखील आपले साठ हजार रुपये प्रकल्पात गुंतविले. शाश्‍वत ऊर्जेचा स्रोत दीर्घकाळ उपयोगात आणण्यासाठी गावकऱ्यांच्या ट्रस्टने पुढील 25 वर्षे या प्रकल्पाची योग्य पद्धतीने देखभाल करण्याची हमीदेखील दिली. यासाठी ग्रामस्थांचा ट्रस्ट, ग्रामऊर्जा आणि बॉश कंपनीमध्ये सहकार्य करार करण्यात आला. प्रकल्पाच्या उभारणीसाठी वाडीतील शिवाजी शेळके यांनी स्वतःची दोन गुंठे जागा दिली. ग्रामपंचायतीनेही तातडीने या प्रकल्पाला "एनओसी' प्रमाणपत्र दिले. गावातील तरुण मुंबई येथे वायरिंगच्या उद्योगात कार्यरत होते. ऊर्जा उपकरणांच्या हाताळणी संदर्भात त्यांना काही माहिती असल्याने सौर ऊर्जा उभारणीतील तांत्रिक मुद्दे समजावणे सोपे गेले. "ग्रामऊर्जे'तील तज्ज्ञ राहुल सिंग यांनी सौर ऊर्जा प्रकल्पाची आखणी, तर सुमीत सुतार आणि किरण औटी यांनी या संपूर्ण प्रकल्पाची उभारणी केली.

...असा आहे सौर ऊर्जा प्रकल्प

दरेवाडीमध्ये प्रकल्पाची जागा निश्‍चित झाल्यावर 10 किलो वॉट ऊर्जानिर्मितीच्या दृष्टीने या जागेवर 39 सौर पॅनेल तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीने बसविण्यात आले. पॅनेलमधून गोळा झालेली वीज इन्व्हर्टरला पुरविली जाते. सोलर पॅनेलमध्ये तयार झालेली वीज "डीसी' प्रकारातील असते. याचे इन्व्हर्टरच्या माध्यमातून 230 व्होल्ट "एसी'मध्ये रूपांतर होते. त्यानंतर वीज स्थानिक "ग्रीड'द्वारे प्रत्येक घरात पुरविली जाते. इन्व्हर्टर, बॅटरी आणि कंट्रोल पॅनेलसाठी प्रकल्पाशेजारी कंट्रोल रूम बांधण्यात आली. दिवसभरात तयार होणारी वीज गिरणी आणि पंपासाठी वापरली जाऊन शिल्लक राहिलेली वीज बॅटरीमध्ये साठवली जाते. रात्रीच्यावेळी या बॅटरीमध्ये साठवलेली वीज पुन्हा इन्व्हर्टरच्या माध्यमातून स्थानिक "ग्रीड'मध्ये सोडली जाते. प्रत्येक घरातील विजेचा वापर समजण्यासाठी मीटर जोडण्यात आला आहे. सोलर पॅनेलमधून किती वीज तयार झाली, तसेच गावकऱ्यांनी किती वीज वापरली याची नोंद "मेमरी कार्ड'मध्ये साठवली जाते. ही माहिती पुण्यातील ग्राम ऊर्जेच्या कार्यालयातूनही तपासता येते. पथदिव्यांसाठी टायमर लावण्यात आला आहे. त्यामुळे आपोआप संध्याकाळी सात वाजता रस्त्यावरील दिवे सुरू होतात आणि सकाळी सहा वाजता बंद होतात. या प्रकल्पात येणाऱ्या लहान अडचणी सोडविण्यासाठी अनिल बोऱ्हाडे आणि शिवाजी शेळके यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर वीज वहनातील दोष तातडीने दुरुस्त करता येतात. गेल्या पाच महिन्यांपासून कोणताही तांत्रिक अडथळा न येता या प्रकल्पातून 40 घरांना 24 तास वीज पुरविली जात आहे. जशी मागणी वाढेल त्या प्रमाणात पॅनेल वाढविण्याचेही नियोजन या प्रकल्पात आहे.

सौर ऊर्जेने उजळली वाडी...

सौर प्रकल्पापासून विजेच्या वहनासाठी गावात 17 डांब रोवण्यात आले. त्यावरून तारा ओढून प्रत्येक घरात वीज मीटर देण्यात आले आहेत. गावात 10 पथ दिवे लावण्यात आले आहेत. ऑगस्ट 2012 च्या सुमारास प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित झाला. तो तयार झाल्यानंतर कोणताही खर्चिक समारंभ न करता गावातील साक्षी बोऱ्हाडे या लहान मुलीच्या हस्ते दिव्याचे बटन दाबून शाश्‍वत ऊर्जेचा गावामध्ये पुरवठा सुरू करण्यात आला.

दर महिन्याला वीजबिल भरतात ग्रामस्थ...

सौर ऊर्जा तसा खर्चिक प्रकल्प आहे. यंत्रणाही महाग आहे. त्यामुळे काटेकोर व्यवस्थापन असेल तरच शाश्‍वत ऊर्जेचा स्रोत कायम स्वरूपी वापरणे शक्‍य होते. प्रकल्प व्यवस्थापनासाठी ट्रस्टच्या माध्यमातून आर्थिक नियोजन करण्यात आले आहे. वाडीतील प्रत्येक घरात तीन एलईडी दिवे, टीव्ही आणि मोबाईल चार्जर चालतील इतक्‍या विजेचा पुरवठा होतो. प्रत्येकाला दरमहा कंदीलासाठी सरासरी 100 ते 150 रुपयांचे रॉकेल लागायचे. त्यासाठी जुन्नरला जावे लागत होते. वीज घरात पोचल्याने रॉकेलचा अतिरिक्त खर्च वाचला. प्रत्येक घरातील मीटर रीडिंग आणि पैसे गोळा करण्याची जबाबदारी गावातील अनिल बोऱ्हाडे या तरुणाने घेतली आहे. दर महिन्याच्या एक ते पाच तारखेच्या दरम्यान प्रत्येक घरात जाऊन रीडिंग घेतले जाते. वीज बिलाचा स्थिर आकार 90 रुपये अधिक मीटरच्या प्रति रीडिंगला दोन रुपये या दराने वीजबिल आकारले जाते. घरी केवळ तीन एलईडी दिवे असलेल्यांना सरासरी 130 रुपये बिल येते. तीन एलईडी दिव्यांसह टीव्ही असलेल्यांना सरासरी 175 ते 200 रुपयांपर्यंत बिल येते. सौर ऊर्जा 24 तास उपलब्ध असल्याने प्रत्येक जण न चुकता बिल भरतो. प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपर्यंत बिल न भरल्यास 50 रुपये दंड आकारला जातो. ट्रस्टच्या नावाने बॅंकेत खाते उघडण्यात आले आहे. या खात्यात दरमहा सध्या चार ते साडेचार हजार रुपये बिलापोटी जमा होतात. या बचतीमधून प्रकल्पाचे व्यवस्थापन, दुरुस्तीचा खर्च भागविण्याचे नियोजन आहे. ट्रस्टने प्रकल्पाचा विमा काढला आहे. दळणासाठी महिलांची होणारी पायपीट लक्षात घेऊन ग्राम ऊर्जा संस्थेने दोन एचपी क्षमतेची पिठाची गिरणी घेऊन दिली आहे. गिरणीचे नियोजन ट्रस्ट करणार आहे. प्रकल्प सुरळीत चालवण्याची जबाबदारी ट्रस्टने घेतली आहे. गावकऱ्यांनी गावासाठी शाश्‍वत ऊर्जेचा शोधलेला पर्याय निश्‍चितच इतरांना ऊर्जा देणारा आहे.

प्रकल्पाचे असे झाले फायदे

  • संपूर्ण वाडी ही प्रकल्पाच्या उभारणीसाठी आणि व्यवस्थापनासाठी एकत्र आली.
  • 24 तास विजेची उपलब्धता.
  • घरटी रॉकेलच्या खर्चामध्ये किमान 150 रुपये बचत झाली. प्रदूषण कमी झाले.
  • प्रत्येक घरात तीन एलईडी दिवे, टीव्ही, मोबाईल चार्जिंगची सोय झाली. सायंकाळी मुलांना अभ्यास करणे शक्‍य झाले.
  • वाडीमध्ये पथदिवे आले, त्यामुळे रात्री जंगली जनावरे, सापांचा धोका कमी झाला.
  • गावात पिठाची चक्की आली. त्यामुळे महिलांची दोन किलोमीटरची पायपीट वाचली.
  • शेती विकासासाठी शेतकरी मंडळ, महिला बचत गटाचे नियोजन.
  • ओढ्यावर श्रमदानातून बंधारा बांधणार, शेतीला पाणीपुरवठा होण्यासाठी ओढ्यावर पंप बसविला जाणार.
  • पिण्याच्या पाण्याच्या सोईसाठी कूपनलिकेचे नियोजन.
  • मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी "ट्रस्ट'ने घेतले दोन संगणक.

दरेवाडीकरांच्या प्रतिक्रिया  

महिला शेतकऱ्यांचा गट तयार करणार...
पूर्वी दिव्यांसाठी रॉकेलचा खर्च किमान 90 रुपये होता, रॉकेल वेळेवर मिळेल याची शाश्‍वती नव्हती. आता सौर ऊर्जेमुळे 24 तास वीज घरात आली. रॉकेलचा वापर कमी झाला, वेळ वाचला. प्रकल्पामुळे महिला एकत्र आल्या आहेत. यापुढे महिला बचत गट करणार आहोत, त्याचा शेती विकासासाठी फायदा होईल.
- शशिकला बोऱ्हाडे
प्रकल्पामुळे वाडीतील लोकांमध्ये प्रगतीच्या दृष्टीने चर्चा होऊ लागली आहे. सामूहिक प्रयत्नातून भात शेती, वनौषधी, भाजीपाला, फळबागेतील नवे तंत्र गावात आणणार आहे.
- शिवाजी शेळके
-----------------------------------------------
धान्य दळण्यासाठी दोन किलोमीटर अंतरावरील अंजनवळे येथे जावे लागायचे. आता सौर ऊर्जेमुळे गावातच पिठाची गिरणी आली. एकत्र येण्याचे फायदे समजू लागले आहेत.
-पुनाबाई बुळे
-----------------------------------------------
आमच्यावेळी शिक्षणाचे महत्त्व नव्हते, पण आता वाडीतील मुले शिक्षणासाठी धडपडत आहेत. त्यांच्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प मदतीचा ठरतोय. अजूनही मुलांना शाळेसाठी तीन किलोमीटर अंतर चालावे लागते. आता वाडीत अंगणवाडीची सोय करता येईल. शेतकऱ्यांकडे गावरान गाई, म्हशी आहेत. त्यांच्या दुधापासून तूप, खवा तयार करतो. शेतकरी मंडळाच्या माध्यमातून शेती आणि पशुपालन प्रगतीला मदत होईल.
- दिगंबर बोऱ्हाडे
-----------------------------------------------
सामूहिक प्रयत्नातून अडचणी सोडविणार...
सौर ऊर्जा प्रकल्पामुळे प्रत्येक घरात 24 तास वीज आली. आम्ही पिठाची गिरणी घेतली आहे. गावातील ओढ्यावर सामूहिक प्रयत्नातून पाणी अडविण्यासाठी बंधारे घालणार आहोत. शेतीसाठी पाणीपुरवठा करण्यासाठी पंप घेणार आहे. सौर ऊर्जा प्रकल्पाच्या दर महिना वीज बिलातून न्यासाकडे दरमहा चार ते पाच हजार जमा होतात. ही रक्कम प्रकल्प व्यवस्थापनासाठी वापरणार आहे. येत्या काळात शेतकरी मंडळ आणि महिला बचत गटाचे नियोजन केले आहे.
- लहू बोऱ्हाडे (अध्यक्ष, वनदेव ग्रामोद्योग न्यास)
-----------------------------------------------
संपर्क ः
अनिल बोऱ्हाडे ः 7588217814
लहू बोऱ्हाडे ः 9822832843
ग्रामऊर्जा, पुणे ः 020- 64001402

स्त्रोत : अग्रोवोन


अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate