অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अ‍ॅस्टरॉयडिया

अ‍ॅस्टरॉयडिया

हा एकायनोडर्माटा संघातील एक प्राणिवर्ग आहे. याच संघात ऑफियूरॉयडिया हा आणखी एक वर्ग आहे. या दोन वर्गांतील प्राण्यांमध्ये काही बाबतींत साम्य दिसून येते. शिवाय या दोन्ही वर्गांतील प्राण्यांच्या जीवाश्मांच्या (शिळारूप झालेल्या अवशेषांच्या) अभ्यासावरून असे दिसते की, त्यांचे पूर्वज एकच होते. म्हणून काही प्राणिशास्त्रज्ञ हे वर्ग निराळे आहेत असे न समजता अ‍ॅस्टरोझोआ या एकाच वर्गाचे ते दोन उपवर्ग आहेत असे मानतात. असे जरी असले तरी बहुतेक प्राणिशास्त्रज्ञ हे दोन वर्ग भिन्नच आहेत असे समजतात.

अ‍ॅस्टरॉयडियात सगळ्या तारामीनांचा समावेश होतो. या वर्गाचे फेरोझोनिया आणि क्रिप्टोझोनिया असे दोन गण पाडलेले आहेत. पहिल्या गणात अँथीनिया, अ‍ॅस्टरिना, पेंटॅसेरॉस इ. तारामीनांचा आणि दुसऱ्या गणात अ‍ॅस्टीरिअ‍ॅस, सोलॅस्टर, ब्रिसिंगा वगैरे तारामीनांचा समावेश होतो.

हे फक्त समुद्रात आढळणारे प्राणी आहेत. जगातील सगळ्या समुद्रांच्या तीरांवर ते आढळतात, पण उष्ण प्रदेशातील प्रवालभित्तींवर (प्रवालांच्या भिंतींवर अथवा खडकांवर) ते मुबलक असून विविध प्रकारचे असतात. अतिशय खोल समुद्रातही (३-६ किमी. खोलीवर) यांच्या बऱ्याच जाती राहतात.

तारामीनांचे शरीर चपटे असून त्याच्या मध्यावर एक तबकडी असते; तिच्यापासून पाच अरीय बाहू निघालेले असतात; पण त्यांची बुडे तबकडीपासून स्पष्टपणे वेगळी नसतात. काही जातींत ४० बाहुदेखील असतात. शरीराच्या ज्या पृष्ठावर मुख असते त्याला ‘मुखपृष्ठ’ व विरुद्ध पृष्ठाला ‘अपमुखपृष्ठ’ म्हणतात. चलनाच्या वेळी मुखपृष्ठ खाली असते. आंतरांग 'अपमुखपृष्ठ' म्हणतात. चलनाच्या वेळी मुखपृष्ठ खाली असते. आंतरांग (शरीराच्या आत असणाऱ्या इंद्रियांचा समुदाय) बाहूंच्या आत शिरलेले असते. गुदद्वार अपमुखपृष्ठावर असते आणि याच पृष्ठावर दोन बाहूंच्या बुडाच्या मध्ये मॅड्रेपोराइट (एक चापट, वाटोळे किंवा पंचकोनी, खोबणी असलेले व आरपार भोके पडलेले तकट) असतो. प्रत्येक बाहूच्या मुखपृष्ठावर बुडापासून टोकापर्यंत एक मध्य चरणारप्रसीता (चालण्याकरिता उपयोगी पडणारे नळीसारखे पाय असणारी खोबण) असते; या खाचेतून नाल-पाद पुढे आलेले असून त्यांच्या दोन किंवा चार ओळी असतात. नाल-पादांचा उपयोग चालण्याकरिता होतो.

मिळेल त्या खाद्यावर तारामीन उदरनिर्वाह करतात; पण लहान, सबंध गिळण्याजोगे प्राणी त्यांना पसंत पडतात. लहान क्रस्टेशियन (कवचधारी) व मॉलस्क (मृदुकाय) प्राणी आणि समुद्री अर्चिन त्यांना आवडतात. परंतु खोल समुद्रात राहणाऱ्या जातींना तळाच्या चिखलात मिसळलेल्या जैव पदार्थांच्या बारीक तुकड्यांवर किंवा कणांवर संतुष्ट रहावे लागते. हे अन्न मिळविण्याकरिता त्यांना बराचसा चिखल खावा लागतो. काही मोठे तारामीन शिंपल्यातील कालवांवर उपजीविका करतात.

शरीराचे सगळे बाह्य पृष्ठ पक्ष्माभिकामय (हालचालीस उपयुक्त असणाऱ्या केसासारख्या वाढींनी युक्त) उपकलेने (अस्तराप्रमाणे असणाऱ्या समान पेशीच्या स्तराने) आच्छादिलेले असते. शरीरावर कंटक किंवा गुलिका (लहान गाठी) असून त्यांपैकी काही चल असतात व काहींचे संदंशिकांत (पृष्ठावर असणारा चिमट्यासारख्या बारीक संरचनांत) परिवर्तन झालेले असते. प्रत्येक बाहूच्या टोकावर एक तांबडा ठिपका (डोळा) असतो.

लिंगे भिन्न असतात; अंड्याचे निषेचन (अंड्याचा शुक्राणूशी होणारा संयोग) पाण्यात होते. अंड्यातून डिंभ (अळीसारखी अवस्था) बाहेर पडतो; तो दोन प्रकारचा असू शकतो; काही तारामीनांत बायपिनॅरिया नावाचा डिंभ असतो तर काहींत ब्रेकिओलॅरिया असतो [डिंभ].

अ‍ॅस्टरिडी-कुलांतील तारामीन ऑयस्टर (कालव) खातात,त्यामुळे ऑयस्टरांच्या व्यापाराचे नुकसान होते. काही देशांतील लोक तारामीन खातात. काही तारामीनांच्या शरीरावरील तीक्ष्ण काट्यांमुळे माणसांच्या पायांना जखमा होतात.

जीवाश्म : सैलसर जोडलेले लहानलहान पत्रे कातडीत बसवून अ‍ॅस्टरॉयडियांचा सांगाडा बनलेला असतो. प्राणी मेल्यावर त्याचे शव लौकरच कुजते व सांगाड्याचे पत्रे गळून इतस्तत: पडतात. म्हणून अ‍ॅस्टरॉयडियांच्या सांगाड्याचे जीवाश्म  सामान्यत: होत नाहीत. सर्व सांगाडा सुरक्षित राहिलेला आहे असे जीवाश्म विरळाच आढळतात.

अ‍ॅस्टरॉयडियांचा गट हा प्राचीन अशा गटांपैकी एक असून पूर्व-ऑर्डोव्हिसियन कल्पाइतक्या जुन्या (सु. ४९ कोटी वर्षांपूर्वीच्या) कालातील खडकांत त्यांचे जीवाश्म आढळलेले आहेत. आधुनिक अ‍ॅस्टरॉयडियांसारखी लक्षणे असलेली काही गोत्रे पुराजीव महाकल्पात (सु. ६० ते २४.५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) होती.[उदा., हडसनॅस्टर व मेसोपॉलिअ‍ॅस्टर ही ऑर्डोव्हिसियन व सिल्युरियन कल्पात (सु. ४९ ते ४२ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) व डेव्होनॅस्टर गोत्र डेव्होनियन कल्पात (सु. ४० ते ३६.५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात)].

पुराजीव महाकल्पातील कित्येक गोत्रे लौकरच निर्वंश झाली. त्यांच्यापैकी कित्येकांची लक्षणे काही अंशी अ‍ॅस्टरॉयडियासारखी तर काही अंशी ऑफियूरॉयडियासारखी होती व त्यांच्या वर्गीकरणाविषयी मतभेद आहेत. मध्यजीव महाकल्पातल्या (सु. २३ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या कालातील) व त्याच्या नंतरच्या काळातील अ‍ॅस्टरॉयडियांची लक्षणे आधुनिक अ‍ॅस्टरॉयडियांसारखी होती.

लेखक : क. वा. केळकर, ज. नी. कर्वे

माहिती स्रोत :मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/27/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate