मांसाहारी गणातील (कार्निव्होरा) मार्जार कुलातला (फेलिडी) सस्तन प्राणी. याला प्यूमा, माउंटन लायम (गिरिकेसरी पर्वतावरचा सिंह) अशीही नावे आहेत. सबंध दक्षिण व मध्य अमेरिका, उत्तर अमेरिकेचा अगदी दूरचा भाग आणि कॅनडा या प्रदेशांत हा प्राणी आढळतो.
पूर्ण वाढ झालेल्या कूगराची लांबी तीन मी.पर्यंत असते; शेपटी ९० सेंमी. लांब असते; वजन ९० किग्रॅ.पर्यंत असते; नर मादीपेक्षा मोठा असतो. याचा रंग सिंहासारखा पिंगट असतो. कान आणि शेपटीचे टोक काळे असू शकते; पोट पांढरे असते.
कूगर झाडावर चढण्यात पटाईत आहे. हा मांसाहारी असून हरणांसारख्या मोठ्या प्राणांची शिकार करतो, परंतु उंदरांसारखे लहान प्राणीही याला खायला चालतात. पाळीव जनावरांवरदेखील हा हल्ला करतो; अगदी थोड्या वेळात १०–१२ मेंढ्या किंवा बकऱ्या तो सहज मारतो. याला एका वेळी खायला बरेच मांस लागते.
मादीची २-३ वर्षांनी एकदा वीण होते. गर्भावधी १३-१४ आठवड्यांचा असून मादी एका वेळी २-३ पिल्लांना जन्म देते. पिल्ले जन्माच्या वेळी आंधळी असून त्यांच्या अंगावर ठिपके व पट्टे आणि शेपटीवर वलये असतात, पण त्यांची जसजशी वाढ होत जाते तसतसे हे ठिपके, पट्टे आणि वलये नाहीशी होतात. मादी पिल्लांना ४– ६ आठवड्यांनी पाजणे बंद करते, पण ती जवळजवळ प्रौढ होईपर्यंत आईबरोबरच असतात.
----------------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 4/26/2020
पायांना खूर असलेल्या अपरास्तनी (ज्यांच्या गर्भाला ...
सस्तन प्राण्यांच्या मुस्टेलिडी कुलातील हा मांसाहार...
हा मांसाहारी सस्तन प्राणी मुस्टेलिडी कुलाच्या मेलि...
हा एक शिशुधानस्तनी प्राणी (पिल्लू बाळगण्याकरिता पो...