অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अवशेषांगे

अवशेषांगे

लहान आणि अपूर्ण वाढ झालेल्या रचनांना किंवा अंगांना अवशेषांगे म्हणतात. आज पृथ्वीच्या पाठीवर आढळणारे जीव, प्राचीन काळी असणाऱ्या अगदी साध्या जीवांपासून क्रमाक्रमाने उत्पन्न झाले आहेत, या जैव क्रमविकासाच्या सिद्धांताची सत्यता शाबित करण्याकरिता जीवशास्त्रज्ञांनी वेळोवेळी पुढे मांडलेल्या पुराव्यांपैकी अवशेषांगे हा एक महत्त्वाचा पुरावा आहे.

बदलणाऱ्या किंवा भिन्न परिस्थितीला तोंड देण्याकरिता आणि परिस्थिती बदलल्यामुळे उत्पन्न झालेली नवी कार्ये पार पाडण्याकरिता प्राणी अचानक नवी इंद्रिये तयार करू शकत नाहीत; जुन्याच इंद्रियांत क्रमाक्रमाने बदल घडवून आणतात. त्याचप्रमाणे पुष्कळदा असे घडते की, एका विशिष्ट परिस्थितीत शरीरातील एखादी रचना उपयुक्त असते, परंतु भिन्न परिस्थितीत ती निरुपयोगी किंवा हानिकारक ठरते. अशा परिस्थितीत नैसर्गिक निवडीच्या क्रियेने निरुपयोगी किंवा हानिकारक रचना नाहीशा होण्याच्या मार्गाला लागतात. परंतु या रचनांवर पूर्वपरंपरेची पकड इतकी मजबूत असते की, त्या आकाराने जरी लहान होत गेल्या तरी तशाच रेंगाळत राहतात. एखादी रचना जाणाऱ्या रचनांच्या नाहीशी होण्याला हजारो वर्षे लोटावी लागतात. या नाहीशा होत जाणाऱ्या रचनांच्या वेगवेगळ्या अवस्था निरनिराळ्या प्राण्यांच्या शरीरांत आढळतात.

अशा तऱ्हेच्या ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी रचनांना 'अवशेषांगे' म्हणतात. पौर्वज प्रकारांत (पूर्वजांमध्ये) त्यांची वाढ पूर्ण झालेली असेल किंवा नसेल, त्या कार्यक्षम असतील अगर नसतील, पण हल्ली त्या निरुपयोगी स्वरूपात आढळतात.

अवशेषांगांची येथे फक्त थोडी ठळक उदाहरणेच दिली आहेत. निमेषक पटल (तिसरी पापणी) हे अवशेषी रचनेचे एक उदाहरण आहे. मासे, बेडूक, पुष्कळ सरीसृप (सरपटणारे प्राणी) आणि पक्षी यांत ते पूर्णावस्थेत आढळते. केरकचऱ्यापासून डोळ्याचे रक्षण करणे हे त्याचे कार्य होय. परंतु मनुष्य आणि त्याचे जवळचे नातेवाईक यांच्यात ते लहानशा वळीसारखे असते. या वळीला अर्धचंद्रवली म्हणतात. पापण्या व त्यांची उघडमीट करणारे स्नायू यांच्या विकासामुळे निमेषक पटल माणसाच्या शरीरात निरुपयोगी झाले आहे.

जमिनीवर राहणाऱ्या पुष्कळ पक्ष्यांची उडण्याची शक्ती नाहीशी झालेली आहे. न्यूझीलंडमध्ये आढळणारा किवी पक्षी याचे उदाहरण आहे. वरवर पाहिले तर या पक्ष्याच्या शरीरावर पंख आढळत नाहीत; पण काळजीपूर्वक निरीक्षण केल्यावर त्याच्या शरीरावरील केसांसारख्या पिसांखाली पंखांचे अल्पविकस (अतिशय थोडी वाढ) आढळतात. यांना उड्डाणांगे म्हणून काहीही महत्त्व नाही. न उडणाऱ्या पुष्कळ कीटकांत देखील पंखांचे अवशेष आढळतात.

माणसाला माकडाप्रमाणे शेपूट नसते, पण ज्या ठिकाणी ते असावयाचे त्या ठिकाणी माणसामध्ये चार अल्पविकसित मणक्यांची बनलेली एक पुच्छास्थी असते व तिला अल्पविकसित स्नायू जोडलेले असतात. माकडांना शेपूट हालविण्याकरिता ज्या स्नायूंचा उपयोग होतो तेच हे स्नायू होत, पण माणसात ते निरुपयोगी असतात.

गर्भावस्थेत माणसाला शेपूट असते पण गर्भाची पूर्ण वाढ झाल्यावर ते नाहीसे होते. मात्र कधीकधी ते तसेच राहते. प्रौढ मेंढीमध्ये जत्रुक (सरीचे वा मानेचे हाड) नसते, परंतु भ्रूणामध्ये ते उत्पन्न होऊन नंतर नाहीसे होते.

पुरुषांना असलेल्या अल्पविकसित स्तनांचा काही उपयोग नसतो, पण कधीकधी ते वाढून त्यात दूध उत्पन्न होते. काही स्त्रियांना स्तनांच्या कित्येक जोड्या असतात; निकृष्ट प्राण्यांप्रमाणेच या स्तनांच्या अग्रांच्या दोन ओळी असतात. विकास चालू असताना देवमाशांनी आपले राहण्याचे माध्यम आणि आहार बदलला. माध्यम बदलल्यामुळे मागचे पाय आणि त्यांना आधार देणाऱ्या श्रोणि-अस्थी (नितंबाची हाडे) नाहीशा झाल्या. देवमाशांत कधीकधी श्रोणि-अस्थींची एक जोडी आढळते पण तिचा पृष्ठवंशाशी

२. आ. १. कान हलविणारे स्नायू. माकडांना कान हलविण्याकरिता या स्नायूंचा उपयोग होतो. माणसात हे स्नायू अवशेषी आहेत. त्यांचा माणसाला उपयोग होत नाही. आ. २. दीर्घस्थायी शेपूट. माणसाच्या गर्भाला शेपूट असते. पुढे ते नाहीसे होते. पण कित्येकदा ते टिकून रहाते. माणसाला त्याचा काहीच उपयोग नसतो. आ. ३. स्तनांच्या जोड्या. कित्येकदा स्त्रियांना स्तनांच्या कित्येक जोड्या असतात. निकृष्ट प्राण्यांप्रमाणेच या स्तनांच्या अग्रांच्या दोन ओळी असतात.२. आ. १. कान हलविणारे स्नायू. माकडांना कान हलविण्याकरिता या स्नायूंचा उपयोग होतो. माणसात हे स्नायू अवशेषी आहेत. त्यांचा माणसाला उपयोग होत नाही. आ. २. दीर्घस्थायी शेपूट. माणसाच्या गर्भाला शेपूट असते. पुढे ते नाहीसे होते. पण कित्येकदा ते टिकून रहाते. माणसाला त्याचा काहीच उपयोग नसतो. आ. ३. स्तनांच्या जोड्या. कित्येकदा स्त्रियांना स्तनांच्या कित्येक जोड्या असतात. निकृष्ट प्राण्यांप्रमाणेच या स्तनांच्या अग्रांच्या दोन ओळी असतात.

(पाठीच्या कण्याशी) असणारा संबंध पूर्णपणे नाहीसा झालेला असतो. या अवशेषांचे टिकून राहणे चतुष्पादीय पूर्वजपरंपरा दर्शविते. त्याचप्रमाणे देवमाशाच्या भ्रूणाला दातांचे अंकुर असतात पण प्रौढ अवस्थेत दात केव्हाही नसतात. दातांचा अभाव आणि केवळ प्लवकांवरच (समुद्राच्या पाण्यात अथवा गोड्या पाण्यात तरंगणारे प्राणी आणि वनस्पती यांवरच) उपजीविका करण्याकरिता उत्पन्न झालेले तिमिशृंगास्थिपट्ट (देवमाशाच्या वरच्या जबड्याच्या आतल्या पृष्ठावर असणारे केराटिन या प्रथिनाचे कठीण पट्ट) या दोन्ही गोष्टी आहारात झालेला बदल दाखवितात.

माणसाचे आंत्रपुच्छ (आतड्यापासून निघणारी एक लहान बंद नळी, अ‍ॅपेंडिक्स), कान हालविणारे स्‍नायू, घोड्यांच्या पायांवरील फलकास्थी, स्फीनोडॉनाचा पीनिअल (तिसरा) नेत्र, अजगराच्या श्रोणि-अस्थी ही अवशेषांगांची आणखी काही उदाहरणे होत.

सगळीच अवशेषांगे निरुपयोगी असतात असे नाही. नाहीसे होण्याच्या वाटेवर असलेले अवशेषांग योग्य परिस्थितीत एखादे नवे कार्य करू लागते. उदा., कीटकवर्गाच्या डिप्टेरा या गणातील कीटकांच्या मागच्या पंखांच्या जोडीचा र्‍हास होऊन त्यांची संतोलक (तोल राखणारी) अंगे बनतात;कीटक उडत असताना त्यांच्या शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य ही अंग करतात.

लेखक : ज. नी. कर्वे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate