অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आय – आय

आय – आय

मॅलॅगॅसीमध्ये (मादागास्करमध्ये) आढळणारा हा सस्तन प्राणी लेमूरसारखा असतो [ लेमूर]. प्राणिशास्त्रातले याचे नाव डॉबेंटोनिया मादागास्करिएन्सिस आहे. याच्या अंगावर मऊ फर (आखूड, रेशमासारखे मऊ, दाट केस) असून रंग काळा असतो. डोके वाटोळे व रुंद असते; पुढचे दात कृंतकाच्या (भक्ष्य कुरतडणाऱ्या प्राण्याच्या) पुढच्या दातांसारखे पण मोठे व छिन्नीसारखे असतात; डोळे व कान मोठे असतात; हातांची बोटे लांब असून त्यांच्यावर अणकुचीदार नखर (नख्या) असतात; मधले बोट तारेसारखे बारीक असते; पायाचा अंगठा पायाच्या इतर बोटांसमोर आणता येतो; त्यावर चपटे नख असून बाकीच्या बोटांवर नखर असतात. कवटी, पाय आणि आंतरेंद्रियांची रचना, लेमूरांशी असलेला यांचा संबंध दर्शवितात. शेपूट लांब व झुपकेदार असते.

हा वृक्षवासी प्राणी रात्रिंचर असून दाट जंगलात रहातो. यांची जोडपी असतात, पण एकेकटे प्राणीही भटकताना आढळतात. उसाचा रस, बांबूच्या आतला मगज, फळे, अंडी वगैरे यांचे भक्ष्य होय; लाकूड पोखरणारे कीटक व सुरवंटदेखील तो खातो. हाताच्या बोटांनी लाकूड किंवा झाडाच्या फांद्या ठोकून त्या पोकळ आहेत असे वाटले, तर आपल्या छिन्नीसारख्या दातांनी तो वरचे लाकूड फोडून काढतो व आपले तारेसारखे मधले बोट पोकळीत फिरवून सुरवंट व किडे ओढून बाहेर काढतो. उसावरची सालदेखील तो अशीच दातांनी सोलून काढतो.

मॅलॅगॅसीमधील मूळ रहिवाशांना या प्राण्यांबद्दल फार पूज्यभाव व आदर वाटतो. आपले पूर्वज यांच्या शरीरात वास करतात अशी त्यांची समजूत आहे.

लेखक :  ज. नी. कर्वे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/1/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate