অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

महावितरण : पुनर्रचनेनंतरची ठळक कामगिरी

पुनर्रचनेनंतरची ठळक कामगिरी

कृषीपंपांचे उर्जीकरण

महाराष्ट्र राज्याने सुमारे ३० लाखकृषीपंपांचे ऊर्जीकरण करून एक उच्चांक प्रस्थापित केला असून या कामात महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत आघाडीवर आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या पुनर्रचनेपूर्वी कृषीपंपांच्या वीज जोडणीसाठी प्रलंबित असलेल्या अर्जांची संख्या फार मोठी होती. शेतकरी बांधवाना विजेसाठी वर्षानुवर्षे वाट पहावी लागत असे. महावितरणने या संबंधी वस्तुनिष्ठपणे सुसंगत असे नियोजन केले. त्यामुळे आता प्रतिवर्षी सुमारे १ लाख कृषीपंपांचे उर्जीकरण केले जाते. येत्या एक दोन वर्षात महावितरण इतर प्रवर्गाप्रमाणे कृषी प्रवर्गातील ग्राहकांनाही मागणीनुसार वीज जोडणी देण्याच्या स्थितीत असेल.

वीजगळती कमी करणे

महावितरणने अवघ्या ५ वर्षाच्या काळात विविध मोहिमा हाती घेऊन वीजगळती ३५ टक्क्यांवरून २० टक्क्यांपर्यंत कमी केली आहे. त्या मोहिमा अशा:-

वीजचोरी विरोधी मोहीम

राज्यात वीजचोरी विरोधी मोहिमा वेळोवेळी नियमितपणे राबविण्यात येत आहेत. महावितरणने वीजचो-या शोधून वीजचोरांवर त्वरित कारवाई करण्यासाठी दक्षता विभागाच्या अधिपात्त्याखाली राज्यात ४३ फिरती पथके आणि ६ स्वतंत्र पोलीस ठाणी स्थापन केली आहेत.

वीज मीटर घराबाहेर बसविणे

ब-याच वीज ग्राहकांचे मीटर घरात आडोशाला बसविण्यात आले आहेत. अशा ठिकाणी होत असलेली वीजचोरी लवकर लक्षात येत नाही. म्हणून महावितरणने असे सर्व मीटर त्या जागांवरून हलवून घराच्या समोरच्या बाजूस ते सहजपणे दिसतील अशा ठिकाणी बसविण्याचे ठरविले. सध्या ही मोहीम मोठ्या प्रमाणात राज्यात सर्वत्र सुरु आहे.

मीटर बदलण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम

या कार्यक्रमांतर्गत महावितरणने दहा वर्षे व त्याहून अधिक काळापासून सेवेत असलेले मीटर बदलून त्या ठिकाणी नवीन मीटर बसविण्याचे ठरविले आहे. सर्व जुने इलेक्ट्रो मेकॅनिकल मीटर काढून त्या ठिकाणी नवीन अत्याधुनिक स्टॅटिक मीटर बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी ३० लाख नवीन मीटर विकत घेण्याची प्रक्रियाही सुरु करण्यात आली आहे. हा एक फार मोठा प्रकल्प असून यातून मीटरमधून होणा-या वीज विक्रीचे प्रमाण निश्चितच वाढेल.

उर्जा अंकेक्षण

महावितरणने विजेचा काटेकोर हिशेब ठेवण्यासाठी खालील प्रकारच्या वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केला आहे.

  • वीज वाहिनीवर मीटर (फिडर मीटररिंग): महावितरणने वीज वितरण यंत्रणेत सर्व आवश्यक त्या सर्व ठिकाणी उच्च प्रतिचे मीटर बसविण्याचे ठरविले आहे. त्यानुसार राज्यातील सर्वच १०,२४० वीज वाहिन्यांवर मीटर बसविण्यात आले असून या मीटरचे फोटो मीटर रिडिंगही घेतले जात आहे.
  • वितरण रोहित्रांना मीटर (डीटीसी मीटरिंग) : महावितरणच्या वीजवितरण यंत्रणेत २,८४,६३३ वितरण रोहित्रे कार्यरत असून त्यापैकी सुमारे १.५१ लाख रोहीत्रांना मीटर बसविण्यात आले आहेत.

वितरण फ्राँन्चायझी

भिवंडी हे यंत्रमागाचे शहर तसेच भारताचे मँचेस्टर म्हणून ओळखले जात असून या शहरात वाढती वीजचोरी व वीजबील न भरणे यासारखे प्रश्न होते. म्हणून महावितरणने भिवंडीतील वीज वितरणासाठी फ्रेन्चायझीचा पर्याय निवडला. दि. २६ जानेवारी २००७ रोजी भिवंडी मंडळ मे. टॉरेन्ट पॉवर या कंपनीला सोपविले. हा प्रयोग कमालीचा यशस्वी आणि देशाच्या वीज वितरण क्षेत्रासाठी एक दिशादर्शक सिद्ध झाला आहे.

महावितरण नुकतेच औरंगाबाद शहर मंडळातील औरंगाबाद शहर विभाग १ व २ साठी आणि नागपूर शहर मंडळातील गांधीबाग, सिव्हील लाईन्स व महाल विभागांसाठी फ्रेन्चायझींची नियुक्ती केली आहे.

शून्य भारनियमन मॉडेल

स्थानिक नागरिकांच्या सक्रीय सहभागातून आणि ग्राहक संघटना व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने राज्यात काही ठिकाणी हे शून्य भारनियमनाचे मॉडेल सुरु करण्यात आले आहे. याची कार्यपद्धती अत्यंत पारदर्शक असून नियामक आयोगाच्या पूर्व मंजुरीने तो राबविण्यात येतो. यात तुटी एवढी वीज महागड्या दराने स्वतंत्रपणे खरेदी करून पुरविली जाते. त्याबद्दल स्थानिक ग्राहकांकडून विश्वसनियता आकार घेतला जातो.

पुण्यापासून सुरु झालेला हा प्रयोग मुंबई, ठाणे, पेण व बारामती येथेही सुरु होता. महावितरणने नागपूर, अमरावती, नवी मुंबई, पुणे व औरंगाबाद या महसुली मुख्यालयांच्या ठिकाणी हे मॉडेल सुरु करण्यासाठी विद्युत नियामक आयोगाकडे स्वतः अर्ज केला. नियामक आयोगाने मंजुरी दिल्यानंतर ते या मुख्यालयांच्या ठिकाणी डिसेंबर २००९ पासून सुरु करण्यात आले आहे. पुढे जिल्हा व तालुका मुख्यालयांच्या ठिकाणीही हे मॉडेल सुरु करण्याचा महावितरणचा मानस आहे.

ग्राहक सेवेत सुधारणा

  • राज्यातील सर्व लघुदाब वीज ग्राहकांसाठी इंटरनेटद्वारे वीजबिले भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी www.mahadiscom.in या संकेत स्थळावर कंपनीची स्वतःची पेमेंट गेटवे प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. यापूर्वी ही सुविधा फक्त पुणे, भांडूप, कल्याण, ठाणे, वाशी, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, येथील ग्राहकांसाठी उपलब्ध होती.
  • वीज ग्राहकांच्या मदतीसाठी एक खिडकी योजनेच्या धर्तीवर ग्राहक सुविधा केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. ही ग्राहक सुविधा केंद्रे ग्राहकांच्या तक्रारी, नवीन वीज जोडण्या, मीटर बदलणे आणि नावात किंवा पत्त्यात बदल आदिंचे अर्ज स्वीकारणे ही कामे करतात.
  • रस्तापेठ पुणे, गणेशखिंड पुणे, नागपूर, अमरावती, नांदेड, आणि बारामती अशा ६ ठिकाणी अद्यायावत अशी ग्राहक सुविधा केंद्रे कार्यान्वित करण्यात आली असून आणखी काही ठिकाणी अशी सुविधा केंद्रे सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
  • राज्यातील ३२ मंडळ मुख्यालयांच्या ठिकाणी लघु ग्राहक सुविधा केंद्रे स्थापन करण्यात आली असून आणखी काही ठिकाणी अशी अधिक लघु ग्राहक सुविधा केंद्रे स्थापन करण्यात येत आहेत.
  • वीज पुरवठ्याच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी कल्याण, भांडुप, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर, सांगली, अकोला, सोलापूर, नांदेड, धुळे, जळगाव, अहमदनगर व अमरावती या १५ महानगर पालिकांच्या शहरात कॉल सेंटर्सची स्थापना करण्यात आली आहे.
  • कंपनीच्या संकेत स्थळावर नोंदणी करून ग्राहक ई मेल वर आपली मासिक देयके मिळवू शकतात.
  • सर्व ४० मंडळ कार्यालयात अंतर्गत तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. ग्राहक परिमंडळ कार्यालयातील ग्राहक गा-हाणे निवारण मंचाकडे अपील करण्यापूर्वी आपल्या तक्रारींसाठी या काक्षांकडे दाद मागू शकतात.

माहिती संकलक : अतुल पगार

स्त्रोत : http://www.mahadiscom.in/aboutus/abt-us-01_marathi.shtm

अंतिम सुधारित : 7/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate