অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सूर्याचे पृथ्वीवर होणारे परिणाम

सूर्याचे पृथ्वीवर होणारे परिणाम

सूर्यापासून पृथ्वीला प्रकाश व उष्णता मिळत असते. शिवाय सूर्यापासून येणारे जंबुपार प्रारण, सौरवाताचा स्थिर प्रवाह आणि मोठ्या उज्ज्वालांची कणमय वादळे यांचा पृथ्वीवर परिणाम होतो. सूर्यापासून येणाऱ्या जंबुपार भागालगतच्या प्रारणाने पृथ्वीभोवती ओझोनाचा थर निर्माण होतो व पर्यायाने तो थर पृथ्वीचे अशा प्रारणापासून ढालीप्रमाणे रक्षण करतो. सौर किरिटापासून येणाऱ्या दीर्घ तरंगलांबीच्या मृदू क्ष-किरणांमुळे ⇨ आयनांबरा चे काही थर निर्माण होतात. या थरांमुळे लघुतरंग रेडिओ संदेशवहन शक्य होते. उज्ज्वालांपासून येणाऱ्या कमी तरंगलांबीच्या अधिक कठीण क्ष-किरण स्पंदांनी आयनांबरातील सर्वांत खालचे थर आयनीभूत होतात व रेडिओ संदेशवहनाचे अपायन वा अस्त होतो. पृथ्वीचे परिभ्रमी चुंबकीय क्षेत्र सौरवात अडविण्याच्या दृष्टीने पुरेसे तीव्र असते व त्यामुळे ⇨ चुंबकांबर बनते आणि त्याच्याभोवती सौर कण व क्षेत्रे वाहतात. सूर्याविरुद्घ असलेल्या बाजूला क्षेत्ररेषा ताणल्या जाऊन एक संरचना तयार होते. तिला चुंबकीय पुच्छ म्हणतात. सौरवातात आघात निर्माण होतात, तेव्हा पृथ्वीच्या चुबंकीय क्षेत्रात थोडी वा तीव्र वृद्घी होते. जेव्हा आंतरग्रहीय क्षेत्र पृथ्वीच्या क्षेत्राच्या दिशेच्या विरुद्घ दिशेला बदलले जाते किंवा कणांचे मोठे ढग प्रवेश करतात, तेव्हा चुंबकीय पुच्छातील क्षेत्रे परत जोडली जातात व ऊर्जा मुक्त होते. यातून ⇨ ध्रुवीय प्रकाश निर्माण होतो. मोठ्या उज्ज्वाला किंवा किरिटाच्या द्रव्यमानाची उत्क्षेपणे यांच्यामुळे ऊर्जावान कणांचे ढग आणले जातात. त्यांच्यामुळे चुंबकांबराभोवती वलय प्रवाह निर्माण होतो. त्यामुळे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात तीव्र चढ-उतार होतात, त्यांना भूचुंबकीय वादळे म्हणतात. या आविष्कारांमुळे रेडिओ संदेशवहनात क्षोभ निर्माण होतात आणि दूर अंतरासाठीच्या प्रेषण तारांमध्ये व इतर दीर्घ लांबीच्या संवाहकांमध्ये विद्युत् दाब ऊर्मी निर्माण होतात.

पृथ्वीच्या जलवायुमानावर (दीर्घकालीन सरासरी हवामानावर) सूर्याचे होणारे संभाव्य परिणाम कदाचित सूर्याच्या पृथ्वीवरील परिणामांपैकी सर्वांत वाईट परिणाम आहेत. माउंडर अल्पतम चांगले प्रस्थापित झालेले दिसते; परंतु काही थोडे इतर परिणामही होताना आढळतात. उष्णकटिबंधातील स्थितांबरीय वाऱ्यातील अर्ध-द्विवर्षायू आंदोलनाशी निगडित तापमानातील बदल हाच एक निश्चित असा सूर्य व पृथ्वी यांच्यातील परस्परसंबंध आहे. क्रियाशीलतेनुसार सूर्याची तेजस्विता बदलते. मोठ्या सौर डागाने त्याच्या क्षेत्रफळाच्या समतुल्य प्रमाणात सूर्याचे उत्सर्जन घटते. तथापि, जेव्हा डागाची क्रियाशीलता वाढते तेव्हा तेजःक्षेत्रांच्या परिणामांनी सौर स्रोतात एकूण सु. ०·१ % एवढी वाढ होते. हा परिणाम नगण्य आहे. म्हणून कणांचे परिणाम आणि स्थितांबरातील जंबुपार प्रारणातील चढ-उतार हे परिणाम महत्त्वाचे मानले जातात.

विद्युत् भारित कण चुंबकीय क्षेत्राचे अनुसरण करतात. त्यामुळे कणरुपी प्रारण सर्व मोठ्या उज्ज्वालांपासून निघताना आढळत नाही. ज्या उज्ज्वाला सूर्याच्या पश्चिम गोलार्धात अनुकूल ठिकाणी असतात, केवळ त्यांच्यापासूनच कणरुपी प्रारण येते. पृथ्वीवरुन पाहिले असता सूर्याच्या पश्चिम बाजूकडून येणाऱ्या क्षेत्ररेषा सौर प्रारणाने परत पृथ्वीकडे वळविल्या जातात आणि तेथील उज्ज्वाला कणांना दिशा देतात. हे कण बहुधा प्रोटॉन असतात. हे कण महाआघात सीमापृष्ठात पकडले जातात. हे सीमापृष्ठ सूर्यापासून दर सेकंदाला सु. १,००० किमी. गतीने बाहेर फेकलेले असते. मोठ्या उज्ज्वालांमधील कमी ऊर्जावान कणांचा स्रोत इतका तीव्र असतो की, त्यामुळे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या बाहेर असलेल्या अंतराळवीरांच्या जीवाला धोका पोहोचू शकतो.

 

स्त्रोत : मराठी विश्वकोश (महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ)

अंतिम सुधारित : 7/12/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate