অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

तुरेवाला बुलबुल

तुरेवाला बुलबुल

आपल्याकडे शहरात, गावात अतिश्य सहज दिसणाऱ्या पक्ष्यांमधे बुलबुल हा पक्षी आहे. या बुलबुलांच्या भारतात अनेक जाती आढळतात. त्यातील अगदी सर्रास घराच्या आसपास दिसणाऱ्या जाती म्हणजे रेड वेंटेड बुलबुल अथवा लालबुड्या बुलबुल आणि रेड व्हिस्कर्ड बुलबुल अथवा तुरेवाला बुलबुल. आज मात्र या तुरेवाल्या बुलबुलाचे शहारात दिसण्याचे प्रमाण खुप कमी झालेले आहे. पण थोडे गावाच्या, शहराच्या बाहेर गेलो तर खुरट्या जंगलामधे, झाडीमधे हे बुलबुल हमखास दिसतात. साधरणत: हा पक्षी ७ ईंचाएवढा आकाराने असतो. ह्या पक्ष्याचा वरचा रंग गडद तपकिरी असतो तर पोटाकडे ते शुभ्र पांढरे असतात. डोक्यावर लांब, ऐटदार काळ्या रंगाचा तुरा असतो.

डोळ्याच्या मागे लाल रंगाची पिसे थोडीशी बाहेर आलेली असतात आणि म्हणूनच याचे इंग्रजीमधे नाव रेड व्हिस्कर्ड बुलबुल असते. शेपटीच्या सुरवातीस पण असाच लालसर, भगवा रंग असतो. या पक्ष्यांचे नर मादी दोघेही दिसायला सारखेस असतात पण लहान पक्ष्यांचा रंग थोडासा फिकट असतो.

या पक्ष्यांचे प्रमुख अन्न फळे, फुलांच्या कळ्या, फुलांतील मधूरस किंवा किटक असतात. खाणे मिळवण्यासाठी ते सहसा जोडीने किंवा मोठ्या थव्याने फिरतात आणि मोठ्या मोठ्याने किलबिलाट करत फळझाडांवर उतरतात. पावसाळ्यात यांचा विणीचा हंगाम असतो. नर मादी दोघेही झाडावर कमी उंचीवर, फांदीच्या बेचक्यात कपच्या आकाराचे गोलाकार घरटे विणतात. हे घरटे झाडांची मुळे, पाने यापासून बनवलेले असते आणि आतमधे पिल्लांच्या सुरक्षिततेसाठी कापूस, कोळ्याची जाळी असे तलम अस्तर वापरले जाते. मादी साधरणत: ३ किंवा ४ अंडी घालते. ही अंडी फिकट गुलाबी रंगाची असून त्यावर गडद लाल रंगाचे ठिपके किंवा चट्टे असतात. नर मादी दोघेही अंडी उबवण्याचे आणु पिल्लांचे संगोपन करण्याचे बरोबरीने करतात. या जातीतील इतर पक्ष्यांप्रमाणेच यांची पिल्ले जन्मजात पिसेविरहीत आणि डोळे बंद असलेली असतात.

हे पक्षी अतिशय सहज दिसतात त्यामुळे सहजीकच आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. अर्थात अश्या सहज दिसणाऱ्या पक्ष्यांचे छायाचित्रण फारसे होत नाही. सध्या शहरात हे बुलबुल दिसत नसल्यामुळे यांचे छायाचित्रण काही शहरात शक्य झाले नाही. मोठ्या जंगलात गेल्यावर अर्थातच मोठी सस्तन प्राणी, गरूड अथवा खास जंगलात आढळणारे पक्षी यांच्याकडेच जास्त लक्ष दिले गेले आणि या सतत दिसणाऱ्या बुलबुलाचे छायाचित्रण राहून गेले. या वर्षी साताऱ्याजवळच्या कासच्या पुष्प पठारावर फुलांचे छायाचित्रण करायला गेलो असताना एका लहान झुडपावर पक्ष्यांचा कलकलाट ऐकू आला.

थोडे जवळ जाउन निरिक्षण केल्यावर आढळले की या तुरेवाल्या बुलबुलाची जोडी तिथे बसलेली होती. त्यांचे एकंदर वागणे, उडणे आणि कलकलाट ऐकून ते प्रचंड अस्वस्थ आहेत हे जाणवत होते. थोडावेळ तिथे थांबल्यावर माझ्या लक्षात आले की त्यांचे पिल्लू घरट्यातून खाली पडले होते आणि त्यांना खालच्या झाडीत ते नीट शोधता येत नव्हते. त्या पिल्लाच्या काळजीमुळे त्यांचा जीव कावराबावरा झाला होता. इतक्यात ते पिल्लू हळूहळू छोट्या उड्या मारत वरच्या फांदीवर आले. यामुळे त्या पक्ष्यांना हायसे वाटले आणि ते त्याच्या भोवती घिरट्या घालू लागले. त्यांना आता खात्री पटली होती की त्यांचे पिल्लू व्यवस्थीत आणि सुरक्षीत आहे. पिल्लू अजून वरच्या फांदीवर जाउन विसावले आणि मग हे दोघेही पक्षी त्याला तिथे सोडून निघून गेले.

नर पक्ष्याने त्याच्यासाठी एक मोठा नाकतोडा पकडून आणला आणि त्याला भरवला. असाच पौष्टीक अन्न त्यांनी अजून त्याला एक दोन दिवस भरवले तर ते सहज त्यांच्या एवढे लिलया उडायला शिकू लागेल आणि त्याच्यासुद्धा पंखात त्याच्या पालकांएवढेच बळ सहज येईल.

लेखक - युवराज गुर्जर

स्त्रोत - युवराज गुर्जर ब्लॉग

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate