অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जलविद्युत् केंद्रांचे वर्गीकरण

वर्गीकरण

जलविद्युत् केंद्रांचे वर्गीकरण हे मुख्यतः(१) स्थानपरत्वे, (२) जलशीर्षानुसार अथवा (३) जमिनीवरील किंवा भूमिगत अशा प्रकारे करतात.

स्थानपरत्वे वर्गीकरण

यामध्ये अनेक उपप्रकार असून ते खालीलपमाणे होत.प्रवाहस्थित केंद्र : नदीचा प्रवाह वर्षभर मोठ्या प्रमाणात चालू रहात असेल, तर अशा नदीवर बंधारा घालून पाणी विद्युत् केंद्राकडे वळविले जाते. सामान्यतः विद्युत् केंद्र हे बंधाऱ्यातच एका टोकास (आ. २ अ) अथवा बंधाऱ्याच्या बाजूस नदीच्या काठी असते (आ. २ आ). केंद्राची क्षमता नदीवरील कमीतकमी प्रवाहावर अवलंबून असते. केंद्रातून बाहेर पडलेले पाणी नजीकच पुन्हा नदीत सोडले जाते. बंधाऱ्याचा उपयोग फक्त प्रवाह वळविण्यापुरताच असतो. अतिरिक्त प्रवाह सांडव्यावरून कमी जास्त प्रमाणात वाहत राहतो. केंद्रावरील भार दिवसात जसजसा बदलेल त्याप्रमाणे पाण्याचा वापर कमी-जास्त करावा लागतो. हे करण्यासाठी आवश्यक तेवढीच जलसंचयक्षमता म्हणजेच तेवढा पाण्याचा साठा मावेल एवढी जागा बंधाऱ्याच्या वरील तलावात असली म्हणजे पुरते. अशी केंद्रे गंगा, यमुना अशा नद्यांवर सोईस्कर असतात. नदीच्या पात्रात नैसर्गिक धबधबा असल्यास नदीचे पाणी धबधब्याच्या पायथ्याजवळील केंद्रावर नेऊन त्याद्वारा विद्युत् निर्मिती करण्यात येणारी उदाहरणे म्हणजे कर्नाटक राज्यातील गोकाक आणि गिरसप्पा (जोग) ही होत. (आ) भरती-ओहोटी केंद्र: नदीच्या खोऱ्यातून वाहून येणारे पाणी जलविद्युत् निर्मितीसाठी वापरतात त्याऐवजी भरतीमुळे खाडीत चढणारे पाणी अडवून ठेवून तेवढ्या अल्प जलशीर्षावर भरती-ओहोटी केंद्रात विद्युत् निर्मिती करता येते आणि त्याकरिता खाडीच्या तोंडाशी खाडीवर सुरक्षित जागी बंधारा घालतात. बंधाऱ्याच्या काही भागात उघडझाप करणारी दारे व इतर भागात विद्युत् केंद्रे व नौकानयनासाठी आवश्यक तर जलपाशही (दोन्ही बाजूंनी दारे असलेला मार्ग) ठेवतात (आ. ३). जलशीर्षात थोडाफार फरक पडला,तरी ज्यांच्या फिरण्याच्या गतीत फरक पडत नाही आणि अवश्य तेव्हा पंप म्हणून वापरता येतील अशी बल्ब जातीची टरबाइने या विद्युत् केंद्रात वापरण्यास योग्य असतात. समुद्राच्या भरतीचे पाणी दारांवाटे खाडीत शिरते. भरती पूर्ण झाल्यावर दारे बंद करून भरतीमुळे खाडीतील वाढलेली पाण्याची पातळी ओहोटीबरोबर उतरू देत नाहीत (आ. ३ अ). ओहोटी सूरू झाल्यावर बंधाऱ्याजवळील समुद्राच्या बाजूकडील पाण्याची पातळी विवक्षित पातळीपर्यंत खाली जाऊन टरबाइन चालण्यास लागणा रे आवश्यक ते जलशीर्ष (आ. ३ आ) मिळण्यास दोन तीन तासांचा अवधी लागतो. त्या अवधीत टरबाइनचा पंप म्हणून उपयोग करून ओहोटीकडील पाणी खाडीत बंधाऱ्याच्या वरच्या बाजूस पंप करून पुरेसे जलशीर्ष मिळण्यास लागणारा अवधी कमी करता येतो. पूर्ण ओहोटीनंतर व अडविलेल्या पाण्याची पातळी उतरली म्हणजे आवश्यक तितक्या जलशीर्षाच्या अभावी विद्युत् निर्मिती बंद पडते आणि पुन्हा भरती येऊन आवश्यक ते जलशीर्ष मिळेपर्यंत सुरू होऊ शकत नाही. भरती व ओहोटी यांच्या वेळी असणाऱ्या पातळ्यांतील अंतर जास्त असेल असे ठिकाण भरती ओहोटी केंद्रास उपयुक्त व व्यवहार्य ठरते. भूभागाच्या रचनेवर भरतीची उंची अवलंबून असते. इंग्लिश खाडीत फ्रान्सच्या किनाऱ्यावर रांस नदीच्या मुखाजवळ एक विद्युत् निर्मिती केंद्र १९६७ मध्ये कार्यान्वित झाले. यातील २४ टरबाइने भरती-ओहोटीच्या दोन्ही वेळी विद्युत् निर्मिती करू शकतात. भरतीमुळे मिळणारे जलशीर्ष सु. ८ मी. असून एकूण उत्पादन शक्ती ५५० मेवॉ. तास आहे. भारतातील खंबायतचे आणि कच्छ येथील आखातांत अशी जलविद्युत् केंद्रे बांधण्याच्या दृष्टीने संशोधन करण्यात येत आहे. (इ)साठविलेल्या पाण्यावर चालणारी केंद्रे : या प्रकारात नदीवर आवश्यक तेवढ्या उंचीचे धरण बांधून पर्जन्यकाळातील पाणी साठवून तलाव करतात व त्यातील पाणी वर्षभर विद्युत् निर्मितीसाठी वापरतात. भारतात ज्या नद्यांना पाण्याचा पुरवठा फक्त मॉन्सून काळातच होतो अशा नर्मदा, तापी,कृष्णा, या नद्यांवर अशी केंद्रे सोईस्कर असतात (आ. ६). या प्रकारच्या केंद्रांचे खा लीलप्रमाणे पोटविभाग पडतात. इ) धरणाच्या पायथ्याशी बसविलेली केंद्रे : धरणातून पोलादी किंवा काँक्रीटचे नळ टाकून त्यांतून धरणातील पाणी केंद्रातील टरबाइनावर नेतात व अवजल म्हणजे वापरलेले पाणी पुन्हा त्याच नदीत सोडतात. या प्रकारात धरणामुळे निर्माण झालेल्या जलशीर्षावरच केंद्रातील टरबाइने चालतात. अवजलाचा उपयोग सिंचाई आणि इतर कामांसाठी होतो (आ. ६ आ). भाटघर धरणाच्या पायथ्याशी, भाक्रा धरणाच्या पायथ्याशी, तसेच म्हैसूर येथील शिवसमुद्रम्, महानदीवरील हिराकूद, रिहांड बंधारा इ. बंधाऱ्यांच्या पायथ्याशी अशी केंद्रे आहेत. इ) धरणापासून दूर असलेली केंद्रे : नदीच्या उताराचा फायदा घेऊन नदीच्या वरच्या भागात बांधलेल्या तलावातील पाणी नदीच्या खालच्या भागाजवळ उभारलेल्या विद्युत् केंद्रावर कालव्याने शीर्षधीमध्ये (नळाच्या वरच्या बाजूला असलेल्या तलावांत) व तेथून नळावाटे नेऊन उपलब्ध होणाऱ्या जलशीर्षावर (आ. ६ अ) किंवा तलावातील पाणी बोगद्यातून अगर नळातून भूमिगत केंद्रावर नेऊन मिळणाऱ्या जलशीर्षावर विद्युत् निर्मिती करतात व अवजल त्याच नदीत अथवा दुसऱ्या ठिकाणी सोडतात. चिपळूणजवळ अलोरे येथे कोयनेच्या अवजल कालव्यावर वरील दुसऱ्या प्रकारचे विद्युत् निर्मिती केंद्र आहे. सिंचाई कालव्याच्या मार्गात भूरचनेत एकदम बराच उतार असेल तेथेही जलविद्युत् केंद्र उभारता येते. पंजाबमधील नानगलपासून निघालेल्या कालव्यावरील व गंडक व कोसी प्रकल्पांपैकी नेपाळमधील केंद्रे अशा प्रकारची उदाहरणे आहेत. इ) धरणानजीकच्या दरीत असलेली केंद्रे : डोंगरमाथ्यावरील नदीवर धरण बांधून ते पाणी पायथ्याजवळील विद्युत् केंद्रात नेऊन दुसऱ्या नदीत सोडल्यास मोठे जलशीर्ष मिळते. सह्याद्रीच्या पायथ्याशी कुलाबा जिल्ह्यात खोपोली, भिरा, भिवपुरी व रत्नागिरी जिल्ह्यात पोफळी येथे तसेच काश्मीरमध्ये सिंधू नदीच्या पाण्यावर वीज उत्पादन करणारी जुनी केंद्रे आहेत. तमिळनाडू व केरळचा परंबिकुलम्-अलियार प्रकल्प व इतर कित्येक प्रकल्प असे आहेत. इ) पंपाच्या साह्याने केलेल्या जलसंचयावरील केंद्रे : दिवसाच्या निरनिराळ्या वेळी तसेच ऋतुमानाप्रमाणे विजेचा भार बदलत असतो. विद्युत् केंद्राच्या क्षमतेपेक्षा ज्या वेळी भार कमी असतो त्या वेळी केंद्रातील सामग्रीचा पुरेपूर उपयोग होत नसल्याने आर्थिक दृष्टीने फायदेशीर ठरत नाही. अशा वेळी निर्माण होऊ शकणाऱ्या पण खप नसलेल्या जादा विद्युत् शक्तीचा साठा करून ठेवण्याचा एक उपाय म्हणजे कमी भाराच्या काळात जादा विद्युत् शक्तींच्या साहाय्याने पाणी वरच्या पातळीतील जलाशयात पंप करून चढविणे. याच पाण्याचा उपयोग विजेची मागणी वाढताच पुन्हा विद्युत् निर्मितीसाठी होतो. जलशीर्षानुसार वर्गीकरण : हे तीन प्रकारांत करतात. यामघ्ये १५ मी. पर्यंत, १५ ते ५० मी. पर्यंत व ५० मी. पेक्षा जास्त जलशीर्ष असलेल्या केंद्रांना अनुक्रमे कमी, मध्यम व जास्त जलशीर्षाची केंद्रे असे म्हणतात. या तीनही प्रकारच्या केंद्रांतील पाण्याच्या प्रवाहाचे मार्ग व संयंत्राचे म्हणजे यंत्रसामग्रीचे आणि रचनेतील फरक ठोकळमानाने आ. ५ मध्ये दाखविले आहेत. जगातील सर्वाधिक जलशीर्ष असलेले केंद्र इटलीमध्ये लांरेस येथे असून त्या केंद्रावरील जलशीर्ष २,०३० मी. आहे.

जमिनीवरील व भूमिगत जलविद्युत् केंद्रे

१९०० पर्यंत बहुतेक सर्व जलविद्युत् केंद्रे जमिनीच्या वर बांधली गेली. त्यानंतरच्या काळात अनेक भूमिगत केंद्रे निरनिराळ्या देशांत बांधण्यात आली आहेत. विद्युत् केंद्र पृष्ठभागावर बांधावे किंवा भूमिगत ठेवावे, हे भौगोलिक व भूवैज्ञानिक पहाणी करून ठरविता येते. विद्युत् केंद्रे भूमिगत ठेवण्याचे मुख्य कारण त्यांच्या बांधणीचा खर्च कमी येतो. भूमिगत केंद्रामध्ये पाणी वाहून नेणाऱ्या नळांची व बोगद्यांची लांबी कमी ठेवूनही पुरेसे जलशीर्ष मिळविता येते. तसेच चांगल्या खडकातून बोगदा खणला असल्यास पाण्याचा दाब पेलण्यास नळांना खडकाचा आधार मिळतो व कमी जाडीचे, पोलादी नळ वापरता येतात. यामुळे होणाऱ्या बचतीमुळे भूमिगत विद्युत् केंद्रे कमी खर्चाची होतात. तसेच भूमिगत विद्युत् केंद्राचे बांधकाम व त्यातील यंत्रांची उभारणी सर्व ऋतूंत अबाधितपणे चालू ठेवता येते. विद्युत् केंद्र भूमिगत ठेवल्यामुळे हवाई हल्ल्यापासून संरक्षण होऊन युद्धकालातही विद्युत् निर्मिती चालू ठेवणे शक्य होते.

जलवाहक संहती

नदीतील किंवा तलावातील पाणी विद्युत् केंद्रातील टरबाइनांपर्यंत व तेथून पुढे परत नदीपर्यंत वाहून नेण्यासाठी जी योजना करण्यात येते, तिला जलवाहक संहती असे म्हणतात. निरनिराळ्या प्रकारच्या विद्युत् केंद्रांमध्ये सर्वसाधारणपणे पुढीलप्रमाणे जलवाहक संहती असतात.

धरणाच्या पायथ्याशी असलेल्या विद्युत् केंद्राची जलवाहक संहती

धरणाच्या पोटातून पोलादी किंवा प्रबलित (पोलादाच्या सळ्या घालून जास्त बलवान केलेल्या) काँक्रीटचे नळ घालतात. त्यात येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाच्या नियंत्रणासाठी दारे बसविलेली असतात. बहुतेक वेळा एकापुढे एक असे दोन दरवाजे बसविलेले असून एकाचा उपयोग नेहमीच्या नियंत्रणासाठी असतो व दुसऱ्याचा उपयोग पहिले दार दुरुस्तीसाठी काढण्यात आले असता करण्यात येतो. दारांची उघडझाप नियंत्रण खोलीतून किंवा धरणाच्या अंतर्भागातच बांधलेल्या खोलीतून करता येते. धरणामध्येच नळांच्या तोंडाशी अंतर्ग्रहण रचना (प्रवाहातील लहान मोठे गोटे, झाडाच्या फांद्या, ओंडके इ. अडविण्यासाठी लोखंडी जाळ्या, दारे इ. बसविण्याची सोय) केलेली असते. धरणामधून जाणारे नळ जरी गोलाकृती असले, तरी दारे आयताकृती बसविणे सोईचे असते म्हणून अंतर्ग्रहण रचनेमध्ये सुरुवातीचा भाग आयताकृती बांधून पुढे गोलाकृती भागास जोडणारा संक्रमण भाग म्हणजे हळूहळू आकार बदलत जाणारा भाग असतो. टरबाइनाजवळही नळावर एक नियंत्रक झडप बसविलेली असते. काही ठिकाणी, विशेषतः नळाची लांबी कमी असेल तेव्हा दोहोंपैकी एक नियंत्रणयोजना रहित करता येते, टरबाइनावरून पडलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी टरबाइनाखाली चोषण नलिका [ → जल टरबाइन] असते

धरणापासून दूर असलेल्या विद्युत् केंद्राची जलवाहक संहती

अशा ठिकाणच्या विद्युत् केंद्राच्या जलवाहक संहतीतील मुख्य घटक पुढीलप्रमाणे असतात व भौगोलिक परिस्थितीप्रमाणे त्यांपैकी आवश्यक ते घटक समाविष्ट करतात (आ. ६) : (१) अभिगम कालवा२) अंतर्ग्रहण रचना३) शीर्षजल कालवा किंवा शीर्षजल बोगदा वा सोईप्रमाणे दोन्ही४) शीर्षधी अथवा शीर्ष उधाणकूप, (५) पातनाड किंवा निपीड कूपक, (६) जमिनीवरील अथवा भूमिगत विद्युत् केंद्र, (७) अवजल कालवा अथवा अवजल उधाणकूपासह किंवा अवजल बोगद्याशिवाय. अभिगम कालवा : तलावातील पाणी अंतर्ग्रहण रचनेपर्यंत वाहून नेण्यासाठी या कालव्याचा उपयोग होतो. पाण्याबरोबर रेती, दगड इ. वाहत येऊ नयेत यासाठी या कालव्यातील पाण्याचा प्रवाहाचा वेग कमी ठेवणे आवश्यक असते. भौगोलिक परिस्थितीनुरूप काही ठिकाणी अभिगम बोगदा वापरावा लागतो (आ. ६ अ). अंतर्ग्रहण रचना : धरणांच्या पायथ्याशी असलेल्या विद्युत् केंद्राकरिता पाणी घेण्यासाठी धरणांतर्गत रचना असते. तिला अंतर्ग्रहण रचना म्हणतात. या रचनेमध्ये नियंत्रण दारे व जाळ्या बसविलेल्या असतात (आ. ६ अ, आ). शीर्षजल कालवा :सपाट किंवा कमी उताराच्या प्रदेशात अंतर्ग्रहण रचनेपासून पाणी उघड्या कालव्यातून शीर्षधीपर्यंत नेणे शक्य होते. ह्या कालव्याचा तळउतार शक्य तितका कमी असतो शीर्षजल बोगदा : भौगोलिक रचनेमुळे काही ठिकाणी पाणी कालव्यातून नेणे शक्य होत नाही. अशा वेळी शीर्षजल बोगद्याची योजना केली जाते. बोगद्याचा आकार वर्तुळाकृती किंवा नालाकृती असून पाण्याच्या अंतर्गत दाबाकरिता, तसेच सभोवतालच्या खडकाचा व झिरपून येणाऱ्या पाण्याचा बाह्य दाब हे बोगद्याच्या अभिकल्पाच्या वेळी विचारात घेतात. बोगद्याचा आतील पृष्ठभाग काँक्रीटने गुळगुळीत करण्यात येतो. त्यामुळे घर्षण कमी होऊन जलशीर्षाचा क्षय कमी होतो. ज्या ठिकाणी खडकाचा स्तर पाण्यावरील दाब पेलण्याइतका मजबूत नसतो तेथे बोगद्यात पोलादी नळ अस्तर म्हणून घालण्यात येतात शीर्षजल उधाणकूप :जनित्रावरील विद्युत् भारातील बदलानुसार टरबाइनावर सोडले जाणारे पाणी टरबाइनाजवळील नियंत्रकामार्फत कमी-जास्त करतात. टरबाइनाजवळील झडपा पूर्ण उघडण्यास किंवा बंद करण्यास कमीतकमी सु. दहा सेकंद लागतात. जलवाहक संहतीमधील नळ व बोगदे यांची लांबी जर जास्त असेल, तर झडप बंद झाल्यानंतर त्यामध्ये कोंडल्या गेलेल्या पाण्याच्या जडतेमुळे नळातील अंतर्गत दाब अतिशय वाढतो. हा वाढलेला दाब पेलण्यासाठी आवश्यक अशा मजबूत नळाची योजना करणे बऱ्याच खर्चाचे काम असल्याने जलवाहक मार्गाची प्रभावी लांबी कमी करून हा जडता परिणाम कमी करण्यासाठी उधाणकूपाची म्हणजे अतिरिक्त दाब मोकळा होण्यासाठी नळाच्या वरील टोकाजवळ हौदाची योजना करतात (आ. ६ आ). शीर्षप्रवाह शीर्षजल कालव्यातून होत असेल तेव्हा कालव्याच्या शेवटी व पातनाडाच्या म्हणजे जलशीर्षाचा दाब पेलतील अशा नळाच्या वा बोगद्याच्या सुरुवातीस आवश्यक तेवढ्या आकारमानाच्या शीर्षधीची योजना करावी लागते. या शीर्षधीचे कार्यही शीर्ष उधाणासारखेच असते ज्या वेळी जनित्रावरील विद्युत् भार वाढतो त्या वेळी टरबाइनाजवळील झडपा उघडून पाण्याचा जास्त पुरवठा टरबाइनाला करावा लागतो. त्यामुळे पाणी जास्त वेगाने खेचले जाऊन अंतर्गत दाब मर्यादेपेक्षाही कमी होऊन नळ कोलमडण्याची भीती असते. अशा वेळीही जलवाहक मार्गाची प्रभावी लांबी उधाणाने कमी करून हा दाब मर्यादित ठेवता येतो. शीर्षजल बोगदा व पातनाड किंवा निपीड कूपक यांच्या दरम्यान उधाणाची रचना केल्यामुळे पुढील फायदे होतात : (१) पातनाडावरील किंवा निपीड कूपकावरील पाण्याच्या दाबात होणारी क्षयवृद्धी मर्यादेत राहते. (२) पातनाडात निर्माण होणाऱ्या जलाघाताच्या (पाण्याचा दाब एकदम वाढल्यामुळे बसणाऱ्या हादऱ्याच्या) तरंगांचे अनिष्ट परिणाम शीर्षजल बोगद्यापर्यंत पोहोचत नाहीत व ते तरंग उधाणातच विरून जातात. (३) या तरंगांमुळे उधाणकूपामध्ये साठलेले पाणी जास्त मागणीच्या वेळी वापरता येते. शीर्षजल बोगद्याची लांबी जास्त असेल, तर पाण्याचा वेग जनित्राजवळ येईपर्यंत वाढण्यास वेळ लागतो. उधाणकूप असेल, तर मागणी वाढल्याबरोबर उधाणकूपात साठलेले पाणी वापरले जाते व दरम्यान शीर्षजल बोगद्यातील पाण्याचा वेग वाढवून पाहिजे तेवढा पुरवठा करता येतो. याउलट मागणी कमी होईल तेव्हा शीर्षजल बोगद्यातील प्रवाहाचा वेग आवश्यक तेवढा कमी होईपर्यंत पाणी उधाणकूपात साठविले जाते. सामान्यतः संपूर्ण भरून वाहणाऱ्या शीर्षजल बोगद्याची व पातनाडाची मिळून एकंदर लांबी जलशीर्षाच्या पाचपटींहून जास्त असेल, तर उधाणकूप ठेवणे आवश्यक ठरते. नैसर्गिक भूरचना व विद्युत् केंद्रावरील भारात होणारे आकस्मिक चढ-उतार यांप्रमाणे उधाणकूपाची रचना विविध प्रकारे करतात. अभिकल्पकाच्या कल्पनेप्रमाणे व भूरचनेप्रमाणे उधाणकूपाचे अगणित रचना प्रकार असतात, असे म्हटल्यास अयोग्य होणार नाही. तरीही ढोबळपणे रचनावैशिष्ट्यांवरून पडणारे पाच मुख्य प्रकार आ. ७ मध्ये दाखविले आहेत. पातनाडशीर्षधीपासून किंवा उधाणकूपापासून नळ घालून पाणी टरबाइनाकडे नेतात. या नळांना पातनाड म्हणतात. सरळ रेषेत उतरत असलेल्या पातनाडाचा भार पेलण्यासाठी ठराविक अंतरावर प्रबलित सिमेंट काँक्रीटचे आधार त्यांना देतात. तसेच पातनाडाची दिशा बदलत असेल तेथे पाण्याची अपमध्य (मध्यापासून दूर ढकलणारी) प्रेरणा पेलण्यासाठी वळणाच्या बाहेरील बाजूस आधार देतात निपीड कूपक: उधाणकूपापासून तिरकस किंवा उभ्या बोगद्यातून पाणी टरबाइनाला पुरविले जाते त्या बोगद्यास निपीड कूपक असे म्हणतात. निपीड कूपकास काँक्रीटचे किंवा पोलादाचे अस्तर असते. जेव्हा सभोवतालचा खडक चांगला असतो तेव्हा पाण्याचा दाब खडक घेऊ शकतो. अशा वेळी पोलादी अस्तराची जाडी कमी लागते. पातनाड वापरणे किंवा निपीड कूपक वापरणे हे भौगोलिक रचनेवर अवलंबून असते. कित्येक वेळा भौगोलिक परिस्थितीमुळे उघड्या पातनाडाची लांबी बोगद्यापेक्षा (निपीड कूपकापेक्षा) फारच जास्त होते. तसेच उघड्यानळांना काँक्रीटचे आधार द्यावे लागतात. शिवाय चांगल्या खडकातून गेलेल्या निपीड कूपकातील पोलादी अस्तर कमी जाडीचे ठेवता येते. अशा ठिकाणी निपीड कूपक ठेवणे कमी खर्चाचे पडते अवजल बोगदा अथवा अवजल कालवा व अवजल उधाणकूप :टरबाइनामधून बाहेर पडणारे पाणी ज्या बोगद्यातून अथवा कालव्यातून किंवा दोन्हींच्या साह्याने सोईस्कर नैसर्गिक जलप्रवाहात सोडले जाते त्यास अवजल बोगदा किंवा अवजल कालवा म्हणतात. अवजल कालवा ज्या जलप्रवाहास मिळतो त्यातील पाण्याच्या पातळीनुसार अवजल बोगद्यात मोकळा प्रवाह किंवा मागील दाबाने रेटला जाणारा प्रवाह म्हणजे दाब प्रवाह असतो. दाब प्रवाही बोगद्यात पाण्याचा दाब जास्त वाढत असल्यास विद्युत् केंद्राजवळ अवजल बोगद्याच्या सुरुवातीस अवजल उधाणकूप ठेवतात. अवजल उधाणकूपाचे कार्य शीर्षजल उधाणकूपासारखेच असते साहाय्यक सामग्री
जलविद्युत् केंद्रातील विद्युत् उत्पादन थांबले असताटरबाइनाच्या भागांची तपासणी करण्याची आवश्यकता भासते. त्या वेळी पातनाड, वलयाकार अस्तर व चोषण नलिका यांतील पाण्याचा पूर्ण निचरा करण्याकरिता पंप व नळ यांची तरतूद करतात. विद्युत् केंद्रातील सांडपाणी व पायातून अगर टरबाइनावरील झाकणातून झिरपणारे पाणी अवजल कालव्यात फेकण्याकरिता याच पंपाचा उपयोग होतो. याखेरीज जलविद्युत् केंद्रातील सामग्री म्हणजे टरबाइन जनित्राचा उपयोग करून विद्युत् निर्मिती करणाऱ्या कोणत्याही केंद्रात लागणारे तेलाचे निरनिराळे पंप, थंड पाणी खेळविण्याचे पंप, वायुसंपीडक (दाबयुक्त हवा निर्माण करणारे साधन), झडपांचे यांत्रिक चलनवलन करणारी सामग्री, अग्निशामक साहित्य, मुख्य व साहाय्यक रोहित्र (विद्युत् दाब बदलणारे साधन), मुख्य व साहाय्यक स्विच यंत्रणा, विद्युत् घटमाला व तिचा प्रभारक (घटमाला पुन्हा विद्युत् भारित करणारे साधन), जनित्राचे विक्षोभ नियंत्रण, विद्युत् वाहक केबली, नियंत्रक मंडले, निरनिराळी मापके, वायुवीजन (हवा खेळती ठेवणारी यंत्रणा), आणीबाणीच्या प्रसंगी उपयोगी पडेल असा डीझेलवर चालणारा एखादा मूलचालक (यांत्रिक शक्ती निर्माण करणारे एंजिन किंवा इतर साधन) इ. होय.

 

स्त्रोत : मराठी विश्वकोश (महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ)

अंतिम सुधारित : 7/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate