অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गांधील माशी

गांधील माशी

संधिपाद संघातील कीटक वर्गाच्या हायमेनॉप्टेरा गणात गांधील माशीचा समावेश होतो. याच गणात मुंग्या आणि मधमाश्या यांचाही समावेश होतो. यांच्या सु. १७,००० जाती ज्ञात असून त्या प्रामुख्याने उष्ण व उबदार प्रदेशांत आढळतात. भारतात आढळणार्‍या ग़डद तांबूस रंगाच्या या कीटकांच्या दंशामुळे त्वचेचा दाह होऊन त्यावर गांध्या उठतात. म्हणूनच त्यांना गांधील माश्या असे नाव आहे. तिचे शास्त्रीय नाव व्हेस्पा स्टिंक्टा असे आहे. १३ किंवा १४ सांध्यांचे स्पर्शक, मोठे संयुक्त डोळे, पातळ व पारदर्शी पटलसदृश पंखांच्या दोन जोड्या आणि वक्ष व उदर यांच्यामधील अत्यंत चिंचोळी कंबर ही हायमेनॉप्टेरा गणाची प्रमुख लक्षणे आहेत. काही गांधील माश्या तांबूस पिवळ्या व निळसर काळ्या रंगांच्या असतात. काहींच्या अंगावर काळ्या, पिवळ्या, लाल, पांढर्‍या रंगांचे पट्टे किंवा ठिपके असतात.

मातीचे घरटे व कुंभारीण माशी

वनस्पतिजन्य पदार्थांचे तुकडे करून ते चघळण्याची क्षमता गांधील माश्यांच्या मुखांगात असते. वनस्पतींच्या विविध भागांचे आणि सुरवंटांच्या, कीटकांच्या व कोळ्यांच्या अवयवांचे लचके तोडून व चघळून ते आपल्या अळ्यांना भरविण्याचे काम कामकरी गांधील माश्या करतात. या माश्यांच्या जननेंद्रियांचे रूपांतरण विष-ग्रंथी आणि दंश करावयाच्या नांगीमध्ये झालेले असते. ही नांगी उदराच्या शेवटच्या भागात असते. मधमाशीत नांगीच्या तीक्ष्ण आणि टणक भागावर उलट्या दिशेने वळलेले काटे असतात; अशा प्रकारचे काटे गांधील माशीत नसतात. त्यामुळे एकदा दंश केला तरी गांधील माशी आपली नांगी शत्रूच्या शरीरातून सहज उपसून वारंवार दंश करू शकते. यामुळेच गांधील माशी मधमाधीच्या तुलनेत अधिक धोकादायक ठरते.

गांधील माशीच्या जीवनचक्रात अंडी, अळी, कोश आणि प्रौढ कीटक अशा चार जीवनावस्था असतात. समागमानंतर नर मरून जातो. पोळ्यातील कप्प्यांत मादी एक-एक अंडे घालते. समूहाने राहणार्‍या गांधील माश्यांच्या बाबतीत अंड्यांतून बाहेर पडणार्‍या अळ्यांना कामकरी माश्या अन्न भरवितात. त्यांची कोशावस्था पोळ्याच्या कप्प्यातच पार पडते. शेवटी कप्प्याचे टोपण कुरतडून पूर्ण वाढलेली गांधील माशी बाहेर पडते. पोळ्याजवळ कामकरी माश्यांचा एक गट पहारा देत असतो. या माश्या चिडखोर असतात. पोळ्याजवळ येणार्‍या शत्रूवर त्या त्वेषाने हल्ला करतात.

एकाकी आणि समाजप्रिय असे गांधील माश्यांचे दोन प्रमुख प्रकार आहेत. उदा., ओरिएंटल पेपर वास्प या समाजप्रिय गांधील माश्या आहेत, तर कुंभारीण माशी (पॉटर वास्प) या एकाकी गांधील माश्या आहेत. समाजप्रिय गांधील माश्या पोळी तयार करतात. पोळे करताना वनस्पतिजन्य पदार्थ कुरतडून त्याच्या लगद्यापासून पातळ पापुद्रा तयार केला जातो. त्या पापुद्र्याचा वापर करून छोटे छोटे षट्कोनी कप्पे केले जातात. या कप्प्यांचा वापर अंडी, अळ्या आणि कोश यांच्या संरक्षणासाठी केला जातो. काही जातींमध्ये अशा पोळ्यांच्या भोवती विविध आकारांची संरक्षक कवच्यांसारखी घरटीदेखील बांधली जातात. अशा घरट्यांमध्ये पोळ्यांचे एकेरी अथवा एकापेक्षा अधीक थर रचलेले असतात. ओरिएंटल पेपर वास्प या गांधील माश्यांच्या घरट्यामधील समुहात शेकडो माश्यांचे वास्तव्य असते.

एकाकी गांधील माश्यांची छोटी घरटी वनस्पतींच्या पानांच्या खालच्या बाजूला चिकटविलेली आढळतात. कुंभारीण माशी चिखलाच्या साहाय्याने गोलाकार मडक्यांसारखी किंवा उभट आकाराचे घरटे बांधते. त्यात आपले अंडे घालण्यापूर्वी ती हरभर्‍याच्या रोपांवर आढळणार्‍या घाटे अळ्यांना दंश करून बेशुद्ध करते आणि बेशुद्ध सुरवंटांना आपल्या घरात साठवून ठेवून मगच अंडे घालते. काही जातींमध्ये घाटे अळ्यांऐवजी इतर सुरवंट किंवा कीटक किंवा कोळ्यांचाही वापर केला जातो. दंश केल्यानंतर अळ्या मरत नाहीत आणि त्यांची वाढही होत नाही. नंतर कुंभारीण माशी घरटे बंद करते. कालांतराने कुंभारीण माशीच्या अंड्यातून तिची अळी बाहेर पडते आणि ती बेशुद्ध सुरवंटांना खाऊन वाढते. तिची वाढ होऊन ती कोशावस्थेत प्रवेश करते. नंतर तिचे रूपांतर गांधील माशीत होते आणि घरट्याचे झाकण कुरतडून ती बाहेर येते.

माणसाच्या दृष्टीने गांधील माशीचा दंश अतिशय वेदनाकारक असतो. अनेक माश्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे लहान मुले दगावू शकतात. मात्र काही बाबतीत त्या उपकारकही ठरतात. या माश्या अनेक कीटकांचा, सुरवंटांचा आणि कोळ्यांचा फडशा पाडत असल्यामुळे त्यांच्याद्वारे कीटकांच्या संख्येवर नियंत्रण राखले जाते. शेतीच्या दृष्टीने ही बाब उपयुक्त ठरते. मकरंद गोळा करीत असताना त्या परागणाचे महत्त्वाचे कामही करीत असतात.

किट्टद, शिवाप्पा

स्त्रोत -मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate