অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अनुकारिता ( Mimicry )

अनुकारिता ( Mimicry )

अनुकारिता ( Mimicry )

आकार, ढब, रंग आणि वर्तन यांबाबतींत इतर प्राण्यांशी, वनस्पतींशी किंवा निर्जीव वस्तूंशी असणार्‍या प्राण्यांच्या साम्याला किंवा नक्कल करण्याला अनुकारिता (अनुकृती) म्हणतात. निसर्गात प्राण्यांच्या संरक्षणाकरिता विविध पर्याय असून अनुकारितेमुळे प्राणी सहजासहजी दिसत नाहीत किंवा दिसतात, तेव्हा ते आपला दिखाऊ उपद्रवीपणा दाखवितात. अनुकारिता उत्पन्न होण्याचे प्रमुख कारण म्हणजे नैसर्गिक निवड, असे मत आउगुस्ट व्हाइसमान आणि हेन्‍री वॉल्टर बेट्स या शास्त्रज्ञांनी मांडले आहे.

अनुकारितेचे संरक्षक आणि आक्रमक असे दोन प्रकार आहेत. संरक्षक अनुकारितेत छद्मी (लपविलेली) व भयसूचक असे दोन उपप्रकार आहेत. आक्रमक अनुकारितेत भक्ष्य पकडणे हा अंतिम हेतू असतो. या अनुकारितेत छद्मी व प्रलोभक असे दोन उपप्रकार आहेत.

बिनविषारी सर्पाने केलेले अनुकरण

संरक्षक अनुकारिता:

छद्मी अनुकारिता

निसर्गात हा प्रकार जास्त आढळतो. क्रिप्टोलिथोडिस या खेकड्याचा वाटोळा आकार, गुळगुळीतपणा, रचना आणि पांढरा रंग हे सर्व समुद्रकिनार्‍यावरील बिलोरी गोट्यांशी खूप जुळणारे असतात. यामुळे हा खेकडा चटकन ओळखता येत नाही. हातांनी या गोट्यांची उलथापालथ केल्यावर खेकड्याच्या हालचालींमुळे त्याचे अस्तित्व ओळखता येते. दुसर्‍या एका खेकड्याचे लाटांनी झिजलेल्या प्रवाळ खडकांशी हुबेहूब साम्य असते. कीटकांमध्ये सेलेनिया टेट्राल्युनॅरिया या पतंगाचा सुरवंट आपल्या पायांनी फांदी घट्ट पकडतो. फांदीशी कोन करून आपले शरीर ताठ उभे करतो. याच्या शरीराचा रंग आणि आकार डहाळ्यांच्या फांद्याच्या आकारासारखा असतो. शरीराचा हा आविर्भाव खूप वेळ टिकतो. प्रत्यक्ष स्पर्श झाल्यावरच ही डहाळी अथवा काटकी नसून सुरवंट आहे हे समजते. यष्टीकीटकांचे शरीर सडपातळ असते. पाय निमुळते होत गेलेले असतात. आकार व रंग झाडाच्या डहाळ्यांशी व काटक्यांशी खूपच साम्य दर्शवितो. त्यामुळे ते पटकन दिसत नाहीत. फायलियम या पर्णकीटकाचे पंख चपटे, शरीर पसरट आणि पाय पानासारखे हिरव्या रंगाचे असतात. याशिवाय हिरव्या रंगावर अधूनमधून पिवळसर रंगाचे वेडेवाकडे ठिपके असतात, जे पानांवरील कवकांच्या डागांसारखे दिसतात. कॅलिमा पॅरालेक्टाया फुलपाखराचा मागचा पंख लांब होऊन देठासारखा दिसतो. यामुळे त्याचा आकार पानासारखा दिसू लागतो. हे दोन्ही कीटक झाडावर चटकन ओळखू येत नाहीत. वरील सर्व प्रकारांत प्राणी लपलेले राहतात.

भयसूचक अनुकारिता

या प्रकारात प्राणी भडक रंगांच्या आणि खाण्याला बेचव किंवा काही विषारी प्राण्याची नक्कल करतात. जसे, प्रवाल-सर्प हा एक विषारी साप आहे. त्याच्या शरीरावर रंगांचे एकाआड एक असे आडवे पट्टे असतात. अनेक बिनविषारी सर्प शत्रूपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी प्रवाल-सर्पाची नक्कल करतात आणि शत्रूला भय दाखवितात. हेटेरोडॉन हा बिनविषारी साप फुसकारून व प्रहार करून आपण विषारी साप आहोत असे भासवतो. मोनर्क फुलपाखरू खाण्यास बेचव असते. पक्ष्यांना खाण्यास रुचकर असणारे व्हाइसरॉय फुलपाखरू त्याची नक्कल करते.

आक्रमक अनुकारिता

छद्मी अनुकारिता या प्रकारच्या एका उदाहरणात एका जातीचे कोळी ज्या फुलांवर राहतात त्याच फुलांसारखा त्यांचा रंग असतो. यामुळे फुलांवर येऊन बसणार्‍या कीटकांना ते दिसत नाहीत आणि हे कीटक त्यांच्या भक्ष्यस्थानी पडतात. झाडांवर राहणारे कोळी झाडांच्या निरनिराळ्या भागांची नक्कल करतात.

प्रलोभक अनुकारिता

या प्रकारच्या उदाहरणात एका विशिष्ट प्रकारच्या कोळ्याचा रंग आणि रूप आमर फुलासारखे (ऑर्किड) असते. हे साम्य प्रलोभक असून त्यामुळे या कोळ्याला भक्ष्य मिळते.

देशमुख, नरेंद्र

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate