অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जंगल निर्मितीतून निसर्ग संवर्धनाचा उपक्रम

जंगल निर्मितीतून निसर्ग संवर्धनाचा उपक्रम

आपण रोजच्या जीवनात अनेक नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करतो. मात्र ही साधनसंपत्ती निर्माण होण्यासाठी हजारो वर्षे लागतात. ज्या प्रमाणात आधुनिकीकरण होत आहे. औद्योगिक जडणघडण वाढत आहे याचे प्रमाण पाहता काही वर्षात नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास होण्याचा धोका देखील निर्माण झाला आहे. आपण निसर्गाच्या सानिध्यात जातो. मात्र निसर्गाचे संवर्धन कसे करता येईल याचा विचार करत नाही, पण निसर्ग हा आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग मानून जंगल निर्मितीतून निसर्ग संवर्धनाचा अनोखा उपक्रम राबविण्याचा संकल्प नयना नारगोळकर यांनी घेतला आहे. दिलखुलास या कार्यक्रमातून जंगल निर्मितीतून निसर्गाचे संवर्धन कसे करता येईल याची माहिती दिली आहे.

प्रश्न - पुणे येथील येथे खडकवासला जंगल लावण्याची कल्पना कशी सूचली ?

उत्तर - निसर्ग हा आपल्या जीवनाचा महत्त्वाचा घटक आहे. मला लहानपणापासून निसर्गाची आवड होती. त्यात माझ्या कुटुंबाने मला साथ दिली. आम्ही राज्यातील जंगला जंगलातुन फिरून निसर्गाचा मनमुराद आनंद घ्यायचो, फळाफुलांचे, पक्षांचे,फुलपाखरांचे आणि झाडांचे फोटो घ्यायचो. त्यावेळी मनात विचार यायचा की झाडे आपल्या जवळ असावीत. मग आम्ही 15 एकर जागेत जंगलाची निर्मिती करण्यास सुरवात केली. जंगलातली ही हिरवळ सौदर्यं फुलपाखरे आपल्याला जवळून बघता यावी या विचारातून जंगल लावण्याच्या कल्पनेला सुरुवात झाली. सुरुवातीला आम्ही फुलझाडे लावली पण फुलझाडे ही शोभेची आहेत. पण त्यानंतर फक्त फुलझाडे न लावता मोठी झाडे लावुन जंगल उभे केले. पक्षांना आपले घरटे बांधता यावे, फुलपाखरांना फुले उपलब्ध व्हावी तसेच औषधी वनस्पती उपलब्ध व्हावी यासाठी आजवर एकूण आठ ते दहा हजार झाडे या परिसरात लावण्यात आली आहेत. तसेच झाडे लावतांना किंवा त्यांना वाढविताना अनेक अडचणी येत असतात. झाडे लावणे हा फक्त एक ‍पर्यावरण संदेश नसून त्याची निगा राखणे तितकेच महत्वाचे आहे. माझ्या पतीनी हे कार्य हाती घेतले होते. त्यांच्या पश्चात आता मी ते कार्य पूर्ण करत आहे. या झाडांना आम्ही हवामानानुसार पाणी घालतो, सुरुवातीला पाणी टाकण्याचे प्रमाण वेगळे असते. ती झाडे थोडी मोठी झाली की त्यांच्यामध्ये पाणी शोषून घेण्याची क्षमता वाढते. नंतर ते आपोआप पाऊसाचे पाणी शोषून घेतात. माझ्या कल्पनेतले जंगल आणि झाडे मी जोपासत आहे. सुरवातीला कोणतेही काम करताना अडचणी येत असतात. मात्र हळूहळू निसर्गाची सेवा करताना सर्व अडचणी दूर होत गेल्या. आणि याद्वारे पर्यावरण जागृतीचा संदेश मी लोकांपर्यंत पोहचवत गेले.

प्रश्न- शहरातल्या लोकांना तुम्ही औषधी वनस्पती लावण्यासाठी काही माहिती देऊ शकता का?

उत्तर - शहरात प्रदुषणामुळे ऑक्सिजनची कमी आहे. यावर उपाय म्हणून तुम्ही छोट्या जागी किंवा कुंडीत आयुर्वेदिक झाडे लावू शकता. तुळस, कडूलिंबं इत्यादी झाडे लावली तर ही झाडे ऑक्सिजन देतात आणि यामुळे आरोग्य चांगले राहते. आपल्या घराशेजारी असणाऱ्या जागेचा जास्तीत जास्त वापर झाडे लावण्यासाठी करावा. यातून आपण निसर्गाचे संवर्धन करण्यास देखील मदत करू शकतो. तसेच जंगलात वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी येतात या पक्ष्यांसाठी खाण्याची व पिण्याची व्यवस्था देखील केली जाते. जंगलात वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी येत असतात. त्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आम्ही प्रत्येक झाडांमध्ये छोट्या तळ्यांची निर्मिती केली आहे. या तळ्यांमध्ये येऊन पक्षी पाणी पितात. त्यांच्या खाण्याची व्यवस्था त्या तळ्यांच्या शेजारी केलेली असते. पक्षांना खाण्यासाठी काय लागते, त्याचा अभ्यास करून त्यानुसार खाद्य ठेवले.

प्रश्न- जंगलातील विविध प्रकारच्या झाडांवर विविध प्रकारची फळे लागतात, या फळांचा तुम्ही काय उपयोग करता ?

उत्तर - जंगलात विविध प्रकारची फळे झाडांवर लागतात. चिकू, केळी,आंबे इत्यादी फळे आम्ही तोडत नाही. ही फळे आम्ही बाजारात विकत नाही. जंगलातली सर्व फळे जंगलातल्या पक्षांसाठी खाद्य म्हणून दिली जातात. जंगलात राहणाऱ्या विविध पक्षांना पाहण्यासाठी जंगलात अनेक विद्यार्थी येत असतात. जंगलात पुण्यातील वेगवेगळ्या शाळेतील मुले झाडे व त्याच्या पडलेल्या बियांचे अभ्यास करायला येतात. काही शालेय मुलांनी या झाडांच्या बिया नेऊन त्यांचा प्रकल्पामध्ये त्या बियांपासून नवीन शोध लावले आहेत. या बरोबरच कॉलेजमध्ये वनस्पतीशास्त्राचे विद्यार्थी जंगलात वेगवेगळ्या झाडांचा अभ्यास करायला येत असतात.

प्रश्न- जर कोणाला छोटी बाग बनवायची असेल तर त्यासाठी रोपे व सेंद्रिय खत उपलब्ध होते, त्याबद्दल माहिती द्या ?

उत्तर - आम्ही एक छोटी रोपवाटिका तयार केली आहे. या रोपवाटिकेमध्ये आम्ही रोप ठेवतो ही रोप वृक्षापासूनच बनवली जातात. सेंद्रिय खत हे त्या वृक्षांच्याखाली व आजूबाजूला जो पाला असतो त्यापासूनच तयार केले जाते. जंगलात कौटुंबिक सहली येतात. निसर्ग प्रेमी भेट देण्यासाठी येत असतात. जंगलाबद्दल लोकांमध्ये एक प्रकारचा उत्साह दिसून येतो. पुण्यातच इतक्या जवळ जंगल आहे. म्हणून अनेक कुटुंब सहलीसाठी जंगलात येतात. तसेच अनेक निसर्ग प्रेमी ही जंगलात झाडे, फुले,पक्षी बघायला येतात. अनेक लोक आपल्या मुलांचे वाढदिवसही निसर्गाच्या सानिध्यात साजरा करू इच्छितात. ते ही सहकुटूंब जंगलात येतात.

प्रश्न- तुम्ही सगळ्यांना झाडे लावून त्यांची निगा राखण्याकरिता काय संदेश देऊ इच्छिता ?

उत्तर - मनुष्याला निसर्गाने खूप काही दिले आहे. झाडांच्या सानिध्यात नेहमीच प्रसन्न व शांत वाटत असते. त्यामुळे झाडांची योग्य जोपासना केली. त्यांच्यावर प्रेम केले तर ते ही तुमच्यावर प्रेम करतात. आपले हे पर्यावरण या झाडांमुळेच सुंदर राहते. अनेक झाडांच्या सावलीमुळे रस्त्यात चालणाऱ्या अनेक लोकांना निवारा मिळतो. त्यामुळे प्रत्येकाने एक तरी झाड लावून पर्यावरणाची काळजी घ्यावी. त्यातूनच आपण पर्यावरणाचे संवर्धन करू शकतो.

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 4/6/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate