অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जपा राज्याचे पर्यावरण... करुनी वृक्षांचे संवर्धन

जपा राज्याचे पर्यावरण... करुनी वृक्षांचे संवर्धन


5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या दिवशी पर्यावरणाचा समतोल राखण्यासंदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृतीही केली जाते. या दिनाचे औचित्य साधुन लोकनेते कै.गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मरणार्थ त्यांनी राज्याच्या व देशाच्या प्रती केलेल्या योगदानाची आठवण जपण्यासाठी राज्यात यंदा 3 जून ते 9 जून या कालावधीत पर्यावरण सप्ताह साजरा केला जाणार आहे. लोकनेते कै.गोपीनाथराव मुंडे यांच्या कार्याचे स्मरण वृक्षलागवडीच्या माध्यमातून चिरंतर ठेवणारी ही महत्त्वपूर्ण योजना आहे. त्याबाबतची ही थोडक्यात माहिती.. .. ..
लोकनेते कै.गोपीनाथ मुंडे यांनी केंद्र सरकारमध्ये ग्रामीण विकासमंत्री व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री या नात्याने देशासाठी व राज्यासाठी प्रभावी कामगिरी केलेली आहे. त्यांचे हे योगदान विचारात घेता, त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत वृक्ष लागवड करुन पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दरवर्षी दिनांक 3 जून ते 9 जून या कालावधीत पर्यावरण सप्ताह घोषित करण्यात आला आहे. 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून सर्वत्र पाळला जातो. या दिवशी वृक्ष लागवडीसारखे पर्यावरणास पोषक असे उपक्रम राबविले जातात. म्हणूनच या लोकनेत्याच्या विचारांचा सुगंध वृक्षांच्या माध्यमातून राज्यातील ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी या सप्ताहाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य हे हरित राज्य करुन जलसंधारण व वृक्षारोपनाच्या माध्यमातून संपूर्ण राज्य दुष्काळमुक्त होण्यासाठी आपले शासन कार्यरत आहे. यासाठी जलयुक्त शिवारासारखे महत्त्वपूर्ण अभियान राज्यात राबविण्यात येत आहे. पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे पुढील काळातील आव्हानांना तोंड देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत वृक्षलागवडीसारखा कार्यक्रम या निमित्ताने हाती घेण्यात आलेला आहे. यासाठी सर्वांचे सक्रीय सहकार्य आवश्यक आहे आणि त्या माध्यमातुन आपले महाराष्ट्र राज्य सुजलाम सुफलाम होईल असा विश्वास ग्रामविकास व जलसंधारण, महिला व बालविकास आणि रोजगार हमी योजना मंत्री श्रीमती पंकजा गोपीनाथ मुंडे यांनी व्यक्त केला आहे. निश्चितपणे मंत्री महोदयांच्या या विश्वासास सक्रीय साथ जनता व प्रशासनामार्फत मिळेल यात शंका नाही.
सदर पर्यावरण सप्ताहामध्ये संपुर्ण राज्यात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत होणार आहे. यासाठी जलयुक्त शिवार अभियानातील निवडण्यात आलेल्या गावांना प्राधान्य देण्यात येईल.

वृक्षलागवडीसाठी ठिकाणे

वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हा प्राथमिक, माध्यमिक शाळेची ठिकाणे, अंगणवाडी, आरोग्य केंद्रे, समाजमंदिर, गावठाण, गायरान, ग्रामपंचायतीच्या मालकीची जमीन, शासकीय, निमशासकीय कार्यालये व रस्त्याच्या दुतर्फा इत्यादी ठिकाणी प्राध्यान्याने घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा महासंचालक, सामाजिक वनीकरण विभाग, पुणे यांच्यामार्फत योग्य प्रतीच्या रोपांचा पुरवठा सर्व संबंधितांना करण्यात येणार आहे.
सर्व जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपरोक्त पर्यावरण सप्ताहाचे आयोजन करण्यात येत असून पालकमंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष, लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते 3 जून रोजी किमान एका गावामध्ये पर्यावरण सप्ताहाचा शुभारंभ करावा असे ठरले आहे. सदर पर्यावरण सप्ताहामध्ये सक्रीय लोकसहभाग घेण्यात येणार आहे. तसेच वृक्ष लागवड करावयाच्या कार्यक्रमाचे गावनिहाय नियोजन करण्यात येईल.

मजूर नोंदणी उपक्रम

या सप्ताहादरम्यान महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जास्तीत जास्त पात्र मजूरांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी याकरिता ग्रामपंचायत स्तरावर मजूर नोंदणी उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्यामार्फत संबंधितांना सूचित करण्यात येईल. तसेच मजूर नोंदणी संदर्भात पूर्वसुचनाही दंवडी आदी माध्यमातून देण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये मजूरांकडून जॉबकार्डसाठी मागणी नमुना क्रमांक 1 मध्ये प्राप्त करुन घेण्यात येणार आहे. तसेच या सप्ताहादरम्यान प्रत्येक गावातील आठवडी बाजाराच्या दिवशी व ठिकाणी मजूर नोंदणी उपक्रम आयोजित केल्यास त्यास मजूरांचा जास्त प्रतिसाद मिळू शकेल याकरिता नियोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमादरम्यान नवीन जॉबकार्ड देणे, जॉबकार्ड नुतनीकरण करणे, जॉबकार्ड अद्ययावत करणे याबाबतची कार्यवाही प्राथम्याने करण्यात येईल. या संदर्भातील सर्व जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व ग्राम रोजगार सेवक यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
लोकनेत्यांनी केलेले कार्य हे भावी पिढीसाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक असे असते. त्यांनी केलेल्या लोकाभिमुख कार्याचे स्मरण होण्यासाठी अशा प्रकारच्या योजनांचा फार मोठा लाभ झाल्याची उदाहरणे आहेत. म्हणूनच ही योजनाही मोठ्या प्रमाणात यशस्वी होऊन लोकनेते कै.गोपीनाथराव मुंडे यांच्या कार्याचे स्मरण भावी काळात विशाल अशा वटवृक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेच्या कायम स्मरणात राहिल असे वाटते. तर मग लक्षात ठेवा "जपण्या राज्याचे पर्यावरण करुया वृक्ष संवर्धन.. ..

 

- डॉ.राजू पाटोदकर जिल्हा माहिती अधिकारी, रायगड-अलिबाग

माहिती स्रोत: महान्यूज, सोमवार, ०१ जून, २०१५

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate