অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आकारजनन

आकारजनन

(मॉर्फोजेनेसिस). भिन्न भिन्न वनस्पती व प्राणी यांचे आकार, स्वरूप व संरचना इत्यादींतील तपशील लक्षात आल्यामुळे आपणास त्यांना परस्परांपासून वेगळे असे ओळखणे शक्य होते. वनस्पतींच्या व प्राण्यांच्या भिन्न अवयवांची वाढ होत असतानाच त्यांना विशिष्ट आकार, स्वरूप व संरचना प्राप्त होते. त्या वेळी त्या प्रक्रियेस आतून व बाहेरून चालना मिळते व त्यानुसार फरक पडतात; यासंबंधीचे विवरण, प्रयोग व निष्कर्ष यांचा अंतर्भाव ‘आकारजनन’ या जीवविज्ञानांतर्गत शाखेत केला जातो. प्रस्तुत नोंदीत वनस्पतींच्या आकारजननाचेच विवरण केलेले असून प्राण्यांसंबंधीच्या विवरणाकरिता ‘प्राण्यांचे आकारजनन’ ही स्वतंत्र नोंद पहावी.

प्रत्येक वनस्पतीचे भिन्न स्वरूप तिच्या नियंत्रक सामर्थ्याचा प्रत्यक्ष व दृश्य पुरावा मानला जातो. ह्यासंबंधीच्या माहितीचा उपयोग करून घेऊन वनस्पतींच्या अवयवांचे आकार, संरचना व कार्ये यांवर कृत्रिम उपायांनी नियंत्रण ठेवणे काही प्रमाणात शक्य झाले आहे.

वनस्पतींच्या अवयवांचा विकास होत असतानाच त्यांचे परस्पसंबध त्या व्यक्तीच्या जीवनाला उपयुक्त ठरतील अशी यंत्रणा असते. बहुधा सर्व अवयव सारख्याच वेगाने वाढतात, त्यामुळे स्वरूपात फारसा फरक पडत नाही. परस्परसंबंधामुळे आकारातील बदल नियमित व अपेक्षित असतो. खोडाच्या शेंड्यावरची कळी खालच्या कळ्यांच्या वाढीवर प्रभाव पाडते. बहुतेक वनस्पतींच्या विकासावस्थेत प्रारंभी दोन भिन्न व परस्पर विरूध्द गुणांची टोके असलेला अक्ष निर्माण होतो. याला ‘ध्रुवत्व’ म्हणतात. उच्च वनस्पतीत या अक्षाच्या एका टोकास ‘मूळ’ व दुसऱ्यास ‘प्ररोह’ म्हणतात. क्षुद्र वनस्पतीत हे लक्षण रंदुकावस्थेत (फलित अंदुकावस्थेत म्हणजे फलित स्त्रीप्रजोत्पादक पेशीत) आढळते. उच्च वनस्पतीत  पुनर्जननामध्ये नवीन फुटणारे अवयव वर सांगितलेल्या ध्रुवत्वाशी सुसंगत असतात. तसेच अक्षाच्या एका टोकाकडून दुसऱ्याकडे चयापचयाच्या (शरीरात सतत होणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींच्या ) प्रक्रियेच्या वेगात क्रमश: बदल होत गेलेला आढळतो व पदार्थाच्या स्थलांतरावरही ध्रुवत्वाचा प्रभाव पडलेला दिसतो. कृत्रिमरीत्या ध्रुवत्व बदलता येते. अक्षावर उगम पावणाऱ्या पार्श्विक (बाजूच्या) अवयवांची मांडणी अनियमित नसून त्यामध्ये भिन्न प्रकारची पण समात्रता (एकसारखेपणा) असते. उदा., खोडावरची पानांची मांडणी [ पर्णविन्यास] व फुलाच्या अक्षावरची पुष्पदलांची मांडणी [ फूल]. विकासावस्थेत भिन्न अवयवांत परस्परांपासून येण्यासारखे फरक पडतात. उदा., अक्षाच्या दोन्ही टोकांस कार्यानुरूप भिन्न प्रकारची इंद्रिये (उदा., पाने, फुले, मुळे इ.) निर्माण होतात. या प्रक्रियेस ‘प्रभेदन’ म्हणतात. वाढ व प्रभेदन साधारणपणे एकाच वेळी सूरू असतात. बाह्यस्वरूपाइतकेच महत्वाचे बदल शरीरावयवांच्या लहानमोठ्या घटकांत घडून येतात. या बदलांचे प्रकारआनुवंशिकतेवर अवलंबून असतात. तसेच ते बाह्य परिस्थितीमुळेही [ परिस्थितिविज्ञान] पडतात. शरीराच्या भागाचा लोप झाल्यास त्या जागी पुन्हा नवीन अवयव निर्माण होतात [ पुनर्जनन] व ही क्षमता अखंडपणे चालू राहते. पूर्ण विकसित कोशिकांपासून (शरीरातील सूक्ष्म घटकापासून, पेशींपासून) रसायनांच्या साहाय्याने नवीन वाढ उत्पन्न करता येते व त्यापासून पुढे संपूर्ण वनस्पती बनवता येते .[ ऊतक संवर्धन ].

कधीकधी वृध्दीतील नियंत्रणाचा लोप होऊन गाठी, गुल्म व कर्करोग यांसारखी वाढ उद्भवते. कीटकांच्या दंशामुळे किंवा कवक (बुरशीसारखी हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पती) व सूक्ष्मजंतू यांच्या संपर्काने आलेल्या पदार्थामुळे अशा प्रकारच्या निश्चित व विशिष्ट प्रतिक्रिया (उदा. मायफळातील मुकुटग्रंथी) होतात [गाठी, वनस्पतींच्या] . पाणी, तापमान, प्रकाश, यांत्रिक घटना, संप्रेरक द्रव्ये (हॉर्मोने) ,रसायने इ. बाह्य घटक व कोशिकांतील जनुके व रंगसूत्रे [ कोशिका, बहुगुणन] यांचा आकारजननात बराच मोठा वाटा असतो. उदा., इंडॉल ॲसिटिक अम्लामुळे (ऑक्सिन) कोशिकावरणाची लांबी वाढण्यास चालना मिळून प्रकाशामुळे व पृथ्वीच्या केंद्राकडे (प्रकाशानुवर्ती व गुरुत्वानुवर्ती;  वनस्पतींचे चलनवलन) वाढ होते, मुळाच्या विकासाला चालना मिळते व बिनबियांची फळे मिळतात. तसेच पाने व फळे  अपाच्छेदनाने पडून जाणे टाळता येते. [ अपाच्छेदन व पानझड].

लेखक : शं. आ. परांडेकर

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/1/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate