অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जहरीले विंचू

जहरीले विंचू

जहरीले विंचू

शक्तीशाली दोन नांग्या आणि जहाल विषारी डंख मारणारी शेपटी असलेला विंचू म्हणजे आपल्याला कायम भितीदायकच वाटतो. पण प्रत्यक्षात मात्र हे विंचू अतिशय शांत आणि बऱ्याच वेळेला निरूपद्रवी असतात. अष्टपाद वर्गातील विंचवाच्या जगभरात सुमारे ८०० जाती आढळतात. विंचवाच्या वैशिष्ट्यपूर्ण शरीररचनेमुळे त्यांची वर्गवारी "स्कॉर्पिओनिडा" या खास वर्गात केली जाते. तुकड्या तुकड्यांनी बनलेले त्यांचे शरीर टोकाकडे निमुळते होऊन शेपटीचा आकार घेते. याच शेपटीच्या टोकाला विंचवाची सुप्रसीद्ध दंश करणारी नांगी असते. तर भक्ष्य पकडण्यासाठी शरीराच्या पुढील भागात दोन चिमट्याप्रमाणे नांग्या असतात. या बळकट हातांनी विंचू आपले भक्ष्य पकडतात, फाडतात आणि त्याचा जीवनरस शोषून घेतात. आकाराने सर्वात मोठे असलेले विंचू आफ्रिकेत आणि भारतात सापडतात आणि ते सहज एक फुटापर्यंत वाढतात.

 

विंचू त्याचे भक्ष्य पकडण्यासाठी जमिनीच्या स्पंदनांचा आणि वाऱ्याच्या दिशेचा वापर करतो. ही वाऱ्याची दिशा जाणवण्यासाठी त्यांच्या शरीरावर केस असतात. या केसांच्या सहाय्याने विंचवाला भक्ष्याच्या हालचालीने होणाऱ्या वाऱ्याची जाणीव होते. भक्ष्य पकडण्यासाठी विंचू आपल्या पुढच्या नांग्यांचा वापर करतो आणि आपल्या शेपटीत असलेल्या विषारी काट्यने त्याला डंख करून बेशुद्ध करतो. काही मोठ्या जातीचे विंचू मात्र त्यांच्या शक्तीशाली नांगीनेच त्यांची शिकार पकडतात आणि फाडून खातात. त्यांना बऱ्यचशा वेळेस त्यांचे विष वापरायची गरजच पडत नाही. हे विंचू फक्त द्रव पदार्थच घेऊ शकत असल्यामुळे ते त्यांनी शिकार केलेल्या प्राण्याच्या शरीराला त्यांच्या नांगीने फाडतात आणि त्यांचे लाळेसारखे द्रव भक्ष्याच्या शरीरात सोडतात. यामुळे त्या प्राण्याच्या शरीरातील अवयव त्या लाळेमुळे विरघळतात आणि यांना ते जीवनरष शोषून पिता येतात. हे विंचू अतिशय प्रतिकूल परिस्थीतीतसुद्धा अनेक दिवस अन्नाशिवाय राहू शकतात. मात्र ज्या वेळेस त्यांना शिकार मिळते तेंव्हा ते मोठ्या प्रमाणावर अन्न खाउन घेतात.

पुढे कित्येक दिवस त्यांनी अन्न मिळाले नाही तरी चालते आणि त्यांना त्यांच्या जगण्यासाठी अतिशय कमी उर्जा लागते. त्यांची पाण्याची गरजसुद्धा अशीच कमी असते आणि त्यांना त्यांच्या खाण्याच्या वेळेस मिळालेल्या द्रवावरच ते राहू शकतात. हे विंचू जसजसे वाढत जातात तेंव्हा ते इतर किटक किंवा साप यांच्याप्रमाणेच कात टाकतात. ही कात टाकण्याची प्रत्येक वेळ त्यांच्याकरता अतिशय महत्वाची आणि कठीण असते. या वेळेस त्यांचे शरीर इतके नाजूक असते की त्यांना ती कात व्यवस्थीत काढता आली नाही तर तिथेच त्यांचा मृत्यु ओढवतो किंवा या काळात त्यांना इतर प्राण्याचे भक्ष्य बनावे लागते.

हे विंचू अतिशत लाजरे बुजरे असल्यामुळे सहसा त्यांची आपली भेट होत नाही. त्यातून बरेचसे विंचू निशाचर असल्यामुळे त्यांचा जास्तीत जास्त वावर रात्रीच असतो. दिवसा मात्र जर आपण दगडांच्या कपारी किंवा छोट्या मोठ्या दगडांखाली बघितले तर आपल्याला बरेच वेगवेगळे विंचू दिसू शकतात. हल्ली शहरांमधे या विंचवांचे दिसणे होतच नाही पण गावात अजूनही पावसाच्या काळात हे विंचू घराच्या, शेताच्या आसपास दिसतात. यांच्या छायाचित्रणासाठी एकतर आपल्याला रात्री फिरावे लागते किंवा दिवसा ते सापडण्याच्या संभाव्य जागा शोधत बसावे लागते. अतिशय चपळ असणारे हे विंचू पटकन दगडाखाली, बिळात किंवा फटीत जाउन बसल्यामुळे दरवेळेस त्यांचे छायाचित्रण शक्य होतेच असे नाही. मी आतापर्यंत कान्हा, कॉर्बेट इथे मोठे ९/१० ईंचाचे काळे विंचू बघितले आहेत. पण सर्वात जास्त आणि वेगवेगळ्या जातीचे विंचू बघितले ते कर्नाटकातील दांडेलीच्या जंगालात. या जंगलात रात्री बाहेर पडलो आणि एक दोन विंचू बघितले नाहीत असे कधी झालेच नाही.

फणसाडच्या किंवा येऊरच्या जंगालात सुद्धा दगडांचे उलथापालथ केल्यावर अनेक विंचू आढळले, अगदी नुकते कात टाकलेले नाजूक आणि मऊ शरीराच्या विंचवांचेसुद्धा छायाचित्रण केले. आतामात्र "विंचवाचे बिर्हाड पाठीवर" या म्हणीप्रमाणे विंचवाची मादी आणि तिच्या पाठीवर तीची छोटी छोटी पिल्ले असे छायाचित्र कधी मिळेल याचीच वाट बघतोय.

लेखक - युवराज गुर्जर

स्त्रोत - युवराज गुर्जर ब्लॉग

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate