অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पिठ्या ढेकूण

पिठ्या ढेकूण

(ढेकण्या, चिकटा). कीटकांच्या कॉक्सिडी या उच्च व महत्वाच्या कुलातील पिठ्या ढेकूण हे लहान कीटक जगाच्या बहुतेक सर्व भागांत आढळतात. होमोप्टेरा गणात त्यांचा समावेश होतो. पिठ्या ढेकणांचे साधारणत दोन गटांत वर्गीकरण करता येईल :

१) आखूड शेपटीचे, अंडी घालणारे, सामान्य (स्यूडोकॉकस सिट्री; स्यू. गहामी; स्यू. लाँगिस्पायनस; स्यू. मॅरिटिमस) व मेक्सिकन पिठ्या ढेकूण (फेनोकॉकस गॉसिपी

(२) लांब शेपटीचे, अंडी न घालणारे आणि अर्भकावस्था असणारे पिठ्या ढेकूण (स्यू. अडोनिडम).

साधारणत: दोन्ही गटांतील नर अतिशय लहान असतात. त्यांना चोच नसते. ते काही खात नाहीत व त्यांची पचनसंस्था अक्रियाशील असते. प्रौढ नराला अग्रभागी सु. १० खंडांची शृंगिका (सांधेयुक्त लांब स्पर्शेंद्रिय) असते; काही ठिकाणी २५ खंडांची शृंगिका आढळल्याचीही नोंद झाली आहे. डोळे संयुक्त असतात [ डोळा]. पायांची पूर्ण वाढ झालेली असते. मागील पंखांचे गदाकृती संतोलकात (तोल सांभाळणार्‍या अवयवात) रूपांतर झालेले असते. पंखांवरील सिराविन्यास (शिरांची जाळी) अतिशय र्‍हास पावलेला असतो. मादी बहुधा स्थानासक्त असते. पाय नसताना आणि असलेच तर अक्रियाशील असतात पंख नसतात.

शरीर मऊ किंवा गुल्मासारखे (गाठी सारखे) असते; शरीरावर चूर्णमय किंवा मेणचट किंवा खवल्यांचे वा इतर कठीण स्त्रावाचे आच्छादन असते. काही जाती आपल्याभोवती मोत्यासारखे कवच निर्माण करतात. मादीला चोच आणि शृंगिकाही असतात. डोळे अतिशय साधे असतात व ते नेत्रकांसमान (प्रकाशग्राही पेशीसमूहांच्या समान) असतात. कापसासारख्या मेणाच्या पिशवीत मादी ३०० ते ६०० अंडी घालते. मादी एक किंवा दोन आठवडे अंडी घालून लगेच मरते.

मादीला अनेक ग्रंथी व छिद्रे असतात. दोन ते चार मालपीगी नलिका (निरूपयोगी द्रव्ये शरीराच्या बाहेर टाकण्याच्या नलिकाकार ग्रंथी; मार्चेल्‍लो मालपीगी या इटालियन शास्त्रज्ञांच्या नावाने ओळखण्यात येणार्‍या नलिका) असतात. अंडी ६ ते २० दिवसांत उबून पिले बाहेर पडतात. ती पानांचा रस शोषून वाढतात. सु. चार महिन्यांच्या कालावधीत त्यांची पूर्ण वाढ होते. नराप्रमाणे मादीला कोषावस्था नसते. वर्षातून साधारणत दोन ते चार वेळा वीण होते. काही जातींत अनिषेकजनन होते.

उपद्रव

पिठ्या ढेकूण कागदी लिंबाच्या झाडावर आक्रमण करतात. अनेक शोभिवंत वृक्ष तसेच पादपगृहात (नियंत्रित परिस्थिती ठेवलेल्या बंदिस्त ठिकाणी) वाढविण्यात येणार्‍या शोभिवंत वनस्पती यांना हे पीडक आहेत. मादी व रांगणारे प्रौढ पानाच्या मागील बाजूस जमतात. सुईच्या आकाराचे अत्यंत तीक्ष्ण असे मुखभाग त्यांना असल्यामुळे वनस्पतींच्या ऊतकात (समान रचना व कार्य असणार्‍या पेशींच्या समूहात) ते शिरून त्यातील रस शोषतात. काही जाती नारिंगांचा नाश करतात. स्यूडोपोडस ब्रेव्हिपस या जातीमुळे झाडांची पाने पिवळी पडतात व जळतात. जमिनीवरील पिठ्या ढेकूण र्‍हायझोइकस टेरेस्ट्रीस गवताच्या मुळांना व लागवडीतील पिकांना उपद्रवी असतो.

नियंत्रण

या कीटकांच्या वसाहतींवर लहान ब्रशाने घासल्यास किंवा त्यांवरून अल्कोहॉलात बुडविलेला कापडाचा बोळा फिरविल्यास त्यांचे निर्मुलन होते.

कॅक्टस आणि रबर वृक्ष यांच्या पानांवर पाण्याचा तीव्र फवारा मारल्यासही त्यांवरील पिठ्या ढेकूण दूर होतात. कार्बनी कीटकनाशकांचा (उदा., मॅलॅथिऑन वगैरेंचा) फवाराही उपयोगी ठरतो.

 

जमदाडे, ज. वि.

कुलकर्णी, सतीश

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate