অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अनिषेकजनन

अनिषेकजनन

प्राणी आणि वनस्पती या दोहोंतही सामान्यतः लैंगिक जनन आढळते. मादीचे पक्व अंडे आणि नराचा शुक्राणू यांचा संयोग होऊन अंडे उद्दीपित होते व त्याच्या विकासाने नवीन जीव उत्पन्न होतो. लैंगिक जननाच्या एका विशिष्ट प्रकारात शुक्राणू आणि अंडे यांचा संयोग न होताच केवळ पुं-युग्मकापासून म्हणजे शुक्राणुपासून अथवा फक्त स्त्री-युग्मकापासून म्हणजे अंड्यापासून जीवाची उत्पत्ती होते. याला ‘अनिषेकजनन’ म्हणतात. पुं-युग्मकापासून होणाऱ्या जीवोत्पत्तीला ‘पुं-अनिषेकजनन’ आणि स्त्री-युग्मकापासून होणाऱ्या जीवोत्पत्तीला ‘स्त्री-अनिषेकजनन’ म्हणतात. पुं-अनिषेकजनन काही समयुग्मकी (ज्यांच्यातील पक्व जनन-कोशिका सारख्या असतात अशा) शैवलांत आणि स्त्री-अनिषेकजनन प्राण्यांच्या जवळजवळ सर्व वर्गांत आणि काही वनस्पतींत आढळते.

अनिषेकजनन-क्रियेसंबंधी काही मूलभूत गोष्टी कळण्याकरिता तिचा लैंगिक जनन-क्रियेपर्यंत माग काढणे आवश्यक आहे. लैंगिक जननात दोन्ही युग्मकांच्या केंद्रकांत गुणसूत्रांची (एका पिढीतून दुसऱ्या पिढीत आनुवंशिक लक्षणे नेणाऱ्या सुतासारख्या सूक्ष्म घटकांची,  गुणसूत्र) कमी झालेली संख्या (सामान्यतः एकगुणित) सारखीच असते. व्यक्तीचे आनुवंशिक आणि लैंगिक स्वरूप मुख्यतः गुणसूत्रांमुळेच निश्चित होते. नराचा युग्मक अंड्याला क्रियाशील तर करतोच, पण याशिवाय आपल्या गुणसूत्रांची त्यात भर घालतो; म्हणून निषेचित अंड्यात आणि त्यापासून उत्पन्न होणाऱ्या प्राण्याच्या शरीराच्या कोशिकांत (पेशींत) गुणसूत्रांची संख्या दुप्पट (सामान्यतः द्विगुणित) असते. अंड्याचे निषेचन झाले नाही तर ते मरते; पण अनिषेकजननात जेव्हा फक्त माद्या उत्पन्न होतात तेव्हा अंडे स्वयंप्रेरणेची आणि नियंत्रणाची शक्ती संपादन करते. व त्यामुळे त्याचा विकास होतो आणि गुणसूत्रांची संख्या कमी होत नाही.

काही जीवांत फक्त स्त्री-अनिषेकजननानेच प्रजोत्पादन होते, तर काहींमध्ये अंड्यांचे निषेचन होऊन अगर न होताच त्यांच्या विकासाने जीवोत्पत्ती होऊ शकते. हा दुसरा प्रकार कीटकांमध्ये आढळतो आणि त्याला ‘वैकल्पिक अनिषेकजनन’ म्हणतात. स्त्री-अनिषेकजननाने फक्त नर, फक्त माद्या किंवा दोन्हीही उत्पन्न होतात. उदा., मधमाश्या, काही रोटिफर [ रोटिफेरा], खवले-कीटक इत्यादींपासून फक्त नर; काही रोटिफर, पाणपिसवा व इतर क्रस्टेशियन (कवचधारी प्राणी), यष्टि-कीटक व इतर कीटक इत्यादींपासून फक्त माद्या आणि कधी कधी पतंग आणि कित्येक हायमेनॉप्टेरा (कीटकांचा एक गण) यांच्यापासून नर आणि माद्या दोन्हीही उत्पन्न होतात. रोटिफर, पाणपिसवा आणि हिरव्या माशा यांच्यात लैंगिक जनन आणि अनिषेकजनन यांचे एकांतरण होते; याला ‘चक्रीय अनिषेकजनन’ म्हणतात. ‘शावकीजनन’ या पीटिका-दंशुकांत आढळणाऱ्या विशिष्ट प्रकारात अनिषेचित अंडी डिंभक (अळीसारख्या) अवस्थेतच अकाली विकास पावतात. प्राण्यांच्या बहुतेक वर्गात आढळणाऱ्या  ‘अल्पवर्धित अनिषेकजनन’ या प्रकारात अनेषिचित अंड्याचा विकास प्रौढ दशेच्या आधीच्या एखाद्या दशेपाशीच थांबतो. काही नेमॅटोड-कृमींत (जंतात) शुक्राणू अंड्यात शिरून त्याचे उद्दीपन करतो, परंतु त्याच्या केंद्रकाचा अंड्याच्या केंद्रकाशी संयोग होण्यापूर्वीच ऱ्हास होतो. या असामान्य प्रकाराला ‘आभासी युग्मन’ असे नाव असून तो लैंगिक जनन आणि अनिषेकजनन यांच्या मधला आहे. ‘भौगोलिक अनिषेकजनन’ हा प्रकार मुख्यतः काष्ठयूका (एक कवचधारी प्राणी) आणि कीटक यांत आढळतो. या प्रकारात अनिषेकी रूपाच्या वास्तव्याचे स्थान त्याच्या पूर्वज लैंगिक रूपाच्या वास्तव्याच्या ठिकाणापेक्षा निराळे असते. शिवाय अनिषेकी रूप प्रायः बहुगुणित (पक्व जनन-कोशिकेत असणाऱ्या गुणसूत्रांच्या संख्येच्या तिप्पट, चौपट इ. गुणसूत्रे असलेले ) असते.

अनिषेकजननाने जेव्हा फक्त नर उत्पन्न होतात तेव्हा या क्रियेत गोवल्या गेलेल्या घटना जेव्हा फक्त माद्या उत्पन्न होतात तेव्हापेक्षा फार वेगळ्या असतात; कारण असे नर त्यांच्या गुणसूत्रांची संख्या निम्मी असल्यामुळे विशेष प्रकारचे असतात. पण त्यांमध्ये, त्याचप्रमाणे चक्रीय अनिषेकजननात, जीवनक्षमता, लिंगनिर्धारण आणि गुणसूत्रे या गोष्टींची अतिशय गुंतागुंत झालेली असते.

अनिषेकजननातील महत्त्वाच्या फरकांचा विकास पावणाऱ्या अंड्यातील गुणसूत्रांच्या संख्येशी संबंध असतो. वरच्या प्रतीच्या प्राण्यांच्या देहकोशिकांत गुणसूत्रांची संख्या स्वाभाविक (द्विगुणित) असते, पण त्यांच्या परिपक्व युग्मकात ती निम्मी (एकगुणित) असते. पण अनिषेकजनन पद्धतीने विकास पावणाऱ्या अंड्यातून न्यूनकारी विभाजन (विभाजनाने गुणसूत्रांची संख्या निम्मी होणे) होत नसल्यामुळे, ती द्विगुणित असतात. मधमाशीची निषेचित अंडी द्विगुणित असून त्यांच्यापासून उत्पन्न होणाऱ्या माद्यादेखील (राणी, कामकारी) द्विगुणित असतात; परंतु परिपक्व अनिषेचित अंडी एकगुणित असतात. अनिषेकजनन-रीतीने त्यांचा विकास होऊन नर उत्पन्न होतात व ते एकगुणित असतात. या नरांचे शुक्राणू परिपक्व होताना न्यूनकारी विभाजन होत नाही; कारण गुणसूत्रांची संख्या आधीच एकगुणित असते. हे शुक्राणू अंड्यांप्रमाणे एकगुणित असतात. प्राण्यांमध्ये न्यूनकारी विभाजन झाल्यावरदेखील अनिषेकजननात गुणसूत्रांची संख्या दुप्पट होऊन स्वाभाविक (द्विगुणित) संख्या उत्पन्न होते.

अनिषेकजनन कृत्रिम रीतीने घडवून आणण्याचे अनेक यशस्वी प्रयोग करण्यात आले आहेत. रेशमाच्या पतंगाची अंडी गरम करून त्यांच्यापासून प्रौढ पतंगाची वाढ करण्यात आली आणि त्यांच्यापासून अनिषेकजननाने लागोपाठ तीन पिढ्या उत्पन्न करण्यात आल्या. बेडकांच्या अंड्यांना सुईने टोचून त्यांच्यापासून पिल्ले तयार करण्यात आली आहेत. अंड्यांच्या उद्दीपनाकरिता वेगवेगळे पदार्थ वापरून वेगवेगळ्या प्राण्यांच्या अंड्यांवर प्रयोग करण्यात आलेले आहेत. अशा प्रयोगांनी कोशिकांविषयी जरी जास्त माहिती मिळालेली असली तरी अंड्याला क्रियाशील करणाऱ्या एखाद्या सामान्य मूलतत्त्वाची माहिती मिळालेली नाही; किंवा कृत्रिम अनिषेकजननाचे स्वरूप किंवा गुणधर्मही कळलेले नाहीत. त्याचप्रमाणे प्रायोगिक व नैसर्गिक अनिषेकजनन आणि प्रायोगिक अनिषेकजनन व निषेचन यांच्या यंत्रणांत कितपत साम्य आहे, याच्यावरही प्रकाश पडलेला नाही. निरनिरळ्या प्रयोगांवरून अनिषेकजनन घडवून आणणारे प्राकृतिक घटक विविध असावेत, एवढेच अनुमान फार झाले तर काढता येईल. अंड्यांतील कॅल्शियमाचे कार्य या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे, असे काही संशोधकांचे म्हणणे आहे.

अनिषेकजननाची उत्पत्ती आध्य नाही, लैंगिक जातींमध्ये ते उत्परितवर्तनाने (आनुवंशिक लक्षणांमध्ये होणाऱ्या एकाएकी बदलांनी, उत्परिवर्तन) उत्पन्न झाले आहे.

लेखक : ज. नी. कर्वे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/3/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate