অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

निर्वनीकरण

निर्वनीकरण

मानवी क्रियांसाठी वनांचे सफार्ईकरण व विरलीकरण म्हणजे निर्वनीकरण होय. काही वेळा पूर, वादळ, वणवा इत्यादी नैसर्गिक कारणांमुळे देखील निर्वनीकरण घडून येते. परंतु याच्या तुलनेत मानवाकडून होणाऱ्या निर्वनीकरणाचे प्रमाण प्रचंड आहे. प्रामुख्याने शेतीकरिता जमीन लागवडीखाली आणण्यासाठी, मानवी वस्तीसाठी, कुरणांचे क्षेत्र वाढविण्यासाठी वृक्षतोड करून अथवा आग लावून वने नष्ट करण्यात येतात. झाडे तोडून त्यापासून लाकूड आणि लाकडापासून कोळसा मिळविला जातो. लोहमार्ग, रस्ते व उद्योगधंदे इत्यादींसाठी, वाढत्या लोकसंख्येकरिता घरे उभारण्यासाठी व स्थलांतरित शेतीसाठी वनांचा नाश केला जातो. अशा रीतीने लोकसंख्यावाढ, औद्योगिकीकरण, शहरीकरण व जागतिकीकरण ही प्रमुख कारणे निर्वनीकरणाच्या मुळाशी आहेत.

निर्वनीकरण पृथ्वीवर वनांची निर्मिती ६५ कोटी वर्षांपूर्वी झाली असावी. या वनांमुळेच मानवाला पृथ्वीवर राहता येऊ शकले. आरंभीच्या काळात मानव पूर्णपणे वनांवरच अवलंबून होता; परंतु जसजशी मानवाची प्रगती होऊ लागली तसतशा त्याच्या वाढत्या गरजा भागविण्यासाठी मोठ्या संख्येवर वने नष्ट झाली. मानवाला वनांपासून अन्न, वस्त्र व निवारा मिळतो. तसेच ऑॅक्सिजनची निर्मिती, जलनियमन, जमिनीची धूप रोखणे, वनौषधी मिळविणे, प्रदूषकांचे प्रमाण कमी करणे इत्यादी क्रिया वनांपासून साध्य होतात.

पृथ्वीवर सद्यस्थितीत सु. ४०० दशलक्ष हेक्टर जमिनीवर वनांचे आच्छादन आहे आणि त्याचे क्षेत्रफळ एकू ण उपलब्ध जमिनीच्या क्षेत्रफळाच्या ३१ज्ञ् इतके आहे. दरवर्षी प्रचंड प्रमाणात जमिनीचे निर्वनीकरण करून अन्य उपयोगांसाठी जमीन उपलब्ध करण्यात येते. अलिकडील काळात, वनांचे महत्त्व ओळखून निर्वनीकरणाचे प्रमाण कमी करण्यासाठी, तसेच नव्याने वनाच्छादन वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न चालू असल्यामुळे निर्वनीकरणाचे प्रमाण थोडे घटले आहे. निर्वनीकरणात दक्षिण अमेरिका व आफ्रि का यांचा लक्षणीय वाटा होता. मात्र, आशिया खंडात चीन, भारत व व्हिएतनाम येथील वनीकरणामुळे दरवर्षी वनांखालील क्षेत्रात भर पडत आहे.

जागतिक हवामानावर वनांचा परिणाम होत असतो. निर्वनीकरण हे जागतिक तापमानवाढीला कारणीभूत ठरत आहे. तसेच हरितगृह परिणामाचे देखील निर्वनीकरण एक प्रमुख कारण आहे. उष्ण प्रदेशातील निर्वनीकरणामुळे सु.२०ज्ञ् जागतिक हरितवायूचे उत्सर्जन होते. वनातील जैववस्तुमानामध्ये प्रचंड प्रमाणात कार्बन साठविला जातो. निर्वनीकरणामुळे यात दरवर्षी घट होत आहे. जलचक्रावर देखील निर्वनीकरणाचे वाईट परिणाम होतात. निर्वनीकरणामुळे मातीतील तसेच हवेतील पाण्याचे प्रमाण कमी होते. परिणामी जमिनीची धूप होते.

निर्वनीकरण निर्वनीकरणामुळे जैवविविधतेमध्ये घट होते. त्यामुळे अनेक प्रजाती विलुप्त झाल्या आहेत. जगातील सर्वाधिक जैवविविधता वर्षारण्याच्या क्षेत्रात आढळते. वर्षावने नष्ट केल्यामुळे वनस्पती, प्राणी व कीटकांच्या प्रजातींची मोठ्या प्रमाणावर संख्या कमी होत असून वर्षाकाठी अनेक प्रजाती नष्ट होत आहेत. विकसित व विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थेत वनांवर आधारित उद्योगांचा मोठा वाटा आहे. लाकडाचा उपयोग घरे बांधण्यासाठी, कागद तयार करण्यासाठी, जळणासाठी व स्वयंपाकासाठी केला जातो.

मानवाचे अस्तित्व वनांवर अवलंबून आहे, याची जाणीव झाल्यामुळे ‘झाडे लावा-झाडे जगवा’ ही मोहीम सुरू करण्यात आली. निर्वनीकरणामुळे Nहास होणाऱ्या सामाजिक, आर्थिक व पर्यावरणीय मूल्यांबाबत जगभरातील जनतेला जागृत करण्यासाठी २०११ हे वर्ष संयुक्त राष्ट्रांनी ‘वन वर्ष’ म्हणून जाहीर केले. आंतरराष्ट्रीय वन वर्षाच्या बोधचिन्हात मानवी जीवनात वनांचे सर्वस्पर्शी उपयोग दाखविले आहेत. मानवाच्या अस्तित्वासाठी वनरक्षण, वनसंवर्धन व पुनर्वनीकरण यांचे आत्यंतिक महत्त्व आहे.

 

सागर, वीणा बाळकृष्ण

स्त्रोत: कुमार विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate