অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गॉगलवाली लूटारू माशी

गॉगलवाली लूटारू माशी

पावसाळ्यानंतर जेंव्हा जंगलात किटकांचा सुकाळ असतो त्याच काळात ही लूटारू माशी मोठ्या प्रमाणात दिसायला लागते. डिप्टेरा या माश्यांच्या वर्गात येणाऱ्या या माशीला इतर माश्यांसारखे दोनच पंख असतात. दुसऱ्या जोडीचे रूपांतर त्या पंखाच्या मागे एखाद्या गाठीसारखे असते आणि त्यांना "हॉल्टर" असे म्हणतात. जलद, उड्डाणाच्या वेळेस त्यांना तोल सावरण्यासाठी आणि स्थैर्य येण्यासाठी याचा उपयोग होतो. ही रॉबरफ्लाय अथवा लूटारू माशी तीच्या नावाप्रमाणेच दहशतवादी असते. जमिनीलगत अगदी लहान झुडपावर किंवा गवताच्या पात्यावर ती दबा धरून बसते.

थंडीमध्ये गारठलेल्या फुलपाखरांना, पतंगांना किंवा इतर किटकांना ती सावज म्हणून शोधत असते. या किटकांनी जरा तिच्यासमोरून उडायला सुरवात केली की ती त्यांच्यावर झपाट्याने हल्ला करते. हवेतल्या हवेतच एखाद्या किटकाला पकडणे यात तीचा हातखंडा असतो. यात तीला साथ देतात ते तीचे काटेरी, मजबूत पाय. या काटेरी पायांमुळे पकडीत आलेले भक्ष्य तीच्याकडून सुटणे केवळ अशक्य ठरते.

आपल्यासारखे दात त्यांना नसल्यामुळे ती त्या पकडलेल्या भक्ष्याच्या शरीरात आपली सोंड खुपसते. या सोंडेतून आपली जहाल लाळ त्या भक्ष्याच्या शरीरात सोडते. यामुळे त्याच्या शरीरातील पेशींचे विघटन होऊन ती त्या भक्ष्याला एखाद्या "फ्रुटी"सारखे पिउन टाकते. मलूल, सत्वहीन अशे शरीर आणि पंख केवळ तीच्या तावडीतून खाली काही काळानंतर गळून पडतात. रंगीबेरंगी नसलेली, पंखावर किंवा शरीरावर काहीच नक्षी नसलेली ही लूटारू माशी दिसयला सुंदर, आकर्षक नक्कीच नसते. मात्र तीच्या डोळ्यात तीचे सारे सौदर्य साठवलेले असते.

अतिशय आकर्षक, मोठे टपोरे संयुक्त डोळे हे वेगवेगळे रंग परावर्तित करतात. क्षणात हे डोळे आपल्याला उन्हात चमकताना हिरवेगार पाचूसारखे दिसतात तर क्षणात जरा प्रकाश अथवा दिशा बदलली की ते एखाद्या माणकासारखे लालभडक भासू लागतात. परत थोडासा प्रकाश कमी झाला तर तेच डोळे अगदी निर्जीव काळेभोर दिसतात. एखाद्या गॉगलसारखे रंगीबेरंगी असणारे हे डोळे असतात मात्र एकदम प्रखर. त्यांच्या मोठ्या आकारामुळे त्यात मोठ्या प्रमाणावर भिंगे सामावलेली असतात. याच कारणामुळे त्यांना आजूबाजूची थोडीशीसुद्धा हालचाल सहज टिपता येते आणि थेट त्या किटकावर हल्ला चढवला जातो.

कमी उंचीवर शिकार करण्याच्या तीच्या पद्धतीमुळे हीचे छायाचित्रण करायला सोपे जाते. तीचे छोट्या झुडपावर दबा धरून बसणे किंवा शिकार आजूबाजूलाच खाली खात बसणे यामुळे ती आपल्याला सहज सापडू शकते. त्यात ती इतकी अधाशी आणि हावरट असते की एकदा का तीच्या तोंडात सावज असले तर ती जाम हलत नाही आणि मग तुम्हाला तीचे मनसोक्त छायाचित्रण करता येते. आत्तापर्यंत जेवढ्या वेळेला ह्या माशीला मी जंगलात बघीतले आहे त्याच्या निम्म्या वेळेला ती तीची शिकार पकडून बसली होती. मोठे चतूर, पतंग, सिकाडा, फुलपाखरे हे तीचे प्रमुख खाणे असले तरी अगदी बारीकसारीक किटकसुद्धा तीला खायला चालतात.

आताच गेल्या आठवड्यात येऊरच्या जंगलात अगदी सकाळी मी एका लूटारू माशीला बघितले. तीने नुकताच एक छोटा कीडा पकडला होता आणि त्याचे ती "रस"ग्रहण करत होती. रात्रभराच्या उपासाने तीचे पोट अगदी उपाशी आणि खपाटीला गेले होते. त्याला खाउन झाल्यावर तीने अजून एक पतंग पकडला. त्याला खाउन झाल्यावर तीचे अजून एक जवळच कीडा पकडला. मी तीचे जवळपास अर्धा तास निरिक्षण आणि छायाचित्रण करत होतो. या काळात तीने ५/६ किटक पकडून फस्त केले आणि अर्थातच माझ्या शेवटच्या शेवटच्या छायाचित्रात तीचे "भरलेले" आणि टम्म फुगलेले पोट दिसत होते. अनेक वेळा बघून, अनेक वेळा छायाचित्रण करूनसुद्धा या "गॉगल"वाल्या लूटारू माशीचे अजून अजून छायाचित्रण करायचा मोह काही टळत नाही एवढे मात्र खरे.


लेखक - युवराज गुर्जर

स्त्रोत - युवराज गुर्जर ब्लॉग

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate