অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

देवाने धाडलेले किटक

देवाने धाडलेले किटक

ह्या किटकाला लेडी बीटल अथवा लेडीबर्ड बीटल असे म्हणतात. या किटकाच्या जवळपास सर्व जाती आपल्याला खुप उपयोगी ठरतात. ह्यांचा आकर्षक आकार आणि रंगसंगती यामुळे एकंदरच यांच्याबद्दल चांगले मत असते आणि फ्रेंच लोक तर यांना "देवाने धाडलेले किटक" असेच संबोधतात. आज जगभरात ह्यांच्या ४००० हून अधिक जाती आढळतात आणि त्यातील बहूतकरून सर्व ह्या त्यांच्या पंखांवरील ठिपक्यांच्या रचनेमुळे वेगवेगळे ओळखता येतात. इतर ढालकीड्यांप्रमाणेच या लेडीबर्ड ढालकीड्याचासुद्धा पुर्ण जीवनक्रम असतो आणि अंडी, अळी, कोष व प्रौढ अश्या चारही अवस्था असतात. साधरणत: अंडी ते प्रौढावस्था ह्या एकंदर कालावधीस ३/४ आठवड्यांचा काळ जावा लागतो.

झाडाच्या पानाखाली सुक्ष्म, पिवळी, लांबट १० ते ५० अंडी समुहात घातली जातात. ह्या अंड्यातून ३ ते ५ दिवसात अळी बाहेर येते. ही अळी मावाकीड्यांवर वाढते आणि तीच्या या वाढीसाठी तीला अंदाजे २ ते ३ आठवडे लागतात. यानंतर तीचा कोष होतो आणि त्या कोषातून प्रौढ किटक अंदाजे ७ ते १० दिवसानंतर बाहेर येतो.

ह्या ढालकीड्यांमधे प्रौढ किटक आणि त्यांच्या अळ्या हे दोघेही मावा कीड्यांवर तुटून पडतात. त्याच बरोबर पिकांवर, फुलबागांवर येणारे इतर त्रासदायक किटकही त्यांना खाण्यासाठी चालतात. यांचे एक अळी अंदाजे ४०० मावा कीडे तीच्या अवस्थेमधे फस्त करते आणि प्रौढ कीडा त्याच्या आयुष्यामधे अंदाजे ५००० हून अधिक मावा कीडे फस्त करतो. याच कारणाकरता परदेशात हे लेडीबर्ड ढालकीडे शेतकऱ्यांना मावा कीड्यांचा नाश करायला विकले जातात. हे कीडे एकाच जागेवर वर्षांमागुन वर्षे जमतात. त्यामुळे या किटकांना या जागांवर पकडून मग त्यांना शेतकऱ्यांना, बागायतदारांना विकले जाते. शेतकऱ्यांना मात्र नैसर्गिक कीड नियंत्रण झाल्याने त्याचा अतोनात फायदा होतो.

ह्या ढालकीड्यांना बचावाकरता काही आश्चर्यकारक नैसर्गिक साधने बहाल केलेली आहेत. त्यांचा लाल, भगवा, काळा रंग पक्ष्यांना हे काही फारसे चांगले खाणे नाही याची जाणीव कायम करून देतो. पक्ष्यांना उपजतच जाण असते की जे किटक लाल, भगवे, पिवळे, काळे असतात ते एकतर विषारी असतात किंवा त्यांची चव अतिशय घाणेरडी असते, त्यामुळे ते सहसा अश्या रंगाच्या किटकांच्या वाटेला जात नाहीत. अर्थातच यामुळे हे किटक जरी चावत नसले तरी वाईट चवीचे नक्कीच असतात. त्याच प्रमाणे जेंव्हा त्यांना धोक्याची जाणिव होते तेंव्हा ते मेल्याचे सोंग घेतात. बऱ्याच शिकारी प्राणी पक्ष्यांना जीवंत भक्ष्य खायची सवय असल्यामुळे सहसा ते मृत प्राण्याकडे ढुंकूनही बघत नाहीत. याशीवाय हे कीडे आपल्या पायाच्या सांध्यातून एक खास प्रकारचा घाण वास येणारा स्त्राव सोडतात, यामुळे भक्षक त्यांच्यापासून लांबच रहाण्यात समाधान मानतात.

हा लेडीबर्ड ढालकीडा खरातर भलताच लहान म्हणजे जेमतेम मसुराच्या दाण्याएवढा आणि क्वचीतच दिसणारा. त्यामुळे ठरवून याचे छायाचित्रण मुश्कीलच असते. पण कधी कधी मात्र नशीबाने साथ दिली तर अशी दृश्येसहज मिळूनही जातात. पुणे शहरात सहज टेकडीवर फिरायला गेलो असताना, फुलपाखरांच्या अळ्या शोधता शोधता एका पानावर हा ढालकीडा आजूबाजूच्या मावा कीड्यांवर ताव मारताना आढळला. मात्र सतत पाउस असल्याने याची जास्त काही छायाचित्रे काढता आली नाहीत. तरीसुद्धा त्या थोड्या वेळात या कीड्याने २/३ मावा कीडे फस्त केले. दुसऱ्या छायाचित्रात ह्या लेडीबर्ड ढालकीड्याची अळी दिसत आहे. ही अळी आकाराने प्रौढ ढालकीड्यापेक्षा मोठी असते. भयंकर चपळ असणारी ही अळी सतत एका पानावरून दुसऱ्या पानावर धावपळ करत असते.

 

लेखक - युवराज गुर्जर

स्त्रोत -  युवराज गुर्जर ब्लॉग

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate