অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सुताराची ठकठक

सुताराची ठकठक

जंगलातून फेरफटका मारताना अचानक एखादा सोन्याचा तुकडाच हवेत तरळावा तसा हा सुतार पक्षी सुसाट उडत झाडीत गडप होऊन जातो. जत नीट निरिक्षण केले आणि दुर्बिणीतून रोखून बघितले तर जवळच्याच एखा झाडाच्या खोडामागे हा लपून फक्त डोके बाहेर काढून तुम्हालाच बघत असतो. त्याची धारदार, लांबलचक चोच आणि डोक्यावरचा लालभडक तुरा तो तिथेच आहे याची खात्री पटवून देतो. आज जगभरात यांच्या २००हून अधिक उपजाती आढळतात आणि त्यातल्या अनेक विविध रंगी सुतारांच्या जाती आपल्याला भारतातील जवळपास सर्व जंगलात बघायला मिळतात. यांच्यातील चिमणा अथवा "पिग्मी" सुतार हा तर जेमतेम चिमणीएवढा लहान असतो तर सर्वात मोठा "स्लेटी" सुतार हा डोमकावळ्याएवढा मोठा असतो. सर्वसाधारणपणे ह्या सुतारांना आकर्षक रंगसंगती बहाल केलेली असते. यात अगदी सोनेरी पिवळा, लाल, काळा, हिरवा असे रंग तर आढळतातच पण त्यावर ठिपक्यांची, पट्ट्यांची नक्षीसुद्धा असते.

या सुतार पक्ष्यांची खासियत म्हणजे त्यांची लांबलचक, धारदार आणि अणुकुचीदार चोच. एखाद्या ओल्या अथवा सुक्या झाडाच्या खोडावर अतिशय वेगाने आघात करत, त्याला छिन्नीने कोरावे तसे कोरून आतली अळी किंवा किटक लिलया टिपून, ओढून बाहेर काढतात. हे करताना त्यांची विशीष्ट जीभसुद्धा त्यांना फार उपयोगाची ठरते. ही लांब, चिकट जीभ अगदी खोडाच्या आत लपलेला जीव सुद्धा बाहेर खेचून आणते. बाहेर आल्यावर पण तो जीव पडू नये म्हणून त्यांना त्या जिभेला विळखा घातला जातो. सहसा सुतार पक्ष्यांच्या जाती ह्या झाडावरच रहाताना आढळतात.

अगदी सरळसोट उभ्या खोडावर हा सुतार पक्षी झरझर एखाद्या शिडीवर चढल्यासारखा चढतो. यासाठी त्याला टोकदार नख्या असलेले पाय आणि मजबूत शेपटीचा उपयोग होतो. यांच्या शेपटीची पिसे ताठर असतात आणि त्यामुळे ती खोडावर दाबून तीचा घट्ट आधार घेता येतो. खोडातले किटक जसे हे खाण्यासाठी ओढून काढतात तसेच त्या कठीण खोडावर सतत घाव घालून अगदी गोलाकार २/३ इंची व्यासाचे बीळ आत तयार करून त्यात ते आपले घरटे बनवतात. दोघेही नरमादी जोडीने हे घरटे बनवतात. मादीने आत अंडी घातल्यावर, पुढे सुद्धा पिल्लांची काळजी ते नर मादी दोघेही घेतात. घरट्याच्या आत अगदी सुरक्षित असलेल्या या अंड्यांचा रंग पांढरा असतो. ही अंडी उघड्यावर नसल्यामुळे त्यांच्यावर मिळूनमिसळून जाणारे रंग, धब्बे अथवा नक्षी नसते. मादी अंदाजे २/५ अंडी घालते. ही अंडी साधारणत: दोन आठवडे उबवली जातात आणि त्यानंतर १८/३० ती आत घरट्यात असतात त्यानंतर ती घरट्यातून बाहेर पडून स्वतंत्र रहातात.

आपल्या जंगलात या सुतारांच्या अनेक जाती आढळतात. त्यातला सोनपाठी सुतार अगदी शज दिसत असला तरी इतर जाती सापडायला कठीण असतात. हे पक्षी अगदी लाजरेबुजरे असल्यामुळे त्यांचे छायाचित्रण अगदी काळजीपुर्वक करावे लागते. मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात, भरतपूरच्या जंगालात थंडीचा कडाका जोरात होता. त्यात भर म्हणून प्रचंड धूके पडले होते, अगदी सकाळी साडेआठ पर्यंत काही दिसत नव्हते. अचानक एकदम धूके विरले आणो सुर्यप्रकाश चमकू लागला आणि पक्ष्यांची खाण्यासाठी एकच दंगल उडाली. त्याचवेळी मला ही सुतार पक्ष्यांची जोडी टिपता आली. खरेतर त्या झाडावर सहा सोनपाठी सुतार बागडत होते. पण त्यांची खाण्यासाठी धावपळ चालली होती आणि ते वेगवेगळ्या फांद्यांवर असल्यामुळे मला काही ते एका "फ्रेम"मधे घेता आले नाहित. उन्हाळ्यात सासन गीरच्या जंगलात हा चिमणा सुतार आमच्या जीपच्या इतका जवळ आला की शेवटी आमच्या लेन्सच्या "मिनीमम फोकसिंग डिस्टंस" च्य आत असल्यामुळे चक्क आम्हाला जीप मागे नेऊन त्याच्यामधले आणि आमच्या मधले अंतर वाढवायला लागले. अगदी १५ मिनिटे त्याने आमच्या समोर कोरून कोरून अनेक किडे मटकावले आणि आम्हाला त्याचे छान छायाचित्रण करता आले.

लेखक - युवराज गुर्जर

स्त्रोत - युवराज गुर्जर ब्लॉग

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate