অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मधमाशी

मधमाशी

हायमेनॉप्टेरा गणाच्या क्लीस्टोगॅस्ट्रा उपगणातील एपॉयडीया या अधिकुलात कीटकांच्या सु. २०,००० जाती आहेत.

कोष्टक क्र ७. जगातील प्रमुख मध उत्पादक देशांतील १९७९ मधील मधाचे उत्पादन.

देश

उत्पादन (टनांत)

अंगोला

१५,०००

अमेरिकेची संयुक्त संस्थाने

१,०७,६००

अर्जेंटिना

२८,०००

ऑस्ट्रेलिया

१७,८००

इथिओपिया

२०,०००

कॅनडा

२९,७५०

ग्रीस

८,९००

चीन

२,५७,०००

तुर्कस्थान

२१,०००

पश्चिम जर्मनी

१४,०००

पोलंड

१५,०००

बल्गेरिया

८,४००

मॅलॅगॅसी

१२,२००

मेक्सिको

५६,०००

रशिया

२,२०,०००

रूमानिया

१५,५००

स्पेन

१०,०००

जागतिक एकूण उत्पादन

१०,३१,०२६

या सर्व कीटकांना इंग्रजीत ‘बी’ या सामान्य नावाने ओळखण्यात येते. त्यांपैकी मधमाशी हा एक कीटक होय. या अधिकुलाचे तेरा कुलांत विभाजन केले आहे. यांपैकी एपिडी या कुलात मधमाश्यांचा समावेश होतो. एपिस हा मधमाश्यांचा मुख्य वंश होय. या वंशातील सर्व मधमाश्यांना नांगी असते. आणि त्यांना दुखावल्यास त्या नांगी मांरतात. या मधमाश्यांचे दोन विभाग करता येतील. पहिल्या विभागात प्रकाशात एकच पोळे बांधणाऱ्या एपिस डॉरसॅटा व ए. फ्‍लोरिया या मधमाश्या, तर दुसऱ्या विभागात जास्त फण्या अससलेली आणि अंधारात, झाडांच्या ढोल्यांत किंवा दगडांच्या कपारीत पोळी बांधणाऱ्या ए. मेलिफेरा व ए. इंडिका या जातींच्या मधमाश्या समाविष्ट आहेत.

ए. मेलिफेरा

ही मधमाश्यांची जगातील प्रसिध्द जाती आहे. या जातीच्या मधमाश्या यूरोप व आफ्रिकेत आढळतात. यूरोपातून ती अमेरिकेत नेण्यात आली. यूरोप आणि अमेरिकेतील या जातीच्या उपजाती पुढीलप्रमाणे आहेत :

(१) इटालियन,

(२) कॉकेशियन,

(३) कार्निओलान व

(४) जर्मन.

याच जातीच्या आफ्रिकेतील उपजाती

(१) इंटरमीसा,

(२) लामास्की (ईजिप्शयन),

(३) कॅपेन्‍सिस (केप),

(४) अँडॅन्सोनी (आफ्रिकी) या आहेत.

ए. डॉरसॅटा, ए. इंडिका व ए. फ्लोरिया या भारतात आढळणाऱ्या मधमाश्यांच्या प्रमुख जाती आहेत.

मधमाशी या कीटकाचा मानवाशी संबंध सु. ४,००० वर्षांपूर्वी आला असावा. वेदकालीन वाङ्‍मयात व इतर धार्मिक ग्रंथात मधमाशी व मध यांचे उल्लेख आहेत. माणसाळविलेल्या प्राण्यांत मधमाशीचे स्थान फार महत्त्वाचे आहे.

निरनिराळ्या जातींच्या मधमाश्यांच्या आकारमानात खूपच फरक आहे. ए. फ्लोरिया ही मधमाशी आकारमानाने सर्वांत लहान आहे. हिची लांबी ८ते १३ मिमी. असते. ए. डॉरसॅटा ही मधमाशी १८ ते २१ मिमी. लांब असते. पूर्ण वाढ झालेल्या मधमाशीच्या शरीराचा रंग काळा किंवा तपकिरी असतो.

शरीररचना

शरीरावर केसांचे आवरण असते. डोके वक्षाइतकेच (छातीइतकेच) रूंद असते व पुढून पाहिल्यास त्रिकोणी दिसते. ते वक्षाला पटलयुक्त अरूंद मानेने जोडलेले असते. बाजूस असलेले संयुक्त डोळे अंडाकृती असतात व डोक्यावर तीन अक्षिका (साधे डोळे म्हणजे प्रकाशग्राही कोशिकांचे-पेशींचे-समूह व अधून-मधून रंगद्रव्ययुक्त कोशिका यांनी बनलेले डोळे) असतात ["डोळा]. उदोष्ठधर (भालाच्या अग्रभागी असणारे कॅल्शियमयुक्त पट्ट) लांबट, जिव्हा लांब, उत्तर स्पर्शक (मुखाच्या मागे असलेले सांधेयुक्त संवेदी उपांग) एक खंडाचा बनलेला असतो. पंखांच्या दोन जोड्या लांब आणि निरूंद असून अग्र (पुढील) पंखांवर शिरा असतात. पाय बळकट; उदर छेदित (रूंद टोक असलेले), लांबोळके पण शरीराच्या इतर भागांपेक्षा कमी केसाळ असते. उदराचा सहावा खंडबहिरागत (इतर भागांच्या मानाने पुढे आलेला) असून उदराच्या शेवटी वाकडी, काटेरी नांगी असते. ["कीटक.]

मधमाशीचा पचनमार्ग मुख, ग्रसनी (घसा), ग्रसिका (ग्रसनी ते जठरापर्यंतचा भाग; यात विस्तारित झालेला आणि मधु-जठर या नावाने ओळखण्यात येणारा भाग असतो),संबंधित लाला ग्रंथी, जठर (यात अन्नाचे पचन व शोषण होते), अग्रांत्र (आतड्याचा पुढील भाग) व गुदांत्र यांनी बनलेला आतड्याचा भाग व शेवटी गुदद्वार असा असतो. उत्सर्जक इंद्रिये (मालपीगी नलिका; मार्चेल्लो मालपीगी या शास्त्रज्ञांच्या नावाने ओळखण्यात येणाऱ्या नलिका) रक्तातील निरूपयोगी द्रव्ये पचनमार्गात जठर व गुदांत्र यांच्या संधिस्थानापाशी सोडतात.

रक्ताभिसरण तंत्र (संस्था)

हे विवृत (खुले) असून अंतर्गत इंद्रिये रक्ताने आवेष्टिलेली असतात. पचन झालेले अन्नद्रव्य रक्ताद्वारे ऊतकांकडे (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहांकडे) वाहून नेले जाते व चयापचयात (शरीरात सतत होणाऱ्या भौतिक आणि रासायनिक घडामोडींत) निर्माण होणारी निरूपयोगी द्रव्येही वाहून नेली जातात. नलिकाकार हृदय रक्ताभिसरणाचे कार्य करते. बाह्य वातावरणाला (श्वसन रंध्रांनी) जोडलेल्या नलिकांच्या बनलेल्या श्वसन तंत्राद्वारे जरूर त्या इंद्रियाला ऑक्सिजन पुरविला जातो व निरूपयोगी कार्बन डाय-ऑक्साइड बाहेर काढून टाकला जातो.


स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate