অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अणुयुद्ध

अणुयुद्ध

अण्वस्त्रांचा वापर करून लढला जाणारा एक अत्याधुनिक युद्धप्रकार. अण्वस्त्रांच्या साहाय्याने लढले जाणारे युद्ध, त्यात वापरण्यात येणारे तंत्र व साधनसामग्री, करण्यात येणाऱ्या हालचाली व त्यांतून निष्पन्न होणारे अंतिम परिणाम हे सर्वसामान्य रूढ युद्धाहून भिन्न व क्रांतिकारक असल्याने अणुयुद्धाचा स्वतंत्र विचार आवश्यक ठरतो.

युरेनियमसारख्या मूलद्रव्यांच्या अणुकेंद्रांचे भंजन केल्यास त्यापासून प्रचंड ऊर्जा निर्माण होते, हा शोध विसाव्या शतकाच्या चौथ्या दशकात लागला. अणुस्फोटाने उत्पन्न होणाऱ्या किरणोत्सर्गी प्रारणाने, दाबाने व उष्णतेने अमानुष संहारशक्ती उपलब्ध होते. त्यामुळे तिचा युद्धात उपयोग करून घेण्यासाठी अण्वस्त्रे निर्माण करण्याची चढाओढ पश्चिमी देशांत सुरू झाली. अणुबाँब, हायड्रोजन बाँब, कोबाल्ट बाँब अशांसारखी एकापेक्षा एक वरचढ अण्वस्त्रे बनविण्यात येऊ लागून अमेरिका, रशिया ह्यांसारख्या अतिप्रगत देशांत त्यांचे साठे करण्यात येऊ लागले. अणुबाँबचा प्रायोगिक स्फोट अमेरिकेने १६ जुलै १९४५ रोजी न्यू मेक्सिको राज्यातील ॲलामोगोर्डो येथील प्रयोगभूमीवर केला.

मेरिकेने दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटास ६ ऑगस्ट १९४५ रोजी जपानच्या हीरोशीमा शहरावर अणुबाँब टाकला. ह्या अणुबाँब-हल्ल्यात २०,००० टन टीएनटी.च्या स्फोटात उत्पन्न होणाऱ्या शक्तीएवढी विध्वंसक शक्ती निर्माण होऊन हीरोशिमा शहराचा दहा चौ.किमी. भाग संपूर्णपणे उद्ध्वस्त झाला. त्यावेळच्या ३,४३,००० वस्तीच्या ह्या शहरातील ६६,००० लोक मृत्युमुखी पडले व आणखी ६९,००० गंभीर जखमी वा लुळेपांगळे झाले. ६७ टक्के इमारतींचा नाश झाला. दुसऱ्या महायुद्धात वापरण्यात आलेला दुसरा व शेवटचा अणुबाँब अमेरिकेनेच जपानच्या नागासाकी ह्या शहरावर ९ ऑगस्ट १९४५ रोजी टाकला. ह्या हल्ल्यात ३९,००० लोक प्राणास मुकले व २५,००० जबर जखमी झाले. ४० टक्के वास्तूंचा पूर्ण विध्वंस वा जबर मोडतोड झाली.

अणुबाँबमुळे झालेला विध्वंस व संहार इतका जबरदस्त होता, की जपानसारख्या अतिचिवट राष्ट्रालासुद्धा तात्काळ शरणागती पत्‍ाकरावी लागली. अमेरिकेच्या पर्ल हार्बर बंदरातील लहानमोठ्या युद्धनौकांचा व इतर नागरी नौकांचा जपानने अचानक हल्ला करून विध्वंस केला होता; त्यामुळे अमेरिकेने ताटस्थ्य टाकून ती जपान-जर्मनीविरूद्ध दोस्तांच्या बाजूने युद्धात सामील झाली. अणुबाँब टाकून अमेरिकेने जपानच्या दोन प्रमुख शहरांच्या केलेल्या अमानुष विध्वंसाची घटना इतकी हृदयविदारक होती, की संबंध जगालाच हादरा बसला. युद्धासाठी अशा प्रकारचा अण्वस्त्रांचा उपयोग रूढ झाल्यास सर्व जगाचा नाश होण्यास विलंब लागणार नाही, ह्या चिंतेने जगातील सर्व देशांचे राज्यकर्ते, शास्त्रज्ञ व जबाबदार विचारवंत ग्रासून गेले. अण्वस्त्रांचे अस्तित्वात असलेले साठे नाहीसे करावेत, युद्धासाठी अणुऊर्जेचा वापर केला जाऊ नये, अण्वस्त्रांच्या निर्मितीला बंदी घालावी, ह्यांसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा व बोलणी सुरू झाली. अमेरिका व रशिया ह्या अणुविद्येतील अग्रगण्य राष्ट्रांनासुद्धा अणुऊर्जेच्या अपरंपार संहारकतेची जाणीव होऊन त्या राष्ट्रांनीही अण्वस्त्रांच्या निर्मितीसंबंधी फेरविचार सुरू केला. त्यांचा कल सर्वनाशी अशा अण्वस्त्रनिर्मितीपेक्षा अणुऊर्जेच्या साहाय्याने मर्यादित स्वरूपाचा युद्धोपयोगी विध्वंस साधू शकतील, अशा धर्तीची अण्वस्त्रे तयार करण्याकडे झुकला आहे. आंतरखंडीय प्रक्षेपणास्त्रे, औष्णिक अणुकेंद्रीय अस्त्रे ही अशा स्वरूपाची अण्वस्त्रे होत.

तथापि अणुबाँब-संशोधन अजून चालूच आहे. १९५० नंतर अमेरिकेने हायड्रोजन बाँब, सुपर बाँब, औष्णिक अणुकेंद्रीय बाँब ह्या नावांनी प्रसिद्ध असलेली अण्वस्त्रे निर्माण केली व अशा प्रकारच्या बाँबचे चाचणी-स्फोटही केले. त्यांत ह्या बाँबची विध्वंसक शक्ती ५ ते ७ मेगॅटन म्हणजे हीरोशीमावर टाकलेल्या अणुबाँबच्या शेकडो पट स्फोटक असते, असे दिसून आले. १९५४ साली केलेल्या चाचणी-स्फोटाच्या अण्वस्त्राची शक्ती १४ मेगॅटन होती. ५ मेगॅटन शक्ती उत्पन्न करणाऱ्या बाँबमुळे ४०० चौ. किमी. प्रदेश संपूर्ण उद्ध्वस्त होतो व २,००० चौ.किमी. पर्यंत त्याच्या किरणोत्सर्गी प्रारणयुक्त उष्णतेचा दाह पसरू शकतो.

शा प्रकारे एका बाजूने अण्वस्त्रांचा विध्वंसक उपयोग सिद्ध करण्याचे प्रयोग प्रामुख्याने पाश्चात्य राष्ट्रांत जारी असून दुसऱ्या बाजूने त्यांचा प्रतिकार व निवारण करण्याचे प्रयोगही चालू आहेत. जमिनीत खोल भुयारे बांधून अणुहल्ल्यांच्या वेळी त्यांत आश्रय घेता यावा, अशी सोय रशियात केली आहे. अमेरिकेत दूर अंतरावरून आगामी हल्ल्याची पूर्वसूचना देणारी रडारयंत्रणा ७० कोटी डॉलर खर्चून उभारण्यात आली आहे. असे असले, तरी अण्वस्त्रांपासून सध्या तरी पूर्ण बचाव करता येण्याइतकी साधने उपलब्ध झालेली नाहीत.

युद्धशास्त्रदृष्ट्या ४०० चौ. किमी. क्षेत्राचा संपूर्ण नाश व २,००० चौ. किमी. क्षेत्रात त्याच्या दाहक किरणोत्सर्ग प्रारणाचा प्रादुर्भाव दीर्घ काळपर्यंत करू शकणारे अण्वस्त्र हे रणनैतिक साध्यासाठी वापरण्याजोगे युद्धोपयोगी अस्त्र होऊच शकत नाही; कारण त्याचा वापर केल्यानंतर २,००० चौ. किमी. प्रदेशातील सैनिकी हालचाली दीर्घ काळपर्यंत स्थगितच ठेवाव्या लागतील. व्यूहतंत्रात्मक साध्यासाठीसुद्धा इतक्या संहारक अस्त्रांच्या वापरामुळे युद्ध पुढे चालू राहण्याच्या शक्याशक्यतेचा मुद्दा विवाद्य आहे. एवढे प्रचंड विध्वंसक साधन जवळ असणाऱ्या राष्ट्राला आपल्या हेतुसिद्धीसाठी युद्ध करण्याची जरूरीच पडू नये; परंतु अनेक राष्ट्रे अणुयुद्धसज्ज असताना त्यांच्यामध्ये अणुयुद्ध सुरू झाले, तर ते कशा पद्धतीने चालेल किंवा ते दीर्घकाळपर्यंत चालेल काय, या प्रश्नांची उत्तरे कल्पनेनेच देणे शक्य आहे. असे अणुयुद्ध कोठेच लढले गेले नसल्यामुळे ती उत्तरे काल्पनिक ठरतील. अणुयुद्ध हा युद्धप्रकार अजून रीतसर सुरू होऊन रूळला नसल्याने त्यातील आक्रमण व प्रतिकार यांची तंत्रे, डावपेच, हालचाली आदींचे स्वरूप निश्चित झालेले नाही.

अण्वस्त्रांची निर्मिती ही बाब आता एकट्या रशियाची किंवा अमेरिकेची मिरासदारी राहिलेली नसून अण्वस्त्र तयार करण्याचे प्रयत्न फ्रान्स, ब्रिटन, चीन ह्या देशांत चालूच आहेत. राजकीय हेतुसिद्धीसाठी एखादे लहानसहान राष्ट्रदेखील आपली आर्थिक सुस्थिती व भौतिक अस्तित्व पणाला लावून अण्वस्त्र निर्माण अगर हस्तगत करू शकते. अशा परिस्थितीत अण्वस्त्रांचा अविचारी गैरवापर केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंबहुना अशा प्रकारचा एखादा-दुसरा प्रयोग दुर्दैवाने यशस्वी झाल्यास त्यातून परस्परांवर अणुबाँब फेकण्याचे दुष्टचक्रच निर्माण होऊन त्यामुळे जगावरील सर्व मानवजातच नष्ट होण्याचा धोका संभवतो.

अमानुष विध्वंसक शक्तीच्या अंगभूत गुणामुळे अण्वस्त्रांचा प्रत्यक्ष वापर होण्यापेक्षा ते आक्रमणाला प्रतिबंध म्हणूनच प्रचारात राहण्याची अधिक शक्यता आहे. कारण जगातील सर्वच प्रगत युद्धयमान राष्ट्रांना अण्वस्त्रांच्या अमोघ शक्तीची जाणीव झालेली असल्याने ती निर्माण करण्याची त्यांची खटपट चालू आहे. तथापि अण्वस्त्रांचा युद्धात वापर केला जाण्याऐवजी भीतीचा समतोल राखण्यासाठीच त्यांचे साठे जवळ बाळगले जातील, अशी शक्यता दिसते.

पाटणकर, गो. वि.

 

स्त्रोत : मराठी विश्वकोश (महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ)

अंतिम सुधारित : 1/28/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate