অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अनुकूलन

अनुकूलन

प्राणी ज्या स्वाभाविक निवासस्थानात राहतात तेथील परिस्थितीत जिवंत राहण्याला ते लायक असतात, म्हणजेच त्यांची शरीररचना, देहक्रिया, वर्तन आणि जीवनप्रणाली या सगळ्या गोष्टी त्या परिस्थितीशी जुळणाऱ्या असतात. पण काही कारणांमुळे परिस्थितीत बदल झाला आणि तेथील प्राण्यांना या बदललेल्या परिस्थितीतच राहावे लागले किंवा प्राण्यांना काही अपरिहार्य कारणामुळे आपले निवासस्थान सोडून वेगळी परिस्थिती असलेल्या स्थानी जावे लागले तर त्यांच्यात जे बदल होतात त्यांना ‘अनुकूलन’ म्हणतात. अनुकूलन ही संज्ञा प्राण्याच्या अनुकूली लक्षणाला त्याचप्रमाणे ज्या क्रियेने अनुकूलित स्थिती उत्पन्न होते त्या क्रियेला लावतात. प्राण्यांच्या वेगवेगळ्या समूहांत अनुकुलनाचे प्रमाण वेगवेगळे असते. काहींत ते एखाद्या लहान जागेतील परिस्थिती पुरतेच मर्यादित असते तर काहींत ते सामान्य असते. पहिल्या प्रकारचे उदाहरण चिचुंद्री हे होय. जमिनीतील बिळात राहता येण्याच्या दृष्टीने तिचे अनुकूलन झालेले असते. डोळे अगदी बारीक, कान लहान, दात बारीक, पुढचे पाय आखूड आणि मागचे लांब असतात. उंदीर हे दुसऱ्या प्रकाराचे उदाहरण म्हणून देता येईल. हवामान, अन्न किंवा संरक्षण या बाबतींत भिन्न असणाऱ्या वेगवेगळ्या परिस्थितीत तो यशस्वीपणे राहू शकतो. अनुकूलने पुष्कळ प्रकारची असतात आणि ती प्राण्यांची शरीरचना, शरीरक्रिया आणि वर्तन यांत एकाच वेळी दिसून येऊ शकतात; इतकेच नव्हे, तर त्यांचे परस्परांशी संबंध असतात. मधमाशीमध्ये पुष्कळ अनुकूलने आढळतात. उदा., मकरंद (मध) गोळा करण्याकरिता चूषी मुखांगे (शोषण करणारे तोंडाचे अवयव), शर्करांवर निर्वाह करण्याचे सामर्थ्य, पराग गोळा करण्याकरिता केस आणि केसांचे कुंचले, फुलांचे रंग ओळखण्याकरिता लागणारी डोळ्यांची विशिष्ट संवेदनक्षमता, मेणाचे उत्पादन आणि अन्न साठविण्याकरिता व पिल्लांच्या निवाऱ्याकरिता त्याच्यापासून पोळे बनविणे आणि पोळ्यातील तीन जातींच्या माश्यांच्या सवयींचा अत्यंत गुतागुंतीचा साचा. या विविध अनुकूलनांचे परस्परसंबंध असल्यामुळे मधमाशीला आपला जीवनक्रम सुरळीत चालू ठेवता येतो.

अनुकूलन हे प्राण्यांच्या अंगी असणारे एक महत्त्वाचे आणि असाधारण लक्षण आहे. बहुतेक अनुकूलने उपजत (जन्मसिद्ध) असली तरी कित्येक व्यक्तींच्या आयुष्यात उत्पन्न होतात. लोहाराच्या उजव्या हाताचे स्नायू एकसारखे उपयोगात आणल्यामुळे फार मोठे होतात. लामार्क यांच्या मताप्रमाणे अशी उपार्जित (मिळविलेली) लक्षणे एका पिढीतून पुढच्या पिढीत उतरतात. जिराफाची मान आखूड होती पण झाडांच्या वरच्या फाद्यांची पाने खाण्याचा प्रयत्न करताना ती ताणली गेल्यामुळे थोडी लांब झाली आणि अनुकूलनाची ही प्रवृत्ती पुढच्या पिढीत उतरली अशा प्रकारे उत्तरोत्तर मान लांब होत जाऊन हल्लीचा जिराफ उत्पन्न झाला. निश्चित पुराव्याच्या अभावी लामार्क यांची ही कल्पना मागे पडली.

डार्विन यांनी या प्रश्नाचे स्वरूप आपल्या नैसर्गिक निवडीच्या तत्त्वाने पालटून टाकले. त्यांनी असे दाखविले की, ज्या प्राण्यांमध्ये वंशागमक्षम (एका पिढीतून पुढच्या पिढीत उतरणारे) फेरबदल आढळतात त्यांच्यावर नैसर्गिक निवडीचा परिणाम होतो आणि अनुकूलन हे त्याचेच फळ होय. जी अनुकूलने उपयुक्त किंवा हितकर असतील त्यांची निवड होते व ज्यांना काहीच किंमत नसते किंवा जी अपायकारक असतात त्यांची केव्हाही निवड होत नाही. प्राणी ज्या परिस्थितीत राहतात तिच्याशी जर त्यांचे पूर्णपणे अनुकूलन झालेले असेल तरच ते जगण्याचा जास्तीत जास्त संभव असतो.

डार्विन यांच्या काळात आनुवंशिकीचा फारसा अभ्यास झालेला नव्हता. पण त्यानंतर झालेल्या आनुवंशिकीच्या प्रगतीमुळे काही अनुकूलनांच्या उत्पत्तीविषयी माहिती मिळाली पण इतर बऱ्याच अनुकूलनांविषयी अद्याप काहीच खुलासा झालेला नाही. अनुकूलनांच्या उत्पत्तीविषयी थोडक्यात सांगावयाचे झाले तर, नैसर्गिक निवडीच्या दडपणाच्या परिणामामुळे अनुकूलने उत्पन्न होतात असे म्हणता येईल. एखाद्या समुदायात अस्तित्वात असलेल्या अतिशय हितावह लक्षणांचे रक्षण करण्याकडेच नैसर्गिक निवडीचा रोख असतो. बाह्य कारकांच्या उद्दीपनाची अनुक्रिया म्हणून उत्परिवर्तने (आनुवंशिक लक्षणांमध्ये होणारे आकस्मित बदल, उत्परीवर्तने) उत्पन्न होत नाहीत; ती वाटेल तशी उत्पन्न होतात. यांपैकी ज्यांना अनुकूली मूल्य असते ती पुढच्या पिढ्यांत उतरण्याचा फार संभव असतो आणि कालांतराने सगळ्या समुदायात ती पसरणे शक्य असते. गुणसूत्रांची (एका पिढीतून दुसऱ्या पिढीत आनुवंशिक लक्षणे नेणाऱ्या सुतासारख्या सूक्ष्म घटकांची,  गुणसूत्र) संख्यावाढ किंवा पर-निषेचन (एका प्राण्याच्या शुक्राणूचा त्याच जातीच्या दुसऱ्या प्राण्याच्या अंडाणूशी होणारा संयोग) यांच्यासारख्या इतर आनुवंशिक बदलांमुळे या नवीन लक्षणांच्या परिणामात वाढ होते. परिस्थितीमुळे जरी प्रत्यक्षपणे आनुवंशिकतेचा साचा बनत नसला तरी निवासस्थानाच्या परिस्थितीमुळे तो काही मार्गांपुरताचा मर्यादित होतो.

अगदी भिन्न वर्गांतील प्राणी जेव्हा एकाच प्रकारच्या परिस्थितीत राहतात तेव्हा सामान्यतः स्पष्ट साम्य असणाऱ्या संरचना त्यांच्यात उत्पन्न होतात. या घटनेला ‘समाभिरूपता’ म्हणतात. शार्क, देवमासे, शिंशुक आणि सील यांच्यासारख्या समुद्रातील मोठ्या पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांचे शरीर प्रवाह-रेखित असते आणि त्यांचे पर अथवा पाद वल्ह्यांसारखे असतात. हे साम्य समान जीवनक्रमामुळे झालेल्या अनुकूलनाचाच परिणाम होय. क्रमविकास चालू असताना पुष्कळदा असे घडते की, एकाच वंशाचे अथवा अतिशय निकट संबंध असणाऱ्या वंशांचे प्राणी अन्न आणि संरक्षण मिळविण्याकरिता निरनिराळ्या ठिकाणी जातात आणि यामुळे वेगवेगळ्या जीवनक्रमाला उपयुक्त अशी विविध अनुकूलने त्यांच्यात उत्पन्न होतात. या घटनेला ‘अनुकूली विकिरण’ म्हणतात. उदा., पौर्वज स्तनी प्ररूपांपासून (ज्यावरून जातीचे अगर वंशाचे गुणधर्म ठरवितात अशा व्यक्तिगत जीवाच्या नमुन्यापासून) वेगवेगळ्या वंशपरंपरा निर्माण झाल्या आहेत. सपाट प्रदेशात चरणारे प्राणी (गुरेढोरे, घोडा), बिळे करून राहणारे प्राणी (चिचुंद्री, उंदीर), उडणारे प्राणी (वटवाघुळे), जलीय प्राणी (देवमासा, सील, समुद्रगाय), वृक्षवासी प्राणी (माकडे), मांसाहारी प्राणी (कुत्री, मांजरे) इ.

प्राण्यांची पुष्कळ अनुकूली लक्षणे संरक्षक असतात. कासव, आर्मडिलो व गोगालगाय यांची कवचे आणि साळीच्या अंगावरचे लांब काटे ही संरचनात्मक अनुकूलने त्या त्या प्राण्यांचे रक्षण करतात. गांधीलमाशीचे डंख मारणे व सापाचे चावणे ही क्रियात्मक अनुकूलने त्या प्राण्यांच्या बचावाकरिताच असतात. प्राण्यांचे रंग हा सामान्यत: संरक्षक अनुकूलनाचा आणखी एक प्रकार मानण्यात येतो [ अनुकृति; मायावरण]

अनुकूलने व्यक्त होण्याकरिता पुष्कळच कालावधी लागतो हे निर्विवाद आहे; पण लवकर दृष्टीस पडणाऱ्या काही अनुकूलनांची उदाहरणेही अलीकडे दिसून आली आहेत. दक्षिण कॅलिफोर्नियात लिंबाच्या झाडांवरील तांबड्या शल्क(खवले)-कीटकांचा नाश करण्याकरिता हायड्रोसायानिक अम्ल वायू फवारीत असत परंतु काही काळानंतर या वायूने हे कीटक मरेनासे झाले. संशोधनानंतर असे आढळून आले की, या वायूला प्रतिरोध करण्याची शक्ती या कीटकांच्या अंगी उत्पन्न झाली होती. दुसरे उदाहरण माश्यांचे आहे. घरातील माश्या नाहीशा करण्याकरिता डीडीटी घरात सगळीकडे फवारतात. सुरूवातीला यामुळे माश्या मरतात पण माश्यांच्या दोनचार पिढ्यांनंतर या औषधाचा माश्यांवर काही परिणाम होत नसल्याचे आढळून आले आहे. या औषधाला प्रतिरोध करण्याची शक्ती त्यांच्यात उत्पन्न होते.

मानसिक अनुकूलन : मानसशास्त्रीय दृष्टया अनुकूलन (अथवा समायोजन) म्हणजे जेणेकरून जीवन गतिमान राहील व मानसिक स्वास्थ भंग पावणार नाही, अशा प्रकारे प्राप्त परिस्थिती व व्यक्तीचे प्रेरणात्मक जीवन यांच्यातील मेळ होय. कधी परिस्थितीत परिवर्तन घडवून आणून, तर कधी स्वतः परिस्थितीशी जमवून व्यक्ती परिस्थितीशी समायोजन साधीत असते. ज्याप्रमाणे जैविक पातळीवर भौतिक परिसराशी समायोजन हे जीवनरक्षणाच्या दृष्टीने अत्यावश्यक असते, त्याचप्रमाणे मानसिक पातळीवरही मानसिक आरोग्यरक्षणाच्या दृष्टीने व्यक्तीच्या सामाजिक-सांस्कृतिक परिसरातील प्रसंगांशी अनुकूलन वा समायोजन झालेले असणे, हेही महत्त्वाचे असते. त्यासाठी मानसिक शक्तिव्यय घडविणारे संघर्ष, तसेच विकृत स्वरूपाची स्पर्धा टाळणे व इतरांबरोबरच्या सहकार्याचे क्षेत्र वाढवणे इ. गोष्टी आवश्यक असतात.

व्यक्तीचे जीवन नेहमीच सुरळीत व सुखकर रीत्या चालत असते, असे नाही. व्यक्तीच्या जैविक गरजा व तज्जन्य क्षुधा, तृषा, रक्षण, समागम इ.प्रेरणा, त्याचप्रमाणे व्यक्तीच्या सामाजिक जीवनाशी निगडीत असलेल्या सहवास, प्रेम, प्रतिष्ठा, स्वीकृती, वर्चस्व वगैरे मानसिक-सामाजिक प्रेरणा आणि व्यक्तीला प्रेरित करणाऱ्या तिच्या सवयी, अभिवृत्ती, आकांक्षा इत्यादींच्या बाबतीत अतृप्तीचे व वैफल्याचे प्रसंग उद्भवत असतात. व्यापक अर्थाने हे प्रसंग म्हणजे प्रेरणागत संघर्षाचे प्रसंग होत. ह्या अतृप्तीच्या वा संघर्षाच्या प्रसंगांचे मूळ कधी व्यक्तीच्या शारीरिक अथवा बौद्धिक दुर्बलतेत अथवा व्यंगांमध्ये असते; कधीकधी भौतिक वा आर्थिक प्रतिकूल परिस्थिती कारणीभूत असते; कधी परिस्थितीचे दडपण कारणीभूत असते; कधी सामाजिक नीतीचा अडसर येतो; कधी व्यक्तीच्या दोन विरोधी प्रेरणा एकाच वेळी प्रबल होतात, तर कधी व्यक्तीच्या प्रबल प्रेरणा व बालपणापासूनचे नैतिक संस्कार, तसेच स्वतःच्या विवेकशीलतेतून निर्माण झालेली आंतरिक मूल्ये यांच्यामध्ये द्वंद्वप्रसंग येतो.

असे संघर्षप्रसंग जरी व्यक्तीच्या मनःस्वास्थाला बाधक असले, तरी ते नेहमीच अनिष्ट म्हणता येणार नाहीत. कारण संघर्षामुळे व्यक्तीच्या कर्तृत्वाला आव्हानही मिळत असते व ते व्यक्तिमत्वविकासाला उपकारकही ठरतात. परंतु स्वस्थता टिकवू पहाणे हा जीवमात्राचा स्वभावच असल्याकारणाने संघर्षप्रसंग व तज्जन्य ताण सुसह्य करण्याचे प्रयत्न व्यक्ती करू लागते.

संघर्षप्रसंग नाहीसा करून समायुक्त स्थिती व समाधान प्राप्त करून घेण्याचे व्यक्तीचे प्रयत्न (१) अनुरूप कृतिप्रधान (टास्क ओरिएंटेड)असू शकतात. उदा., प्रसंग व स्वतःची कुवत, स्वभाव, परिस्थिती वगैरे ध्यानी घेऊन त्याप्रसंगाशी धडक देऊन किंवा पर्यायी मार्ग अवलंबून आपल्या प्रेरणांची तृप्ती करून घेणे किंवा (२) ते प्रयत्न मुख्येत्वेकरून आत्मगौरव वा अस्मिताभाव कसातरी सुरक्षित ठेवण्याचे असतात व अशा रीतीने व्यक्ती मनःस्वास्थ मिळवू पाहते. उदा., माघार घेणे, दिवास्वप्ने रंगविणे. लटक्या सबबींनी मिथ्या समर्थन करणे, स्वतःच्या अप्रशस्त हेतूंचे वा प्रवृत्तींचे इतरांवर प्रक्षेपण वा आरोपण करून आत्मसन्मान टिकविणे वगैरे. या व अशा अनेक प्रयुक्त्या फ्रॉइड यांनी प्रकाशात आणल्या आहेत व त्यांना ‘स्व’रक्षणप्रयुक्त्या अशी संज्ञा दिली आहे. त्यांचा आश्रय व्यक्ती बहुधा अजाणता घेत असते.

या ‘स्व’रक्षणप्रयुक्त्या एकपरी अनुकूलन वा समायोजन साधण्याच्याच तऱ्हा असतात. त्यांचा अवलंब वेळप्रसंगी सर्वच जण करतात. मात्र त्यांचा अतिरेकी वापर मानसिक आरोग्याच्या दृष्टीने अनिष्ट असतो. या ‘स्व’रक्षणप्रयुक्त्यांच्या आहारी व्यक्ती गेली, की तिच्या वर्तनाची गणना विकृतींच्या सदरात होते.

संदर्भ : 1.Shaffer, L. F.; Shoban, E. J. Psychology of Adjustment, Houghton-Miffin,1956.

2.Steckle, L. G. Problems of Human Adjustment, New York, 1957.

लेखक : व. वि. अकोलकर , वा.मा. कुलकर्णी, मा.वि. जोशी

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/8/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate