অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नजाकतदार अग्नीपंख

नजाकतदार अग्नीपंख

आज जगात काही विशिष्ट्य ठिकाणी मोठ्या प्रचंड संख्येने प्राणि अथवा पक्षी रहातात अथवा त्या ठिकाणी स्थलांतर करतात. त्यामुळे ती ठिकाणे आणि तो विशिष्ट काळ निसर्गप्रेमी त्या जागी भेट द्यायला कधीच चुकवत नाहीत. या मधे वाईल्ड बिस्ट चे टांझानिया मधील सामुहिक स्थलांतर, कोस्टा रीका किंवा ओरिसाच्या किनाऱ्यावरील ऑलिव्ह रिडले कासवांचे मोठ्या संख्येने अंडी घालायला येणे, मेक्सीको मधील मोनार्च फुलापाखरांचे स्थलांतर, ख्रिसमस बेटांवर लाल खेकड्यांचे सामुहिक संचलन अश्या कीती तरा जागा आणि प्राणी सांगता येतील. आपल्याकडेसुद्धा अश्याच काही ठिकाणी फ्लेमिंगो अथवा रोहित पक्षी असे मोठ्या संख्येने दिसतात. अर्थात त्यांची ही संख्या केनियातील नाकुरू तळे किंवा बोगोरिया तळ्यातील रोहित पक्ष्यांएवढी नसली तरी इतर पक्ष्यांच्या समुहापेक्षा नक्कीच मोठ्या पटीत असते.

फ्लेमिंगो अथवा रोहीत पक्ष्याच्या चार उपजाती जगात आढळतात. यातील "ग्रेटर फ्लेमिंगो" ही जात अमेरीका, युरोप आणि आशियात सर्वत्र आणि सहज आढळते. हे फ्लेमिंगो अतिशय देखणे, रंगीबेरंगी पाणपक्षी आहेत. हे पक्षी मोठया संख्येने एकत्र रहातात आणि उडतानासुद्धा त्यांचा मोठाच्या मोठा थवा एकदम उडतो. हे ग्रेटर फ्लेमिंगो साधारणत: चार फुट उंच असतात आणि त्यांचा रंग पांढरा, गुलाबी असतो. मात्र उडताना त्यांच्या पंखाच्या आतील गडद गुलाबी, लाल रंग आणि त्याच बरोबर चमकदार काळी पीसे यामुळे ते खुपच सुंदर दिसतात. त्यांची लांबलचक मान आणि उंचच उंच गुलाबी पाय यामुळे हा पक्षी डौलदार दिसतो. भारतात आढळणारी याची दुसरी जात म्हणजे लेसर फ्लेमिंगो. ही आकाराने लहान असते मात्र त्यांचा रंग अधिक गडद आणि उठावदार असा गुलाबी असतो. शिवाय ही गुलाबी रंगाची पखरण शरीरावर जास्त प्रमाणातसुद्धा झालेली असते. आपल्या भारतात या दोनच जाती आपल्याला बघता येतात.

यांची लांब आणि बाकदार चोच अतिशय वैशिष्टयपुर्ण असते. फ्लेमिंगो आपली मान वाकडी करून चोचीच्या वरचा भाग उलटा करून पाणथळीतील चिखलात फीरवतो. पाणी, चिखल ढवळून चोचीच्या बारक्या फटीमधून पाण्यातील अतिसुक्ष्म जीव चोचीच्या वरच्या भागात असलेल्या गाळणीतून गाळून चोचीच्या आत फक्त सुक्ष्म जीव रहातात आणि पाणी, चिखल बाहेर पडतो. हा पक्षी जरी मोठा असला तरी पाण्यात असलेल्या अतिसुक्ष्म जीव, शेवाळे यांच्यावरच त्यांची गुजराण होते. या त्यांच्या खाण्याच्या विशिष्ट सवयींमुळे त्यांचे खाण्याचे, रहाण्याचे स्थानसुद्धा विशीष्ट आणि मर्यादित असते. असे सांगीतले जाते की त्या जागेवरचे शेवाळे जेवढे चांगले, प्रथिनयुक्त तेवढा त्या रोहित पक्ष्यांचा रंग जास्त गुलाबी आणि उठावदार असतो.

हे त्यांचे खाण्याचे स्थान विशीष्ट आणि मर्यादित असते आणि त्याचप्रमाणे कायम बदलत सुद्धा असते. बहुतेक त्या जागी मिळणाऱ्या अन्नाची प्रत आणि संख्या यावर ते जागा बदलणे ठरवत असावेत. पुर्वी मुंबईच्या आसपास फक्त मुरबाड जवळच्या माळशेज घाटात हे पक्षी यायचे. नंतर त्या ठिकाणी पावसाळ्यात पर्यटकांची अतोनात गर्दी होऊ लागली आणि हळूहळू त्याठिकाणी हे पक्षी यायचे अजिबात बंद झाले. यानंतर मला त्यांचे अर्नाळ्याजवळील दातिवरे हे समुद्र किनाऱ्यावरचे गाव समजले. याठिकाणी जायला आधे रेल्वे मग बस आणि त्यानंतर होडीने जायचे असा बराच लांबचा आणि वेळखाउ प्रवास करायला लागायचा. त्यात जर भरतीची / ओहोटीची वेळ चुकली तर हे पक्षी समुद्रात आत लांब असायचे त्यामुळे बघायला / छायाचित्रण करायला मिळायचे नाहीत. याकारणा करता एकदा तर मी एक छोटा तंबूच समुद्रकिनाऱ्यावर ठोकून २/३ दिवस तिथे राहीलो. या वेळेस प्रथमच मला त्यांची राखी रंगाची लहान पिल्ले दिसली. त्यानंतर मी "बर्ड रिंगींग" करायला पुलिकत, श्रीहरीकोटा येथे गेलो होतो तेंव्हा तिथल्या तळ्यात असेच हजारो ग्रेटर फ्लेमिंगो बघितले.

तिथल्या स्वच्छ निळ्या पाण्यात ते खुप छान दिसत होते पण आमच्यामधील अंतर फार असल्यामुळे त्यांचे छायाचित्रण काही मनासारखे झाले नाही. यानंतर माझ्या गुजराथच्या नल सरोवरला भेटी सुरु झाल्या. ३/४ फुट उथळ पण खाऱ्या तळ्यात अतिशय आत काही भागात तिथे हे रोहित दिसतात आणि छोट्या होडक्यातून तुम्हाला आत जाउन त्यांना बघावे / छायाचित्रण करावे लागते. नितळ पाण्यात, निळसर आकाशाच्या पार्श्वभुमीवर यांची खुप छान छायाचित्रे मिळतात. इथे तुम्हीसुद्धा पाण्यामधे असल्यामुळे तुम्हाळा बऱ्यापैकी त्यांच्या जवळ जाता येते आणि त्यांची सहज "टेक ऑफ" घेतानाची सुद्धा छायाचित्रे मिळतात. नुकतीच गेली काही वर्षे आतातर भर मुंबईतच शिवडी, उरण येथे हे दोनही जातीचे रोहीत मोठ्या संख्येने येतात. मात्र शिवडी किंवा माहूलच्या घाण, काळ्या, वास येणाऱ्या प्रदुषित पाण्यात त्यांना बघायला जरी मजा आली तरी छायाचित्रणात तेवढी मजा येत नाही. मागे इमारती, विजेचे खांब, ऑइल रिफायनरीजच्या पार्श्वभुमीवर यांची मिळणारी छायाचित्रे आता जर शिवडी - उरण फ्ल्यायओव्हर झाला तर अजुन किती दिवस मिळणार हा आमच्यासमोर एक मोठाच प्रश्न आहे.

 

लेखक - युवराज गुर्जर

स्त्रोत - युवराज गुर्जर ब्लॉग

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate