অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गरुड

गरुड

गरुड

पक्षीवर्गाच्या फॅल्कॉनिफॉर्मिस गणातील अ‍ॅक्सिपिट्रिडी कुलातील शिकारी पक्षी. घार, ससाणा, गिधाड इ. पक्ष्यांचा या कुलात समावेश होतो. सोनेरी, पिंगट, शिखाधारी, मत्स्याहारी, पहाडी, कृपण, ठिपक्यांचा, शाहाबाज, सर्प, टकल्या, बादशाही असे गरुडांचे प्रकार आहेत. पिंगट गरुडाचे शास्त्रीय नाव अ‍ॅक्विला रॅपॅक्स आहे. रंगावरून त्याला ‘पिंगट गरुड’ म्हणतात. हा गरुड भारत, पाकिस्तान, नेपाळ, बांगला देश इ. ठिकाणी आढळतो.

साध्या घारीपेक्षा हा पक्षी आकाराने मोठा असतो. शरीराची लांबी ६०-९० सेमी. असते. शरीर सामान्यतः तपकिरी असते पण पुष्कळदा रंग मळकट पिवळसर, तपकिरी किंवा तांबूस तपकिरी असतो. शेपूट गडद करड्या तपकिरी रंगाचे असते. माथा बसका, चोच जाड, मजबूत, टोकाशी वळलेली व तीक्ष्ण असते. पाय बोटांपर्य़ंत पिसांनी झाकलेले असून रंगाने तपकिरी पिवळे असतात. पायाची बोटे पसरट असतात. नख्या बाकदार व टोकदार असतात. नर व मादी रंगरूपाने सारखे दिसतात. मादी ही नरापेक्षा मोठी असते.

गरुड एकेकटे किंवा जोडीने राहतात. मनुष्यवस्तीपासून दूर राहणे पसंत करतात. आकाशात घिरट्या घालीत ते भक्ष्याची टेहळणी करीत असतात व झाडाझुडपात डोकावतात. ते उडताना पंखांची टोके पसरलेल्या हाताच्या पंजांसारखी दिसतात. पंखाची फडफड न करता फक्त तरंगत मोठे अंतर तो पार करतो. पिंगट गरुड धाडसी पक्षी आहे. त्याचे डोळे इतर पक्ष्यांच्या मानाने मोठे असतात. अनेक पक्ष्यांची दृष्टी माणसांपेक्षा तीक्ष्ण असते. गरुड आणि ससाणा यांची दृष्टी सर्व पक्ष्यांपेक्षा तीक्ष्ण असते. आकाशात खूपच उंच उडत असतानाही तो आपले भक्ष्य पकडण्यासाठी हवेत सूर मारून वेगाने खाली येतो आणि नख्यांच्या मदतीने तो भक्ष्य पकडतो. हा पक्षी साप, सरडे, पक्षी, ससे, घुशी, उंदीर यांना पायात घट्ट पकडून आणि उचलून नेतो व खातो. तो मोठे कीटक व मृत जनावरांचे मांसही खातो. त्यामुळे तो परिसर स्वच्छ राखण्याचे काम करतो. भक्ष्याची शिकार फक्त दिवसा करतो. लहान कोकरू उचलून नेण्याएवढी शक्ती त्यांच्यामध्ये असते. अ‍ॅमेझॉनमधील एक प्रकारचा गरुड झाडावरील माकडही उचलून नेतो.

गरुडाचे घरटे उंच झाडाच्या शेंड्यावर, कडेकपारीत किंवा सुळक्यावर बांधलेले असते. अशा ठिकाणी इतर प्राणी सहजासहजी जाऊ शकत नाहीत. घरटे १.५ ते २ मी. व्यासाचे, मोठ्या आणि बळकट काटक्यांनी तयार केलेले असते. त्याची आतील बाजू पाने, नारळाच्या शेंड्या, कीटकांना पळवून लावणा-या वनस्पती यांनी आच्छादलेली असते. प्रजननाचा काळ नोव्हेंबरपासून एप्रिलपर्य़ंत असतो. मादी दोन ते तीन अंडी घालते. अंडे सु. ७५ मिमी. व्यासाचे, पांढरट रंगाचे आणि तपकिरी ठिपक्यांचे असते. घरट्यामध्ये मादी अंडी उबविते. अंड्यांतून ४३-४५ दिवसांनंतर पिले बाहेर येतात. नर व मादी दोघेही पिल्लांना भरवितात. ते ६६-७५ दिवस पिलांची काळजी घेतात. कारण त्यांची पिले दिर्घकाळ अन्नासाठी व रक्षणासाठी त्यांच्यावर अवलंबून असतात. एखादा शिकारी पक्षी घरट्याकडे चाललेला दिसताक्षणी नर व मादी खाली झेपावून त्याला पिटाळून लावतात. गरुडाची जोडी एकच घरटे अनेक वर्षे वापरते. दरवर्षी केलेल्या नव्या डागडुजीने घरटे मोठे होत जाते. गरुडाचा आयु:काल २५-३० वर्षांचा असतो.


स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate