অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अनुकृति

अनुकृति

या शब्दाचा मूळ अर्थ नक्कल असा आहे. निसर्गात प्राण्यांच्या संरक्षणाकरिता ज्या विविध योजना आढळतात त्या सगळ्यांत अनुकृती ही अत्यंत परिपूर्ण आणि अद्भुत होय. आकार, ढब, रंग आणि वर्तन या बाबतींत इतर प्राण्यांशी, वनस्पतींशी किंवा निर्जीव वस्तूंशी असणाऱ्या प्राण्यांच्या साम्याला 'अनुकृती ' हे नाव दिलेले आहे. अनुकृतीमुळेच हे प्राणी सहजासहजी दिसून येत नाहीत; किंवा दिसतात तेव्हा ते आपल्या दिखाऊ उपद्रवीपणाची जाहिरात करतात.

अनुकृतीचे संरक्षक आणि आक्रमक असे दोन प्रकार आहेत. त्याचप्रमाणे संरक्षक अनुकृतीचे छद्मी (लपविलेली) व भयसूचक आणि आक्रमक अनुकृतीचे छद्मी व प्रलोभक (मोह घालणारी) असे आणखी उपप्रकार आहेत. याखेरीज अनुकृतीचे आणखीही दोन भाग पाडता येतील : (१) अचेतन किंवा निष्किय. या प्रकारात रूप आणि रंग यांच्यामुळे साम्य उत्पन्न होते. बहुसंख्य अनुकारकांचा (नक्कल करणाऱ्यांचा) या प्रकारात समावेश होतो; आणि (२)चेतन किंवा सक्रिय. या प्रकारात अनुकारक आपल्या वर्तनाने प्रतिरक्षित (निर्भय) आदर्शाचे अनुकरण करतो.

अनुकृतीकरिता सृष्टीतील सजीव पदार्थच आदर्श म्हणून पाहिजेत असे नाही. निर्जीव वस्तूदेखील चालतात. दगडगोट्यांपासून तो झाडांच्या डाहाळ्या किंवा एखाद्या क्रियाशील उपद्रवी कीटकापर्यंत सगळ्यांचे अनुकरण केले जाते.

संरक्षक अनुकृती : हिच्या दोन प्रकारांपैकी छद्मी प्रकार सामान्यत: जास्त आढळतो. क्रिप्टोलिथोडिस हा खेकडा याचे एक उत्तम उदाहरण होय. याचा वाटोळा आकार, गुळगुळीतपणा, रचना आणि पांढरा रंग ही सर्व समुद्रकिनाऱ्यावरील बिलोरी गोट्यांशी इतकी बेमालूम जुळणारी असतात की, तो ओळखू येणे शक्य नसते. हातांनी या गोट्यांची उलथापालथ केल्यावर त्याच्या हालचालींमुळेच त्याचे खरे स्वरूप प्रकट होते. अशा प्रकारे संपादन केलेली प्रतिरक्षा (निर्भयता) हे खरे संरक्षण होय यात शंका नाही. ही अनुकृती निःसंशय अचेतन प्रकारची होय. कारण खेकड्याच्या थोड्याशा हालचालीनेदेखील त्याचे अस्तित्व दिसून येते. दुसऱ्या एका खेकड्याचे समुद्राच्या लाटांनी झिजलेल्या प्रवाळाच्या खडकांशी हुबेहुब साम्य असते. हा प्राणी मांसाहारी असल्यामुळे या गोपनाचा दुहेरी हेतू असणे संभवनीय आहे. शत्रूपासून संरक्षण हा एक आणि भक्ष्य पकडण्याकरिता साहाय्य हा दुसरा.

जिऑमेट्रिड पतंगांच्या सुरवंटांचे रंग पुष्कळदा संरक्षक असतात; इतकेच नव्हे, तर निरनिराळ्या झाडांच्या डहाळ्यांची व शिरकुट्यांची ते हुबेहुब नक्कल करतात. सेलेनिया टेट्राल्युनारिया या पतंगाचा सुरवंट आपल्या मागच्या पायांनी फांदी घट्ट पकडून तिच्याशी कोन करून आपले शरीर ताठ उभे करतो. शरीराचा रंग आणि आकार या बाबतींत याचे शिरकुट्यांशी असलेले साम्य इतके परिपूर्ण असते आणि शरीराचा हा आविर्भाव इतका वेळ टिकणारा असतो की, एखाद्या सराईत निरीक्षकालादेखील ही बतावणी उमगत नाही. प्रत्यक्ष स्पर्श केल्यावरच ही काटकी नसून प्राणी आहे हे समजते. अशा तर्‍हेची अनुकृती रंग आणि आकार या बाबतींत मुख्यतः अचेतन असते.परंतु ही नकली बैठक साध्य करण्याकरिता त्यापूर्वी प्रयत्न करावा लागत असल्यामुळे ही अनुकृती अंशतः चेतन किंवा क्रियाशील असते.

शिझुरा मक्रोनिस  हा जिऑमेट्रिड पतंग अनुकृतीचा याच्या पुढील पल्ला गाठतो. याचा सुरवंट डहाळीची हुबेहुब नक्कल करतोच पण खुद्द पतंगसुद्धा फांदीच्या सालीची नक्कल करतो. डोके खाली करून तो फांदीच्या सालीला घट्ट चिकटतो. आपल्या ताठ शरीराचा फांदीशी कोन करून ते उभे करतो आणि पंख अंगाभोवती अशा तऱ्हेने गुंडाळून घेतो की, सालीशी असणारे साम्य अधिकच उठून दिसते.

यष्टि-किटकाचे शरीर सडपातळ असते. पाय बुडापासून निमुळते होत गेलेले असतात, रंग संवादी असतात आणि संचलन मंद असते. हे कीटक उत्कृष्ट अनुकारक आहेत. काही यष्टि-कीटकांची चालण्याची ढब फार विचित्र असते. काही हळूहळू थबकत चालतात तर काही डुलत डुलत

किंवा लटपटत चालतात. उष्ण आणि उपोष्णकटिबंधीय प्रदेशांत या कीटकांच्या सहाशेपेक्षा जास्त जाती आहेत. यांपैकी काहींच्या संरक्षण योजना खरोखरच विलक्षण असतात. याचे सर्वोत्कृष्ट उदाहरणफायलियम या पर्णकीटकाचे होय. याचे पंख, चपटे आणि पसरट शरीर आणि पाय हिरव्या रंगाचे असतात. या हिरव्या रंगावर मधूनमधून पिवळसर रंगाचे वेडेवाकडे ठिपके असतात, ते पानांवरील कवकांच्या डागांसारखे दिसत असल्यामुळे या कीटकाचे पानांशी तंतोतंत साम्य दिसून येते.

पुष्कळ फुलपाखरांचे स्वरूप पानांसारखे असते, निर्जीव किंवा कोमेजलेल्या पानांच्या सर्वसाधारण रंगापुरतेच हे साम्य मर्यादित नसते; तर पानाचा देठ, त्याची मधली शीर, शिराविन्यास (शिरांची मांडणी),कवकबिंदू आणि रोगयुक्त पानांमध्ये आढळणाऱ्‍या मोकळ्या जागा या सर्वांची हूबेहुब नक्कल केलेली आढळते.

३ मोडक्या शिरकुटीसारखा दिसणारा सुरवंट.सीनोफ्लेबिया आर्किडोना हे बोलिव्हियातील फुलपाखरू अशा प्रकारचे आहे. तथापि, कॅलिमा पॅरालेक्टा या भारतीय फुलपाखराचे उदाहरण लक्षात ठेवण्यासारखे आहे. या फुलपाखराचा मागचा पंख लांब होऊन देठासारखी रचना तयार होते आणि पानावर आढळणारी इतर सर्व चिन्ह पूर्णत्वाला पोहोचलेली असतात. या फुलपाखराच्या वरच्या बाजूचा रंग ठसठशीत निळा-काळा असून त्यावर तांबूस-पिवळा किंवा निळसर-पांढरा पट्टा असतो. हे फुलपाखरू ओळखण्याची खूण म्हणजे हा पट्टा होय. हे फुलपाखरू उडत असताना त्याचे रंग स्पष्ट दिसतात, पण बसताक्षणीच पंख मिटल्यामुळे हे रंग दिसेनासे होतात आणि पंखांच्या अधर-पृष्ठाचे संरक्षक रंग मात्र दिसतात.

भयसूचक अनुकृती : या अनुकृतीचे काही असामान्य प्रकार येथे दिलेले आहेत. या प्रकारात अनुकारक प्राणी भडक रंगांच्या आणि खाण्याला बेचव किंवा विषारी प्राण्यांची नक्कल करतात.

प्रवाल-सर्प  हा चकचकीत रंगाचा एक विषारी साप आहे. भारतात याच्या सात जाती आढळतात. यांच्या शरीरावर तांबडे आणि काळे किंवा इतर रंगांचे आडवे पट्टे एकाआड एक असे असतात. कित्येक जातींचे निर्विष (बिनविषारी) साप प्रवाल-सर्पाच्या विविध जातींची नक्कल करतात. त्यामुळे शत्रूपासून त्यांचा बचाव होतो.हेटेरोडॉन हा निर्विष साप विषारी सापाप्रमाणेच फुसकारून व प्रहार करून आपण विषारी साप आहोत असे भासवतो. या कृतीने थोड्याफार प्रमाणात त्याला प्रतिरक्षा मिळते. प्रवाल-सर्पाचे केले जाणारे अनुकरण अचेतन असते. तर हेटेरोडॉनची अनुकृती चेतन असते. कारण ती परिणामकारक करण्याकरिता या सापाला काही कृती करावी लागते.

कीटक-वर्गामध्ये क्रियाशील आणि निष्क्रिय अशा दोन्ही प्रकारच्या अनुकारकांची फार मोठी संख्या आढळते. ते आकार, रंग आणि वर्तन या बाबतीत आपल्या आदर्शाची नक्कल करतात. सफिर्डी कुलातील पुष्प-मक्षिका मधमाश्यांची व गांधीलमाश्यांची, मुद्‌गल (भुंगा) गांधीलमाश्यांची आणि काही पतंग मधमाश्यांची नक्कल करतात; काही फुलपाखरे, खाण्यास बेचव म्हणूनच प्रतिरक्षित असणाऱ्‍या इतर फुलपाखरांचे अनुकरण करतात. याचे परिचित उदाहरण प्रतिरक्षित मॉनर्क (राज) फुलपाखराचे होय. हे फुलपाखरू खाण्यास बेचव असते म्हणून पक्ष्यांना खायला रुचकर असणारे व्हाइसरॉय फुलपाखरू याची नक्कल करते, नाही तर या फुलपाखरांचा केव्हाच नाश झाला असता.

कधीकधी एखाद्या फुलपाखराची फक्त मादीच एखाद्या प्रतिरक्षित आदर्शाची नक्कल करते; नराचे रंग अगदी वेगळ्या प्रकारचे असतात (द्विरूपी जाती). शिवाय फार दूरवर पसरलेल्या जातींमध्ये एकाच नराचा अनेक रूपांच्या माद्यांशी सहवास होतो; कारण प्रत्येक मादी आपापल्या भागात मुबलक असणाऱ्‍या प्रतिरक्षित जातीची अनुकृती करते. आफ्रिकेतील डॅनाइड फुलपाखरे खाण्यात बेचव तर पॅपिलिओ स्वादिष्ट असतात.पॅपिलिओ मेरोप या आफ्रिकेतील फुलपाखराच्या नराच्या व्याप्तीमध्ये फारसा फरक पडलेला नाही. परंतु पॅपिलिओची मादी म्हणून असणारे मादीचे अस्तित्व बहिरंगातील बदलामुळे जवळजवळ संपुष्टात आलेले आहे; पॅपिलिओ मादीने डॅनाइड मादीचे बाह्य स्वरूप धारण केलेले असते. या पॅपिलिओ माद्या सगळीकडे एकाच जातीच्या डॅनाइड मादीची नक्कल करतात असे नाही, तर ज्या ठिकाणी जी जात विपुल असेल त्या जातीच्या मादीची अनुकृती करतात. याचा परिणाम असा झाला आहे की, या माद्यांमध्ये बहुरूपता दिसून येते. चार रूपे अनुकारी (नक्कल करणारी) असून नराशी साम्य असणारे एक मूळचे रूप असते.

आक्रमक अनुकृती : कित्येक मांसाहारी किंवा कीटकाहारी प्राण्यांमध्ये भक्ष्य मिळविण्याकरिता या प्रकारच्या अनुकृतीचे अवलंबन केलेले आढळते. फुलांवर राहणारे कोळी याचे उत्तम उदाहरण होत. हे कोळी ज्या फुलांवर असतात त्याच फुलांसारखा यांचा रंग असल्यामुळे फुलांवर येऊन बसणाऱ्‍या कीटकांना ते दिसत नाहीत आणि म्हणून हे कीटक कोळ्यांच्या भक्ष्यस्थानी पडतात. वृक्षांवर राहणारे कोळी झाडाच्या निरनिराळ्या भागांची नक्कल करतात, पण या सगळ्याचा अंतिम हेतू भक्ष्य पकडणे हाच असतो. ही सगळी उदाहरणे छद्मी आक्रमक अनुकृतीची होत.

आणखी एक प्रकारची कोळ्याचे रंग आणि रूप या बाबतींत एका जातीच्या ऑर्किडाच्या फुलाशी निकट साम्य दिसून येते. हे साम्य प्रलोभक असून कोळ्याच्या फायद्याचे असते. आफ्रिकेतील एका सरड्याचा रंग संरक्षक असतो, परंतु त्याच्या तोंडाजवळ भडक रंगाचा डाग असतो, त्यामुळे पुष्कळ बेसावध प्राण्यांना भुरळ पडून ते याच्या तावडीत सापडतात.

मेल्याची बतावणी करणे हे अनुकृतीचेच एक स्वरूप आहे; ही सक्रिय अनुकृती होय. अमेरिकेतील

ऑपॉस्सम शत्रूने हल्ला केल्याबरोबर मेल्याचे सोंग करतो. जाड आणि कठिण कवचाचे मुद्गल असेच मेल्याचे सोंग करतात.

अनुकृतीची सगळी उदाहरणे पाहिली असता तिचे दोन सर्वसामान्य प्रकार असल्याचे दिसून येते. घाणेरडा वास, घाणेरडी चव, नांगी असणे इ. गुणधर्मांमुळे आदर्श भक्षकापासून सुरक्षित असतो आणि अनुकारक वरील गुणधर्मांच्या अभावी सुरक्षित नसतो; पण आदर्शांशी बारिकसारिक बाबातीतही असलेल्या त्याच्या फसव्या साम्यामुळे तो भक्षकाच्या तावडीतून निसटतो. अनुकृतीच्या अशा सर्व प्रकारांना ‘बेट्सीय अनुकृती’ (बेट्स या ब्रिटिश शास्त्रज्ञांच्या नावावरून) म्हणतात.

फ्रित्स म्यूलर या जर्मन प्राणिविज्ञांना दक्षिण अमेरिकेत फुलपाखरांच्या अनुकरी जातींमध्ये बरीच गुतांगुत दिसून आली. ती बेट्सीय अनुकृतीच्या साच्यात न बसल्यामुळे, त्यांनी अनुकृतीचा दुसरा प्रकार पुढे मांडला. त्याला ‘म्यूलरीय अनुकृती’ म्हणतात. या अनुकृतीत दिसायला अगदी सारख्या आणि खाण्याला बेचव अशा अनेक वेगवेगळ्या जातींचा समावेश होतो. सगळ्यांचे रंग भयसूचक असतात आणि त्यांच्या अनिष्ट गुणधर्मांची एकाच वेळी जाहिरात होत असल्यामुळे भक्षकावर त्याचा हळूहळू का होईना परिणाम होतो व कोणत्याही एका जातीची वाजवीपेक्षा जास्त हानी होत नाही. अनेक रीतींनी अतिशय दूरचा संबंध असणाऱ्‍या गांधील माश्यांवर आढळणारे पिवळे आणि काळे पट्टे हे म्यूलरीय अनुकृतीचे एक उदाहरण आहे.

अनुकृतीची कारणे : अनुकृती उत्पन्न होण्याचे नैसर्गिक निवड हेच फक्त एक कारण आहे, असे वाइझमन यांनी प्रतिपादन केलेले आहे. निकट साम्य (उदा., पांढरी फुलपाखरे आणि हेलिकॉनिडी कुलातील घाणेरड्या चवीची फुलपाखरे यांत दिसून येणाऱ्‍या साम्यासारखे) नैसर्गिक निवडीच्या क्रियेवरच अवलंबून राहील. अर्थात प्रत्येक पिढीत ज्या व्यक्तींचे आदर्शाशी जास्त साम्य असेल त्याच व्यक्ती स्थूलमानाने पुनरुत्पादनाकरिता जिवंत राहतील आणि अशा प्रकारे हे साम्य, सुरूवातीला निस्संशय थोडे असले तरी प्रत्येक पिढीत वाढत जाऊन क्रमाक्रमाने सांप्रतच्या पूर्णावस्थेला पोहोचेल.

बेट्स यांनी फुलपाखरांच्या अनुकृतीचा दीर्घकाल अभ्यास करून काढलेले निष्कर्ष वरच्यासारखेच आहेत.

काहींच्या मताप्रमाणे अनुकृती उत्पन्न होण्याचे कारण पुढीलप्रमाणे आहे: फुलपाखरांतल्यासारखी अनुकारी रूपे, एखाद्या ठळक उत्परिवर्तनाने (आनुवंशिक लक्षणांमध्ये होणाऱ्‍या आकस्मित बदलाने, उत्परिवर्तन) उत्पन्न झाली असावीत आणि काही काळ दोन्ही रूपे एकाच वेळी अस्तित्वात असावीत; परंतु क्रमाक्रमाने जुने रूप नाहीसे झाले असावे. अशा प्रकारच्या तर्कामुळे पॉपिलिओ मेरोपमध्ये आढळणाऱ्‍या बहुरूपतेचा फार झाले तर खुलासा होईल; पण इतर बाबतींत तो लागू पडणार नाही. तथापि, आधुनिक मतप्रवाहाप्रमाणे अनुकृती उत्पन्न होण्याची गौण प्रवर्तक कारणे कोणतीही असली तरी नैसर्गिक निवड हे मुख्य होय यात शंका नाही.

लेखक :  ज. नी. कर्वे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate