অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वीज आणि वीज बील कसे वाचवाल ?

मे महिना आला आहे आणि गर्मी आपल्या चरणसीमेवर आहे. देशाच्या काही ठिकाणी पारा ४५ डिग्रीच्या वर गेला आहे. सर्व लोकांची उष्णतेने त्राही-त्राही होत आहे. अशावेळी तुम्ही सर्व उपाय करता या असह्य गर्मीपासून वाचण्यासाठी. त्यामुळे घरातले सर्व थंड हवा देणारे इलेक्ट्रॉनिक उपकरणे रात्रं दिवस चालू राहतात. परिणामी भले मोठे विजेचे बील येते. हे बील पाहून अनेकदा आपल्याला चक्कर येते. हे सर्व आपण सोईस्कर करू शकतो. यासाठी खालील काही सोपे उपाय आहेत.

वातानुकुलक (एअर कंडिशनर) आणि त्याचे गाळण (फिल्टर) नेहमी स्वच्छ ठेवा वातानुकुलकची गाळण आणि त्याच्या भोवताली सर्व परिसर स्वच्छ ठेवावा. जर त्यात कचरा साचला असेल तर तो स्वच्छ करणे गरजेचे आहे. साचलेल्या कचऱ्यामुळे वातानुकुलक हवे ते परिणाम देण्यात असमर्थ राहते. त्या कचऱ्यामुळे त्याला अडचणी येतात आणि ते अधिक ऊर्जा घेऊन आपले काम करू लागते. या सर्वांमुळे आपले विजेचे बील वाढते.

सर्व बाबी लक्षपूर्वक पाळल्या तर तुम्ही आपले वातानुकुलक चांगल्या प्रकारे वापरू शकतात. स्वच्छतेमुळे वातानुकुलकची कार्यक्षमता वाढते. तुम्ही २५ ते २६ डिग्रीवर थंड हवा अनुभवू शकता. यामुळे तुम्ही प्रत्येक एक डिग्रीवर ऊर्जा वाचवू शकता. कधीतरी मध्येच पंखा लावण्यास हरकत नाही, त्यामुळे तुमचे थंड वातावरण अबाधित राहील.

ऊर्जा कार्यक्षमता विभाग आपल्या घरात विद्युत उपकरणे ही ऊर्जा कार्यक्षमता विभागाद्वारे प्रमाणीतच असावी. हे विभाग उपकरणाच्या ऊर्जा वाचविण्याच्या क्षमतेप्रमाणे त्याला प्रमाणित करते. अर्थात जास्त ऊर्जा वाचवली कि जास्त गुण त्या उपकरणाला मिळतात. विभागाची गुण यादी ही १ ते ५ स्टार यामध्ये आखलेली आहे. अशी उपकरणे आपले वीज बील कमी करतील आणि ऊर्जासुद्धा जास्त खर्च करणार नाही. वातानुकुलक चालू असताना सर्व दारे खिडक्या बंद ठेवणे अनिवार्य आहे. त्यामुळे बाहेरील हवा आत येणार नाही आणि घरातील तापमान थंड राहण्यास मदत मिळेल.

दारे खिडक्या वायुविजनसाठी उघड्या ठेवा


सकाळ-संध्याकाळ आपल्या घरातील दारे खिडक्या उघड्या ठेवा. त्यामुळे वारा आत बाहेर होण्यास मदत मिळते. अर्थात वायुवीजन होते. घरातील गरम आणि कोंडलेली हवा बाहेर जाते आणि बाहेरची ताजी थंड हवा घरात प्रवेश करते. अशावेळी घरातील तापमान थंड राहण्यास मदत मिळते.

आपले वातानुकुलक आणि इतर थंड हवेची विद्युत साधने यावेळी बंद ठेवू शकतो. त्यामुळे ऊर्जा आणि वीज कमी वापरले जातात, परिणामी आपले विजेचे बील कमी येऊ शकते.

विद्युत उपकरणे विद्युत खोबणीपासून (सॉकेट) काढून ठेवा

रोज कुठल्या न कुठल्या तरी विद्युत उपकरणाचा वापर जरूर होतो. आपले घर हे विद्युत उपकरणे भरलेले आहे. ते आपल्या जीवनाचे एक अविभाज्य घटक बनलेले आहेत. त्यामुळे सवयीप्रमाणे प्रत्येक उपकरण आपल्या जागेवर विद्युत खोबणीशी जोडलेले असते. विजेचे बटन बंद असले तरीही उपकरण विजेशी खोबणाद्वारे जोडलेले असते.

जेव्हा तुम्ही विद्युत उपकरणे खोबणीशी जोडून ठेवता तेव्हा उष्णता निर्माण होते. हीच उष्णता घरात राहते आणि तुम्हाला वातावरण अधिक उष्ण वाटते. त्यामुळे गरज नसताना विद्युत उपकरणे बंद ठेवा आणि विद्युत खोबणीपासून लांब ठेवा.

म्हणून आता लॅपटॉप चार्जर, मोबाईल चार्जर, फोन चार्जर आणि अशी बरीच विजेची उपकरणे बंद असताना अनप्लग करून ठेवा.

दुपारच्या वेळी पडदे लावा

उन्हाची तीव्रता सकाळी ११ ते संध्याकाळी पाचपर्यंत खूप जाणवते. अशावेळी सूर्य अगदी डोक्यावरच आहे असे भासते. उष्णता जास्त असते आणि त्यामुळे गर्मी वाढते. या वेळात तुम्ही घरातील पडदे बंद ठेवा. त्यामुळे गर्मी आत येणार नाही किंवा त्याचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळेल. पडदे हलक्या रंगाचे असतील तर उत्तम. कारण हलके रंग उष्णता शोषून घेत नाहीत. जड किंवा गडद रंगाचे पडदे उष्णता शोषून घेतात आणि त्यामुळे तुम्हाला घरातील वातावरण उष्ण जाणवेल.

नैसर्गिक प्रकाशाचा अधिकाधिक वापर करा

उन्हाळ्यात सूर्य प्रकाश मुबलक असतो. या प्रकाशाचा पुरेपूर उपयोग केला पाहिजे. दिवसभर घरातील सर्व प्रकाशाचे स्त्रोत उघडे ठेवा. त्यामुळे घरात छान उजेड राहील आणि विजेच्या उपकरणाची गरज भासणार नाही. ही उपकरणे न वापरल्याने वीज बील आणि उष्णता दोन्ही कमी होतील.

बाजारात ऊर्जा कार्यक्षम दिवे सहज उपलब्ध आहेत याचा वापर करावा. एलईडी दिवे आणि कॉम्पॅक्ट फ्लूरोसेन्ट दिवे (सीएफएल) यांचा वापर करावा. त्यामुळे वीजसुद्धा वाचते आणि विजेचे बीलपण कमी होण्यास मदत मिळते.

कामाचे तास टाळा

सकाळची वेळ ही सर्वांचीच घाईची वेळ असते. अशावेळी विद्युत उपकरणे वापरणे टाळा. अर्थात इस्त्री, मिक्सर, कपडे धुण्याची मशीन वगैरे वापरणे टाळा. सर्वजण एकदम जास्त वीज आणि ऊर्जा वापरतात त्यामुळे त्याचा जास्त वापर आणि खप होतो. परिणामी आपल्याला भले मोठे वीज बील येते. शक्यतो या उपकरणाशी निगडीत कामे नंतर किंवा अवेळी करावीत. त्यामुळे उपकरणावर भार येत नाही आणि उर्जेचा पुरेपूर वापर होतो.

शीतकपाट (रेफ्रिजरेटर) आणि भिंतीमध्ये जागा सोडा

उन्हाळ्यात सर्वात प्रिय वस्तू म्हणजे शीतकपाट (रेफ्रिजरेटर). त्यातील थंड पाण्यानेच तहान भागते. शक्यतो हे शीतकपाट स्वयंपाक घरात असते आणि सर्वात जास्त उष्णतादेखील तिथेच असते. त्यामुळे भिंतीपासून शीतकपाट थोडे लांबच ठेवावे. असे केल्याने हवा शीतकपाटाच्याभोवती फिरत राहते आणि त्याचे तापमान सामान्य राहण्यास मदत होते.

या थोड्याशा छोट्या गोष्टी आपले गर्मीचे दिवस सुखकर बनवू शकतात. हॅप्पी गर्मी.

लेखिका - सुजाता चंद्रकांत

स्त्रोत : महान्युज

 

अंतिम सुधारित : 7/18/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate