অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भलामोठ्ठा टारांटूला....

भलामोठ्ठा टारांटूला....

भलामोठ्ठा टारांटूला....

आपल्याला कोळी म्हटले की घराच्या खोलीत कोपऱ्यात केलेले त्याचे छोटे जाळे किंवा खिडकीच्या तावदानावरून उड्या मारणारा कोळी एवढेच ज्ञान असते. कधी कधी त्याचे जाळे किती मजबूत आणि उपयोगी असते यावर एखादा लेख आपण वाचलेला असतो. घरातल्या गृहीणींना तर “काय मेले कोळीष्टके करून ठेवतात, सारखी सारखी साफ करावी लागतात” असेच वाटत असते. पण स्पायडरमॅन चित्रपटामुळे कोळी आपल्याकडे मुलांमधे भलतेच "पॉप्युलर" झाले आहेत. पण नवलाची गोष्ट अशी की आपल्या भारतात हजारो जातीचे वेगवेगळे छोटे मोठे कोळी आढळतात. अगदी यात महाकाय टारांटूला सारखे ६/७ ईंचाचे कोळी सुद्धा आहेत आणि त्यांची एवढी विविधता आपल्याकडे आहे की देशविदेशातले अभ्यासक त्यांच्याकरता इथे भारतात येतात.


मला मात्र अचानकच या भल्यामोठ्या कोळ्याला बघता आले. २००३ साली मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मी किटकांच्या अभ्यासाकरता / छायाचित्रणाकरता गेलो असताना मला तिथे डॉ. धर्मेंद्र खंडाल याने का कोळी दाखवला आणि जमिनीत एखाद्या उंदराचे जसे मोठी बिळ असते तसे या कोळ्याचे घर दाखवले. त्याच वेळेस त्याने मला सांगितले होते की ती नेमकी जात ही जमिनीवरची होती पण तश्याच काही जाती या झाडावर रहाणाऱ्या असतात आणि झाडाच्या ढोलीत त्या रहातात. या झाडावर रहाणाऱ्या जाती दिसायला जास्त सुंदर असतात आणि त्यांच्या पायांचा आतल्या भागाचा रंग पिवळाजर्द असतो आणि म्हणूनच त्यांना इंग्रजीमधे “यलो थाय टारांटूला” असे संबोधतात. मुंबईमधे मात्र हे कोळी दिसत असल्याची नोंद नव्हती.


यानंतर मी सप्टेंबर २००५ मधे "बटरफ्लाय मीट" साठी केरळच्या अरालम या जंगलात गेलो होतो. केरळमधील घनदाट सदाहरीत जंगल यामुळे तीथे दिसणारे पक्षी, साप, किटक हे एकदम "खास" होते. शेवटच्या दिवशी आम्ही आमचा शेवटचा फेरफटका संपवून बाहेर येत होतो तेंव्हा मला एका भल्यामोठ्या झाडावर हा अवाढव्य कोळी दिसला. अवाढव्य म्हणजे तो माझ्या पंज्यापेक्षा मोठा आणि ६ इंचापेक्षासुद्धा लांब होता. त्याचे शरीर केसाळ आणि जाडजूड होते. त्याचा रंग काहीसा राखाडी आणि त्यावर बारीक ठिपके, रेषा होत्या. झाडाच्या खोडावर त्याचा रंग अतिशय मिळून मिसळून गेला होता. थोडीफार छायाचित्रे घेतल्यावर त्याने हळूहळू हालचाल सुरू केली. एखाद्या मोठ्या, केसाळ पण भयावह "सॉफ्ट टॉय" प्रमाणे तो दिसत होता. वरून त्याचा रंग जरी राखाडी, मातकट असला तरी त्याच्या मांड्या जर्द पिवळ्या रंगाच्या होत्या. ह्यामुळे मला त्याला लगेच ओळ्खता आले की हाच तो "यलो थाय" किंवा इंडीयन ऑरनामेंटल स्पायडर. केरळमधल्या त्या जंगलामधे याआधी कोणी तो कोळी बघितला नव्हता त्यामुळे तिथेले स्थानिक निसर्गप्रेमी आणि वन अधिकारी माझ्यावर खुप खुष झाले होते. त्यावेळी आमच्या बरोबर जागतिक किर्तीचे छायाचित्रकार श्री. टी. एन. ए. पेरुमल होते, त्यांना जेंव्हा मी हा कोळी दाखवला तेंव्हा तेसुद्धा अचंबित झाले आणि त्यांनीसुद्धा त्या कोळ्याची लगोलग छायाचित्रे काढण्यास सुरवात केली.


हे कोळी झाडावर रहातात आणि नेहेमीच्या कोळ्यासारखे जाळे न विणता झाडाच्या खोबण्यांमधे, बिळासारख्या भोकात रहातात.  अर्थातच त्या बीळाला मऊ आणि मजबूत धाग्यांनी सजवलेले असतेच. हे कोळी निशाचर असतात आणि दिवसा सहसा दिसत नाहीत. जर योग्य आसरा आणि पुरेसे खाणे असेल तर ते सहसा त्यांची रहाण्याची जागा बदलत नाहीत. यांच्या माद्या अंड्यांबरोबरच पिल्लांचे संगोपनसुद्धा काळजीपुर्वक करतात आणि ही पिल्ले पुढे कित्येक दिवस त्यांच्या आईसोबतच रहातात. हे कोळी पुर्णपणे मांसाहारी असून आपल्या बीळाच्या टोकावर पाय बाहेर काढून भक्ष्याची वाट बघत रहातात. आजूबाजूने जाणारे पक्षी, सरडे, पाली किंवा किटक ह्यांच्यावर झपाट्याने झडप घालून त्यांचा ते चट्टामट्टा करतात. आज जगभरात यांच्या ८०० जाती आहेत आणि भारतातसुद्धा आज ५०हून अधिक जाती आढळतात.


यानंतर या महाकाय कोळ्यांच्या मी सतत मागावर राहिलो. मला माहिती मिळाली की फणसाड अभयारण्याच्या वनखात्याच्या निवासाच्या दरवाजातच असलेल्या वडाच्या झादावर हे कोळी हमखास दिसतात, म्हणून मी तिथे गेलो. पण तिथे गेल्यावर तिथल्या वनरक्षकाने सांगितले की त्या कोळ्याने ते “झाड” सोडले आहे. त्यांनतर मला गोव्याच्या “तांबडी सुर्ला” जंगलात तसलाच पण अजुन रंगीत कोळी दिसला. त्याचे पोट चक्क गुलाबी होते आणि पायावर जांभळी झळाळी होती. यानंतर काही दिवसांनी मी परत फणसाडच्या जंगलात गेलो. रात्री जंगलात आम्ही या कोळ्यांची घरे तपासत फिरत होतो आणि तिथे एका मोठ्या झाडावर आम्हाला त्याचे बिळ सापडले. नवलाची गोष्ट अशी की तिथे त्या घरात एक मोठी मादी आणि तिची ३/४ छोटी पिल्लेसुद्धा दिसत होती.


माथेरानच्या जंगलात सुद्धा हे कोळी आपल्याला सहज दिसतात. अर्थात हे कोळी निशाचर असल्यामुळे यांना बघायला आपल्याला अगदी रात्रीच जंगलात जावे लागते. दिवसामात्र हे कोळी त्यांच्या बिळात शांत झोपून असतात त्यामुळे अगदी क्वचितच ते बाहेर खोडावर दिसतात. या पावसाळ्यात माथेरानच्या जंगलात एका झाडावर यांची मला १०/१२ पिल्ले दिसली. ही पिल्ले एवढी लहान होती की ती त्या भल्यामोठ्या टारांटूलाची पिल्ले आहेत हे सांगूनही पटत नव्हते. ही पिल्ले अतिशय लाजरी आणि सजग असल्यामुळे जराजरी हालचाल झाली की लगेचच बिळात पळायची आणि त्यामुळे मला काही त्यांची छायाचित्रे काढता आली नाहित. मात्र त्या एका रात्रीत आम्हाला त्या जंगलात ही पिल्ले सोडून जवळपास ५/६ मोठे कोळी वेगवेगळ्या भागातल्या जंगलांमधे दिसले. आता हे कोळी त्यांची शिकार कशी काय करतात हे बघण्याकरता रात्रभर तिथे बसायचा विचार आहे.

लेखक - युवराज गुर्जर

स्त्रोत - युवराज गुर्जर ब्लॉग

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate